उन्हाळा २०१०

पुढादीगणातील शब्द

पुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.

विल्यम सफायर

'वॉटरबोर्डिंग्ज' (Waterboardings) हा शब्द ऐकला आहे? दहशतवाद्यांच्या छावण्यांमध्ये त्यांना बोलते करण्यासाठी छळण्याचा हा एक मार्ग आहे. सफायर यांनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता. वॉटरबोर्डिंग म्हणजे एका सी-सॉसारख्या फळीवर कैद्याला जखडायचे आणि मग त्याचे डोळे पाण्याखाली असे दाबायचे, की त्याला आपण बुडतोय असे वाटायला लागेल. (सुप्रसिद्ध राजकीय व भाषाविषयक स्तंभलेखक, पुलित्झर पारितोषिक विजेते, आणि रिचर्ड निक्सन यांचे काही काळ सल्लागार असलेले विल्यम सफायर यांचे २५ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.)

वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ

मराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. स्वतंत्र 'मराठी विद्यापीठ' या आपल्या संपादकीयावरील डॉ० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद वाचला. (भाषा आणि जीवन, हिवाळा २०१०)

मुरुडची भाषा

नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.

विनायक नारायण बाळ

मराठी विद्यापीठ

'भाषा आणि जीवन'मध्ये अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. असे लेख संपादन करून त्यांची विषयवार विभागणी करून ते प्रसिद्ध पुस्तकरूपाने झाले तर मराठीच्या अभ्यासकांना ते संकलित स्वरूपात मिळतील. अधिक संशोधनासाठी ते उपयुक्त ठरतील. असे नवीन विचारधन विस्मृतीमध्ये जाऊ नये यासाठी असा प्रकल्प याच त्रैमासिकाने योजावा असे मला वाटते.सदाशिव देव

मानवी भाषेचे वय - अज्ञात!

ध्वनिविशेषांची मर्यादा ओलांडून माणूस पहिले-वहिले मोडके-तोडके शब्द कधी वाणीबद्ध करू लागला, त्यातून शब्दसंकुल कसे करू लागला, वाक्यरचना आणि शब्दांची संवादी योजना करू लागला, यांबद्दलचे संशोधन अजून बरेच प्राथमिक अवस्थेत आहे. जुने हाडांचे सापळे वा कवटया सापडू शकतात, पण जुने शब्द कसे सापडणार? ते तर केव्हाच - म्हणजे बोलता बोलताच हवेत विरून जात होते. (शब्द बापुडे केवळ वारा!) त्यामुळे प्राचीन माणूस बोलायला लागल्यापासून ते त्या भाषेला संकेत संवादाचे रूप प्राप्त होईपर्यंत नक्की किती वर्षे गेली असावीत, हे अजूनतरी निश्चितपणे सांगता आलेले नाही.

- कुमार केतकर,

लेखनविषयक शासन-निर्णयावरील प्रतिक्रिया

लेखनविषयक शासननिर्णय २००९ हा 'भाषा आणि जीवन'च्या संपादकांनी आपल्या वाचकांसमोर सविस्तर ठेवण्याचे ठरविले. (हिवाळा २०१०, उन्हाळा २०१० अंक पाहावेत.) याचा हेतू हा की त्यांचे लक्ष वेधावे आणि त्याबद्दल प्रचलित हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकव्यवहार आणि यांत्रिक संदेशग्रहण करणार्‍या मंडळींच्या व्यवहारात एकसूत्रीपणा यायला मदत व्हावी. लेखनविषयक चर्चा म्हटले म्हणजे शुद्धलेखनाची चर्चा सामान्यत: आपल्या डोळ्यांसमोर येते. (उदा० कवि की कवी, ब्राह्मण की ब्राम्हण, विसांवा की विसावा). या ठिकाणी मात्र ही चर्चा दृश्य आकारांच्या अधिक मूर्त पातळीवर उतरली आहे.अशोक रा० केळकर

हिवाळा २०१० अंक : शासनसंमत मराठी वर्णमाला

संदर्भ - हिवाळा २०१० अंक : शासनसंमत मराठी वर्णमाला
उक्त लेखननियमांत पुढील अक्षरांची शिफारस आढळते : सख्खा (पृ० ७६), पुठ्ठा, बुढ्ढा (पृ० ८०). हे लेखन अन्य सदृश अक्षरांच्या लेखनाशी विसंगत आहे. उदा० बुद्धी (पृ० ७८) : हा शब्द 'सख्खा' शब्दानुसार 'बुध्धी' असा लिहावा लागेल. अल्पप्राण व्यंजन (क्, ग्, च्, ज्...) आणि महाप्राण व्यंजन (ख्, घ्, छ्, झ्र....) यांच्या संयोगाक्षरांत सर्वत्र असेच लेखन करण्याचा प्रसंग येईल. (स्वछ्छ, उथ्थान, शुध्ध, ...)
वस्तुत: महाप्राण व्यंजनाचे द्वित्व करण्याच्या प्रसंगी पहिला घटक उच्चारत: अल्पप्राण होतो. रूढ लेखन तदनुसार आहे. शासनसंमत लेखनात विवाद्य जोडाक्षरे (ख्ख, ठ्ठ, ढ्ढ) अन्य सदृश जोडाक्षरांशी विसंगत आहेत.

जागतिकीकरणाच्या संदर्भात मराठी अस्मिता

अस्मिता याचा अर्थ आपल्या सत्त्वाची जाणीव असणे. अभिमान याचा अर्थ कदाचित गर्व असाही होईल. त्यामध्ये दंभ असू शकतो. दंभ अगर गर्वामध्ये अहंकार आहे. अस्मितेमध्ये सत्त्व आहे. भाषिक अस्मिता याचा अर्थ असाही होऊ शकतो की, माझ्या सत्त्वाची मला जाणीव आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व ही माझी 'ओळख' आहे. ती पुसताना वेदना होणार आहेत. 'विज्ञान आणि तंत्रज्ञाना'त झालेल्या क्रांतीमुळे, आधुनिक मानवाला आपल्या 'संस्कृती'चा शोध घेताना इतरांकडून घेण्याची आपली क्षमता किती आहे, यावर 'अस्तित्व' अवलंबून आहे. 'अस्तित्व' टिकवल्यानंतरच 'अस्मिते'चा जन्म होतो.

आग्रह आणि दुराग्रह

भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. भाषा ही केवळ उच्चारलेल्या किंवा छापलेल्या शब्दांनी बनत नाही. भाषा हा तुम्ही-आम्हीच नाही तर अनेक वर्षे आपल्या पूर्वजांनी केलेला विचार आहे, जगलेले आयुष्य आहे. त्यामुळे आपण मराठीविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या जगण्याविषयी बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी बोलतो. इंग्रजीने तुम्हां-आम्हांला पुष्कळ दिले हे खरे, मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळणार्‍या लोकांविषयीची तक्रार आहे ती इंग्रजीशी भांडण आहे म्हणून नाही, तर ती माणसे कुठेच रुजत नाहीत म्हणून. ती धड इंग्रजीही होऊ शकत नाहीत आणि मराठीशीही त्यांचा संबंध तुटलेला असतो!पुष्पा भावे