प्रतिसाद

भाषाभिमान आणि भाषाविवेक

अ०रा० यार्दी

संदर्भ : ‘भाषा आणि जीवन’चा वर्ष २८, अंक ३ पावसाळा २०१०

१) इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द देताना खूपच सूक्ष्म विचार करायला हवा. उदा० टेलिफोनला आपण दूरध्वनी / दूरभाष म्हणतो आणि मोबाईलला भ्रमणभाष / भ्रमणध्वनी म्हणतो. खरे तर टेलिफोनला ‘स्थिरभाष’ म्हणायला काय हरकत आहे? लँडलाइनचा अर्थ तो घरात. एका ठिकाणी, जागा निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवलेला असतो. ‘भ्रमणभाष’ हा शब्द भ्रमण करता करता, बोलता येण्याची सोय असलेला या अर्थाने ठीक आहे. पण तो शब्द ध्वनीपेक्षा वस्तूला अधिक लागू होतो. काही लोक मोबाईलला ‘चलभाष’ असाही शब्द वापरतात. म्हणजे याच आधाराने टेलिफोनला ‘अचलभाष’ म्हणायचे काय?

२) ‘‘बहुभाषिक भारत- वास्तव आणि स्वप्न’’ हा मॅक्सीन बर्नसन यांचा लेख अतिशय उद्बोधक आहे. मुद्दा आहे, ‘मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेऊ द्या’ या शिक्षणतज्ज्ञांच्या अभिप्रायाबद्दलचा. वास्तव हे नेहमीच वेगळे राहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांनी कितीही कंठरवाने सांगितले, तरी मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळविणे दुरापास्त होत चालले आहे, विशेषत: भाषावार प्रांतरचनेनंतर.
‘मातृभाषा’ या मागची संकल्पनाच मोडीत काढण्याचे राजकारण आज राज्या-राज्यांमध्ये खेळले जात आहे. मातृभाषा म्हणजे आईची-आईकडून आलेली भाषा. इतर आनुवंशिक गुण (आणि दोष) सुद्धा घेऊनच जसे मूल जन्माला येते, तसेच भाषेचे अंगही ते आईकडून घेऊन येत असावे आणि त्यानंतर ते अधिकाधिक, घडणीच्या बालपणी आईच्या सहवासातच राहत असते. त्यामुळे आईची भाषा ती मातृभाषा असे झाले असावे. पण आजकाल मातृभूमी, मातृभाषा या संकल्पना इतक्या संकुचित मनाच्या लोकांच्या ताब्यात गेल्या आहेत की या सगळ्यांचा पुनर्विचार करावा असे त्यांना वाटू लागले आहे. मातृभूमी म्हणजे भारत देश नसून ज्या प्रांतात तो / ती, जन्मला / जन्मली, ती भूमी होय. मातृभाषा म्हणजे आईकडून आलेली भाषा असे नसून त्या राज्याची भाषा होय, असा समज जरबेने बसवू पाहिला जात आहे. अशा संदर्भात शिक्षणतज्ज्ञांच्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आणि तो नेमका घेतला, तर त्याला वास्तवात कितपत आधार मिळतो? भाषांचा हा गोंधळच नको म्हणून इंग्रजी किंवा हिंदी भाषांच्या माध्यमांच्या शाळांत आपल्या पाल्यांना पाठविणारे पालक आज संख्येने वाढत आहेत आणि विशेष म्हणजे अशी आपली मातृभाषा सोडून इतर भाषांतून शिक्षण घेतलेली मंडळी मातृभाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांच्या तुलनेत खूपच उजवी ठरत आहेत. ‘तडफदार’ ठरत आहेत. मातृभाषांत शिक्षण घेतलेली मुलं मात्र न्यूनगंडानं त्रस्त झालेली दिसत आहेत. असे सगळे असताना मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह कशासाठी? इतर भाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांनी परदेशवार्‍या करायच्या, ऐषारामी जीवन जगायचं आणि मातृभाषेत शिक्षण घेतलेल्यांनी फक्त आपल्याच राज्यापुरतं मर्यादित जगायचं? या सगळ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करून त्यावर योग्य ती उपाययोजना होत नाही, तोपर्यंत ‘मातृभाषेतून शिक्षण’ या वैज्ञानिक विचाराला वास्तव जगात आधार मिळणं कठीण आहे.

