सलील वाघ

मराठी कवितेची बदलती भाषा : उपबोधाख्यान

स्वातंत्र्योत्तर काळात मर्ढेकर-रेगेंच्या कवितांनी कवितेची भाषा बदलली, त्यानंतर थोडासा प्रयत्न वसंत गुर्जर, मनोहर ओक, ढसाळांच्या पिढीने केला, पण कवितेची खरी भाषा बदलली ती माझ्या (म्हणजे नव्वदनंतर प्रकाशित झालेल्या, शीतयुद्धोत्तर) पिढीने. इंदिरा गांधींची हत्या हा भारताच्या राजकारणातलाच नव्हे तर भारतीय मानवसमूहाच्या मानवसंकल्पनेतलाच (महत्त्वाचा) टर्निंग पॉईंट होता. आमच्या पिढीतला प्रत्येक जण आदर, फॅसिनेशन, द्वेष, तिरस्कार यांपैकी कोणत्या ना कोणत्या भावनेने इंदिराजींशी जोडलेला होता.

क्रियापदाचे बदलले स्थान

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ.