दिवाळी २००९

मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे

मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात. नकारात्मक वाक्यांतील क्रियापदांच्या रूपाबद्दल येथे मी वर्णनात्मक विवेचन करणार आहे.

मराठीमधील सकारात्मक वाक्यांमधील क्रियापदांची रूपे पंतव्याकरणातील प्रत्ययमाळांपासून चांगल्या प्रकारे वर्णिलेली आहेत. मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात, असा विचार करता 'काळ' कल्पना उपयोगी पडत नाही, तर रूपात्मक 'आख्याते' उपयोगी पडतात. काळ/अर्थ, लिंग, वचन आणि पुरुष हे आख्यातरूपाचे धर्म आहेत. अनेक व्याकरणकारांनी फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी:

तक्ता : सकारात्मक वाक्यांतील आख्यातरूपे

 

क्रमांक आख्यातवर्ग अर्थ अकर्मक उदाहरण सकर्मक उदाहरण

प्रथम त-आख्यात  वर्तमानकाळ तो जातो तू पोळ्या करतेस
द्वितीय त-आख्यात संकेतार्थ जर तो जाता... जर तू पोळ्या करतेस...
ल-आख्यात भूतकाळ तो गेला तू पोळ्या केल्या(स)
व-आख्यात विध्यर्थ त्याने जावे तू पोळ्या कराव्या(स)
ई-आख्यात रीतिभूतकाळ तो जाई तू पोळ्या करीस
ऊ-आख्यात आज्ञार्थ तो जावो तू पोळ्या कर
ईल-आख्यात भविष्यकाळ तो जाईल तू पोळ्या करशील
च-आख्यात कर्तरी रीति- भूत/भावे- कर्मणी विध्यर्थ तो जायचा/ त्याने जायचे तू पोळया करायचीस/ तू पोळया करायच्या(स)

वरील सूचीमध्ये 'तू पोळया केल्या(स)' वगैरे, यातील (स) हा वैकल्पिक आहे. याला कर्ता-कर्म आणि कर्ता-भावे संकर प्रयोग म्हणतात. या लेखासाठी त्या वैशिष्टयाकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. * यात पुरुष हा एकच धर्म क्रियापदासाठी 'आख्यात'रूपात खास दिसतो. बाकी सर्व धर्म अन्य प्रकारच्या शब्दरूपांत कधीकधी दिसतात. पुरुष म्हणजे काय? मी/आम्ही, तू/तुम्ही, तो, ती, ते/ते, त्या, ती, म्हणजे बोलणारी, ऐकणारी, अन्य व्यक्ती यांच्या विवक्षेने शब्दाचे रूप बदलणे. अशा परिस्थितीत कधीच न बदलणारे रूप म्हणजे 'आख्यात' नव्हेच. आता येथे या सर्व उदाहरणांची नकारात्मक वाक्ये बघू:

तक्ता २ : नकारात्मक वाक्यांतील आख्यातरूपे 

 
क्रमांक आख्यातवर्ग अर्थ अकर्मक उदाहरण सकर्मक उदाहरण

प्रथम त-आख्यात          वर्तमानकाळ तो जात नाही / तो नाही जात (सकारात्मक 'जातो')   तू पोळ्या करत नाहीस   (सकारात्मक 'करतेस’)
द्वितीय त-आख्यात संकेतार्थ जर तो न/नाही जाता... सकारात्मकाप्रमाणेच जर तू पोळ्या न/  नाही करतेस... (सकारात्मकाप्रमाणेच)
ल-आख्यात भूतकाळ तो गेला नाही/ नाही गेला (सकारात्मकाप्रमाणेच) तू पोळ्या नाही केल्या(स)/ केल्या नाही(स) (सकारात्मकाप्रमाणेच)  
व-आख्यात विध्यर्थ त्याने न जावे/जाऊ नये (सकारात्मकाप्रमाणे वैकल्पिक)                     तू पोळ्या कराव्या(स) / करू नयेस (सकारात्मकाप्रमाणे वैकल्पिक)  
ई-आख्यात रीतिभूतकाळ तो जात नसे (सकारात्मकात "जाई") तू पोळ्या करत नसस (सकारात्मकात करीस)
ऊ-आख्यात आज्ञार्थ तो न जावो (सकारात्मकाप्रमाणेच)   तू पोळ्या करू नकोस (सकारात्मकात ‘कर’)  
ईल-आख्यात भविष्यकाळ तो नाही जाईल/     तो जाणार नाही      (सकारात्मकाप्रमाणेच वैकल्पिक) तू पोळ्या नाही करशील/ करणार नाहीस (सकारात्मकाप्रमाणेच वैकल्पिक)
च-आख्यात कर्तरी रीति- भूत/भावे- कर्मणी विध्यर्थ तो नाही जायचा/ त्याने नाही जायचे (सकारात्मकाप्रमाणेच) तू पोळ्या नाही करायचीस/ तू पोळ्या नाही करायच्या(स) (सकारात्मकाप्रमाणेच)

  नकारात्मक वाक्यरचना असेल तर काही काही आख्यातांत क्रियापदरूप मराठीत दिसत नाही. अशा ठिकाणी सकारात्मकात ज्या धातूचे आख्यातरूप असते, नकारात्मकात त्या धातूचे कृदन्तरूप दिसते. नाही, नये, नको, वगैरे अशी आख्यातरूपे दिसतात. म्हणजे मराठीत न-असणे (न-अस्/आह् धातू) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल. ही अस्/आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहे. नाही, नये, नको, वगैरे याची रूपे एका तक्त्यात देता येतील. *

नकारापुढे विशिष्ट आख्यात न दिसणे हा प्रकार अन्य भाषांतही दिसतो.

संस्कृतात त्याची झलक दिसते. कुरु/मा कार्षी: [म्हणजे कर/करू नकोस (पाणिनीची अष्टाध्यायी)]

इंग्रजीत हा प्रकार दिसतो, पण मूलत: वेगळा आहे:
 is /is not; was/was not; should /should not; does/does not....

या 'सहायक' (ऑक्झिलियरी) धातूंच्या सूचीतले जे धातू आहेत त्यांची रूपे सर्व आख्यातांत सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यांत आढळतात. त्या सूचीवेगळे जे धातू आहेत, त्यांची आख्यातरूपे फक्त सकारात्मक वाक्यांतच दिसतात. नकारात्मक वाक्यांत do या सहायक धातूचीच आख्यातरूपे दिसतात:

goes/does not go; went/did not go (येस्पेर्सेन)

अरबी भाषेत असा प्रकार फार दिसतो की अर्थ जमवायचा असेल तर एका आख्याताचे नकारात्मक रूप दुसर्‍याच आख्यातात करावे लागते.

कतब/लम् तक्तुब् (लिहिले/नाही लिहिले) (राइट्विक्)

 पण यात फरक हा, की ते वेगळे आख्यातरूप मूळ धातूचेच असते, मराठीत मात्र कुठल्याही आख्यातात मूळ सकारात्मक धातू जर नकारात्मकात बदलला, तर त्याचे कृदन्तरूप होते; आख्यातशब्द वेगळाच होतो.

समारोप : या विवेचनाला अनुसरून पुढील प्रस्ताव मराठी व्याकरणासाठी विचाराधीन व्हावा - मराठीत न-असणे (न-अस्/आह् धातू- नाही, नये, नको, वगैरे रूपे) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल. ही अस्/आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहेत.

संदर्भ
परब, प्रकाश. 2002. मराठी व्याकरणाचा अभ्यास : ओरिएंट लाँगमन, मुंबई.
माङिलुङ्। पाणिनीय सूत्र 3.3.175 कशिकावृत्ती (1983 संस्करण) : चौखम्भा संस्कृत प्रकाशन, वाराणसी
Jespersen, O. 1933. Essentials of English Grammar. (Chapter 28 : Affirmation, Negation, Questions. ) : Routledge, : New York, USA
Wrightwiok J.; Gaafar Mahmoud. 1998. Arabic Verbs and Essentials of Grammar : Passport Books, Chicago, USA

धनंजय वैद्य
सहायक प्राध्यापक, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, यु०एस०ए०
*नसणे (धातू नस्) हा वेगळा प्रकार आहे. त्याची सर्व आख्यातांत पूर्ण रूपे सापडतात. ''नये''ची पुरातन व्युत्पत्ती ''न येणे'' पासून आहे. या गोष्टीचे आधुनिक मराठी व्याकरणाशी काही कर्तव्य नाही.

स्तिमित करणारा बौद्धिक आवाका

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.(परीक्षित पुस्तक : रुजुवात - अशोक रा० केळकर. लोकवाङ्मय गृह, मुंबई. २००८. पृष्ठे २४+३१६. किंमत रु० ६००/-)

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.

डॉ० केळकरांची प्रज्ञा अनेक विद्याशाखांत अधिकारवाणीने संचार करताना दिसते. बहुतेकांना त्यांची ओळख एक श्रेष्ठ भाषावैज्ञानिक म्हणून असते. या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली आहे. पण भाषाविज्ञानाच्या क्षेत्राबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी अतिशय सूक्ष्मदर्शी, अंतर्दृष्टियुक्त लिखाण केले आहे. या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामगिरीच्या संदर्भात एक मार्मिक विधान प्रा० मे०पुं० रेगे यांनी केले आहे. ते या संग्रहाच्या 'भलावणीत' (ब्लर्ब) उद्धृत केलेले आहे. प्रा० रेगे म्हणतात, ''तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास इत्यादी अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे (डॉ० अशोक केळकर) अधिकारी पंडित (आहेत). डॉ० केळकरांच्या ''मिस्टिकल अनुभवाकडे पाहण्याची नवी दृष्टी'' देणार्‍या लेखाच्या संदर्भात प्रा० रेगे यांनी हे विधान केले. हे लेखन नंतर 'भेदविलोपन' या पुस्तिकेद्वारे वाचकांना उपलब्ध झाले. ते साहित्य-समीक्षक आहेत, साहित्य मीमांसक आहेत, त्यांना संगीतमीमांसक (म्यूझिकॉलॉजिस्ट) म्हणून संबोधिता येईल अशा प्रकारचे त्यांचे संगीतविषयक चिंतन आहे. नृत्य, शिल्प, वास्तुकला अशा कलाप्रकारांवर त्यांनी त्यांच्या तलस्पर्शी, सूक्ष्मदर्शी आणि अंतर्दृष्टियुक्त चिंतनाने वाचकाला त्या-त्या कलांच्या स्वरूपाबद्दल नव्याने विचार करायला लावील अशा प्रकारचे लिखाण केलेले आहे.

युरोपियन इतिहासामधील विद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या (रिनॅसन्सच्या) काळात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होती, ज्यांना आदराने 'रिनॅसन्समॅन' म्हटले जाई. मानव्य विद्यांच्या अनेक शाखांतील त्यांचा अधिकार सर्वमान्य असे. डॉ० केळकरांकडे पाहिले की ते आपल्या काळातील 'रिनॅसन्समॅन'च आहेत असेच त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते.

डॉ० केळकर स्वत: उत्तम शिक्षक होते आणि शिक्षणप्रक्रियेतही त्यांना विशेष रस होता. प्रस्तुत संग्रहामध्येही 'शिक्षणाचे एक माध्यम - कला', 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' या लेखांतून किंवा व्यावहारिक समीक्षा या चौथ्या विभागातील 'उपरी भाषा आणि थलकरी भाषा : लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'च्या संदर्भात' या लेखाच्या इतिकथनात जे संदर्भ दिलेले आहेत ते ध्यानात घेतले तरी त्यांची शिक्षकाची भूमिका कळून येते. असेही म्हणता येईल की या ग्रंथातील अनेक लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्म, तरल अशा प्रकारचे विश्लेषण करीत असतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतात. तेव्हाही विद्यार्थ्यांना नव्या दिशांनी विचार करायला लावणार्‍या शिक्षकाचे ते प्रश्न आहेत असेच जाणवते.

या ग्रंथामध्ये संग्रहित केलेल्या लेखांचे वर्गीकरण डॉ० केळकर यांनी चार विभागांत केले आहे. पहिला विभाग सैद्धांतिक समीक्षेचा आहे. यामध्ये डॉ० केळकर यांनी कविता ('कवितेचे असतेपण' - १९६९), 'कवितेचे सांगतेपण, करतेपण' (१९८३), 'शैली आणि तंत्र' (१९८५), 'भाषा आणि साहित्य' (१९७०,८१) 'कलावती वाणी : बोलणे, म्हणणे, गाणे' (१९९६) हे साहित्यविषयक लेख आहेत. त्याचप्रमाणे नाटक या विषयावर 'नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास' (१९९६) आणि 'नाटक : एक होणे' (१९८७). याचबरोबर संगीत आणि नृत्य यांवरही दोन लेख आहेत. यांपैकी 'कवितेचे असतेपण' हा विशेष महत्त्वाचा लेख आहे. कवितेच्या असतेपणाचा प्रश्न चार प्रश्नमालिकांत दडलेला आहे, असे डॉ० केळकर मानतात. या चार प्रश्नमालिका

१) स्वत्वाचा प्रश्न २) अस्तित्वाचा, अस्तित्वकक्षेचा प्रश्न

३) धर्मित्वाचा प्रश्न ४) अर्थवत्तेचा किंवा तार्किकतेचा प्रश्न

अशा आहेत. या चार प्रश्नमालिकांची सविस्तर मांडणी डॉ० केळकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काटेकोर चिकित्सकपणे केलेली आहे. डॉ० केळकरांच्या विवेचनशैलीच्या वैशिष्ट्यांसह अशा प्रश्नांच्या विवेचनात नेहमी वापरल्या जाणार्‍या शब्दांचा (संज्ञांचा) वापर चुकीचा आहे हे सांगत असतानाच ते काही धोक्याचे कंदीलही दाखवतात. उदा० कोणत्याच विशिष्ट कवितेचा विचार करायचा नाही. काव्य हा शब्द वर्ज्य. कारण तो 'गोलाकार'. या संग्रहातील बर्‍याच लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्मात जाऊन चिकित्सा करतात आणि योग्य अन्वर्थक शब्द मिळाल्यानंतरच त्यांचे विश्लेषण थांबते. हा काथ्याकूट नाही, तर अ‍ॅरिस्टॉटलच्या वचनाप्रमाणे 'अचूक व्याख्या करणे हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे', या विधानाची साक्ष पटविणारे आहे. या लेखातील विश्लेषणातून कवितेच्या व्याख्येकडे ते वाचकाला आणतात. कविता म्हणजे १) संहिता २) एक मुद्दाम रचलेला वाचनीय वा श्रवणीय मजकूर, एक शैलीबद्ध अ-निर्हेतुक, अ-सहज संहिता ३) एक शैलीबद्ध भाषेचा कच्चा माल, द्रव्य म्हणून उपयोग करणारी आणि अर्थसंक्रामक चिन्ह (कम्युनिकेटिव्ह सिंबल) म्हणून वावरणारी स्वायत्त कलाकृती. अशा प्रकारे कवितेच्या नेहमीच्या व्याख्येपेक्षा अगदी निराळीच जाणीव ते करून देतात. म्हणजेच कविता हा भाषिक चिन्ह-व्यवहार आहे असे ते पटवून देतात. त्यांच्या शब्दात, ''कविता वाहनाच्याद्वारे भाषिक संकेतांनुसार कविता-पाठ्य चिन्हित होते आणि कविता पाठ्याद्वारा एक नवीन अनंगवस्तू चिन्हित होते.'' ''पण या नव्या चिन्हीकरण - व्यवहारातून उभी राहते ती एक स्वत:त सामावलेली, आतून अभंग अशी वस्तू'' (पृष्ठ १९). आपली नव्या चिन्हीकरणाची कल्पना आणि दि० के० बेडेकर यांनी मांडलेली 'विकल्पन' ही संकल्पना आणि संस्कृत साहित्य मीमांसेमधील 'भाव' या संज्ञेने सुरुवातीच्या काळात दर्शविली गेलेली संकल्पना एकच आहेत असेही ते नमूद करतात (पृष्ठ १९) आणि अशा प्रकारे कवितेच्या चर्चेला भाषाविज्ञान, चिन्हविज्ञान या शाखांशी जोडतात.

'कवितेचे सांगतेपण, करतेपण' या लेखाची सुरुवात 'कवितेचे असतेपण' या लेखाप्रमाणेच आर्चिबाल्ड मक्लिश या कवीच्या A poem should not mean / But be या विधानाने होते आणि या दोन लेखांमधील दुवाही त्यामुळे सिद्ध होतो. ''कवितेची व्याख्या करणे अवघड, कारण ती जात्या विवादग्रस्त संकल्पना आहे. ... कविता कवितांमध्ये ... फार/तर कुलसाम्य शोधावे हे बरे''. कवितेची व्याख्या करताना निर्माण होणारे वादविषय ध्यानात घेऊन डॉ० केळकरांनी कविता आणि काव्य यांच्या संबंधात १) आनंदवादी २) आशयवादी ३) रूपवादी ४) जीवनवादी आणि ५) आशयरूपवादी असे कविता-वाचकांचे वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण या ग्रंथातील इतर काही लेखांतही आपल्याला भेटते.

कवितेची भाषा आणि सामान्य व्यवहाराची भाषा ह्यांमध्ये फरक आहे हे नमूद करून पाठ्यरूपी कविता आणि कलावस्तुरूपी कविता यांचे नाते स्पष्ट करताना डॉ० केळकर तंत्र आणि शैली यांचे विवेचन करतात. हे विवेचन 'सांगतेपणा'च्या अर्थवत्तेच्या चर्चेचा पुढचा टप्पा गाठते. यानंतर 'सांगतेपणा'-कडून 'करतेपणा'कडे वाचकाला नेताना डॉ० केळकर, 'कलावस्तूमुळे आणखी काही चिन्हित होते का (पृष्ठ ४२) आणि कविता श्रोत्यावर-वाचकावर, श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय करते, निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय करते आणि समाजासाठी काय करते असा मुद्दा विचारात घेतात आणि वर नमूद केलेले पाच प्रकारचे 'वादी' काय म्हणतील याची मांडणी करतात.'

कवितेची चर्चा करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात याची ही उत्तम मांडणी आहे.

डॉ० केळकरांनी कल्पिलेले पाच गट/पाच भूमिका हवाबंद नाहीत, हे उघड आहे. त्यांच्यातल्या संभाव्य स्थित्यंतराची दखलही डॉ० केळकरांनी घेतली आहे. त्यामुळे मराठीतील काव्यमीमांसेच्या संदर्भातील त्यांची विधाने जशीच्या तशी स्वीकारणे कठीण आहे. तथापि या वादात वापरण्यात येणार्‍या रूपवाद, जीवनवाद इत्यादी कल्पनांच्या भोंगळ वापराबद्दल ते आपल्याला जागृत (अ‍ॅलर्ट) करतात हे या विवेचनाचे खरे मोल आहे.

या दोन लेखांची नोंद थोडी विस्ताराने घेण्याचे कारण डॉ० केळकरांची मांडणीची पद्धत, त्यांच्या विवेचनपद्धतीच्या लकबी या दोन लेखांत स्पष्ट होतात आणि हीच दृष्टी मग इतर निबंधांतही दिसून येते. फक्त तपशील विषयानुसार बदलत राहतात. डॉ० चंद्रशेखर जहागिरदार यांनी आपल्या प्रस्तावनेत 'डॉ० केळकर... मांडणीची पूर्वतयारी म्हणून संबंधित विषयाचा एक नवीन संकल्पनात्मक नकाशाच व्यवस्थित मांडतात.' (पृष्ठ सात) असे म्हटले आहे. या नकाशात कोणत्या वाटा फसव्या म्हणून बंद आहेत, वर्ज्य आहेत, याचेही दिग्दर्शन डॉ० केळकर करतात अशी त्यात भर घालावीशी वाटते.

याच संदर्भात डॉ० केळकर यांच्या भूमिकेचा प्रश्नही अपरिहार्यपणे उपस्थित होतो. त्याचे उत्तर देताना 'मी स्वत:ची भूमिका मांडण्याचे कटाक्षाने टाळले आहे... तशी भूमिका मांडण्याची तार्किक अपरिहार्यता अंगीकारलेल्या वाटाडयाच्या कामासाठी वाटली नाही म्हणून टाळले आहे,' असे ते म्हणतात. डॉ० केळकरांची वाटाड्याची भूमिका इतर लेखांतही जाणवते. असे असले तरी भूमिकेचा प्रश्न उपस्थित होतोच. स्वत: डॉ० केळकरांनी 'लेखकाचे मनोगत'मध्ये असे म्हटले आहे की ''मी मार्क्सवादी नाही - ना साम्यवादी ना समाजवादी. पुस्तकाच्या अग्रभागी जोडलेली नांदी पाहावी म्हणजे मी तटस्थ नाही एवढा दिलासा निश्चित मिळेल...माझी भूमिका सांगणे कसे गुंतागुंतीचे आहे याचाही उलगडा होईल.'' समीक्षेत तटस्थ कसे राहणार? समीक्षेतली विधाने... व्याख्यादेखील जात्या पक्षपाती आणि म्हणून वादग्रस्त आणि प्रश्नांकित असतात... समीक्षेतली विधाने वाईट अर्थाने वादग्रस्त होऊ नयेत म्हणजे वितंडाग्रस्त होऊ नयेत (म्हणून) सुसंगतपणे एक समान विवादभूमी सादर करणे महत्त्वाचे आहे.'' म्हणजे येथेही डॉ० केळकर एक प्रकारे आपली भूमिका अनुच्चारित ठेवतात. इतरत्रही 'मला स्वदेशीवादाचा, नेटिव्हिझमचा पुरस्कार करायचा नाही' (पृष्ठ २७४) अशा प्रकारची विधाने त्यांच्या लिखाणात आढळतात. तेव्हा आपण डॉ० केळकरांची भूमिका काय याचा पाठपुरावा न करता त्यांनी सादर केलेल्या साहित्यविचाराच्या मांडणीतून काय जाणवते याचा शोध घेणे इष्ट होईल.

१९६०नंतर मराठी समीक्षेमध्ये डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांनी 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आणि संज्ञांची ओळख करून देऊन समीक्षेची समज वाढवणारी भर घातली. डॉ० केळकर या घडामोडीत सहभागी होते आणि त्यांच्या लिखाणात 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आपल्याला बर्‍याच वेळा आढळून येते. या दोन व इतर काही लेखांतही त्यांच्या विवेचनामध्ये अमेरिकन नवसमीक्षक आणि इंग्रजी समीक्षकांचा पुष्कळ वेळा उल्लेख येतो. उदा० वेलेक आणि वॉरेन (थिअरी ऑफ लिटरेचर) जॉन क्रो रॅन्सम, टी०एस० एलियट, एल०सी० नाइट्स, आय०ए० रिचर्ड्स आणि प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी 'इंटेन्शनल फॅलसी', 'अफेक्टिव्ह फॅलसी' या संज्ञांच्या वापरातून सूचित झालेले ब्रुक्स, विम्सॅट, बिअर्ड्सली ह्या टीकाकारांनी मांडलेल्या साहित्य-विचाराचे स्वरूप पाहिले तर काही गोष्टी जाणवतात. त्या, माझ्या मते, डॉ० केळकरांच्या मांडणीलाही लागू होतात.

१. या टीकाकारांची मांडणी विशेष करून 'कविता' या साहित्यप्रकाराशी निगडित आहे. त्यातही विश्लेषणासाठी ते लिरिकचा वापर करताना दिसतात. डॉ० केळकर स्वत: 'कविता' ही 'रोमँटिक लिरिक'पेक्षा निराळी आहे असे म्हणतात आणि 'कविता' अधिक व्यापक करतात. सैद्धांतिक समीक्षा या विभागातील पहिल्या पाच लेखांतील त्यांचे विवेचनही 'कविता' या साहित्य-प्रकाराशीच निगडित आहे. अर्थात त्यांच्या भाषावैज्ञानिक अंतर्दृष्टी (इनसाइट्स) मुळे, तंत्र, शैली यांच्या अतिशय सूक्ष्म, तरल विश्लेषणामुळे आणि चिन्हांकन आणि चिन्हीकरण या संज्ञांच्या वापरामुळे वर नमूद केलेल्या टीकाकारांच्या ते कितीतरी पुढे गेले आहेत असे जाणवते. तरीही विवेचन प्रामुख्याने कवितेविषयी आहे असेच वाटते.

२. अशा कविताकेंद्री मांडणीमुळे साहित्याच्या इतर रूपांकडे उदा० कादंबरी आणि इतर गद्यप्रकार यांच्या सैद्धांतिक समीक्षेला फारसे स्थान उरत नाही. जेव्हा त्यांचा विचार होतो तेव्हा अशा कृती 'कविते'च्या गुणधर्मांनी युक्त असणार्‍या असतात आणि त्यांचा विचारही जणू काही त्या 'कविता' असाव्यात अशा पद्धतीने भाषा, शैली अशा बाबींकडे विशेष लक्ष देऊन केला जातो.

३. अशा प्रकारे लिरिसिझम (कवितात्मता) या बाबीवर लक्ष केंद्रित केले तर साहित्य-विचारातील वास्तव, वास्तववाद यांकडे दुर्लक्ष होते. विम्सॅट आणि ब्रुक्स यांनी लिहिलेल्या 'लिटररी क्रिटिसिझम : ए शॉर्ट हिस्ट्री'मधील 'वास्तववाद' (रिअ‍ॅलिझम) विषयक प्रकरण पाहिले तर अशा मांडणीमुळे साहित्याच्या काही अंगांकडे कसे दुर्लक्ष होते, इतकेच नव्हे तर त्यांच्यावर कसा अन्यायही होतो हे लक्षात येईल. मराठी साहित्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर वास्तववादाची सैद्धांतिक मांडणी नसणे ही मोठी उणीव होईल, कारण आधुनिक मराठी साहित्यामध्ये वास्तववाद महत्त्वाचा आहे.

'सैद्धांतिक समीक्षा' विभागातील ''भाषा आणि साहित्य'' या लेखातील मांडणी १९७० साली नक्कीच नवपथप्रदर्शक झाली असणार. आज सुमारे चाळीस वर्षांनंतर त्यातील बहुतेक विवेचन वाचकांच्या अंगवळणी पडले आहे.

''शैली आणि तंत्र'' या लेखातील प्रतिपादन थोडयाफार फरकाने आधीच्या लेखात आलेले आहे. ''कवितेचे सांगतेपण-करतेपण'' या लेखातील आनंददायी, रूपवादी, आशयवादी, जीवनवादी आणि आशयरूपवादी या वर्गीकरणाचा वापर करून या प्रत्येक भूमिकेचे तंत्र आणि शैली यांबाबत काय म्हणणे आहे हे मांडण्यात आले आहे. या विवेचनाच्या शेवटी शैली म्हणजे केवळ भाषासरणी हे समीकरण खोडून काढण्यात आले आहे. शैलीचा विचार माध्यमाशी निगडित आहे आणि म्हणून साहित्यशैलीला भाषाविज्ञानाची शाखा मानल्यामुळे 'शैली माध्यमाच्या पातळीवर असते आणि केवळ भाषा या साधनद्रव्याच्या पातळीवर नसते हे नजरेआड करणे' ही चूक होते. तसेच 'शैलीचा विचार...समीक्षेसारख्या जात्या वादग्रस्त संकल्पना आणि मूल्य-विवेक यात गुंतलेला उद्योग आहे हे लक्षात न घेण्याची चूक' (पृष्ठ ५६) (होते) हा अतिशय मूलगामी आणि महत्त्वाचा विचार कबीर आणि तुकाराम यांच्या चार कवितांचा शैली-विचार करताना मांडला आहे.

'कलावती वाणी' या लेखात वाणीच्या बोलणे, म्हणणे आणि गाणे या तीन आविष्कारांची चर्चा करण्यात आली आहे. 'मनुष्यजीवनाच्या विविध आविष्कारांत वाणी, आणि शास्त्र आणि कला मोडतात.' भाषा ही वाणीची मुख्य परिणती आहे. वाणी हा भाषेचा मुख्य आविष्कार आहे. अनुभवाला आणि वर्तनाला अर्थ देण्याची, 'कशाला काय म्हणू नये' हे ठरवण्याची क्रिया भाषेच्या द्वारे पूर्ण होते.

भाषा ही वाणीची मुख्य परिणती असली तरी वाणी भावाविष्काराचे एक साधन आणि संगीताचे वाहनद्रव्यही असते. त्यामुळे वाणी जेव्हा 'कलावती' होते तेव्हा भावाविष्कार तसेच वाणीचे संगीताशी असलेले नाते विचारात घ्यावे लागते. डॉ० केळकर भाषा आणि संगीत या दोन ध्रुवांच्या दरम्यानची, त्यांना जोडणारी जी साम्यस्थळे आहेत त्यांचे विवेचन करतात. कलावती वाणी ही कलेचे वाहनद्रव्यही बनलेली असते. या वाहनद्रव्याचा जेव्हा आशयद्रव्याशी संयोग होतो तेव्हा कलेचे माध्यम निष्पन्न होते. (पृष्ठ६७) डॉ०केळकर माध्यमाचा तंत्रपातळीवर आणि शैलीपातळीवर सूक्ष्म भेद स्पष्ट करीत विवेचन करतात. त्यामध्ये त्यांनी नाट्यधर्मी आणि लोकधर्मी या संज्ञा वापरताना भरताने त्यांचा दिलेला अर्थ जसाचा तसा ठेवलेला नाही. (डॉ० केळकर यांच्या एक्लेक्टिक - विविध क्षेत्रांतून आपल्याला उपयुक्त आणि आवश्यक 'कच्चा माल' घेऊन त्यातून नवीन मांडणी करण्याच्या - वृत्तीचे हे चांगले उदाहरण आहे.) परिणामत: या विवेचनात नाट्यधर्मी व लोकधर्मी यांच्या संदर्भात अंतर्दृष्टियुक्त (इन्साइटफुल) दिशादर्शक अशी अनेक विधाने आहेत. 'कलावती वाणी' हा या ग्रंथातील एक महत्त्वाचा लेख आहे. इतिकथनात या लेखातील मांडणीच्या उपयोजनाच्या काही दिशाही त्यांनी कळकळीने मांडल्या आहेत. पण गेल्या १४/१५ वर्षांत कुणी प्रतिसाद दिला नाही याची खंतही ते व्यक्त करतात, तिची गंभीर दखल अभ्यासकांनी घेणे आवश्यक आहे. डॉ० केळकरांच्या मते या अनास्थेचे कारण 'सध्याचा वैचारिक गारठा' हे आहे. कदाचित तथाकथित 'वैचारिक' दूधभात गटकन गिळण्याची सवय लागलेल्या वाचकांना हा तोंडाला भरपूर व्यायाम देणारा विचारप्रपंच मानवत नसावा.

या विभागातील ऊर्वरित लेख नाटक, संगीत आणि नृत्य या विषयांवर आहेत. डॉ० केळकरांची 'कलावती वाणी'मध्ये वाणी कलावती कशी आणि कोणत्या व्यवहारात होते हे ध्यानात घेतले तर ही मांडणी अपरिहार्य होते.

कवितेचा विचार करताना वापरलेल्या पद्धतीप्रमाणे येथेही विवेचन आहे. ''सर्जनशील लेखनाचा नाट्य हा सर्वोत्तम आणि सर्वात शाश्वत आविष्कार आहे. काव्याच्या विविध प्रकारांपैकीच नाट्य एक प्रकार आहे.'' (पृष्ठ७८) हे टी०एस० इलियटचे विधान उद्धृत केले आहे. नाटकाला सर्वश्रेष्ठ काव्य का मानतात याचा उलगडा करण्यासाठी डॉ० केळकर नाट्याची तीन वैशिष्टये विशद करतात:

१. कवी-निरपेक्ष आणि रसिक-निरपेक्ष असा अन्योन्य संबंध केंद्रस्थानी असणे.

२. नाट्यकाव्यातला वर्तमान(काळ) भविष्यकाळाला पोटात बाळगणारा, भविष्यकाळावर अवलंबलेला असतो. या वैशिष्ट्याला केळकर 'भविष्यगर्भ वर्तमानकाळ' म्हणतात.

३. नाटक रचणारा कवी असो,... दिग्दर्शन करणारा कविमित्र असो, कविमित्राचे रंगकर्मी मित्र किंवा प्रयोगात तन्मय होणारा रसिक ... आपापल्या जागी राहून पुन्हा एकत्र काम करण्याचा आनंद नाटकात मिळून जातो. (पृष्ठे७६-७८)

आपल्या या विवेचनाच्या पुष्टीसाठी डॉ० केळकर नाट्यकर्मीची स्वभाववैशिष्टये विशद करतात. ती कीट्सच्या दोन सुप्रसिद्ध वचनांच्या आधारे मांडली आहेत. सर्व रंगकर्मींना - नाट्यकवी, नाट्यदिग्दर्शक, रंगकर्मी आणि नाट्यरसिक या सर्वांना 'परकाया प्रवेश' करण्याची क्षमता आवश्यक असते. 'तटस्थता आणि आत्मीयता यांच्या पलीकडे जाणे म्हणजे तन्मयता (पृष्ठ७९)'.

नाटकातल्या 'भविष्यगर्भ वर्तमानाने निर्माण केलेला ताणतणाव हाताळण्यासाठी रंगधर्मीजवळ आवश्यक असणारे स्वभाववैशिष्टय म्हणजे एक प्रकारची बौद्धिक तितिक्षा.'

नाटकाच्या तिसर्‍या वैशिष्ट्याला डॉ० केळकर समाराधन म्हणतात. समाराधन म्हणजे सर्व संबंधितांची एकत्र खुषी होणे आणि एका घटकाने दुसर्‍याची खुषी राखणे.

अशा प्रकारे परकायाप्रवेशाची क्षमता, वैचारिक आणि भावनिक तितिक्षाबळ आणि समाराधनशीलता हे तीनही गुण नाट्यकर्मींच्या अंगी असावे लागतात. नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा संबंध दोन्ही दिशांनी आहे. तो परस्परपोषक आहे हे सांगून डॉ० केळकर या दृष्टीने नाट्यकर्मींच्या शिक्षणाच्या दृष्टीने जी मांडणी करतात त्यात शिक्षकी तळमळ व्यक्त होते. तसेच 'या तीन गुणांच्या जोपासनेला एक सामाजिक बाजू आहे' (पृष्ठ८२) याचेही निकडीचे भान त्यांना आहे हे दिसते. या लेखाच्या शेवटच्या भागात हिंदी भाषी प्रदेशात 'नाटका'ची जी अवस्था आहे तिच्याबाबत उद्बोधक विवेचन केले आहे.

'नाटक : एक होणे' हा लेख मांडणीच्या बाबतीत 'कवितेचे असतेपण' या लेखासारखा आहे, हे नाटक म्हणजे काय ह्या अतिशय सूक्ष्म विश्लेषणावरून सिद्ध होते. ह्या लेखाच्या शेवटच्या भागात डॉ० केळकरांनी अनेक प्रश्न असलेल्या दोन कार्यक्रमपत्रिका सादर केल्या आहेत. त्या किंवा लेखाच्या आधीच्या भागात त्यांनी वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न पाहता डॉ० केळकरांची त्यांच्या मांडणीच्या बाबतीत आग्रही भूमिका नसून वाद-संवादातून तत्त्वबोध करून घेणार्‍या अधिकारी जिज्ञासूची आहे असे दिसते.

संगीत किंवा नृत्य या कलाप्रकारांची चिकित्सा करतानाही ('संगीताची भाषा आणि मनोव्यापार : एक प्रश्नाचे मोहोळ,' 'नृत्य, कथक, आणि रोहिणी भाटे : एक सम्यग्दर्शन') यांत डॉ० केळकरांनी अशाच प्रकारची कळकळ दाखवली आहे. त्यांचा संगीतावरचा लेख ते एक उत्तम 'म्युझिकॉलॉजिस्ट' आहेत याचा प्रत्यय देतो. संगीताच्या अभ्यासाच्या तीन पायर्‍या विशद करून भारतीय संगीत परंपरांच्या (उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी) अभ्यासात उद्भवणारे काही प्रश्न त्यांनी चिकित्सक पद्धतीने मांडले आहेत. इतर म्युझिकॉलॉजिस्टांप्रमाणे ही मांडणी नाही. ती केवळ अमूर्त, सैद्धांतिक पातळीवरची, पढीक (अ‍ॅकॅडेमिक) नाही तर संगीतव्यवहाराच्या प्रत्यक्ष अवलोकनातून आणि भारतीय संगीत हे जे आपले मोलाचे सांस्कृतिक संचित आहे त्याबद्दलच्या आस्थेतून केलेली मांडणी आहे. 'भारतीय संगीत' हा आपल्या रास्त अभिमानाचा विषय आहे. दुर्दैवाने या संगीताचा जो सैद्धांतिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास भारतात होत आहे त्याबद्दल रास्त अभिमान बाळगण्यासारखी स्थिती नाही' या खेदजनक वस्तुस्थितीमुळे व्यथित होऊन ही मांडणी केली आहे. नाटकावरच्या लेखांप्रमाणेच येथेही डॉ० केळकरांनी चर्चा योग्य दिशेने जाणारी, तत्त्वबोधाचा वेध घेणारी असावी म्हणून प्रश्नांचे मोहोळ उठवलेले आहे.

'द्रव्य', 'माध्यम' आदि संज्ञांचे सूक्ष्म विश्लेषण करून मांडणी करण्याची पद्धतीच नृत्याच्या खास वेगळेपणाची जाण ठेवून त्यांनी वापरली आहे. 'नृत्य' म्हणजे काय आणि काय नाही याची जाणीव वाचकाला या लेखातून मिळते.

ग्रंथाच्या 'आस्वादाकडून समीक्षेकडे' या दुसर्‍या भागात पाच लेख आहेत. 'आस्वाद-व्यापार' हा १९७० पूर्वीचा लेख आहे असे त्याला जोडलेल्या इतिकथनावरून ध्यानात येते. त्या काळी मराठी साहित्यचर्चेमध्ये 'सौंदर्यशास्त्रीय' चर्चेची हवा होती आणि दबदबाही होता. डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांची नावे ठळकपणे आठवतात. सौंदर्यशास्त्रातील बा०सी० मर्ढेकरांचे योगदान पुन्हा एकदा तपासून घेणे हा एक प्रमुख मुद्दा या चर्चांमध्ये असे. डॉ० केळकरांनीही या चर्चेत प्रथमपासूनच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी 'सौंदर्यशास्त्र' या संज्ञेऐवजी 'आस्वाद-व्यापार' ही संज्ञा सुचवली आहे आणि तिचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण 'आस्वाद-व्यापार', 'आस्वाद-मीमांसा' यांचे क्षेत्र अधिक व्यापक करते हे दिसून येते. 'आस्वाद-व्यापाराविषयी' या लेखात आस्वाद-व्यापार, आस्वाद्य वस्तू, आस्वाद घटना, आस्वाद गुण यांचा काटेकोरपणे मागोवा घेतला आहे आणि हे करताना अनेक घोटाळ्यांवर, कमतरतांवर प्रकाश टाकला आहे. शैलीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोण या ग्रंथातील इतर लेखांमध्येही स्पष्ट झाला आहे. या लेखातही त्यांनी केलेले शैलीचे विवेचन मुळातून पाहावे. 'शैलीमीमांसा कुठल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आस्वाद-व्यापार मीमांसेचा ती एक महत्त्वाचा भाग कशी ठरते... शैलीचा नीट विचार झाल्याशिवाय आस्वाद-व्यापारासंबंधीच्या कूट प्रश्नांचा उलगडा होणार नाही' अशी ही भूमिका आहे. 'समीक्षक : एक साक्षीभोक्ता' या लेखावर 'थिअरी ऑव्ह लिटरेचर' ची दाट छाया आहे. समीक्षा-व्यवहारामध्ये नेहमी उपस्थित होणार्‍या 'साहित्याचे सर्वस्पर्शित्व लक्षात घेऊन त्याचा आंतरक्षेत्रीय अभ्यास व्हायला पाहिजे' येथून सुरुवात करून 'साहित्यिक रसग्रहणातून साहित्य-समीक्षा' आणि 'समीक्षेचे सहभागी निरीक्षण म्हणजे साहित्य-मीमांसा' (पृष्ठ १५५) असे डॉ० केळकर म्हणतात. काही प्रमाणात या लेखातले प्रतिपादन आता आपल्या अंगवळणी पडले आहे. (ते सर्वस्वी स्वीकारले आहे किंवा स्वीकारावे असे नाही.) पण तरीही डॉ० केळकरांच्या विश्लेषक अन्वेषण पद्धतीचा नमुना म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.