एक गोष्ट मात्र खरी की, स्व-भाषेच्या अतिरिक्त हव्यासापायी आणि स्वभाषेबद्दलच्या निष्काळजीपणापायी आपण अनेक वेळा सांस्कृतिक हत्या करीत असतो, हे राज्यकर्त्यांच्या गावीही नसते. महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमाभागातले उदाहरणच पाहा. सीमावर्ती भाग म्हटलं की द्विभाषिकांची वस्ती असणारच. असे असताना त्या त्या सीमावर्ती भागातल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी त्या त्या भाषकांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. कर्नाटकातल्या मराठी भाषकांना आणि महाराष्ट्रातल्या कन्नड भाषकांना (सीमावर्ती भागातल्या) आपली भाषिक संस्कृती जपून ठेवण्यासाठी, खरे तर स्थानिक शासनांनी मदत केली पाहिजे. अशा सीमावर्ती भागांची तर त्या त्या शासनाने विशेष दखल घेऊन द्वैभाषिक संस्कृती टिकवली पाहिजे. त्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागूनही पदरी काहीच न पडल्याची निराशाही धोकादायक आहे.

राज्यांच्या सीमावर्ती भागातली संमिश्र संस्कृती, ही केव्हाही त्या त्या राज्याचे भूषण ठरायला हवी. पण चित्र उलटेच आहे. राज्यकर्त्यांच्या अशा असंस्कृत धोरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक हत्या होत आहेत.

अमेरिकन प्रोफेसर पॉल ब्रास यांनी भारतातील भाषा-व्यवहाराचा अभ्यास केला आहे. पण ‘‘आपली राहणी सुधारण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मातृभाषेचा त्याग करायला काही हरकत नाही.’’ हे त्यांचे मत भावनाशून्य आणि केवळ बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आपल्या मातृभाषेचा त्याग करण्याचा सल्ला जो देतो, त्याला मातृभाषेबद्दलच्या भावना काय कळणार? उपयुक्ततावादापलीकडेही जीवनदृष्टी असू शकते, हे केवळ बुद्धिवाद्यांना कळणारच नाही.

आपण बर्‍याच वेळा परराज्यातल्या विद्वानांना विशेष व्याख्यानांसाठी बोलावीत असतो. शेजारच्या राज्यातील विद्वानांना तरी एकमेकांची भाषा अवगत असायला हवी. पण दुर्दैव असे, की आपल्याच देशबांधवांशी थेट संवाद साधायचा असेल तर, या विद्वानांना इंग्रजीचा आधार द्यावा लागतो. आणि हल्ली ‘नॅशनल सेमिनार’ या नावाखाली जे देखावे केले जातात त्यात भाग घेणार्‍या स्थानिक प्राध्यापकांनासुद्धा इंग्रजीत केलेली भाषणे कळत नाहीत. सगळ्यात गंमत म्हणजे, अशा वेळी भाषाभिमान्यांनी इंग्रजीतून बोलण्याचा आग्रह करावा, हे तर न सुटणारे कोडे आहे.

आजचा तरुण-वर्ग परकी भाषा, विशेषत: जपानी, चिनी, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा अत्यंत आवडीनं आणि अभिमानानं, त्या त्या देशात मिळू शकणार्‍या नोकर्‍यांच्या आशेपोटी शिकत आहे. याउलट आपण आपल्याच देशातल्या किती राज्यांच्या भाषा एवढ्या अभिमानानं आणि आवडीनं शिकतो?

संयुक्त क्रियापदांचा पेच

चिन्मय धारूरकर

‘भाषा आणि जीवन’च्या वर्ष २८, अंक १ हिवाळा २०१० या अंकात रेणुका ओझरकर यांचा ‘‘मराठीतील ‘विवाद्य’ संयुक्त क्रियापदे’’ या शीर्षकाचा लेख आला आहे. या लेखात त्यांनी उमाकांत कामतांच्या एका लेखाचा उत्तम समाचार घेतला आहे आणि मुद्देसूदपणे कामतांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे.

