प्र.चिं.शेजवलकर

प्रतिसादः मराठी भाषेतील सौजन्य

'भाषा आणि जीवन'चा उन्हाळी अंक (एप्रिल २००८) आत्ताच वाचला. मराठी भाषा सौजन्यपूर्ण नाही याविषयी अच्युत ओक यांनी लिहिलेलं मत तितकसं बरोबर नाही, असं मला वाटतं.

आपण इतरांशी बोलताना 'जरा पाणी देता का?', 'जरा ती फाईल मला पाठवता का?' या अशा स्वरूपाच्या वाक्यात आपण 'जरा' हा शब्द वापरतो. 'कृपया' या शब्दाला 'जरा' हा प्रतिशब्द आहे. 'मी बोलू का?', 'मी भेटायला येऊ का?' 'अभिनंदन', 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा तर्‍हेचे कितीतरी शब्द आपण नित्याच्या व्यवहारात वापरतो. या शब्दांमध्ये सौजन्य असतं. हे या शब्दांचं सौजन्य मुद्दाम वर्गात शिकवावं लागत नाही. घरात चांगले संस्कार असले तर मुलं आणि मुली हे शब्द नेहमी वापरतात. ज्येष्ठ व्यक्तींना आपण 'माननीय' किंवा 'आदरणीय' असे शब्द नेहमी वापरतो. माझ्या म्हणण्याचा आशय इतकाच की, मराठी भाषा सौजन्यपूर्ण आहे; पण बरीच मराठी माणसं वृत्तीने सौजन्यपूर्ण नसतात. आपल्या मनात दुसर्‍यांबद्दल आस्था आणि आदर असला तर आपण सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण 'आहो' 'जाहो' म्हणतो, 'तुम्ही', 'तुमचा', 'आपण' असे शब्द वापरतो तेही सौजन्य म्हणूनच. नाही तर 'अरे-तुरे'चीच भाषा सगळीकडे वापरली गेली असती.

आज्ञार्थी वाक्यांबद्दल सांगायचं झालं तर, लहान मुलांशी बोलताना घरातले लोक, विशेषत: आई, मुलाला 'अरे राजा (बाबा, सोन्या, बाळा अशी वेगवेगळी विशेषणे लावून आज्ञा करते) अंघोळ करून घे' ही विशेषणे प्रेमळ आणि सौजन्यपूर्णच असतात. उलट आपण मराठी भाषेत लहान मुलांशीसुद्धा सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

प्र.चिं.शेजवलकर
संचालक, एएसएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन, पुणे ४११ ००४.