'मूल्यनिर्णय आणि साहित्यव्यवहार' हा लेख साहित्यकृती विषयक मूल्यनिर्णयाची काटेकोर आणि बहुसमावेशक चौकट निर्माण करतो. येथेही डॉ० केळकरांच्या 'असतेपण, सांगतेपण आणि करतेपण' या त्रयीची उपस्थिती जाणवते. आधीच्या लेखांप्रमाणेच या लेखातले बरेचसे मुद्देही वाचकांच्या परिचयाचे झाले असतील. 'इतिहास, साहित्याचा इतिहास आणि समीक्षकाचे कार्य' हा एक महत्त्वाचा लेख आहे. नेहमीप्रमाणे डॉ० केळकर प्रथम 'इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करतात आणि या विवेचनात उपस्थित झालेल्या मुद्दयांचा साहित्याच्या इतिहासाशी काय अनुबंध असतो, असावा यांचे दिग्दर्शन करीत साहित्याच्या इतिहासाची मांडणी करतात हे माझ्या मते नोंद घेण्याजोगे आहे.

'कवितेचे सांगतेपण-करतेपण' या लेखात समीक्षेतील पाच विविध भूमिका ते पुन्हा मांडतात आणि या पाच भूमिकांची साहित्य-इतिहासाविषयी काय धारणा असेल याची मांडणी करतात. येथील फरक-साम्य यांच्या विश्लेषणामुळे आपल्या विचाराला नव्याने चालना नक्कीच मिळते.

'कला आणि कलाव्यवहार' या विभागातील पहिले दोन लेख - 'शिक्षणाचे एक माध्यम - कला' आणि 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' - डॉ० केळकरांना शिक्षक या नात्याने कला आणि कविता यांच्याविषयी किती आस्था आहे याची साक्ष देतात.

'व्यावहारिक समीक्षा' या विभागात काही साहित्यकृतींची समीक्षा आहे. 'कोसला'चे परीक्षण आणि लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'चे परीक्षण सोडता बाकी सर्व परीक्षणे कवितांची आहेत. 'कोसला' तिच्या शैलीमुळे रूढ कादंबरीपेक्षा निराळी आहे आणि 'उपरा'चे विश्लेषण प्रामुख्याने भाषा आणि भाषिक स्थित्यंतर याविषयी आहे हे ध्यानात घेतले तर इथे प्रस्तुत केलेली समीक्षा (ती अतिशय अंतर्दृष्टिपूर्ण आणि कलाकृतींचे अंतरंग सूक्ष्मपणे उलगडून दाखवणारी आहे हे मान्यच आहे.) कविता, शैली आणि भाषाव्यवहार या अंगांनी जाणारी आहे असे दिसते.

'भारतीय ललितकला (आधुनिक) वयात येतात' हा लेख - डॉ० केळकर त्याला निबंध म्हणतात - सांस्कृतिक समीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय समाजजीवनात जो गुणात्मक फरक घडून आला त्याचे स्वरूप आणि व्याप्ती (खरे तर मर्यादा) - ललितकलांच्या संदर्भात - स्पष्ट करणारा हा लेख आहे. या फरकाला किंवा परिवर्तनाला काय म्हणायचे येथून डॉ० केळकर आपल्या विवेचनाला सुरुवात करतात. त्याला रिनेसन्स (पुनरुज्जीवन) म्हणायचे की 'एनलायटन्मेंट' (प्रबोधन) म्हणायचे? नेहमीप्रमाणे डॉ० केळकर दोन्हींची उकल प्रथम करतात. युरोपियन रिनेसन्सचा 'विद्यांचे पुनरुज्जीवन' हा एक पैलू होता. त्याच्या इतर राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक पैलूंचाही डॉ० केळकर मार्मिक खुलासा करतात. एकोणिसाव्या शतकापासून झालेल्या भारतातील पुनरुत्थानाबद्दल विवेचन करताना ते या स्थित्यंतराचा युरोपीय आधुनिकतेशी संबंध जोडतात आणि त्या आधुनिकतेशी निगडित असलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद, उपयुक्ततावाद तसेच समता आणि राष्ट्रभावना ही मूल्ये आणि ऐहिक परतत्त्वाच्या संदर्भात व्यक्तिवादाची कास धरणे आणि आध्यात्मिक परतत्त्वाच्या संदर्भात इहवादाचा आश्रय करणे या वैशिष्टयांचा परामर्श घेतात.

पश्चिमेकडून आलेल्या या विचारांबाबत डॉ० केळकर एक महत्त्वाचा विचार मांडतात. युरोपियन स्थित्यंतर 'आतून उपजलेले' होते तर त्याचा भारतीय उपखंडात झालेला स्पर्श बाह्यप्रेरणेमुळे झाला, यामुळे दोन क्रियांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर पडले असे ते म्हणतात (पृष्ठ २६७). आणि जरी ते मांडत नसले तरी या अंतराला १९व्या शतकारंभाची भारताची सांस्कृतिक चणही कारणीभूत आहे. त्यामुळे भारतीय पुनरुत्थान अनेकश: दुभंगलेले आहे (पृष्ठ २६७). निरनिराळया जमातींत, प्रदेशांतही हा परिणाम कमीअधिक प्रमाणात जाणवतो. या भारतीय प्रबोधनाचा परिणाम तत्कालीन ललितकलांशी कसा पोचतो हे ऊर्वरित लेखात मांडले आहे. मांडणीचे कार्य 'भावी संशोधनासाठी एक दिशा सुचविणे एवढेच राहील' (पृष्ठ२६८) असे ते स्वत:च म्हणतात. भारतीय ललितकलांचे त्यांनी चार गटांत वर्गीकरण केले आहे. इंग्रजी भाषेचा उपयोग, वापर यांवर या कलांच्यात कमीअधिक प्रमाणात आणि खरीखुरी अथवा व्याज-आधुनिकता येणे कसे अवलंबून होते याचे दिग्दर्शन येथे होते. ब्रिटिशांनी दिलेल्या आश्रयानंतर काही कला अकॅडेमिक झाल्या, तर इतर काही कला ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक पुनर्रचनेमध्ये साहित्य मध्यमवर्गाच्या प्रभुत्वाखाली जाण्यात आणि परिणामत: संकुचित होण्यात झाला. या कोंडीतून सुटण्याचे काही मार्ग (लोकसाहित्याचा वाढता प्रभाव) त्यांनी सुचवले आहेत. 'पाश्चात्त्य प्रभाव भारतीय संदर्भात आत्मसात करायचे कुणाच्या मनातही आले नाही' (पृष्ठ २७२), ही 'घटी'ची बाजू मांडल्यावर डॉ० केळकरांनी प्रबोधनातून मिळालेल्या विधायक स्वरूपाच्या जमेची बाजू मांडली आहे. त्यात इतर आशियाई किंवा वसाहती असलेल्या देशांपेक्षा भारतात प्रबोधन अधिक प्रमाणात रुजले आहे. याबाबत 'हिंदूंची एकंदर जीवनदृष्टी आणि आधुनिकतेची मूल्ये यांमध्ये एक लक्षणीय बंध आहे' असे प्रतिपादन डॉ० केळकर करतात.

आधुनिकतेचे आव्हान भारतीयांचे कलाजीवन पेलेल का? हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याबाबत देशीवादाचा पुरस्कार त्याज्य ठरवला आहे. त्याबाबतीत 'स्व-राज्य' कल्पनेचा पाठपुरावाच आपल्याला आधुनिकतेला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी उपयोगी पडणार आहे असे ते सुचवतात.

डॉ० केळकरांच्या विवेचनातल्या तपशिलांबाबत, काही निष्कर्षांबाबत मतभेद होऊ शकतील. एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. डॉ० मीनाक्षी मुखर्जी त्यांच्या 'द पेरिशेबल एंपायर' या पुस्तकात डॉ० डी०आर० नागराज यांना उद्धृत करतात. “It is possible to identify three streams in the existing theories of colonialism : the schools that are defined by the idea of total conquest, the ones that are organised around the idea of a cultural soul and the ones that stress mutual transformation. The first is represented by the likes of Frantz Fanon, Albert Memmi and Edward Said, the second by the likes of Anand Kumarswamy and Sayyad Hossein Nasr, the third by Ashis Nandy.” डॉ० डी०आर० नागराज यांनी आपल्या 'एग्झाइल्ड अ‍ॅट होम' या संग्रहाच्या प्रस्तावनेत हे विवेचन केले आहे. डॉ० मुखर्जी यांनी तिसर्‍या गटात सुप्रसिद्ध समीक्षक हरीश त्रिवेदी यांचाही समावेश केलेला आहे.

डॉ० केळकर यांच्या विवेचनात रवींद्रनाथ ठाकुरांचा दोनतीन वेळा ओझरता उल्लेख येतो, पण आधुनिकतेच्या संदर्भातले रवींद्रनाथांचे योगदान त्यांनी विचारात घेतलेले नाही. कुमारस्वामींचाही उल्लेख नाही. यांच्या विचारांचा परामर्श माझ्या मते जमेची बाजू वाढवणारा आहे. देशीवादाच्या मुद्दयावर डॉ०केळकरांची भूमिका मान्यच करावी लागते. पण स्वत:चा सांस्कृतिक आत्मा ओळखण्याचा आग्रह धरणार्‍या आणि तिसर्‍या गटातल्या, समावेशक असण्याचा आग्रह धरणार्‍या विचारवंत, समीक्षक आणि कलाकारांचाही विचार प्रस्तुत ठरला असता.

या परीक्षणाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे डॉ० केळकरांचा बौद्धिक आवाका स्तिमित करणारा आहे. त्यांची अन्वेषण-पद्धती मर्मग्राही, अंतर्दृष्टी देणारी आहे. वाचकाशी मोकळेपणाने संवाद करीत (कधीकधी चिमटे काढीत) ते मांडणी करतात. त्यांच्या या प्रचंड बौद्धिक प्रयत्‍नांना साजेसा प्रतिसाद (संवाद, वाद-विवाद या स्वरूपात) मिळत नाही याविषयी ते रास्तपणे दु:खी आहेत. पण हे लेख वाचताना आणि डॉ० केळकरांची व्यथा समजून घेत असताना असेही वाटते की या स्तब्धतेकडे सद्यकालीन (अपरिहार्य?) वैचारिक गारठा असे म्हणून चालणार नाही. डॉ० केळकरांना अभिप्रेत असलेला वाद-संवादाला अनुकूल असा बौद्धिक स्वरूपाचा पुरेसा सशक्त 'पब्लिक स्फिअर' आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. १९व्या शतकाच्या आरंभी गद्याचा अवतार झाला. त्याच्याशीही सुसंगत असा अत्यंत प्राथमिक स्थितीतल्या वादविवाद-तत्त्वबोधाला आवश्यक असा 'पब्लिक स्फिअर' अस्तित्वात आला होता, पण तो सतत शबल राहिला आहे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात अशा प्रकारचा 'पब्लिक स्फिअर' निर्माण करण्यात नियतकालिकरूपी व्यासपीठाचा आणि 'कॉफी हाऊस'रूपी सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग होता. आपण आपल्याभोवती घालून घेतलेल्या अनेक कुंपणांमुळे आपल्याकडे हा 'पब्लिक स्फिअर' पुरेशा परिणामकारकपणे कार्य करू शकत नाही. डॉ० केळकरांनी जन्माला घातलेले 'भाषा आणि जीवन' आता खूपच बाळसेदार झाले आहे. ते अशा प्रकारच्या वादसंवादासाठी आदर्श व्यासपीठ होऊ शकेल आणि त्यातील चर्चांमुळे डॉ० जहागिरदार यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ही 'रुजुवात' सार्थ होईल.

सीताराम रायकर
दूरभाष :०२०-२५४२४४३०८
भ्रमणभाष : ०९८८१९००६०८

सामाजिक भाषाविज्ञानातील संख्यात्मक संशोधन-पद्धती

१. सामाजिक भाषाविज्ञान (सा०भा०वि०) या ज्ञानशाखेची व्याप्ती; सा०भा०वि० या संज्ञेचा वापर

आपल्याला उपलब्ध असलेल्या सामाजिक भाषावैज्ञानिक संदर्भपुस्तकांमध्ये 'सामाजिक भाषाविज्ञान' हे शीर्षक कधी व्यापक अर्थाने तर कधी मर्यादित अर्थाने वापरलेले आपण पाहतो. समाज आणि भाषा यांच्या परस्परसंबंधाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणार्‍या क्षेत्रांचा स्थूलपणाने सा०भा०वि० मध्ये समावेश होतो. उदा० संस्कृतिनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास, समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास, भाषा संपर्क ते संहिता (म्हणजेच संदेशप्रबंध) विश्लेषण यांसारखी क्षेत्रे (आकृती १ पाहा.)

samajik-bhashajivan-akruti1
आकृती १ : सा०भा०वि० या शीर्षकाखाली स्थूल अर्थाने समाविष्ट होणारी क्षेत्रे

वास्तविक या सर्व परस्परसंबंधित पण स्वतंत्र विद्याशाखा आहेत. यांपैकी प्रत्येक क्षेत्राची उद्दिष्टे वेगळी आहेत आणि परिणामत: यांतील प्रत्येक विद्याशाखेची अभ्यासपद्धती वेगळी आहे. यांतील काही पद्धती गुणात्मक आहेत तर काही संख्यात्मक. उदा० द्वैभाषिक किंवा बहुभाषिक समाजांमध्ये भाषांचा वापर कोण कोणाशी, कधी, कुठे, कशाबद्दल बोलत आहे यावरून कसा ठरतो - याच्या गुणात्मक अभ्यासासाठी एक आराखडा हाइम्स आणि गंपर्झ यांनी १९६४मध्ये सुचवला होता. तसेच संभाषणाचे विश्लेषण, संहिता-विश्लेषण, संस्कृतिनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास या विद्याशाखांमधील संशोधन-पद्धती ही प्रामुख्याने गुणात्मक तत्त्वांवर आधारलेली आहे. सूक्ष्म अर्थाने सा०भा०वि० ही संज्ञा समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठीच वापरली जाते. सदर लेखात समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास केंद्रस्थानी ठेवून या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या लबॉवप्रणीत संख्यात्मक संशोधनपद्धतीची आपण माहिती करून घेणार आहोत. (सा०भा० विज्ञानामधील या क्षेत्राला अर्बन डायलेक्टॉलॉजी किंवा व्हेरिएशनिझम या नावाने ओळखले जाते.)

या विषयाची संशोधनपद्धती प्रामुख्याने विलियम लबॉव या अमेरिकन संशोधकाने विकसित केलेल्या 'परिवर्तनीय घटक' (लिंग्विस्टिक व्हेरिएबल) या संकल्पनेवर आधारली आहे. परिवर्तनीय घटकातील भिन्न पर्यायांना 'परिवर्तित पर्याय' (व्हेरिअंट्स) असे म्हणतात. या पर्यायांचा निर्देशात्मक अर्थ (रेफरेन्शियल मीनिंग) बदलत नाही. उदा० 'पानी' असा उच्चार केला किंवा 'पाणी' असा, तरी एकाच पदार्थाचा बोध होतो. पण या विविध पर्यायांचा वापर समाजातील निरनिराळया स्तरांतील लोक औपचारिक/अनौपचारिक शैलीप्रमाणे कमी-जास्त प्रमाणात करत असतात. 'परिवर्तनीय घटक' या संकल्पनेचे महत्त्व असे की ती वापरून आपण परिवर्तित पर्यायांची वारंवारता (फ्रिक्वेन्सी ऑफ यूसेज) मोजून एकाच भौगोलिक क्षेत्रातील भाषावापराबद्दल संख्यात्मक विधाने करू शकतो (जे बोली भाषांच्या पारंपरिक अभ्यासात करणे शक्य नव्हते). अशा संख्यात्मक निरीक्षणांचा आधार घेऊन आपण त्या भाषेच्या बदलाची दिशा निश्चित करू शकतो.

आता आपण या संशोधनपद्धतीचा तपशील पाहू या. संशोधनातील महत्त्वाच्या टप्प्यांचे खाली वर्णन केले आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी मी पुण्यातल्या १२ ते १४ या वयोगटातल्या मुला-मुलींच्या प्रमाण-मराठीच्या वापराचा अभ्यास केला होता. सदर लेखात संशोधनपद्धतीचे वर्णन करत असताना हा अभ्यास मार्गदर्शक म्हणून वापरला आहे. महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे निश्चित करणे व त्या अनुषंगाने 'संशोधन-प्रश्न', गृहीतके तयार करणे.

२. संशोधनाची उद्दिष्टे, 'संशोधन प्रश्न', गृहीतके निश्चित करणे

संशोधनात कशाचे नमुने गोळा करायचे, ते कसे आणि किती मोजायचे हे संशोधनाच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. संशोधन हाती घेण्यामागे अभ्यासकाचे स्वत:चे निरीक्षण, किंवा पूर्वीच्या संशोधकांनी मांडलेली निरीक्षणे असू शकतात. हीच निरीक्षणे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्यासाठी नवीन संशोधन हाती घेतले जाते. पुण्यातील शालेय मुला-मुलींचा अभ्यास करायचे ठरवले ते अशीच दोन निरीक्षणे तपासून पाहण्यासाठी :

१) प्रमाण भाषेतील मुलांची क्षमता आणि त्यांचे शालेय यश व एकूणच निरनिराळ्या सामाजिक घटकांमधल्या मुलांना येणारा शालेय अनुभव यांचा परस्परसंबंध आहे असे दिसून आले.

२) दुसरे निरीक्षण असे की भारतीय सा० भा० वैज्ञानिक अभ्यासांतून 'जात' आणि 'सामाजिक वर्ग' या दोन घटकांचा भाषिक बदलाशी नेमका संबंध काय आहे हे लक्षात येत नाही. यातील दुसर्‍या निरीक्षणाबद्दल थोडी पार्श्वभूमी खाली देत आहे.

१९५८मध्ये विलियम ब्राइट आणि इतर काही अमेरिकन अभ्यासकांनी भारतीय भाषांतील भेदांचा संबंध भारतातील जातीय उतरंडीशी जोडला व यातूनच 'जाती-बोली' ही संकल्पना जन्माला आली (पाहा ब्राइट, १९६०). साधारण १९६९पर्यंत भारतीय भाषांच्या संशोधनात जात या एकाच घटकावर लक्ष केंद्रित राहिले. तथाकथित 'जाती बोली'चे अस्तित्व गृहीत धरून या बोलींचे वर्णनात्मक अभ्यास झाले. १९६९च्या पुढे मात्र अचानक हा ओघ बदललेला दिसतो. त्या काळातील काही प्रमुख समाजवैज्ञानिक व सा० भा० वैज्ञानिक जातीचा उल्लेखही न करता शिक्षण, वय यांचा भाषावापरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करू लागले. १९७०च्या दशकातले सामाजिक-राजकीय वातावरण लक्षात घेतले तर असे दिसून येते की या काळात जात आणि सामाजिक वर्ग यांवर वाद सुरू झाले. त्या काळात जातीचे अस्तित्वच नाकारून वर्गरहित, जातिविरहित समाजनिर्मितीकडे विचारवंतांचा कल होता. याचा परिणाम असा झाला की भारतातील शहरांमध्ये औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक गतिक्षमतेचा (सोशल मोबिलिटी) भाषेवर कसा परिणाम झाला आहे, व्यक्तीच्या स्थिर/कायम असलेल्या जातीय स्तराचा आणि परिवर्तनशील असलेल्या आर्थिक - शैक्षणिक स्तराचा एकमेकांशी संबंध काय आणि त्यांचा भाषावापरावर एकत्रित परिणाम कसा होतो याचा क्वचितच विचार केला गेला आहे. हे मराठीच्या संदर्भात तपासणे आवश्यक वाटले.

संशोधनाची उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर विशिष्ट प्रश्न तयार करावेत. उदा० (१) मुलाच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे?(२) मुलाच्या आईच्या शिक्षणाचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे?(३) मुलाच्या वडिलांच्या शिक्षणाचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे? (४) मुलाच्या जातीचा त्याच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे? इ०. यानंतर या प्रश्नांवर आधारलेली गृहीतके तयार केली. उदा० मुलाच्या जातीपेक्षा त्याच्या आई-वडिलांच्या आर्थिक स्तराचा प्रमाण भाषावापरावर जास्त परिणाम असेल, इ०. प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ही गृहीतके चुकीची किंवा बरोबर सिद्ध होतील.

यापुढचा टप्पा म्हणजे भाषकांचे आणि भाषितांचे प्रातिनिधिक नमुने गोळा करणे.

३. समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठी लागणारी सामग्री कशी गोळा करावी?

इथे आपण आधी भाषकांच्या आणि नंतर भाषा-सामग्रीच्या नमुना निवडीबद्दल माहिती घेऊ या.