संयुक्त क्रियापदांची विवाद्यता ही भाषागत नसून सैद्धान्तिक अव्यवस्थेतून निपजते हे रेणुका ओझरकरांचे म्हणणे त्यांच्या संशोधनातील सैद्धान्तिक चौकटीबद्दलची जाण दाखवणारेच आहे.

अर्जुनवाडकरांनी (१९८७:१७८-१८४) केलेल्या संयुक्त क्रियापदांच्या ऊहापोहाचा संदर्भ लेखात नसावा हे मात्र खटकते. लेखाच्या अखेरीस (पृ० ३७, परिच्छेद दुसरा) एका ठिकाणी ‘उडी मारणे’ व ‘गाडी चालवणे’ याबद्दल जे लिहिले आहे त्या संबंधातील अडचणीबद्दल पुढे ऊहापोह केला आहे आणि संयुक्त क्रियापदांची व्याकरणातील व्यवस्था यावर चर्चा केली आहे.

‘उडी मारणे’ यात ‘उडी’ आणि ‘मारणे’ यात घनिष्ठ संबंध आहे म्हणजे काय? आणि गाडी चालवणे यात नाही म्हणजे काय? याचे एक स्पष्टीकरण असू शकते की, उडी आणि मारणे यांच्या विभिन्न / वेगवेगळ्या स्वत:च्या अर्थापासून जो बोध होतो तो त्यांच्या संयोगाने होत नाही तर तिसराच अर्थ व्यक्त होतो. हा तिसरा अर्थ निर्माण करण्याची जी शक्ती उडी मारणे, गप्पा मारणे, मांडी घालणे इ० क्रियापदांत असते त्या असण्याला आपण घनिष्ठ संबंध म्हणत आहोत. गाडी चालवणे यातील गाडीचा अर्थ आणि चालवणे याचा अर्थ बघता मिळून काही अगदी वेगळाच अर्थ निघत नाही तर ‘‘गाडी चालवणे’’ हाच निघतो. अर्थाच्या पातळीवरील हे तथ्य नजरेसमोर ठेवून आपण घनिष्ठ संबंध असे म्हणणार असलो तर यातून काही व्यवस्था हाती लागत नाही, कारण मुळात वेगळा अर्थ निघतो म्हणून ही संयुक्त क्रियापदं असं म्हणण्यात काही फार तथ्य नाही, कारण भाषेत वेगळा अर्थ संदर्भाने कथित संयुक्त नसणार्‍या क्रियापदाचाही निघू शकतो.
अर्जुनवाडकरांनी केलेली चर्चा पाहा : अर्जुनवाडकर (१९८७:१८०)

