प्रतिक्रिया

लेखनविषयक शासन-निर्णयावरील प्रतिक्रिया

लेखनविषयक शासननिर्णय २००९ हा 'भाषा आणि जीवन'च्या संपादकांनी आपल्या वाचकांसमोर सविस्तर ठेवण्याचे ठरविले. (हिवाळा २०१०, उन्हाळा २०१० अंक पाहावेत.) याचा हेतू हा की त्यांचे लक्ष वेधावे आणि त्याबद्दल प्रचलित हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकव्यवहार आणि यांत्रिक संदेशग्रहण करणार्‍या मंडळींच्या व्यवहारात एकसूत्रीपणा यायला मदत व्हावी. लेखनविषयक चर्चा म्हटले म्हणजे शुद्धलेखनाची चर्चा सामान्यत: आपल्या डोळ्यांसमोर येते. (उदा० कवि की कवी, ब्राह्मण की ब्राम्हण, विसांवा की विसावा). या ठिकाणी मात्र ही चर्चा दृश्य आकारांच्या अधिक मूर्त पातळीवर उतरली आहे.अशोक रा० केळकर

हिवाळा २०१० अंक : शासनसंमत मराठी वर्णमाला

संदर्भ - हिवाळा २०१० अंक : शासनसंमत मराठी वर्णमाला
उक्त लेखननियमांत पुढील अक्षरांची शिफारस आढळते : सख्खा (पृ० ७६), पुठ्ठा, बुढ्ढा (पृ० ८०). हे लेखन अन्य सदृश अक्षरांच्या लेखनाशी विसंगत आहे. उदा० बुद्धी (पृ० ७८) : हा शब्द 'सख्खा' शब्दानुसार 'बुध्धी' असा लिहावा लागेल. अल्पप्राण व्यंजन (क्, ग्, च्, ज्...) आणि महाप्राण व्यंजन (ख्, घ्, छ्, झ्र....) यांच्या संयोगाक्षरांत सर्वत्र असेच लेखन करण्याचा प्रसंग येईल. (स्वछ्छ, उथ्थान, शुध्ध, ...)
वस्तुत: महाप्राण व्यंजनाचे द्वित्व करण्याच्या प्रसंगी पहिला घटक उच्चारत: अल्पप्राण होतो. रूढ लेखन तदनुसार आहे. शासनसंमत लेखनात विवाद्य जोडाक्षरे (ख्ख, ठ्ठ, ढ्ढ) अन्य सदृश जोडाक्षरांशी विसंगत आहेत.