३.१ नमुना-भाषकांची निवड कशी करावी?

लबॉवची संशोधनपद्धती मूलत: संख्यात्मक असल्यामुळे नमुना-भाषकांची निवड प्रातिनिधिक असणे महत्त्वाचे असते. या दृष्टीने रँडम सँपलिंग (पूर्वग्रहरहित नमुने गोळा करणे) ही पद्धत सर्वांत योग्य समजली जाते. इथे रँडम ही कल्पना भाषावैज्ञानिक नसून संख्याशास्त्रीय आहे. या पद्धतीत नमुना-भाषकांच्या निवडीमागे कुठलेही पूर्वग्रह नसतात - जसे की स्त्री अभ्यासकाने सोयीचे म्हणून स्त्री-भाषकांचीच निवड करणे किंवा आपल्याला परिचित अशा एकाच परिसरातील भाषक निवडणे इ० रँडम सँपलमध्ये दूरभाष-सूची, मतदार-यादी यांचा उपयोग होतो. पण ही पद्धत पूर्णपणे भरवशाची असेलच असे नाही. कारण भारतात तरी स्वत:चा टेलिफोन असणारे लोक मध्यम किंवा उच्च वर्गांमध्येच आढळून येतील व मतदार-यादीत केवळ १८ वर्षांवरील मतदारांचा समावेश असतो. समाजातील सर्व वर्गांचे, वयोगटांचे प्रतिनिधित्व या पद्धतीत होत नाही.

यावर उपाय म्हणून जजमेंट सँपल निवडण्याची पद्धत रूढ आहे. म्हणजे विशिष्ट समाजातील भाषावापराचे वर्णन करण्याच्या दृष्टीने त्या समाजातील ठळक आर्थिक स्तर, जाती, लिंग, वयोगट इ०चा काळजीपूर्वक विचार करून त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतील असेच माहीतगार निवडणे. उदा० पुण्यातील शहरी मराठीचा सा०भा० वैज्ञानिक अभ्यास करायचा झाल्यास पुणे शहरातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मध्यमवर्गीय व कामगारवर्गीय, स्त्री-पुरुष, लहान-तरुण-वयस्क, याप्रमाणे जात, वर्ग, लिंग, वयोगटांचे वेगवेगळे स्तर विचारात घ्यावे लागतील. त्यांची तालिका-पद्धतीने मांडणी करून प्रत्येक रकान्यात किमान ८ माहीतगार निवडावे लागतील (पाहा : मिलरॉय १९८७, पृ०२२).

जजमेंट सँपलचे एक उदाहरण आपण इथे विचारात घेऊ या : जात, लिंग, वय, आर्थिक स्तर हे सामाजिक वर्गीकरणाचे निकष मानल्यास आपल्याला खालीलप्रमाणे तालिका तयार करता येईल :

दोन जाती, दोन लिंगे (स्त्री, पुरुष), तीन वयोगट, (१८-३०, ३१-४५, ४६-६०) आर्थिक वर्ग (मध्यम, कामगार) (एकूण २४ रकाने किंवा cells) × (प्रत्येकी आठ माहीतगार) = एकूण १९२ माहीतगार. हीच माहिती खाली तालिकेच्या स्वरूपात मांडली आहे :

samajik-bhashajivan-akruti2

ही पद्धत नेहमीच यशस्वी ठरते असे मात्र नाही. पुण्यातील शालेय मुलांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील मुलं-मुली मी माहीतगार म्हणून गोळा करत होते. हे करीत असताना अनुसूचित जातीतील उच्चशिक्षित आई-वडिलांची मुलं सापडणे मला अवघड गेले. नंतर लक्षात आले की या वर्गातील सामाजिक स्तरांतील आई-वडिलांचा कल आपल्या पाल्यांना मराठी माध्यमिक शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा कॉन्व्हेंट्समध्ये पाठवण्याकडे आहे. पण माझा अभ्यास तर मराठी शाळांपुरताच मर्यादित होता!

आपण रँडम आणि जजमेंट सँपलिंग या नमुना-भाषकांच्या निवडीच्या पद्धती पाहिल्या. याशिवाय सा०भा० वैज्ञानिक अभ्यासात 'भाषकाच्या संपर्कजाळयाचा' वापर करूनदेखील सामग्री गोळा केली जाते. या पद्धतीत 'सामाजिक वर्ग'सारखी अमूर्त संकल्पना न वापरता व्यक्तीच्या रोज संपर्कात येणार्‍या लोकांमध्ये तिच्या नैसर्गिक भाषावापराचे नमुने आपण गोळा करू शकतो.

तर हे झाले माहीतगारांच्या निवडीबद्दल. आता भाषेचे नमुने गोळा करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ या.

३.२ भाषेचे नमुने कसे गोळा करावेत?

या ठिकाणी आपण आधी भाषिक सामग्री गोळा करण्यासाठी कोणत्या पर्यायी पद्धती उपलब्ध आहेत ते पाहू या. त्यानंतर लबॉवने विकसित केलेल्या 'मुलाखत पद्धती'चा तपशील पाहू या.

आपल्या अभ्यासाचे स्वरूप, त्याच्या गरजा/मर्यादा लक्षात घेऊन अभ्यासक खालील पद्धतींपैकी एकीचा किंवा एकापेक्षा जास्त पद्धतींचा संयुक्तपणे वापर करतो.

१) प्रश्नावली

भाषकांच्या सामाजिक स्तराबद्दल माहिती मिळविण्यासाठी, भाषेसंबंधी माहीतगारांची मानसिकता जाणून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष भाषावापराबद्दल माहिती घेण्यासाठी प्रश्नावलींचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये प्रश्नावलीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाषक स्वत: लिहितात किंवा ती ध्वनिमुद्रित करतात. या पद्धतीत माहीतगारांनी स्वत:च्या भाषावापराबद्दल केलेल्या अंदाजांवर अभ्यासक अवलंबून राहतो. हे अंदाज चुकीचेही असू शकतात. त्यामुळे सा०भा० वैज्ञानिक बर्‍याचदा प्रश्नावलीतील उत्तरे तपासून पाहण्यासाठी भाषकाच्या घरच्यांमध्ये किंवा मित्रपरिवारात सामील होऊन/मिसळून निरीक्षण करतो.

२) औपचारिक मुलाखत

आधी फारशी ओळख नसलेल्या भाषकाची पूर्वनिर्धारित प्रश्नसूचीच्या आधारे मुलाखत घेतली जाते. या पद्धतीत नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळणे अवघड असते. मुलाखत-पद्धतीतील ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने भाषकाच्या 'लहानपणीच्या एखाद्या आठवणीचे वर्णन', 'स्वत:च्या एका अनुभवाचे कथन' किंवा 'अलीकडे बघितलेल्या एका चित्रपटाचे कथानक' अशा प्रश्नांचा प्रश्नावलीत समावेश केला जातो. यामुळे भाषक मुलाखतीचा तात्कालिक संदर्भ विसरून आपल्या नैसर्गिक शैलीत बोलू लागतो.

३) सहभागी निरीक्षण (पार्टिसिपंट ऑब्जर्व्हेशन)

औपचारिक मुलाखतीद्वारा नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळणे अवघड असते. पर्यायी पद्धत म्हणून भाषकांच्या संपर्कजाळयात आधी प्रवेश मिळवून, त्यातील सभासदांत मिसळून, एकरूप होऊन नंतर त्यांच्या भाषावापराचे निरीक्षण केले जाते. असा संपर्क साधण्यासाठी संशोधक 'मित्राचा मित्र' किंवा 'मैत्रिणीची मैत्रीण' म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्धतीचा उपयोग करतात. याच संपर्कतंत्राचा उपयोग करून व्यक्तीच्या रोजच्या वापरातल्या भाषेचे नमुने मिळू शकतात.

४) ध्वनिमुद्रण

भाषकांच्या पूर्वसंमतीने त्यांचे घरच्यांशी, सहयोग्यांशी, मित्रांशी रोजच्या संपर्कात होणारे संभाषण ध्वनिमुद्रित करणे ही एक पर्यायी पद्धत आहे. असे करत असताना टेपरेकॉर्डर सहज दृष्टीस येणार नाही अशा ठिकाणी ठेवला जातो. या पद्धतीचा फायदा असा की या पद्धतीत नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र आपली वैयक्तिक संभाषणे ध्वनिमुद्रित करण्याची परवानगी सगळे देतीलच असे नाही. भाषकाचे बोलणे त्याच्या अजाणतेपणे ध्वनिमुद्रित करणे अनैतिक समजले जाते.

५) दैनंदिनीचा वापर

अभ्यासकाने दिलेला आराखडा वापरून अभ्यासासाठी निवडलेले भाषक आपल्या रोजच्या भाषावापरासंबंधी टीपा/नोंदी एका वहीत लिहून ठेवतात. अभ्यासाचा विषय द्वै-किंवा बहुभाषिकता असला तर अभ्यासक या पद्धतीचा वरील एखाद्या पद्धतीला पूरक म्हणून अवलंब करू शकतो. बहुभाषक किंवा घरच्यांशी, नातलगांशी, शेजाऱ्यांशी, सहकाऱ्यांशी बोलत असताना कोणत्या भाषेचा कसा वापर करत आहे हे अभ्यासक दैनंदिनीद्वारे जाणून घेऊ शकतो.

भाषावापराचे वर्णन करत असताना आपले भाषिक नमुने जितके नैसर्गिक तितके चांगले. हे मिळविण्यासाठी लबॉवने जी पद्धत विकसित केली तिला 'मुलाखत-पद्धत' असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक माहीतगाराला पाच प्रकारच्या शैलींमध्ये भाषेचा विचार होईल असे प्रश्न विचारले जातात व उत्तरे ध्वनिमुद्रित केली जातात. (१९६०मध्ये टेपरेकॉर्डरच्या शोधाने भाषेच्या अभ्यासात क्रांती आणली-त्याशिवाय इतके सूक्ष्म विश्लेषण करणे शक्य झाले नसते.) सर्वप्रथम मोकळया गप्पा मारून त्या व्यक्तीच्या नैसर्गिक भाषावापराचा नमुना मिळवण्यावर भर असतो. अशा अनौपचारिक गप्पांकडून मुलाखत हळूहळू व्यक्तीचे लक्ष भाषेवर जास्त केंद्रित होईल अशा प्रश्नांकडे वळते.

samajik-bhashajivan-akruti3

आकृती २ : लबॉवची 'मुलाखत-पद्धत'

नमुना-भाषकांना वाचायला दिलेल्या याद्यांमध्ये/पाठांमध्ये आपल्याला ज्या भाषिक घटकांचा अभ्यास करायचा आहे ते हुशारीने पेरावे लागतात.

पण प्रश्नोत्तरांचे स्वरूप आणि ही मुलाखत ध्वनिमुद्रित होत असल्यामुळे कितीही म्हटले तरी आपल्याला मुलाखत-पद्धत वापरून नैसर्गिक भाषा-नमुने मिळणे अवघड असते. यावर उपाय म्हणून सहभागी निरीक्षण ही पद्धत जास्त उपयोगी ठरते. दहा वर्षांपूर्वी पुण्यातील शाळांमधून विद्यार्थी-मित्र मिळवण्यासाठी मी या पद्धतीचा प्रयोग केला. सुरुवातीला वर्गशिक्षिकेने मुलांना माझा परिचय कॉलेजमध्ये शिकणारी एक 'ताई' असा करून दिला. हिला शाळेतील मुलांवर एक प्रकल्प पूर्ण करायचा आहे, त्यावर तिचे परीक्षेतले मार्क ठरणार आहेत, म्हणून मुलांनी या ताईला जितकी देता येईल तितकी माहिती द्यावी. त्यांच्यासारखीच पण त्यांच्यापेक्षा वयाने मोठी अशी विद्यार्थिनी म्हणून करून दिलेली ओळख मुलांशी अत्यंत अनौपचारिक असे नाते जोडण्यासाठी बरीच कामी आली. वर्गशिक्षिकेने माझ्याशी गप्पा मारायला म्हणून पहिल्यांदा चार विद्यार्थी पाठवले. या मुलांनी त्यांच्या इतर वर्गमित्रांबद्दल 'खोडकर', 'हुशार, 'सगळयांत भाग घेणारा' अशा वर्गीकरणातून बरीच माहिती दिली. आपल्या जवळच्या मित्राबरोबर माझ्याशी गप्पा मारायला येण्याचे आमंत्रण कोणीच नाकारले नाही. समान वयोगटातील या विद्यार्थ्यांशी त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारता-मारताच मग माझ्या नमुना-चौकटीतील सर्व रकाने भरत गेले आणि जवळच्या मित्रांमध्ये ते वापरत असलेल्या भाषेचे नमुनेसुद्धा मिळाले.

४. सा०भा० वैज्ञानिक सामग्रीचे विश्लेषण

४.१ भाषेतील परिवर्तनीय घटक (व्हेरिएबल्ज)

ध्वनिमुद्रित केलेल्या संभाषणांचे, याद्यांचे प्रतिलेखन (transcription) केल्यानंतर त्यांतले परिवर्तनीय भाषिक घटक ओळखणे ही सा०भा० वैज्ञानिक विश्लेषणातील पहिली पायरी.

तत्त्वत: परिवर्तनीय घटक हे ध्वनिस्तरावर, पद आणि वाक्यस्तरावरही आढळतात. पण ते ध्वनि- आणि पदस्तरांवर जास्त प्रमाणात सापडतात. मराठीतील न/ण हा परिवर्तनीय घटक तर आपल्याला माहीत आहेच. त्याचप्रमाणे चहा-चा, दहा-दा, लहान-ल्हान-लान किंवा अर्थ-अर्त, काठी-काटी, आठ-आट, काढ-काड आणि पैसे-पैश्ये, मासे-माश्ये, विक्री-इक्री, ओटा-वटा असे बरेच पर्याय मराठीत सापडतात.

पदस्तरावर आला होता- आल्ता, (मी)करेन-(मी)करल,असे पर्याय दिसतात. पुण्यातील शालेय मुलांचा अभ्यास करत असताना आणखी एक लक्षणीय उदाहरण दिसून आले. एखादी कथा सांगत असताना किंवा दैनंदिन घटनांचे वर्णन करत असताना काही मुले साधा वर्तमानकाळ न वापरता भविष्यकाळाचा वापर करत -'तो हीरो एकदम शूर असणार. तो येणार आणि विलनला मारणार',.... किंवा 'तू दररोज संध्याकाळी काय करतोस' या प्रश्नाचे उत्तर देत असताना - 'घरी येणार, अभ्यास संपवणार आणि मग खेळायला जाणार' असे काही मुले बोलत. एकाच भाषेच्या बोलींचा अभ्यास करत असताना वाक्यस्तरावर त्यामानाने कमी पर्याय सापडतात. द्वैभाषकांमध्ये मात्र वाक्यस्तरावरही पर्याय सापडतात. उदा० मराठी-कन्नड द्वैभाषकांमध्ये मराठी बोलताना 'दादा म्हणाला (की) दहावी तरी पास हो' आणि 'दहावी तरी पास हो म्हणून दादा म्हणाला' या दोन्ही वाक्यरचना आढळतात. याचप्रमाणे भाषासंपर्कामुळे 'तेनं काम केलं', 'तो काम केला', आणि 'आमच्या मावशीनी काय केली' अशा पर्यायी वाक्यरचना सापडतात (पाहा कुलकर्णी-जोशी, २००७). निवडलेल्या प्रत्येक परिवर्तनीय घटकाचे एकूण किती नमुने गोळा करणे आवश्यक आहे, हा प्रश्न सा०भा० विज्ञानात वादाचा विषय आहे. साधारणपणे प्रत्येकी किमान तीस नमुने असावेत असे मत आहे. ध्वनिस्तरावर याहीपेक्षा जास्त नमुने सहज मिळतात, पण पद- आणि वाक्यस्तरावरील परिवर्तनीय घटकांचे नमुने तुलनेने कमी सापडतात.

४.२ परिवर्तित पर्याय निश्चित केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे त्यांची सामग्रीतील वारंवारता मोजणे

मराठीमधल्या 'मी करेन' आणि 'मी करल' (प्रथमपुरुष भविष्यकाळ) या एका परिवर्तनीय घटकाचे उदाहरण घेऊ या. एका नमुना-भाषकाकडून मिळालेल्या भाषा-सामग्रीमध्ये या घटकाचे एकूण ५० नमुने आढळले. त्यांपैकी-

/-एन/या पर्यायाचा वापर - ३५ वेळा

/-अल/ या पर्यायाचा वापर - १५ वेळा

तर /-एन/ या प्रमाण मराठीतील पर्यायाची वारंवारता (३५/५०)×१०० म्हणजे ७० टक्के इतकी आहे. याला लिंग्विस्टिक स्कोअर असे म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येक नमुना-भाषकाचा प्रत्येक परिवर्तनीय घटकासाठी linguistic score काढला जातो. ठरावीक सामाजिक वर्गातील सर्व नमुना-भाषकांचे scores एकत्र केले जातात. कारण लबॉवच्या विचारसरणीनुसार सामाजिक वर्ग म्हणजे समान शिक्षण, आर्थिक परिस्थिती, राहणीमान व जीवनमूल्ये असणार्‍या लोकांचा एक एकसंध समूह असतो. सा०भा० विज्ञानातील सुरुवातीच्या काळात ही पद्धत प्रचलित होती. अलीकडे पर्यायाने प्रत्येक भाषकाचा स्वतंत्र लिंग्विस्टिक स्कोअर मोजला जातो.

४.३ सामाजिक घटक

भाषकाची सामाजिक स्थिती (म्हणजेच त्याचे वय, लिंग, मूळ गाव, शिक्षण, शिक्षणाचे माध्यम, व्यवसाय, राहण्याचे ठिकाण इ०) आणि तसेच त्याच्या संपर्कजाळयाबद्दल माहिती (जवळचे मित्र, कामाच्या ठिकाणचे सहकारी इ०) यांची माहिती एका वेगळया प्रश्नावलीद्वारे किंवा संभाषणाच्या ओघात मिळू शकते. अभ्यासक कधी आपल्या स्वत:च्या निरीक्षणाच्या आधारे तर कधी इतर संशोधनांच्या आधारे सामाजिक घटकांची निश्चिती करतो. या सामाजिक घटकांचेसुद्धा संख्यामापन केले जाते. उदा० 'वय' या घटकाचे 'अल्पवयीन', 'मध्यवयीन' आणि 'वृद्ध' असे गट करून त्यांचे अनुक्रमे १, २ व ३ असे संख्यामापन करता येते. तसेच 'शिक्षण' या घटकाचे 'अशिक्षित', 'दहावीपर्यंत', 'पदवीधारक', 'उच्चशिक्षित' असे गट करता येतील. (अधिक तपशिलांसाठी पाहा:चेंबर्स, १९९७, पृष्ठे ४१-४७). ज्या समाजांमध्ये आर्थिक परिस्थितीवर आधारलेले वर्गीकरण सापडत नाही. (उदा० ग्रामीण भागात), तिथे व्यक्तीचे संपर्कजाळे किती दृढ आहे, त्या समाजातल्या किती लोकांशी तिचा किती प्रकारे संबंध आहे याचे संख्यामापन केले जाते. (अधिक तपशिलांसाठी पाहा : मिलरॉय, १९८०, पृष्ठ १४१)

अशा प्रकारे भाषेतील परिवर्तनीय घटकांचे आणि सामाजिक घटकांचे संख्यामापन केल्यानंतर त्यांचा एकमेकांशी संबंध संख्याशास्त्रीय पद्धतीने प्रस्थापित करता येतो. प्राथमिक विश्लेषणात समाजातील कोणता घटक भाषेतील कोणत्या पर्यायाचा किती वापर करतो, बोलण्याच्या विषयाचा, शैलीचा यावर कसा परिणाम होतो यांचे वर्णन करता येते. अलीकडे भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाचे ध्वनी, पद, वाक्य या स्तरांबरोबरच अशा प्रकारचे सा०भा० वैज्ञानिक वर्णन हे एक महत्त्वाचे अंग समजले जाते.