संयुक्त मानल्या गेलेल्या क्रियापदांना आपण जर गोठलेल्या रचना (फ्रोजन एक्स्प्रेशन्ज!) किंवा रूढीभूत रचना म्हणणार असलो तर अर्थविचार आणि व्याकरण यांना एकत्र आणत आहोत. तसे करताना बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. मुळात संस्कृत आणि इंग्रजीच्या प्रभावात विकसित झालेली आपली मराठीची ‘अमराठी व्याकरणं’ इथे फसली आहेत. व्याकरण म्हणजे रूपांच्या निर्मितीचे नियमन करणारे शास्त्र अशी ढोबळ धारणा दिसून येते. ती काही अंशी पाणिनीय प्रभावातून आहे. पाणिनी बर्‍याचदा रूपलक्ष्यी भूमिका घेतो आणि महत्त्वाच्या घटकांना पदगती देण्यात धन्यता मानतो. पाणिनीला अर्थलक्ष्यी विचार (म्हणजेच सिद्ध पदांचे वा त्यांतील घटकीभूत अवयवांचे आर्थिक विश्लेषण) नको होता असं मुळीच नाही तर पद (पद म्हणजे १. तिङन्त म्हणजेच तिङ् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत अशी धातुरूपे किंवा २. सुबन्त म्हणजे सूप् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती लागलेले आहेत अशी नामरूपे व म्हणून भाषेत व्यवहारयोग्य असा शब्द) या संकल्पनेने रूपनिर्मिती, पदसिद्धीला होणारे फायदे (जसे की अव्ययांना सुबन्तत्व दिले की त्यांनाही पदसंज्ञा मिळते व पाणिनीय व्यवस्थेत त्यांसाठी वेगळी शब्दजाती लागत नाही इ०) पाहता, एक औपचारिक बांधिलकी म्हणून रूपलक्ष्यित्व प्राबल्याने दिसते. पाणिनीचा आणि संस्कृताचा उल्लेख झालाच आहे तर कथित ‘संयुक्त क्रियापदां’संबंधी पाणिनी काय म्हणतो या साहजिक प्रश्नाचा ऊहापोह करू. पाणिनीच्या व्याकरणातील रूपनिर्मितीच्या आणि पदसिद्धीच्या व्यापारात ‘संयुक्त क्रियापद’ अशी संकल्पना नाही. तिची मुळात पाणिनीय व्यवस्थेत गरजही नाही. ओझरकरांनी दिलेली ‘नमस्करोति’ आणि ‘प्रकटीकरोति’ ही संयुक्त क्रियापदे नाहीत असे म्हणता येणार नाही; परंतु, पाणिनीसाठी ती संयुक्त क्रियापदे नक्कीच नाहीत. ‘नम:’ व ‘प्रकटी’ दोहोंनाही रीतसर पदसंज्ञा प्राप्त होते आणि एक अव्ययपद म्हणून त्यांचे स्थान निश्चित होते. संस्कृत भाषा ही अर्थात पाणिनीच्या मालकीची नाही. पाणिनीने केवळ एक व्याकरणिक प्रारूप उभे केले आहे. ओझरकरांना किंवा आधुनिक भाषाविज्ञानाच्या चष्म्यातून बघणार्‍या कोणालाही जर संस्कृतातील अशा क्रियापदांची संगती ‘कॉम्प्लेक्स प्रेडिकेट’ म्हणजेच ‘संयुक्त क्रियापदे’ म्हणून लावायची असेल तर तो मार्ग खुला आहेच. भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स आणि कम्पाउंड व्हर्ब्झ अशा दोन संज्ञा रूढ आहेत आणि त्या आलटून पालटून वापरल्या जातात. केवळ धातुरूपांचा संयोग असेल तर तिथे कम्पाउंड व्हर्ब (उदा० करत बसणे, उकरून काढणे इ०) ही संज्ञा वापरावी व नाम+धातुरूप (उदा० गप्पा मारणे, उडी मारणे इ०) अशा संयोगांसाठी कॉम्प्लेक्स प्रेडिकेट म्हणावे असा कल आहे, तसेच कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स हा मोठा संच मानून कम्पाउंड व्हर्ब्झ हा पोटप्रकार मानावा असाही प्रवाह आहे. या लेखात मात्र नाम +धातुरूप अशा रचनांचीच चर्चा आहे.
पाणिनीय प्रभावातून बाहेर पडून तसेच इंग्रजी व्याकरणाच्या अंधानुकरणातूनही बाहेर पडून आता जायचे कुठे असा प्रश्न आहे. एक उत्तर हे की आधुनिक भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्सची व्यवस्था वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये लावण्यात येते ती मराठीला लागू करून बघणे.

आपण काही एक भूमिका घेणार असू तरच हे सुरू करणे योग्य. मुळात संयुक्त क्रियापदे का मानू नयेत याची भरपूर समाधानकारक चर्चा अर्जुनवाडकर करतात. तिची पुनरुक्ती नको. संयुक्त क्रियापदे मानू नयेत यापक्षी भाषावैज्ञानिक विश्लेषणात्मक पुरावा व कारणमीमांसा अर्जुनवाडकर पुरवतात. हे जरा टोकाचे किंवा फारच रूपलक्ष्यी आहे. पण अर्जुनवाडकरांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. त्यामुळे एक भाषाविशेष आपण दुर्लक्षून टाकत आहोत असे वाटू शकते, पण त्याला इलाज नाही. कारण जर अर्थाचा असा विचार आपण व्याकरणात करत बसलो तर आलंकारिकांचे कामही आपण करून ठेवू, मग त्यांनी करायचे काय! असो. गमतीचा भाग बाजूला, पण आपणच उलटी भूमिका भक्कम करता येते का बघू आणि तसे करताना काय अडचणी येतात ते बघू.

