मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे
मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात. नकारात्मक वाक्यांतील क्रियापदांच्या रूपाबद्दल येथे मी वर्णनात्मक विवेचन करणार आहे.
मराठीमधील सकारात्मक वाक्यांमधील क्रियापदांची रूपे पंतव्याकरणातील प्रत्ययमाळांपासून चांगल्या प्रकारे वर्णिलेली आहेत. मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात, असा विचार करता 'काळ' कल्पना उपयोगी पडत नाही, तर रूपात्मक 'आख्याते' उपयोगी पडतात. काळ/अर्थ, लिंग, वचन आणि पुरुष हे आख्यातरूपाचे धर्म आहेत. अनेक व्याकरणकारांनी फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी:
तक्ता १ : सकारात्मक वाक्यांतील आख्यातरूपे
क्रमांक | आख्यातवर्ग | अर्थ | अकर्मक उदाहरण | सकर्मक उदाहरण |
|
||||
१ | प्रथम त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जातो | तू पोळ्या करतेस |
२ | द्वितीय त-आख्यात | संकेतार्थ | जर तो जाता... | जर तू पोळ्या करतेस... |
३ | ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला | तू पोळ्या केल्या(स) |
४ | व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे | तू पोळ्या कराव्या(स) |
५ | ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जाई | तू पोळ्या करीस |
६ | ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो जावो | तू पोळ्या कर |
७ | ईल-आख्यात | भविष्यकाळ | तो जाईल | तू पोळ्या करशील |
८ | च-आख्यात | कर्तरी रीति- भूत/भावे- कर्मणी विध्यर्थ | तो जायचा/ त्याने जायचे | तू पोळया करायचीस/ तू पोळया करायच्या(स) |
वरील सूचीमध्ये 'तू पोळया केल्या(स)' वगैरे, यातील (स) हा वैकल्पिक आहे. याला कर्ता-कर्म आणि कर्ता-भावे संकर प्रयोग म्हणतात. या लेखासाठी त्या वैशिष्टयाकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. * यात पुरुष हा एकच धर्म क्रियापदासाठी 'आख्यात'रूपात खास दिसतो. बाकी सर्व धर्म अन्य प्रकारच्या शब्दरूपांत कधीकधी दिसतात. पुरुष म्हणजे काय? मी/आम्ही, तू/तुम्ही, तो, ती, ते/ते, त्या, ती, म्हणजे बोलणारी, ऐकणारी, अन्य व्यक्ती यांच्या विवक्षेने शब्दाचे रूप बदलणे. अशा परिस्थितीत कधीच न बदलणारे रूप म्हणजे 'आख्यात' नव्हेच. आता येथे या सर्व उदाहरणांची नकारात्मक वाक्ये बघू:
तक्ता २ : नकारात्मक वाक्यांतील आख्यातरूपे
क्रमांक | आख्यातवर्ग | अर्थ | अकर्मक उदाहरण | सकर्मक उदाहरण |
|
||||
१ | प्रथम त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जात नाही / तो नाही जात (सकारात्मक 'जातो') | तू पोळ्या करत नाहीस (सकारात्मक 'करतेस’) |
२ | द्वितीय त-आख्यात | संकेतार्थ | जर तो न/नाही जाता... सकारात्मकाप्रमाणेच | जर तू पोळ्या न/ नाही करतेस... (सकारात्मकाप्रमाणेच) |
३ | ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला नाही/ नाही गेला (सकारात्मकाप्रमाणेच) | तू पोळ्या नाही केल्या(स)/ केल्या नाही(स) (सकारात्मकाप्रमाणेच) |
४ | व-आख्यात | विध्यर्थ | त्याने न जावे/जाऊ नये (सकारात्मकाप्रमाणे वैकल्पिक) | तू पोळ्या कराव्या(स) / करू नयेस (सकारात्मकाप्रमाणे वैकल्पिक) |
५ | ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जात नसे (सकारात्मकात "जाई") | तू पोळ्या करत नसस (सकारात्मकात करीस) |
६ | ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो न जावो (सकारात्मकाप्रमाणेच) | तू पोळ्या करू नकोस (सकारात्मकात ‘कर’) |
७ | ईल-आख्यात | भविष्यकाळ | तो नाही जाईल/ तो जाणार नाही (सकारात्मकाप्रमाणेच वैकल्पिक) | तू पोळ्या नाही करशील/ करणार नाहीस (सकारात्मकाप्रमाणेच वैकल्पिक) |
८ | च-आख्यात | कर्तरी रीति- भूत/भावे- कर्मणी विध्यर्थ | तो नाही जायचा/ त्याने नाही जायचे (सकारात्मकाप्रमाणेच) | तू पोळ्या नाही करायचीस/ तू पोळ्या नाही करायच्या(स) (सकारात्मकाप्रमाणेच) |
नकारात्मक वाक्यरचना असेल तर काही काही आख्यातांत क्रियापदरूप मराठीत दिसत नाही. अशा ठिकाणी सकारात्मकात ज्या धातूचे आख्यातरूप असते, नकारात्मकात त्या धातूचे कृदन्तरूप दिसते. नाही, नये, नको, वगैरे अशी आख्यातरूपे दिसतात. म्हणजे मराठीत न-असणे (न-अस्/आह् धातू) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल. ही अस्/आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहे. नाही, नये, नको, वगैरे याची रूपे एका तक्त्यात देता येतील. *
नकारापुढे विशिष्ट आख्यात न दिसणे हा प्रकार अन्य भाषांतही दिसतो.
संस्कृतात त्याची झलक दिसते. कुरु/मा कार्षी: [म्हणजे कर/करू नकोस (पाणिनीची अष्टाध्यायी)]
इंग्रजीत हा प्रकार दिसतो, पण मूलत: वेगळा आहे:
is /is not; was/was not; should /should not; does/does not....
या 'सहायक' (ऑक्झिलियरी) धातूंच्या सूचीतले जे धातू आहेत त्यांची रूपे सर्व आख्यातांत सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यांत आढळतात. त्या सूचीवेगळे जे धातू आहेत, त्यांची आख्यातरूपे फक्त सकारात्मक वाक्यांतच दिसतात. नकारात्मक वाक्यांत do या सहायक धातूचीच आख्यातरूपे दिसतात:
goes/does not go; went/did not go (येस्पेर्सेन)
अरबी भाषेत असा प्रकार फार दिसतो की अर्थ जमवायचा असेल तर एका आख्याताचे नकारात्मक रूप दुसर्याच आख्यातात करावे लागते.
कतब/लम् तक्तुब् (लिहिले/नाही लिहिले) (राइट्विक्)
पण यात फरक हा, की ते वेगळे आख्यातरूप मूळ धातूचेच असते, मराठीत मात्र कुठल्याही आख्यातात मूळ सकारात्मक धातू जर नकारात्मकात बदलला, तर त्याचे कृदन्तरूप होते; आख्यातशब्द वेगळाच होतो.
समारोप : या विवेचनाला अनुसरून पुढील प्रस्ताव मराठी व्याकरणासाठी विचाराधीन व्हावा - मराठीत न-असणे (न-अस्/आह् धातू- नाही, नये, नको, वगैरे रूपे) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल. ही अस्/आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहेत.
संदर्भ
परब, प्रकाश. 2002. मराठी व्याकरणाचा अभ्यास : ओरिएंट लाँगमन, मुंबई.
माङिलुङ्। पाणिनीय सूत्र 3.3.175 कशिकावृत्ती (1983 संस्करण) : चौखम्भा संस्कृत प्रकाशन, वाराणसी
Jespersen, O. 1933. Essentials of English Grammar. (Chapter 28 : Affirmation, Negation, Questions. ) : Routledge, : New York, USA
Wrightwiok J.; Gaafar Mahmoud. 1998. Arabic Verbs and Essentials of Grammar : Passport Books, Chicago, USA
धनंजय वैद्य
सहायक प्राध्यापक, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, यु०एस०ए०
*नसणे (धातू नस्) हा वेगळा प्रकार आहे. त्याची सर्व आख्यातांत पूर्ण रूपे सापडतात. ''नये''ची पुरातन व्युत्पत्ती ''न येणे'' पासून आहे. या गोष्टीचे आधुनिक मराठी व्याकरणाशी काही कर्तव्य नाही.