५. भाषेतील परिवर्तनीय घटक आणि सामाजिक भेद यांच्या परस्पर-संबंधातून कसे निष्कर्ष काढता येतात - संख्याशास्त्राची मदत

भाषेतील परिवर्तित पर्याय आणि सामाजिक घटक यांच्यातील परस्पर संबंध हा केवळ योगायोग नाही हे दाखवण्यासाठी संख्याशास्त्राची मदत घ्यावी लागते. मराठीच्या बोलींच्या अभ्यासासाठी या पद्धतीचा उपयोग सर्वप्रथम १९६२मध्ये महादेव आपटे यांनी मुंबईतील ब्राह्मणेतर मराठी भाषकांच्या अभ्यासासाठी केला. नंतर मॅक्सीन बर्न्सन यांनीही फलटणमध्ये ही पद्धत वापरली. ही पद्धत वापरून जगातील अनेक भाषांचा अभ्यास झाला आहे. त्यातून काही ठोस असे निष्कर्षही आपल्यासमोर आले आहेत. उदा०

1. शहरी समाजातल्या कोणत्याही एका सामाजिक गटातील पुरुषांपेक्षा त्यांतील स्त्रियांचा कल प्रमाण-भाषा जास्त प्रमाणात वापरण्याकडे असतो. ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये मात्र भाषाबदलाचे प्रमाण तुलनेने कमी असते.
2. कामगारवर्ग आणि उच्चवर्गीयांपेक्षा मध्यमवर्गीय लोक प्रमाण भाषा जास्त प्रमाणात वापरतात.
3. शहरी समाजातील संपर्कजाळी खुली म्हणजे कमी दृढ असल्यामुळे इथे भाषाबदलाचे प्रमाण आणि वेग जास्त असतात. त्यामानाने ग्रामीण भागात संपर्क-जाळी जास्त दृढ असतात; इथे भाषा बदलाचा वेग कमी असतो. म्हणजेच इथले सामाजिक वातावरण बोली भाषा टिकवून ठेवण्यासाठी पोषक असते.

सा०भा० वैज्ञानिक निरीक्षणांचा सगळयात मोठा उपयोग म्हणजे त्यांच्या आधारे भाषाबदलाची दिशा निश्चित करता येते. हे करत असतानादेखील संख्याशास्त्राची मदत होते. पुण्यातील शालेय मुलांच्या अभ्यासातून असे दिसून आले की या वयोगटातील भाषाभेदांचा सर्वाधिक संबंध त्यांच्या जातीशी आणि आईच्या शैक्षणिक पातळीशी आहे. (परिशिष्टामधील तालिका पाहा). जात आणि वडिलांचा व्यवसाय (म्हणजेच कुटुंबाचा आर्थिक स्तर) यांचा एकत्रितपणेसुद्धा प्रमाण-भाषावापरावर परिणाम दिसून आला : ब्राह्मणेतर मुलांपैकी कामगार आणि मध्यम या दोन्ही वर्गांतील 'इतर मागासवर्गीय जाती' (खालील आलेखात 'बॅकवर्ड') या गटातल्या मुला-मुलींमध्ये प्रमाण मराठीचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले.

समारोप

भाषिक भेद आणि सामाजिक स्तरीकरण यांच्या परस्परसंबंधाच्या अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या संख्यात्मक साधनांची ओळख आपण सदर लेखात करून घेतली. लबॉवच्या १९६०च्या दशकातील संशोधनापासून या पद्धतीची सुरुवात झाली असली तरी त्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्ये इतर संशोधकांच्या योगदानामुळे ही पद्धती विकसित होत-होत अधिक समृद्ध झाली आहे. संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभ्यासकासमोर काही पर्याय असतात. संशोधनाची उद्दिष्टे लक्षात ठेवून यांतील योग्य पर्याय निवडायचा असतो. ही संख्यात्मक पद्धती वापरून भाषाबदलाची सुरुवात समाजातील कोणत्या वर्गात होत आहे हे लक्षात येऊ शकते. तसेच भाषाबदलाची दिशा आणि वेग यांची निश्चिती करता येते.

संदर्भ

आपटे, महादेव. १९६२. 'लिंग्विस्टिक अकल्चरेशन अँड इट्स रिलेशन टु अर्बनायजेशन अँड सोशिओ-इकनॉमिक फॅक्टर्ज.' इंडियन लिंग्विस्टिक्स, २३ : ५-२५

कुलकर्णी, सोनल. २००१. सोशिओलिंग्विस्टिक वेरिएशन इन अर्बन इंडिया : अ स्टडी ऑफ मराठी स्पीकिंग अ‍ॅडलसंट्स इन पुणे. अप्रकाशित शोधप्रबंध, युनिव्हर्सिटी ऑफ रेडिंग, इंग्लंड.

कुलकर्णी-जोशी, सोनल. २००७-०८ 'रीव्हिजिटिंग कुपवाड : दि अर्गेटिव कंस्ट्रक्शन इन मराठी - द्रविडियन कॉन्टॅक्ट अँड कन्व्हर्जन्स.' बुलेटिन ऑफ द डेक्कन कॉलेज.

चेंबर्स, जॅक. १९९७. सोशिओलिंग्विस्टिक थिअरी. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.

चेंबर्स, जॅक; पीटर ट्रडगिल; नॅटली शिलिंग-एस्टेस. (संपादक) २००४. अ हँडबुक ऑफ लँग्वेज व्हेअरिएशन अँड चेंज. ब्लॅकवेल : ऑक्सफोर्ड.

धोंगडे, रमेश. २००६. सामाजिक भाषाविज्ञान. दिलीपराज प्रकाशन, पुणे.

बर्न्सन, मॅक्सीन. १९७८. 'सोशल स्ट्रॅटिफिकेशन इन द मराठी स्पीच ऑफ फलटण'. इंडियन लिंग्विस्टिक्स : ३९:२३३-५१.

ब्राइट, विलियम. १९६०. 'अ केस स्टडी ऑफ कास्ट अँड डायलेक्ट इन मैसूर.' इंडियन लिंग्विस्टिक्स. २१:४५-५०

ब्राइट, विलियम; ए०के० रामानुजन १९६४. 'सोशिओलिंग्विस्टिक व्हेअरिएशन अँड लँग्वेज चेंज'. समाविष्ट जे०बी०प्राईड आणि जे०होम्ज् (संपादक). सोशिओलिंग्विस्टिक्स. पेंग्विन, मिडलसेक्स : इंग्लंड. पृ०१५७-१६६.

मालशे, मिलिंद. २००५.'सामाजिक भाषाविज्ञानातील काही नव्या दिशा.....' समाविष्ट डॉ० जयश्री पाटणकर (संपादक) सामाजिक भाषाविज्ञान : कक्षा आणि अभ्यास ससंदर्भ प्रकाशन, नाशिक.

मिलरॉय, लेज्ली. १९८०. लँग्वेज अँड सोशल नेटवर्क्स. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.

मिलरॉय, लेज्ली. १९८७. ऑब्झव्र्ंहिग अँड अ‍ॅनलायझिंग नॅचरल लँग्वेज. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.

लबॉव, विलियम. १९६६. द सोशल स्ट्रॅटिफिकेशन ऑफ इंग्लिश इन न्यू यॉर्क सिटी. सेंटर फॉर अप्लाईड लिंग्विस्टिक्स वॉशिंग्टन डी० सी०.

हाइम्स, डेल; जॉन गंपर्झ १९६४. (संपादक). 'दि एथ्नॉग्राफी ऑफ कम्युनिकेशन,' अमेरिकन अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिस्ट. ६६, भाग २.

परिशिष्ट

पुण्यातील मराठीतील (न/ण) या परिवर्तनीय घटकांचे संख्याशास्त्रीय प्रतिदर्श (मॉडेल)

Terms in model Deviance d.f. F-ratio p-value

constant ६४५२.४९७५ ११३

+ जात ५१६८.४९८६ ११० १२.०९

+ लिंग ४९१७.६१३१ १०९ ०७.०९ ०.००९

+ आईचे शिक्षण ४४७८.८३९३ १०७ ०६.२ ०.००३

+ वडिलांचे शिक्षण ४३७२.८५३९ १०५ ०१.५ ०.२७७४

+ वडिलांचा व्यवसाय ४२७९.८२२७ १०४ ०२.६३ ०.५८५२

+ जात × लिंग ४१००.४०२ १०१ ०१.६९ ०.२१९७

+ जात × आईचे शिक्षण ३७४०.२२५१ ९५ ०१.७० ०.२२२९

+ लिंग × आईचे शिक्षण ३६६०.११९० ९३ ०१.१३ ०.३०५८

+ जात × वडिलांचा व्यवसाय ३२६७.००७ ९० ०३.७ ०.०१५

+ लिंग × वडिलांचा व्यवसाय ३२६६.०८९३ ८९ ०.०३ ०.८७४७

+ आईचे शिक्षण×वडिलांचा व्यवसाय ३०८२.८७५९ ८७ २.५९ ०.०८१०

या तक्त्यात p-value म्हणजे सापडलेले परस्परसंबंध (correlation) किती दृढ आहेत याचे संख्याशास्त्रीय मोजमाप. परस्परसंबंध दाखवणारी ही संख्या ०.०५पेक्षा जितकी कमी तितका हा संबंध दृढ असतो. गोळा केलेल्या भाषा-सामग्रीतील न/ण या भेदांचा ज्या सामाजिक घटकांशी दृढ संबंध आहे ते अधोरेखित केले आहेत. या अभ्यासातून दिसून आले की जात आणि आर्थिक वर्ग यांचा एकत्रितपणे भाषावापरावर परिणाम होत आहे.

सोनल कुलकर्णी - जोशी
प्रपाठक, डेक्कन कॉलेज, पुणे.
भ्रमणभाष : ०९८९०४४४६०६
ई-मेल : sonalkulk@rediffmail.com

परीक्षणासाठी आलेली पुस्तके

* 'आरपार लयीत प्राणांतिक' (दीर्घकविता) - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५, मूल्य रु० ६०.००
* कविता : भाषा व परिसर - डॉ० शिवाजी पाटील. रजत प्रकाशन, औरंगाबाद. २००८. पृष्ठे १०३. किंमत रु० १००.००
* आम्ही भावंडं - संपा0 आशा गुर्जर. गायत्री साहित्य, पुणे. २००९. पृष्ठे १९४. किंमत रु० १५०.००
* भाषा : विचार, वर्तन आणि अध्यापन - डॉ० विद्यागौरी टिळक. सुविद्या प्रकाशन, पुणे. २००९. पृष्ठे १११. किंमत रु० १००.००
* प्रकाशवाट - (तेलुगू - व्होल्गा, इंग्रजी - अल्लादि उमा व एन० श्रीधर) अनुवादक - वंदना करंबेळकर. ग्रंथाली. मुंबई. २००९. पृष्ठे १३४. किंमत रु० १२५.००

धुळे जिल्ह्यातील दलित समाजाची बोली : अहिराणीचा सामाजिक भेद

प्रत्येक समाजाची स्वत:ची अशी वेगळी बोली असते. त्या बोलीचा वर्णनात्मक पद्धतीने जसा अभ्यास करता येतो, तसा सामाजिक अंगानेही करता येतो. धुळे ग्रामीण परिसरातील दलित-महार जातीची बोली अहिराणी असली तरी तिच्यातील सामाजिक - सांस्कृतिक - धार्मिक घटकांच्या वेगळेपणामुळे त्या जातीच्या अहिराणी बोलीत लक्षणीय वेगळेपण निर्माण झालेले आढळते. हे वेगळेपण धर्मांतरापूर्वीच्या गावकुसाबाहेरील जगण्यातून व धर्मांतरानंतरच्या पाली भाषेच्या संपर्कातून आलेले आहे. म्हणून एकाच गावातील महार जातीतील लोक व महारेतर जातीतील लोक वेगवेगळी अहिराणी बोली बोलताना आढळतात. या वेगळेपणाला अहिराणी बोलीचा ठळक 'सामाजिक भेद' म्हणून नोंदविता येईल.

भाषा आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध किती घनिष्ठ आहे हे सर्वश्रुत आहे. 'संस्कृतीचे व्यक्त रूप म्हणजे त्या समाजाची बोली होय'. (कालेलकर १९६४, पृष्ठ ५८) प्रत्येक समाजाची विशिष्ट संस्कृती असते, विशिष्ट सामाजिक प्रथा, परंपरा, लोकसंकेत, रीतिरिवाज असतात. विशिष्ट लोकधर्म असतो. त्यांतून त्याची बोली वेगळेपण धारण करीत असते. 'बारा कोसांवर भाषा बदलते' असे विधान जेव्हा केले जाते, तेव्हा त्यात 'भौगोलिकता' अधोरेखित होते; तसेच 'प्रत्येक समाजाची किंवा जातीची बोली वेगळी असते', असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात 'सामाजिकता' अनुस्यूत असते. म्हणून भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासापेक्षा ही दिशा वेगळी ठरते.

हिंदू समाजाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी 'जात' आणि 'व्यवसायसाम्य' यांवर आधारलेले अनेक वर्ग आपल्याला दिसतात. समान रूढी, चालीरीती त्याचप्रमाणे इतर अनेक बंधनांनी एकत्र सहजीवन जगावे लागत असल्यामुळे, एका जातीतील व्यक्तींना जी वैशिष्टये प्राप्त होतात, त्यांतली काही भाषिक स्वरूपाची असतात. या संदर्भात ना०गो० कालेलकर (१९८२, पृष्ठ ५८) म्हणतात, ''जातिबाह्य प्रवृत्तींचा निषेध, प्रसंगी त्याविरुद्ध होणारे कडक इलाज आणि जातीच्या पंचांकडून होणारे नियमन, यांमुळे जातिसंस्था संघटित आणि चिवट झाली. याचा परिणाम म्हणून इतर अनेक वैशिष्टयांप्रमाणे अंतर्गत विनिमयासाठी काही बाबतीत वापरला जाणारा 'शब्दसमूह' हे प्रत्येक जातीचे काही प्रमाणात वैशिष्टय ठरले.''

ही परिस्थिती आजही आहे. आज जातिनिष्ठ धंदा किंवा धंदानिष्ठ जात पूर्वीइतक्या चिवट स्वरूपात नसेल; पण तरीही एकच धंदा करणार्‍या व्यक्तींना कार्यपरत्वे एकत्र येऊन विनियम करण्याची आवश्यकता कायमच आहे. भाषेचा हा विशिष्ट उपयोग त्या-त्या वर्गाच्या किंवा जातीच्या गरजेतून निर्माण झालेला आहे. मानवी प्रवृत्तींच्या प्रत्येक क्षेत्रात काही अंशी एका विशिष्ट प्रकारच्या अभिव्यक्तीची गरज असते; आणि त्या दृष्टीने भाषेला किंवा बोलीला वेगळे वळण देणे भाग असते. हा नियम समाजात सुरू होणार्‍या नव्या प्रवृत्तींनाही लागू असतो. प्रवृत्तींचे क्षेत्र अधिक विस्तृत झाले किंवा समाजरचनेत काही परिवर्तन घडून आले, आणि त्याचा ठसा भाषेवर उमटला नाही, असे कधी होत नाही. दलित-महार समाजाचे धर्मांतर झाले. त्यानंतर बौद्ध धर्मातील आचारपद्धती या समाजाने काही प्रमाणात स्वीकारली. त्याचा परिणाम महार समाजाच्या बोली भाषेवर झालेला दिसून येतो. उदा० तथागत, भिक्खू, उपासक, आयुष्यमान, कालकथित, त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राणपाठ, जयमंगल अष्टगाथा, जलदान विधी इत्यादी अनेक पाली वाङ्मयातील शब्द महार समाजाच्या बोली भाषेत रूढ झाले आहेत.

जातीच्या विशिष्ट प्रवृत्तींसाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या भाषेच्या रूपाला आपण त्या जातीची 'लोकबोली' म्हणतो. यातल्या काही प्रवृत्ती समान पातळीवर असतात; त्यामुळे ते शब्द तेवढे दुर्बोध वाटत नाहीत. परंतु काही गोष्टी त्या विशिष्ट जातीपुरत्याच सीमित असतात, म्हणून त्यांचे वाचक शब्द दुर्बोध वाटतात. उदा० पूर्वीच्या काळी महार जातीचा प्रमुख आहार 'गायीचे मांस' हा होता. पिढ्यानपिढ्या हा समाज गाय किंवा बैलाचे मांस खात आला आहे. जिवंत प्राण्याच्या मांसाला 'हलाल मांस' म्हणतात; तर मेलेल्या प्राण्याच्या मांसाला 'पड' असे म्हणतात. धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या बोलीत गाय किंवा बैलाच्या मांसासाठी 'शाक' हा वैशिष्टयपूर्ण शब्द आढळतो. 'शाक' म्हणजे गुराचे मांसच; दुसरी भाजी नव्हे. 'शाक' संदर्भात विपुल शब्दसंपदा या बोलीत आढळते. त्या शब्दांचे अर्थ महारेतर जातींना कळत नाहीत, एवढे वेगळेपण त्यात आढळते. जसे - चान्या, खांडर्‍या, खूर, डल्ल्या, चिच्चू, मुंडं, पिंडं, पार, डील, फफसे, कलेजा, चिलमट, चिचडा, नया, रगती, मांदं, इत्यादी आहारविषयक शब्दसंपत्ती आढळते.

समाजाच्या वेगवेगळया घटकांची ओळख करून घेणे, वेगवेगळ्या प्रदेशांत विखुरलेल्या समाजातील वर्गांची ओळख करून घेणे, म्हणजे त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या सवयींचा अभ्यास करणे होय. अमुक ठिकाणचे, अमुक जातीचे, वर्गाचे लोक कसे वागतात, पोशाख कसा करतात, काय जेवतात, चरितार्थ कसा चालवतात, त्यांची कुटुंबपद्धती कशी आहे, त्यांच्या विवाहसंस्थेचे स्वरूप कसे आहे, त्यांचे सण-उत्सव, लोकदैवते कोणती आहेत, त्यांच्या नवस-सायासाच्या पद्धती, मर्तिक प्रथा इत्यादींबाबत ते कोणत्या रूढी पाळतात, हा अभ्यास पुष्कळ लोक करतात. परंतु संस्कृतीच्या या सर्व अंगांचे स्वरूप ज्यातून व्यक्त होते त्या अपरिहार्य माध्यमाचा, म्हणजे भाषेचा अभ्यास मात्र कोणी करत नाही. ज्यांना आपण मागासलेले समजतो, त्या व्यक्तींच्या तोंडी असणारी शब्दसंपत्ती, त्यांच्याविषयी उत्सुकता दाखवून जर आपण पाहिली तर नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

बोली आणि समाज यांतील परस्परसंबंध अतिशय घनिष्ठ असतात. त्यामुळे बोलणार्‍या व्यक्तीच्या बोली भाषेतून त्याचा समाजच प्रकट होत असतो. समाजात अनेक कारणांमुळे वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण, व्यवसाय, जाति-जमाती, धर्म इत्यादी अनेक कारणांमुळे वेगवेगळे स्तर निर्माण होतात. या स्तरांची भाषापद्धती भिन्न-भिन्न असते. काही बाबतीत जाणवण्याइतपत वेगळेपण असते. एकाच गावातील किंवा परिसरातील बोली भाषा जाति-जमातींनुसार 'वेगळेपण' धारण करते. अशा प्रकारचे वेगळेपण धुळे परिसरातील महार जातीच्या अहिराणी बोलीच्या बाबतीत सोदाहरण सांगता येईल.

अहिराणी बोली ही खानदेशातील, त्यातल्या त्यात धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण बोली आहे. या बोलीचे विभागानुसार अनेक भेद दृष्टीस पडतात. अहिराणी बोलीत विभागानुसार जसे 'प्रादेशिक भेद' निर्माण झाले आहेत तसेच जाति-जमातींनुसार 'सामाजिक भेद' निर्माण झालेले आहेत.

दलित जातींतील 'महार' ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. या जातीची विशिष्ट अशी जीवनपद्धती होती व आहे. ही विशिष्ट जीवनपद्धती अस्पृश्यता, गावकुसाबाहेरचे जगणे यांतून निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे धर्मांतरातून बौद्ध जीवनपद्धतीच्या स्वीकारामुळे या जातीच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टी इतर जातींपेक्षा पूर्णत: वेगळ्या झाल्या आहेत. ह्या सामाजिक वास्तवाला व्यक्त करणारी त्यांची अहिराणी बोलीही वेगळी झाली आहे. हे 'वेगळेपण' अहिराणी बोलीचा एक ठळक 'सामाजिक भेद' म्हणून नोंदविता येईल.

धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या अहिराणी बोलीत असे काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत की, ते महारेतरांच्या अहिराणीत आढळत नाहीत. या शब्दांचा सामाजिक - सांस्कृतिक संदर्भ कळल्याशिवाय त्यांचा अर्थ इतरांना कळत नाही. उदा० आकडी, आठखोय, आवल्या, उचली नवरी, उडती तगारी, काठीघाट, काडीमोड, काढ्या, कासे, कोटम, खूर-मुंडी, गंदोरं, गावकाठी, गायकोयपी, गोर, घरघुशी, घोडनवरी, चलवादी, झाड, ठानं, ढसकन, ढासली, ढेगमेग, देरवट, नाईक, पड, पाचपाल्या, पार, पेवबूड, पोटखालना, फुनकं, बलुतं, बाबत्या, भन्दं, भाट, भादीमाय, महारखोय, महार-चावडी, महारवर, महारवाजा, महार-वाटा, महार-शेवडी, महारीन साडा, महार्‍या, रंगटाकन, रनबल्या, रांडकुली, रायरंग, रूसकीन नवरी, लंगर, वायनं, शाक, शीवदाबन, शेनकुकू, सरवा, सांगावा, हातबाही इत्यादी शब्दांचे सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ माहीत असल्याशिवाय त्यांचे अर्थ इतर समाजातील अहिराणी बोलणार्‍या लोकांना कळणार नाहीत.

प्रत्येक जातीची विशिष्ट अशी सामाजिक व्यवस्था असते. धुळे जिल्ह्यातील महार जातीची एक समाजव्यवस्था आहे. या सामाजिक व्यवस्थेचे विवाहप्रथा, मर्तिक प्रथा, लोकदैवते, लोकधर्म, व्यवसाय, अन्नप्रकार, कपडे, सण-उत्सव इत्यादी घटक आहेत. या घटकांचे आकलन 'महार' जातीच्या बोलीतून होते. धुळे जिल्ह्यातील दलित-महार जातीची बोली म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचे भांडार आहे. या शब्दांचे अर्थ याच परिसरातील इतर जातींतील लोकांना जसे कळत नाहीत, तसेच याच जातीतील परंतु दुसर्‍या परिसरातील लोकांनाही कळणार नाहीत, एवढे 'वेगळेपण' या बोलीतील शब्दांमध्ये आढळते.

काही विशिष्ट संबंधावर आधारित अशा शब्दांचा एखादा गट वेगळा करणे शक्य आहे. हे शब्द अनेकदा एखाद्या संकल्पनेशी संबद्ध असतात. अशा शब्दगटाला 'अर्थक्षेत्र' किंवा 'शब्दक्षेत्र' म्हणतात. अशी शब्दक्षेत्रे महार समाजाच्या बोलीतही आहेत. या शब्दक्षेत्रांमधील शब्दांचे अर्थ महारेतर जातीतील लोकांना कळणार नाहीत.

कुटुंबपद्धती आणि बोलीतील शब्द

धुळे जिल्ह्यातील ग्रामीण महार कुटुंबामध्येही पितृसत्ताक पद्धती आहे. त्या अनुषंगाने कुटुंबसंस्थेशी निगडित वैशिष्ट्यपूर्ण शब्द दलित-महार जातीच्या बोलीत आढळतात. उदा० देरवट, पोटखालना, रांडमुंड, लोकसोयर्‍या, घरघुशी, दूदभाऊ, दूदबहीन, रांडम्या, रांडकुली, रनबल्या इत्यादी.

विवाहप्रथा आणि बोलीतील शब्द

प्रत्येक प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या विवाहप्रथांमध्ये विविधता आढळते. ही विविधता त्या-त्या जातीची बोली भाषा प्रकट करताना आढळते. उदा० मांगनं, देखा-पान्थाना, येटायामाना, कुयभाऊ, कुयबहीन, दुजवर, गंदोरं, हायद्या, पहिलंघर, देरवट, पोटले बोल इत्यादी.

अन्नप्रकार आणि बोलीतील शब्द

पूर्वीच्या काळी दलित-महार जातीचा प्रमुख आहार गाय किंवा बैलांचे मांस हा होता. त्यातून विपुल शब्दसंपदा या बोलीत आढळते. उदा० शाक, चान्या, खांडर्‍या, खूर, पार, चिचडा, नया, रगती, दुबी, आयनी इत्यादी.

अशा प्रकारे घरे, कपडे, व्यवसाय, नवस-सायास, भगताचे विधी, लोकदैवते, सण-उत्सव, लोकधर्म इत्यादी संदर्भातील शब्दसंपत्ती महार समाजाच्या वापरात आहे. धर्मांतरातून, पाली भाषेतून शाब्दिक नवस्वीकृती महार जातीच्या बोलीत झालेली आढळते. तसेच धुळे ग्रामीण परिसरातील महार जातीच्या अहिराणी बोलीत व महारेतर जातींच्या अहिराणी बोलीत उच्चाराच्या पातळीवर व शब्दांच्या पातळीवर वेगळेपण नजरेत भरते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

उच्चार भेद :

महारी

अहिराणीबोली

अवलुंग
(ऊ)

आठुय
(य्)

आदय
(अ)

आयनं
(य्)

ईसमारी
(आ)

उतीगये
(उ)

कवय
(व)

कवाड
(आ)

कुदाई
(आ)

गवर्‍या(या)

झायेर
(य)

रगत
(अ)

बलायं
(यं)

महारेतर

अहिराणीबोली

अवलोंग
(ओ)

आठून
(न्)

आदोय
(ओ)

आलनं
(ल्)

ईसमरी

(अ)

वतीगये
(व)

कधय
(ध)

कावड
(अ)

कुदय
(अ)

गवरा
(आ)

झावर
(व)

रंगत
(ङ्)

बलावं
(वं)

प्रमाण मराठी

आतापर्यंत

इथून

आढळ

अळणी

पाल

ओतले

कधी

दरवाजा

कुदळ

गोवर्‍या

गोधडी

रक्त

बोलविले

शाब्दिक
वेगळेपण:

महारी अहिराणीबोली

आथा -
तथा

उपट

कयक

कोन
जागे

गदक

गिरमी

टाकं

तई-रूसना

नांदडं

पची

पांघुर

पानशेंगा

पुर्‍या

बट्टं

बनाद

बयतन

बन्होई

बा

बेसन

भज्या

भाते

मईस

मुवया

मुकला

मोगरी

रांडमुंड

रोटपाट

जोतरं

शेरी

सोट्या

महारेतर अहिराणीबोली

ईबाक-तिबाक

थापड

पुरानं

कोनाआठे

उकय

थाटी

बोखलं

सी-वरला

संपूट

सटी

धोतीर

मासा

पुरनपोया

सार

धाबोई

जयन

पाव्हना

धल्ला

पिठलं

बोंडे

सोदनं

काजय

गुयन्या

सावटा

बडोनी

रांडोय

पोयपाट

वट्टा

बोय

पयकाठ्या

प्रमाण
मराठी

इकडे-तिकडे

चापट

काठी

कोणाकडे

उकळ

थाळी

कोनाडा

पाटा-वरवंटा

टाकी

पाचवी

धोतर

मासे

पुरण-पोळ्या

रसा

चादर

सरपन

मेहूना

वडील

पिठले

भजी

फडके

काजळ

गुळण्या

पुष्कळ

बडोनी

विधवा

पोळपाट

ओटा

बोळ

पळकाठी

वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की, महार जातीची अहिराणी बोली उच्चाराच्या आणि शब्दांच्या पातळीवर वेगळेपण प्रकट करते. एवढेच नव्हे तर महार जातीच्या बोलीत वाक्प्रयोग व म्हणीसुध्दा वेगळेपण प्रकट करताना आढळतात. [पाहा : प्रकाश भामरे - 'धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती...' भाषा आणि जीवन २६-४ (दिवाळी २००८) पृष्ठे ३१-३७] जसे- 'बाईना फुले बाईल, नि शाबासी मन्हा याहीले', 'रायरंग रातभर राजा नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा,' 'दुसरी ऊनी घरमा, पायली गयी गोरमा', 'धल्ला नवरा कया कुयले आसरा झाया', 'धल्ला नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे', 'घरमा फुटेल बोयका नि मांगस दोन-दोन बायका', 'तुले माले सांगाले, भगतीन आनी घुमाले', 'नाईक भाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये', 'महारनं आख्ख गाव, नि त्यातले नही कोठे ठाव', अशा शेकडो म्हणी महार समाजाच्याच अहिराणी बोलीत आढळतात. त्यांच्या समाजभाषावैज्ञानिक अभ्यासातून एक नवी बाजू पुढे येते. या म्हणींचा अभिधात्मक अर्थ केवळ महार व्यक्तीलाच कळू शकेल व अभिधात्मक अर्थ समजल्याशिवाय त्यांची लक्षणाही कळणार नाही.

म्हणींप्रमाणेच दलित-महार जातीच्या वाक्प्रयोगांना सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आढळतात. जसे - शीव दाबनी पडी, खोयमा टाकेल से, आकडी धरेल से, देरवट वायेल से, महार वर देनं पडीन, हातबाही देनी पडीन, न्हानी पूंजनी पडीन, लंगर तोडना पडीन, इत्यादी वाक्प्रयोगांच्या अभिधांना सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आहेत. हे वाक्प्रयोग लोकरूढी, लोकसंकेत, विवाहप्रथा वगैरेतून आलेले असल्यामुळे महार समाजाचे लोकजीवन समजल्याशिवाय त्यांचे अर्थ कळत नाहीत. लोकबोलीतला हा 'मौलिक ठेवा' नीट जतन करून पुढील पिढीच्या हवाली करणे त्या-त्या समाजाचे कर्तव्य ठरते.

संदर्भ
कालेलकर, ना०गो० १९६४. भाषा:इतिहास आणि भूगोल. मौज प्रकाशन, मुंबई.
कालेलकर, ना०गो० १९८२. भाषा आणि संस्कृती. मौज प्रकाशन, मुंबई.

मुलाखती
लक्ष्मीबाई अर्जुन भामरे
तिरोनाबाई नवल पाटील
मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
किसन नथ्थू मोरे

प्रकाश भामरे
28 अजिंठा, रघुवीरनगर, खोडाई माता रोड, नंदुरबार 425412
मराठी विभागप्रमुख, जी०टी० पाटील महाविद्यालय, नंदुरबार
भ्रमणभाष : 09822294255

मराठीतील आघातांचे उच्चार व लेखन

(उच्चारदर्शनासाठी नागरी लिपीची अपर्याप्तता)

आपल्या मराठीसाठी वापरण्यात येत असलेली लिपी ही नागरी किंवा देवनागरी ह्या नावाने ओळखली जाते. हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या तीन भारतीय भाषांनी पूर्वी संस्कृतच्या लेखनासाठी वापरली जाणारी लिपी जशीच्या तशी उचलली. मराठी भाषेसाठी ती आपण अंदाजे एक हजार वर्षांपासून वापरीत आहोत. तिचा स्वीकार करताना ती आपल्या भाषेच्या उच्चारांसाठी पुरी पडते की नाही हे पाहिले गेले नाही.

त्या वेळी व तसे पाहिल्यास मुद्रण सुरू होईपर्यंत केल्या गेलेल्या लेखनाचा उपयोग मोठ्याने वाचण्यासाठी होत असे. तेसुद्धा स्वत: लिहिलेले स्वत:च मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी जास्त. वाचन हे बहुधा प्रकट होत असे. (आपली काही आडनावेसुद्धा त्याची साक्ष देतात : पाठक, पुराणिक, व्यास वगैरे). साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. पोस्ट ऑफिस नव्हते आणि ग्रंथांची सुरुवात 'श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिलेंजी येथ' अशी होत होती.

लोक बोलून व ऐकून भाषा शिकत होते. वाचिक आणि लिखित असे दोन्ही संकेत स्वतंत्रपणे, म्हणजेच परस्परनिरपेक्षपणेदेखील अर्थबोध करून देण्यास समर्थ आहेत हे तेव्हा माहीत झालेले नव्हते. दृष्टिगम्य संकेतांचे स्वत:च श्राव्य संकेतांमध्ये रूपांतर करून (म्हणजे शब्दांचा मोठ्याने उच्चार करून) मग त्या श्राव्य संकेतांपासून म्हणजे ध्वनीपासून लोक अर्थग्रहण करीत होते. अर्थ समजून घेण्यासाठी ते स्वत:ला व इतरांना ऐकवीत होते. लहान मुले वाचावयाला शिकतात तेव्हा त्यांना मोठ्याने वाचावे लागते. मनातल्या मनात वाचून चालत नाही. म्हणजे अर्थग्रहण करता येत नाही. पूर्वीचे वाचक जुन्या पोथ्यांवरून स्वत: नकलून घेऊन मोठ्याने वाचत असत त्यामुळे स्वत: मोठ्याने वाचताना त्यांच्या लेखनात झालेल्या चुका त्यांना त्रास देत नसत. उच्चारसातत्य कायम राखता येत असे. लेखनातल्या र्‍ह्स्वदीर्घांचे महत्त्व नसे. श्रोत्यांच्या कानांना नीट वाटेल (डोळ्यांना नव्हे) असे त्यांना उच्चारता येत असे. आपली हेमाडपंती मोडी अशाच हेतूने आजच्या शॉर्टहॅण्डसारखी वापरली जात होती. ती लिहिणार्‍याच्या मनातले बहुतेक सारे संदर्भ ती वाचणार्‍याला बहुधा माहीत असत.

आज मुद्रणविद्येच्या प्रसारामुळे कोणीएकाने लिहिलेले लाखो लोक वाचतात. नवीन नवीन विषयच नव्हे तर भाषासुद्धा पुस्तकावरून शिकतात. त्यामुळे पूर्वी शब्दांचे जे उच्चार ऐकून माहीत होत होते ते आता नवसाक्षरांसाठी किंवा नवीन विषयांत पुस्तकांच्या माध्यमांतून प्रवेश करणार्‍यांसाठी (त्यांच्या वाचनात अपरिचित शब्द येतात त्यामुळे) अक्षरांच्या साह्याने दाखविण्याची सोय करावी लागणार आहे; पण ही सोय, अर्थात केवळ उच्चार समजावून देण्यापुरती असावी, नित्य लेखनासाठी नको. त्याची कारणे पुढे येतील.

आजपर्यंत लिपिशुद्धीचे विचार, चारदोन अपवाद वगळता, आपल्या लिपीला मुद्रणसुकर बनविण्यासाठी आणि तिच्यातील 'जोडाक्षरांची' संख्या कमी करून तिला यंत्रारूढ करण्यासाठीच झालेले आहेत. आपले यथार्थ उच्चार दाखविण्यासाठी तिच्यात पुरेशा सुधारणा झाल्या नाहीत. केंद्र सरकारने पुरस्कारिलेल्या परिवर्धित देवनागरीमध्येसुद्धा याविषयी पुरेसा विचार झालेला नाही. नि:संदिग्ध अर्थ समजण्यासाठी लेखनात आणि उच्चारात सातत्य पाहिजे आणि तेवढयासाठीच लिप्यंतर नको.

संस्कृत आणि मराठी ह्या दोन अगदी वेगळ्या भाषा आहेत. त्यांमध्ये जननीजन्यभाव नाही असे माझे मत आहे. त्यांची प्रत्येकीची उच्चारप्रकृती वेगळी आहे. त्यामुळे मराठीचे काही उच्चार संस्कृतमध्ये नाहीत आणि संस्कृतचे मराठीत नाहीत. संस्कृतमधल्या स्वरांपैकी 'ऋ''लृ' आणि अर्थात 'ॠ' 'लृ' मराठीत नाहीत. व्यंजनांपैकी 'ञ' नाही. 'मी त्याला यूं यूं बनविले', ह्यामध्ये किंवा यंव्-त्यंव् ह्यामधले उच्चार ञ् किंवा ञो सारखे होतात पण त्याखेरीज ञ चा उच्चार मराठीत अन्यत्र कोठेही आढळला नाही. व्यंजनासारख्या संस्कृत शब्दांमधला ञ् आपल्याकडे न् सारखा उच्चारला जातो. मूर्धन्य ष चा उच्चार मराठीत नाही. ष हा वर्णच नाही म्हणून क्ष नाही. आपल्या ज्या शब्दांमध्ये क्ष हा वर्ण येतो तो शब्द आपण संस्कृतमधून घेतला आहे असे निश्चित समजावे.

संस्कृत नसलेले रिक्षा, बक्षी, नक्षी असे काही शब्द आम्ही वापरतो पण त्यांचे उच्चार रिक्शा, बक्शी असेच आहेत. आम्ही त्यांमधला क्ष हा वर्ण केवळ लेखनसौकर्यासाठी घेतला आहे. मराठीमध्ये ञ नाही म्हणून ज्ञ (ज्ञ) हा वर्णदेखील नाही. ज्ञ चा उच्चार आपण कोठे द्र्य सारखा तर कोठे निव्वळ ग्य सारखा करतो. इतकेच काय तर वँ‌् हा उच्चारसुद्धा मूळ मराठीत कोठेही नाही. तसाच तो उत्तर भारतीय भाषांमध्येही नाही. सिंह, मांस, दंश, वंश, संस्कृत, हंस, संरक्षण, संशय ह्या सर्व शब्दांचा उच्चार करण्यास आम्हांला फार जास्त प्रयत्न करावा लागतो. तो उच्चार करावयाचा मराठी लोक संकोच करतात किंवा मांस, नपुंसक अशांसारख्या शब्दांमध्ये ते तो करीतच नाहीत. अन्यभाषी सिंहला सिंग किंवा सिन्हा, संवादाला सम्वाद असे करीत असतात. आपणही नरसिंहाला हाक मारताना नरसिंग असेच करीत असतो. संयममध्ये सञ्यम सारखा उच्चार होतो पण हा शब्द किंवा 'किंवा' सारखी अव्यये हे सारे शब्द तत्सम म्हणजे संस्कृत आहेत. आपल्या भाषेत तत्सम शब्दांचा भरणा फार मोठा आहे. हे तत्सम शब्द संस्कृत, हिंदी, कानडी, तेलुगू, अरबी, फारसी, गुजराती आणि इंग्लिश ह्या भाषांमधून आलेले ज्ञात आहेत. ह्यांपैकी आपल्या उच्चारप्रकृतीचा परिणाम होऊन जे मुळापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रतिपादनाच्या सोईसाठी तद्भव किंवा देश्य असे मानले आहे.

ह्या निबंधात मराठी किंवा मराठी भाषा हे शब्द जेथे जेथे पूर्वी वापरले आहेत किंवा पुढे वापरले जातील तेथे तेथे ते तत्समशब्दविरहित मराठीचे द्योतक आहेत असे मानावे आणि मराठी म्हणजे तद्भव किंवा देश्य शब्दांनीच बनलेली भाषा असे ह्या निबंधापुरते समजावे.

ह्यानंतर संस्कृत म्हणजे तत्सम शब्दांची उच्चारप्रकृती आणि मराठी म्हणजे तद्भव वा देश्यशब्दांमधून आढळणारी उच्चारप्रकृती ह्यांतील फरक अधिक विस्ताराने पाहू. यासाठी 'जोडाक्षरे' व अनुस्वार, तसेच रेफ (रफार) आणि विसर्गादी चिन्हे ह्यांचा विचार करावा लागेल.

संस्कृतमध्ये सर्व संयुक्ताक्षरांचे उच्चार आघातयुक्त होतात. त्याला अपवादच नाही. म्हणजे येथे छन्द:शास्त्रातील संज्ञा वापरावयाची तर अशा सर्व संयुक्ताक्षरांपूर्वी येणार्‍या वर्णांचा उच्चार दोन मात्रांनी युक्त होऊन त्यांच्या ठिकाणी गुरुत्व येते. मराठीमध्ये मात्र ज्यांचा आघातयुक्त उच्चार होत नाही अशी जोडाक्षरे पुष्कळ आहेत. य ह्या वर्णाने युक्त, ह या वर्णाने युक्त आणि अनुनासिके. जे अनुस्वाराच्या योगाने दाखविले जाते त्याने युक्त असलेली बव्हंश जोडाक्षरे बहुधा निराघात जोडाक्षरे आहेत.

'य' ने किंवा खरे सांगावयाचे तर 'या' ने युक्त जोडाक्षरे फार जास्त आहेत. उद्या, मातक्यात्, म्यान, दरम्यान यांसारखे काही सुटे शब्द ह्या निराघात 'या' वर्णाने युक्त आहेत. पण मुख्य म्हणजे संबोधने : तात्या, बन्या, बग्या, बाळ्या, मन्या, पिल्या, बाब्या, मोळीविक्या, लाकूडतोड्या, हुजर्‍या, पाणक्या, पुतण्या अशा सर्व संबोधनांमध्ये व नामांमध्ये हा निराघात या येत असतो.

दुसरा फार मोठा वर्ग अनेकवचनांचा आहे. वाटया, गाड्या, माड्या, होड्या, वाड्या, साड्या, बांगड्या, ताटल्या, पुर्‍या, सुर्‍या, दर्‍या, कादंबर्‍या इ०

आणखी एक मोठा वर्ग सामान्य रूपांचा आहे. त्याच्या, माझ्या, तुझ्या, पुण्याला, करण्यासाठी, आचार्‍याला, त्याला, दिव्याखाली, खोर्‍याने वगैरे.

ह्या निराघात 'या' चा उच्चार फक्त मराठीत आहे. संस्कृतात नाही. आपण संस्कृतची लिपी घेतली. त्यामुळे विद्या, उद्यान, ह्यांमध्ये येणारा द्या आणि उद्या, लाद्या, गाद्या ह्यांतला द्या ह्यांमध्ये आपण फरक करू शकलो नाही. संस्कृतामध्ये उद्या हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा उच्चार दाखविण्याची त्यांनी सोय केली नाही. त्यामुळे ती मराठीतही आली नाही. पण मराठीला तिची गरज आहे.

उद्यासारख्या शब्दांमधल्या 'या' मुळे होणारे जोडाक्षर निराघात असल्यामुळे तेथले य हे व्यंजन केवलव्यंजन नसून तो अर्धस्वर आहे असे मी मानतो. ह्या अर्धस्वर य पासून जसा मराठीत या होतो तसे यी आणि ये सुद्धा होतात. उदा० गायी (गाई), सोयी (सोई), हुजर्‍ये, पाणक्ये, पुतण्ये, लाकूडतोड्ये, दात्ये, साठ्ये, परांजप्ये, मोत्यें, मी जात्ये, येत्ये वगैरे.

वर उल्लेखिलेल्या सर्व शब्दांमधील य चा उच्चार निराघात आणि त्यामुळे स्वरसदृश आहे. प्रमाण आणि नि:संदिग्ध उच्चारदर्शनासाठी हा स्वरसदृश उच्चार, मराठीत वेगळा दाखविणे, त्याची सोय करणे आवश्यक आहे.

'य' ह्या अर्धस्वरानंतर आपण आता व्यंजन ह आणि महाप्राण यांतील फरक लक्षात घेऊ. हा विचार मांडताना मी पुढे कदाचित चुकीची परिभाषा वापरीन, किंवा जुन्या पारिभाषिक शब्दांचा नवीन अर्थाने वापर करीन. त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्यातला विचार समजून घ्यावा.

कचटतप आणि गजडदब ह्यांपासून अनुक्रमे खछठथफ आणि घझढधभ होताना ते पहिले वर्ण महाप्राणयुक्त होतात असे मी पुढे म्हटले आहे. माझ्या मनातील कल्पना स्पष्ट होण्यासाठी ही व्यंजने अल्पप्राणाची महाप्राण झाली असे न म्हणता ती महाप्राणयुक्त झाली अशी भाषा मी वापरली आहे. त्यामुळे काहीसाठी माझे प्रतिपादन कदाचित दुर्बोध होईल.

मराठीमध्ये महाप्राण खछठथफ आणि घझढधभ ह्या वर्णांप्रमाणेच ण्ह न्ह म्ह य्ह र्‍ह ल्ह व्ह ह्या वर्णांमध्येही येत असतो. संस्कृतात तो येथे कोठेही येत नाही. (मी निराघात य हा अर्धस्वर आणि निराघात ह ला महाप्राण असे मानतो. ह्यामधली णनम ही अनुनासिके तर यवरल हे अर्धस्वर आहेत हे ध्यानात घेण्याजोगे आहे. यवरल ह्या वर्णांचा उपयोग व्यंजनांसारखा आणि अर्धस्वरांसारखा असा दोनही प्रकारांनी होऊ शकतो. व्यंजनांसारखा केल्यास त्यांचा उच्चार आघातयुक्त तर अर्धस्वरासारखा केल्यास जोडाक्षरांमधला त्यांचा उच्चार निराघात होतो. त्यामुळे य्ह व्ह र्‍ह ल्ह यामध्ये कोणतेच व्यंजन नाही, असे म्हणणे भाग आहे. अर्थात शब्दांमध्ये त्यांचा उच्चार निराघात होत असल्यास जेथे असा अर्धस्वर आणि महाप्राण ह्यांचा संयोग झाला आहे तेथे त्यांच्या ठिकाणचे पौर्वापर्य ठरविणे दुष्कर आहे. आजच्या लेखनामध्ये अडचण अशी की ही अक्षरे व्यंजने कधी असतात ते कळत नाही.

ण्ह- कण्हणे, न-न्हावी, उन्हाळा, पन्हे, पन्हाळा, तान्हुल्याला पाहून आईला पान्हा फुटला, म्ह-म्हशी, म्हातारा, म्हणून, आम्ही, य्ह-बय्हा (बावळट ह्या अर्थाचा नागपुरी शब्द) र्‍ह्-तर्‍हा, पर्‍हा, गोर्‍हा, ल्ह-कल्हई, कोल्हापूर, विल्हेवाट, वल्हवणे, वेल्हाळ, व्हा-जिव्हाळा, जिव्हारी, न्हावाशेव्हा, चव्हाण, पाव्हणा, देव्हारा इ० आता उच्चारलेल्या सर्व शब्दांमधला हा हे व्यंजन नसून तो महाप्राण आहे, असे मी मानतो ह्याचे कारण महाप्राणाचे लक्षण अर्धस्वराप्रमाणे निराघात उच्चार हे आहे असे मला वाटते. ह हे येथे व्यंजन असते तर त्याचा येथे साघात उच्चार करावा लागला असता. हा महाप्राण आपण व्यंजनासारखा लिहितो, हा आपल्या मराठी लेखनातला दोष आहे. आपण अशा दोषांसाठी रोमन आणि उर्दू या लिप्यांना हसतो, पण आपल्या मराठीच्या लेखनातला हा दोष अतिपरिचयामुळे आपल्याला त्रास देत नाही. तो पुरतेपणी आपल्या ध्यानातही आला नाही.

महाप्राण सगळीकडेच व्यंजनाप्रमाणे लिहिला तर काय होईल बघा. क मध्ये महाप्राण घातल्यावर तो क्ह असा होत नसतो तर ख असा होत असतो. अखण्ड ह्या शब्दाचा उच्चार ह हे व्यंजन वापरून केल्यास अक् हण्ड असा होईल, साघात होईल कारण दोन व्यंजनांचा उच्चार ती एकाच वर्णात आली असताना साघात करावयास हवा आणि त्याच नियमाप्रमाणे साघातमधील घा चा उच्चार साग्हात असा करावा लागेल. ह्या दोन उच्चारांवरून महाप्राण आणि व्यंजन ह ह्यांचा उच्चारांमध्ये कसा फरक आहे ते कळून येईल. पाहा (क-ख, ग-घ, च-छ, ज-झ, ट-ठ, ड-ढ, त-थ, द-ध, प-फ, ब-भ) का बनविली ते कळून येईल. आघातयुक्त उच्चाराबद्दलही काही गैरसमज आहेत. दिव्यातून आणि दिव्यांतून यामधील दुसर्‍या दिव्यामध्ये दोन व येतात असा काहींचा समज आहे. तेथे एकदाच व् आणि त्यानंतर दुसरे व्यंजन य हे आले असल्यामुळे त्याचा उच्चार आघातयुक्त होतो इतकेच.

'छ' ह्या अक्षराचा उच्चार मात्र वरच्या नियमाला अपवादात्मक आहे. ते महाप्राणयुक्त लिहिले जात असले तरी तेथे मुद्दाम आघात घ्यावा अशी संस्कृत भाषेची सूचना आहे. (मराठीची नाही.) त्यासाठी 'ह्रस्वस्य पिति कृति तुक्' असे सूत्र आहे. ह्या सूत्राप्रमाणे कोठल्याही ह्रस्व वर्णापुढे छ हा वर्ण आल्यास नियमाने आणि दीर्घ वर्ण आल्यास विकल्पाने तुगागम करावा, (तेथे एक जास्तीचा त् घालावा) असा नियम सांगितला आहे. उदा० वि+छेद = विच्छेद, परि+छेद = परिच्छेद, शब्द+छल = शब्दच्छल, मातृ+छाया = मातृच्छाया, पितृ+छत्र = पितृच्छत्र इ० एखाद्या दीर्घस्वरानंतर विकल्पाने तुगागम होत असल्यामुळे लक्ष्मीछाया आणि लक्ष्मीच्छाया अशी दोनही शुद्ध रूपे सिद्ध होतात. नाहीतरी दीर्घ वर्णांच्या उच्चारानंतर आघाताची आवश्यकता कमी झालेली असते. आघात घेण्याचा हेतू उच्चारात त्या वर्णाच्या ठिकाणी गुरुत्व आणणे असा आहे. तो हेतू दीर्घत्वामुळे साध्य झालेलाच असतो. शिवाय च्छ आणि च्ह ह्यांच्या उच्चारांमध्येही सकृद्दर्शनी जाणविण्यासारखा भेद नाही.

मराठीमध्ये पडछायासारखे 'छ' चे निराघात उच्चार होत असतात. परिणामी मराठीत अन्नछत्र, पितृछत्र, मातृछाया, मुक्तछंद, नाटयछटा, रंगछटा अशी संस्कृत शब्दांची (चुकीची) सामासिक रूपे रूढ झाली आहेत. उलट संस्कृत भाषेची जेथे शक्य असेल तेथे आघात घेण्याची प्रकृती असल्यामुळे तिच्यामध्ये उद्+हर = उद्धर, तस्मिन् + एव =तस्मिन्नेव्, इन्+अन्त = इन्नन्त असे संधी होत असतात. मराठीमध्ये एक+एक = एकैक असा संधी होत नाही तर एकेक असा उच्चार आपण करीत असतो.

खघछ ह्याविषयी सांगून झाले. ठथफझढधभ ह्या महाप्राणयुक्त अक्षरांबद्दल वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

व्यंजन र् हा वर्णदेखील मराठीत नसल्यासारखाच आहे. र हा स्वरयुक्त (अजन्त-एकाच्) वर्ण मराठीत आहे. पण संस्कृतमध्ये (व्यंजन र्) पुष्कळ ठिकाणी वापरला जातो. तसा तो मराठीत आढळत नाही. व्यंजन र् चे चिन्ह संस्कृतात रेफ किंवा रफार (र् ) हे आहे. ते ज्या शब्दांमध्ये आहे ते सर्व शब्द मराठीतर आहेत असे समजावे. ह्या रेफाने युक्त शब्द बघा : अर्क, मूर्ख, वर्ग, अर्घ, शार्ङ, अर्चा, जर्जर, निर्झर, अर्णव, आर्त, अर्थ, सूर्य, पूर्व, कीर्ती, मूर्ती असे असंख्य.

मराठीमध्ये सर्रास, हर्रास, किर्र, कोकर्डेकर, किर्लोस्कर, वगैरे शब्दांमधला रेफ व्यंजन र् चा द्योतक नसून निभृत र चा आहे. किरलोसकर (गावाचे मूळ नाव किरलोसी असे आहे.) कोकरडेकर (गावाचे नाव कोकरडा, स्थानिक उच्चार कोकल्डा असासुद्धा होतो.) असे हे मूळचे शब्द, शब्दांमधल्या काहींचे मधल्या किंवा शेवटच्या अक्षरांचे उच्चार निभृत करण्याच्या आपल्या पद्धतीप्रमाणे आणि उच्चारानुरूप केलेल्या लेखनामुळे किर्लोस्कर, कोकर्डेकर असे लिहिले जाऊ लागले.

सर्रास, हर्रास आणि किर्र ह्या शब्दांमध्ये मात्र व्यंजन र् चा उच्चार होतो असे मला वाटू लागले आहे. ह्या ठिकाणी ह्या शब्दांमुळे मराठीच्या उच्चारप्रकृतीचा आणखी एक विशेष आपल्या लक्षात येणार आहे. मराठीत किंबहुना सर्वच देश्य उत्तर भारतीय भाषांमध्ये जी आघातयुक्त जोडाक्षरे आहेत ती बहुधा ज्यांच्यामध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे अशी आहेत. या नियमाला मला आतापर्यंत दोनचारच अपवाद दिसले आहेत. आधी नियम पाहू व मग अपवाद.

नियम असा की मराठी शब्दांमध्ये असलेली जोडाक्षरे एकाच वर्णाचे द्वित्व होऊन होतात. उदा० कल्ला, किल्ला, गल्ला, हल्ला, हल्ली, गिल्ला, गिल्ली, दिल्ली, सल्ला, बल्ली, फल्ली, कच्चा, पक्का, खड्डा, जख्ख, मख्ख, चक्क, गच्ची, खच्ची, कच्चीबच्ची, लुच्चा, थुच्चा, सच्चा, झक्की, नक्की, चक्की, कित्ता, पत्ता, भत्ता, गुत्ता, ढिम्म, घुम्म, गप्प, मुद्दा, गुद्दा, हुद्दा, पट्टा, बट्टा, थट्टा, चिठ्ठी, विट्टी, सुट्टी, पट्टी, बट्टी, चट्टी, भट्टी, खट्ट, घट्ट, गट्ट, मठ्ठ, लठ्ठ, आप्पा, बाप्पा, अण्णा, भय्या, अय्या, इश्श, वगैरे वगैरे.

अपवाद फक्त स्त, क्त ह्या वर्णांचा (गोष्ट हा शब्दसुद्धा गोठ असा उच्चारला जात असे) उदा० फस्त, मस्त, शिस्त, भिस्त, सुस्त, स्वस्त, जास्त, दुरुस्त, फक्त, मक्ता वगैरे.

आपण मराठीत ज्याला अनुस्वार म्हणतो ते पुष्कळ ठिकाणी नुसते बिन्दुचिन्ह असते. मराठीतल्यासारखा त्याचा गैरवापर अन्यत्र क्वचित झाला असेल. ते एकच चिन्ह मराठीने संस्कृत भाषेतील अनुस्वार म्हणून ङ्ञ्ण्न्म् आणि वँ् या अनुनासिक व्यंजनांच्या ऐवजी; अं, हं, सारख्या अनुनासिका उच्चारांसाठी; दोन सारख्या शब्दांमधला अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी, नामांच्या ठिकाणी तृतीया, सप्तमी अशा विभक्तींचा, बहुवचनाचा, नपुंसकलिंगाचा आणि क्रियापदांच्या ठिकाणी अपूर्ण वर्तमानकाळाचा आणि प्रथमपुरुषी कर्त्याचा असे निर्देश करण्यासाठी इतकेच नव्हे तर खास मराठीचे जे उच्चार आहेत - झालं, केलं, गेलं इत्यादी, ते दाखविण्यासाठीही सरसहा वापरले आहे. त्यामुळे वाचकाची कोठे अर्थ समजण्याच्या बाबतीत सोय तर कोठे उच्चार करण्याच्या बाबतीत गैरसोय झाली आहे.

अनुच्चारित अनुस्वार हा वदतोव्याघात आहे. मराठीत आपण वापरतो ते वास्तविक बिन्दुचिन्ह आहे. म्हणून अनुस्वार व बिन्दुचिन्ह ह्यांच्या खुणा वेगळया असणे आवश्यक आहे. अनुच्चारित अनुस्वार म्हणून आपण संस्कृतची परिभाषा चुकीच्या अर्थाने वापरीत आहोत. 'सर्वांशी मिळून मिसळून राहा म्हणजे तू सर्वांशी यशस्वी होशील' ह्या वाक्यांतील दुसर्‍या सर्वांशी (सर्व अंशांनी) हा उच्चार मराठीत नाही आणि पहिला उच्चार संस्कृतात नाही.

अनुस्वार (बिन्दुचिन्हे नव्हे) आणि रफार ही दोनही व्यंजनचिन्हे आहेत. ही दोनच व्यंजने शिरोरेखेच्या वर येणारी व्यंजने होत. ज्या अक्षरांवर ती येतात ती अक्षरे त्यामुळे जोडाक्षरे मानली गेली पाहिजेत. रेफ हे चिन्ह नेहमीच अक्षरातील स्वरांशाला चिकटलेले असते आणि अनुस्वार तसा नसतो. त्यामुळे रेफ हा त्याच्या खाली लिहिलेल्या अक्षराच्या आधी उच्चारला जातो आणि न चिकटलेला अनुस्वार नंतर.

अनुस्वार आणि चंद्रबिंदू यांच्यातही फरक करणे भाग आहे. अनुस्वार हा अनुनासिक व्यंजनाचा आघातयुक्त उच्चार असून चंद्रबिंदू हा स्वरांना होणारा विकार आहे व त्यामुळे तो निराघात आहे. पण मग इंग्रजी शब्दांमधले अँड, बँक सारखे उच्चार दाखविण्यासाठी निराळी सोय करावी लागेल. आणि आपला चंद्रबिंदू कँवरसाहेब, हँ हँ आणि हँ हँ हँ (हं हं आणि हं हं हं हे श्री० दिनकर देशपांडे यांच्या एका नाटकाचे नाव आहे) अशा उच्चारांसाठी वापरला तर अँ साठीही वेगळे चिन्ह शोधावे लागेल.

बिन्दुचिन्हांचे प्रकार

1. खणखणीत अनुनासिक व्यंजन उदा० (क) शिंके, पंखा, गंगा, तंटाभांडण, भिंत, तिंबूनाना (येथे परसवर्णाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार होतो.)
2. चिंच, मांजर, पंछी, पंजा (येथे परसवर्णाप्रमाणे उच्चार होत नाही कारण मराठीत ञ् आणि वँ नाहीत.)
2. अनेकवचनदर्शक : उदा० शब्दांमध्ये, लोकांसाठी, सर्वांपर्यंत
3. अनुनासिक स्वर उदा० अं, आं, इं, ईं, उं, ऊं, - अं, हं! वगैरे
4. झालं, केलं, गेलं असे उच्चार.

अनुच्चारित (नवीन प्रमाण लेखन-नियमांनुसार हे अनुस्वार लिहिले जात नाहीत.)

1. विभक्तिप्रत्यय - (मीं, तूं, आम्हीं) काळ (जातां, जातां) करूं - कर्ता (डोळयांनी बघतों, ध्वनी परिसतों कानीं, पदीं चालतों)
2. अर्थभेद - (नांव, कांच, पांच) - (क्रियापदें, आज्ञार्थी क्रियापदें, करीं, देईं)
3. लिंग - नपुंसकत्वाचा निर्देश (गुरुं, कुत्रीं, कार्टीं, कोकरूं, लेकरूं लिंबूं)
4. अव्यये - मुळें, साठीं, करितां

मराठीत पुष्कळशा अक्षरांचे उच्चार निभृत होत असतात. त्यांपैकी काही दाखविण्याचा तर काही न दाखविण्याचा प्रघात पडला आहे. दोन्ही, तिन्ही, चार्‍ही मधील निभृत उच्चार व्यंजनांसारखे दाखविले आहेत. उदगीर, नागपूर, यांमध्ये तसे ते होत असले तरी ते दाखविण्याची पद्धत नाही.

संस्कृत भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या चिन्हांनी मराठीत निभृत उच्चार दाखवू नयेत. त्यासाठी वेगळी चिन्हे निर्माण करावीत. अर्थात हा विचार यथार्थोच्चार-दर्शनाबाबत आहे. नित्यलेखनासाठी नाही.

विसर्गाचा विचार केल्याखेरीज आघातविचार पूर्ण होत नाही. विसर्गाचा उच्चार मराठीच्या प्रकृतीला पूर्णपणे परका आहे. जोडाक्षरांच्या ठिकाणी फक्त एकदाच कोठेतरी आघात घ्यावयाचा इतकेच मराठीला माहीत आहे. त्यामुळे विसर्ग व त्यापुढे 'जोडाक्षरे' असे एका शब्दात एकापुढे एक आले की विसर्गाचा लोप करून फक्त जोडाक्षराचा उच्चार करावयाचा अशी मराठीची प्रकृती आहे. नि:श्वास, नि:स्पृह, मन:स्वास्थ्य, मन:क्षोभ, यश:श्री अशांसारख्या शब्दांचे उच्चार निश्वास, निस्पृह, मनस्वास्थ्य, मनक्षोभ, यशश्री असे होतात. 'दु:ख'चा उच्चार, दुक्ख किंवा दुख्ख असा होतो. विसर्ग आणि जोडाक्षर एकापुढे एक आल्यामुळे एकाच शब्दामध्ये दोन आघात घ्यावे लागतात. पण आघात कमी घेण्याकडे मराठीचा कल असल्यामुळे आणि सरधोपट उच्चार करण्याची तिची प्रवृत्ती असल्यामुळे दोन आघातांचे उच्चार मराठीत कधीच होत नाहीत. उदा० उद्ध्वस्त, उद्द्योत, तज्ज्ञ, महत्त्व इ० महाप्राण, विसर्ग आणि व्यंजन 'ह' ह्यांमधील भेद मराठीला माहीत नसल्यामुळे अक्षरश: सारखे शब्द अक्षरशहाप्रमाणे धिक्कार, धि:कारप्रमाणे, अध:पात, अन्त:करण हे अधप्पात, अंतक्करणाप्रमाणे उच्चारले जातात व त्यामुळे ते तसे लिहिले जातात.

मराठीची उच्चारप्रकृती शक्यतो निराघात उच्चार करण्याची असल्यामुळे जेथे कोठे आघातामुळे गुरुत्व येते तेथे दीर्घत्वाची गरज नाही असे मराठी बोलणारे लोक समजतात. ह्या कारणामुळे प्राविण्य, नाविन्य, प्रित्यर्थ, धुम्रपान, रविन्द्र, दिक्षित, आशिर्वाद, तिर्थरूप, पुर्ण, पुर्व, सुर्य, किर्तन, जिर्णोद्धार, परिक्षा, अधिक्षक असे उच्चार करतात व तसेच लिहितात. मराठीमध्ये शब्दाच्या अन्त्यस्थानी 'अ' स्वर व उपान्त्यस्थानी 'इ' किंवा 'उ' असल्यास ते दीर्घ लिहावे असा नियम आहे. तद्भव शब्दांच्या बाबतीत मराठीची उच्चारप्रकृती लक्षात घेऊन, शिस्त, भिस्त, उंट, सुरुंग, तुरुंग, चिंच, भिंत असे शब्द वर सांगितलेल्या नियमाला अपवादस्वरूप मानावे असे सांगितले आहे. संस्कृत भाषेमध्ये स्वरांचे दीर्घत्व आणि आघात हे दोनही वेगवेगळे मानले गेल्यामुळे कीर्ती, तीर्थक्षेत्र, जीर्णोद्धार, आशीर्वाद, सूर्य, पूर्व, मूर्ख अशा सर्व शब्दांमध्ये दीर्घत्व कायम ठेवून आघात घेतला जातो.

काही सूचना - (कोशांमध्ये उच्चारदर्शनासाठीच वापरण्यासाठी; नेहमी लिहिण्यासाठी नाही.) रेफ किंवा रफार हे चिन्ह दर्या-दर्‍या, आचार्यांना-आचार्‍यांना अशा उच्चारांतील फरक दाखविण्यासाठी आपण वापरीत असतो. ते तसेच वापरीत राहावे. अर्धस्वर दाखविण्याची सोय जर वेगळया पद्धतीने करता आली तर अर्धा र् (र्‍) त्या चिन्हाची गरज पडणार नाही, कारण ते सध्या निराघात व्यंजन र् दाखविण्यासाठी वापरले जात आहे.

निराघात 'या' दाखविण्यासाठी विनोबांनी लोकनागरीमध्ये सुचविलेला म् असा कान्या वापरण्यास काही हरकत नाही. त्यामुळे रजा आणि राज्य ह्या दोन शब्दांचे सामान्यरूप डोळयांस वेगळे दिसेल.

आपल्या लिपीतील एका स्वरयुक्त उच्चारासाठी एक अक्षर ही कल्पनाच मोठी मनोरम आहे. उध्द्वस्तमधल्या ध्द्व मध्ये तीन व्यंजने व त्यांच्याबरोबर एक स्वर, धाष्टर्य मध्ये चार व्यंजनांच्या सोबत एक स्वर, कार्त्स्न्यमध्ये पाच व्यंजने-स्वराच्या आधी व एक नंतर अशा सहा व्यंजनांचे एक अक्षर आपण लिहितो. कमी अक्षरांमुळे नि:संदिग्धता येण्यास मदत होते. जलद वाचनास व अर्थग्रहणासही साह्य होते हा आपल्या लिपीचा गुण नष्ट होऊ देऊ नये. आपल्या डोळयांना एकाच प्रकारच्या जोडाक्षरांची सवय व्हावी असे मी मानतो. एकच जोडाक्षर जर नेहमी वापरावयाचे तर ते पूर्वीपासूनचेच का नको असा मला प्रश्न पडतो. त्यासाठी एक आपद्गस्त हा शब्द मी लिहून दाखवितो : 'आपद््‍ग््‍रद्ग्रस्त', 'आपद्ग्रस््त', 'आपद्गरस्त', 'आपद्गरस्त' - वगैरे. हे अनेक पर्याय डोळयांना त्रासदायक होतात म्हणून त्यांच्यापैकी एका रूपाचे प्रमाणीकरण करावे. छापताना सर्वत्र एकच प्रमाणित रूप वापरावे. थोडक्यात काय तर वाचकाची सोय लेखकाने आणि मुद्रकानेही पाहावी.

मराठीतले दंत्यतालव्य च, ज, झ, देहे दु:ख हे सूख मानीत जावे ह्यांतील र्‍ह्स्व एकार, कोठे र्‍ह्स्व ओकारही असेल, एका मात्रेपेक्षा कमी असलेले काही वर्णांचे अर्ध्या किंवा पाव मात्रेचे उच्चारही असतील. त्यांचा विचार पूर्वी पुष्कळांनी केला आहे. म्हणून मी तो येथे केलेला नाही. त्यातून हा निबंध मुख्यत: आघाताविषयी आहे. म्हणून येथे त्याचाच विस्तार केलेला आहे.

दिवाकर मोहनी
मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर 440010
भ्रमणभाष : 09881900608

आरपार लयीत प्राणांतिक

('आरपार लयीत प्राणांतिक' - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५. मूल्य रु० ६०/-)

कवयित्री प्रज्ञा पवार यांची 'आरपार लयीत प्राणांतिक' ही दीर्घकविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या लावणीसम्राज्ञीच्या जगण्याचे सारसर्वस्व शब्दांकित करण्याचा प्रयत्न करते. काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे. डॉ० माया पंडित यांनी 'निमित्ताने' या प्रस्तावनेतून दलित-कष्टकरी स्त्रीच्या सांस्कृतिक संघर्षाची वाचकांना जाणीव करून दिली आहे.

'पवळा हिवरगावकर ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर,' तसेच 'लावणीसम्राज्ञी ते जोगवा मागणारी असहाय स्त्री' या विठाबाईंच्या दंतकथासदृश जीवनप्रवासाचे - त्यातील चढउताराचे - दर्शन या दीर्घकवितेतून प्रभावीपणे घडते. पुरुषसत्ताक मनोवृत्तीची दांभिकताही त्यातून उजेडात येते. विठाबाईंविषयीची कवयित्रीची सहसंवेदना यात विविध नात्यांनी घट्ट विणली गेली आहे. स्त्री, दलित आणि कलावंत या तीनही पातळयांवर कवयित्रीला विठाबाईंशी नाते जोडता आल्यामुळे विठाबाईंची व्यक्तिरेखा यात विविध परिमाणांतून साकार झाली आहे.

कवयित्रीने मार्मिक प्रतिमांच्या द्वारे विठाबाईंच्या अभावग्रस्त जगण्याचे शोकात्म रूप आणि कलासंपन्न जगण्याचे दिमाखदार रूप यातील अंतर्विरोध सूचित केला आहे. ''बाई असण्याच्या चिरंतन ढोलकाठीचा खेळ', 'अभावाची ढोलकी', 'भुकेचा आदिम वग', 'षड्- विकारांची ओटी' ही यातील रूपके अर्थगर्भ आहेत. ही दीर्घकविता भावकवितेच्या अंगाने विकसित होते. त्यामुळे यात वर्णन-निवेदन यांना फाटा देऊन भावना-संवेदना-चिंतन यांच्या आवेगातून आलेला प्रवाहीपणा जाणवतो. शीर्षकातूनही याचा प्रत्यय येतो. यातील चिंतन स्त्रीत्व आणि दलितत्व यांच्याशी निगडित शोषणापुरतेच मर्यादित नसून नवभांडवलशाहीच्या नावाखाली लावणीकलाकारांची होणारी लैंगिक लूटही लक्षात आणून देणारे आहे.

''नवजात अर्भकाला जन्म देऊन,
दगडानं त्याची नाळ ठेचून,
पुन्हा फडावर रंगबाजी करताना,
तुझ्या मायांगातून ओघळणारा घाम,
वेदना अश्शी कापत जाते
माझ्या संज्ञेला''

अशा यातील ओळी उत्कट आहेत आणि धारदार उपरोधामुळे जिव्हारी झोंबणार्‍याही आहेत.
कवयित्री आणि विठाबाई यांच्या सहसंवेदनेच्या नात्यावर उभ्या राहिलेल्या या दीर्घकवितेचा बाज लयबद्ध तर आहेच, शिवाय आशयगर्भही आहे.

नीलिमा गुंडी
neelima.gundi@gmail.com

(भाषा) शिक्षणाचा खेळ(खंडोबा) - संपादकीय

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास शिक्षण मंत्र्यांना जाग येते आणि विविध शासकीय आदेश, धोरणे व योजना जाहीर होऊ लागतात. त्यातून सरकार आणि/किंवा शिक्षणमंत्री नवीन असेल तर विचारायलाच नको. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जाते. 'ज्याचे हाती शिक्षणाच्या नाड्या तोच देशाचा (व भावी पिढ्यांचा) उद्धारकर्ता' असे वाटत असल्याने आपल्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या पोतडीतून नवनवीन चिजा ते काढू लागतात. पाचवीऐवजी आठवीपासून इंग्रजी सुरू करण्याचा १९४८ सालचा खेर मंत्रिमंडळाचा निर्णयच पाहा. त्याचा परिणाम इंग्रजीचे महत्त्व वाढण्यात, इंग्रजी माध्यमाचे स्तोम निर्माण होण्यात आणि शेवटी पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात झाला. असे निर्णय घेताना पुरेसा गृहपाठ, संभाव्य ताबडतोबीच्या व दीर्घकालीन परिणामांचा विचार होतो की नाही अशी शंका त्यामुळे निर्माण होते.

दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांना एटीकेटी (अलाऊड टु कीप टर्म्ज), अकरावीच्या प्रवेशासाठी ९०%-१०%चा निर्णय, गेल्या वर्षीचा पर्सेण्टाइलच्या निर्णयाचा फियास्को, महाराष्ट्रात माध्यमिक शालान्त शिक्षण मंडळाचा शिक्षणक्रमच शिकवण्याची सर्वच शाळांना सक्ती करण्याचा विचार, अकरावीचे प्रवेश 'ऑनलाईन' पद्धतीने करण्याचे प्रयत्न अशा अनेक गोष्टी ताज्या आहेत. त्यातच दहावीची माध्यमिक शालान्त परीक्षाच रद्द करण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या निर्णयाची भर पडली आहे. याच संदर्भात आपल्या राज्यातील शाळांमध्ये कन्नड माध्यमाची सक्ती करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय व त्यासंबंधीचे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील दावे व त्यांवरील निर्णय आठवतात. शिक्षण हा विषय घटनाकारांनी राज्य व केंद्र सरकार या दोहोंच्याही अखत्यारीत ठेवलेला असल्यामुळे असा गोंधळ होत असावा असे ठरवून आता केंद्र सरकारने या बाबतीतले राज्यांचे अधिकार कमी करण्याचा किंवा ते मर्यादित करण्याचा विचार सुरू केला आहे.

शिक्षणात भाषेचा (खरं म्हणजे भाषांचा) दुहेरी संबंध येतो; एक विषय म्हणून आणि कोणताही विषय शिकण्या-शिकविण्याचे माध्यम म्हणून. पण या वस्तुस्थितीकडे आपण पुरेशा गंभीरपणाने पाहात नाही. मुळात कार्यक्षम वापर करण्याइतकी भाषा आत्मसात होण्याआधीच - आणि इंग्रजी (किंवा प्रमाण मराठी)च्या बाबतीत घर, परिसर व वातावरण यांत ती किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा विचार न करता - आपण तिच्यावर अन्य विषयांचा भार टाकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपल्याला आटापिटा करावा लागतो. त्यातून ३५% गुणांना 'उत्तीर्ण' मानणे, अनुत्तीर्णांचे प्रचंड प्रमाण, त्यामुळे होणारी गळती, आत्महत्या, बेकारी असे प्रश्न निर्माण होतात.

महाराष्ट्र शासनाने मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर केलेला करार हा अलीकडे उजेडात आलेला विषय. मूळ करार तीन वर्षांपूर्वीच करण्यात आला आहे. त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनी संगणक शिक्षक तयार करणार, ते शिक्षक इतर शिक्षकांना शिकवणार आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातले सारे विद्यार्थी संगणक-शिक्षित होऊन नोकऱ्या व व्यवसायांसाठी तयार होणार! या सगळयात आपण पुन्हा एकदा बौद्धिक गुलामगिरीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरची सक्ती, इंग्रजी अपरिहार्य ठरण्याची शक्यता आणि हे शिक्षण मराठीतून उपलब्ध झालेच तर त्या मराठीची संभाव्य भीषण अवस्था या सगळयातून आपण करत असलेला शिक्षणाचा व विशेषत: भाषा शिक्षणाचा खेळखंडोबा अधोरेखित होतो.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या पायावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा असतो. आपला हा पायाच कच्चा व डळमळीत आहे. कोठारी, राम जोशी, यशपाल यांच्या अहवालांची अंमलबजावणी करण्याऐवजी नवनवीन समित्या नेमण्यात व त्याद्वारे काहीतरी 'भरीव' काम केल्याचे समाधान मिळविण्यात आपण धन्यता मानतो. व्यावसायिक शिक्षणाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे महाविद्यालये ओसंडून वाहात आहेत हे लक्षात घेत नाही.

शिक्षणाचा आणि विशेषत: भाषा शिक्षणाचा हा खेळखंडोबा कोण, कसा व केव्हा थांबवणार हाच खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे.

- प्र०ना० परांजपे

'बंगलो'

'भाषा आणि जीवन' (उन्हाळा २००९)च्या अंकातील' शब्दजिज्ञासा'मधल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचा 'बंगला' हा लेख वाचला. बंगला या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी त्यांनी चांगली माहिती दिली आहे.

इथे दोन संदर्भग्रंथांची आठवण होते. इंग्रजांच्या काळात बरेच भारतीय शब्द इंग्रजीत वापरले गेले. त्या शब्दांबद्दल माहिती देणारे दोन शब्दकोश म्हणजे जॉर्ज क्लिफर्ड व्हिटवर्थ यांचा 'अँग्लो-इंडियन शब्दकोश' आणि हॉब्सन-जॉब्सन 'अँग्लो-इंडियन शब्दकोश'. या दोन्ही कोशांमध्ये इंग्रजी 'बंगलो' या शब्दाबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

व्हिटवर्थच्या शब्दकोशात इंग्रजीमधला 'बंगलो' हा शब्द बंगालच्या बांग्लाचा अपभ्रंश असल्याचं म्हटलं आहे. बंगलो म्हणजे वाळलेल्या गवताच्या छपराचं एकमजली घर किंवा जमिनीवर स्वतंत्रपणे उभं असलेले कोणतेही घर, असं म्हटलं आहे.

हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात 'बंगलो' या इंग्रजी शब्दाचं 'एकमजली कौलारू घर' असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बंगल्याबद्दलचं किंवा बंगालचं काहीतरी ते बांग्ला असं पूर्वी हिंदुस्थानात म्हटलं जाई. त्यामुळे युरोपियनांनी बंगालसारखी घरं इतरत्र बांधली, तेव्हा त्याला बंगला, बंगाली पद्धतीचे घर अशी नावे दिली. इंग्रजी 'बंगलो' ही संज्ञा बंगालमधील युरोपियनांनी स्थानिक घरांच्या पद्धतीवरून घेतली असल्याचं हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात म्हटलं आहे.

या दोन्ही कोशांबद्दल आणखी थोडी माहिती देते. व्हिटवर्थ यांचा शब्दकोश केगन पॉल, ट्रेंच आणि कंपनी, लंडन यांनी १८८५ मध्ये प्रकाशित केला आणि १९७६ साली इंडिया डॉक्युमेंटेशन सर्व्हिस, गुरगाव यांनी पुनर्मुद्रित केला. त्या वेळी वापरात असलेले आणि भारतीय संदर्भात विशिष्ट अर्थ असलेले पण नेहमीच्या इंग्रजी किंवा भारतीय शब्दकोशांत स्पष्टीकरण नसलेले शब्द व संज्ञा या व्हिटवर्थच्या शब्दकोशात घेतलेल्या आहेत. कलम, कच्चा, पिठोरी, लाख, कडिया इ० अशा जवळजवळ ५ हजारापर्यंत शब्दांची व्युत्पत्ती किंवा भारतीय संदर्भ त्यात दिलेले आहेत. ३५० पानांचा हा शब्दकोश संशोधकांसाठी आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांमध्ये रुची असणार्‍यांसाठी उत्तम संदर्भग्रंथ आहे.

हॉब्सन-जॉब्सन अँग्लो इंडियन शब्दकोश हा हेन्‍री यूल व ए०सी० बर्नेल यांनी तयार केला आहे. १९०३ मध्ये लंडनच्या जॉन मरे यांनी मूलत: प्रकाशित केलेल्या ह्या कोशाचं दुसरं पुनर्मुद्रण नवी दिल्लीच्या एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेसने २००६ साली केलं आहे. यामध्येही अचार, बझार, घी, लोटा, फकीर, झुला इ० इ० सारखे जवळजवळ ५ हजारांपर्यंत शब्द आहेत. शिवाय शब्द पटकन सापडण्यासाठी तीस पानांची शब्दसूची शेवटी दिलेली आहे. तसेच या कोशात ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ आले आहेत, त्या त्या पुस्तकांची पूर्ण नावे असलेली २० पानी एक यादीही दिलेली आहे. जिज्ञासूंनी या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यास या एक हजार पानी पुस्तकाच्या आवाक्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

व्हिटवर्थचा शब्दकोश आणि हॉब्सन-जॉब्सन शब्दकोश हे दोन्ही संदर्भग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

अलका कानेटकर

302, तनुजा सोसायटी, प्रेमनगर, खारेगाव, कळवा (पश्चिम) 400605
दूरभाष : (022) 25372672
भ्रमणभाष : 09969445097

क्रियापदाचे बदलले स्थान

सलील वाघ

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ. त्यातून बुद्धिवादी. शिवाय सहिष्णू. वर समाजकारण राजकारणात माहीर. मात्र भाषेबद्दल अव्वल अनास्था. प्रस्तुत लेखकाने केले एक अनौपचारिक सर्वेक्षण. यात निरीक्षली मराठीतली प्रमुख वृत्तपत्रे, दोन हजार पाच सालापासून. 'महाराष्ट्र टाइम्स,' 'लोकसत्ता', 'सकाळ', 'केसरी', 'लोकमत', 'पुढारी' ही वृत्तपत्रे आणि आजतक, स्टार, अल्फा, झी, आयबीएन, साम ही बातम्यांची चॅनेल्स, यांचे केले वाचन - आणि घेतली नोंद. त्यातून लक्षात आली ही बाब. मराठीवर पडतो आहे प्रभाव. शब्दक्रमासहित वाक्यरचनेचे केले जाते आहे अनुकरण. त्यामुळे क्रियापदाचे बदलले स्थान! ही नुसती नाही निव्वळ एक भाषाशास्त्रीय गोष्ट. याला आहे उद्याची अनेक मानवी परिमाणे. आज संस्कारक्षम वयात असलेली (४ ते १४) मराठी पिढी मोठी होणार आहे ऐकून हीच भाषा. आपण होत चाललो आहोत का जास्त जास्त अ‍ॅक्शन ओरिएंटेड? आपल्याला हवी 'क्रिया' अगोदर म्हणून येत आहे 'क्रियापद' अगोदर. याला नाही केवळ एक व्याकरणिक परिमाण. याचे संदर्भ आहेत अजून खोलवर. क्रिया म्हणजे ‍अ‍ॅक्शन. अ‍ॅक्शन म्हणजे एक्साइटमेंट. समकालीन मराठीभाषकाचे सार्वजनिक जीवन झाले आहे सवंग. खाजगी जीवन झाले आहे खोखले. त्यामुळे ही दोन्हीकडची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला काहीही करून हवी आहे एक्साइटमेंट. एक्साइटमेंटला वापरू इथे मराठी शब्द 'सनसनाटी'. मराठयांना हवी आहे सनसनाटी. म्हणून सरकले आहे क्रियापद आधी.

Pages