संयुक्त क्रियापदे असतात असे मानू. ती लाक्षणिक अर्थाने कळून येतात यावर आपण जरा विचार करू. लाक्षणिक अर्थाने कळून येणे म्हणजे काय हा मूळ प्रश्न आहे तो आपण अर्जुनवाडकरांना विचारू शकतो. त्यावर ते आपले मम्मटाचे पुस्तकच आपल्या समोर ठेवतील. अर्थात ते योग्यच आहे. लक्षणार्थाने कळून येत नाहीत या दिशेने चर्चा पुढे जाऊ शकत नाही.
आधुनिक मनोलक्ष्यी भाषाविज्ञानाच्या अभ्यासपद्धती वापरल्यावर असे दिसून आल्यास नवल नाही की एखादा लाक्षणिक अर्थ मराठीत कळून येण्यास जेवढा (मिलीसेकंदाचा) वेळ लागतो तेवढाच वेळ या ‘लक्षणाभिव्यंजक’ संयुक्त क्रियापदांचा अर्थबोध होण्यास लागत नसून त्यापेक्षा बराच कमी लागतो. यालाच मुळी भाषाविज्ञानात गोठलेली रूढ (फ्रोझन), अभ्यासाने, सवयीने बांधलेली (फर्ॉम्युलैक) अशी विशेषणे वापरली जातात. शिवाय, मराठी भाषक ‘गप्पा मारणे’ याचा वापर करताना ‘चला जरा लक्षणा वापरू या’ किंवा ‘काय नवलाईनं प्रयोग करतो आपण’ असा दरवेळेस विचारही करत नाहीत, हे प्रयोग सवयीने सहज मुखावाटे बाहेर पडतात. म्हणजेच इथे लक्षणा गोठलेली आहे. इथे लक्षणा आहे याचे भानही वापरकर्त्यांना राहिलेले नसते.
असे असले म्हणून, उलटपक्षी कोणी असेही म्हणेल की ‘उडी मारणे, गप्पा मारणे’ यांत लक्षणा गोठलेली आहे आणि त्यांचा समग्रपणे एकत्रितच अर्थबोध होतो, त्यांतील नामांचा (उडी, गप्पा), क्रियापदांचा यांचा भिन्नत्वाने बोध होत नाही, तर त्यांना संयुक्त मानायचेच कशासाठी. म्हणजे संयुक्त क्रियापदे (नाम+क्रियापद प्रकारातले कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स) ही संज्ञाच टाळता येतील. पण असे म्हणणे सयुक्तिक नाही. कारण समग्रपणे जरी बोध होत असला तरी ती, ती नामे आणि क्रियापदे अस्तित्वात असतातच. आणि त्यांचा संयोग इथे होत आहे, म्हणून त्यांना संयुक्त म्हणण्यात वावगे काहीच नाही! पण हा युक्तिवादही फार तग धरू शकत नाही, कारण मूळ प्रश्न हा की गोठलेल्या लक्षणा आपले व्याकरण स्पष्टीकरणाच्या पातळीवर हाताळू शकते का? याचे सरळ उत्तर नाही, असे आहे. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गोठलेल्या लक्षणातील पदांच्या संयोगातून निर्माण होणार्‍या अर्थाविषयी काही निश्चयपूर्वक भाकीत करता येत नाही. याची जबाबदारी शेवटी कोशावर टाकावी लागते आणि वाक्प्रचार या कोटीतच त्यांची यादी द्यावी लागते.

सोस्यूरच्या चिन्हाच्या यादृच्छिकतेचा विशेष वाक्प्रचारांच्या संदर्भातही लागू ठरतो. गोठलेल्या लक्षणांची वासलात कोशात वाक्प्रचार या खाक्यात करणे म्हणजे एक प्रकारे त्यांची कोणतीही तार्किक मीमांसा न देता त्यांची यादृच्छिकता मान्य करण्यासारखेच आहे. दुसर्‍या एका दिशेने या गोष्टीचा विचार करता येईल. ती दिशा म्हणजे स्टिव्हन पिंकर यांनी दाखवलेली किंवा एस्पेरांतोच्या विकासातून स्पष्ट झालेली. त्यानुसार असे वाक्प्रचारात्मक प्रयोग निर्माण होणे हे भाषेचे भाषापणच आहे. मग त्या चिन्हभाषा असोत व एस्पेरान्तो सारख्या रचलेल्या भाषा असोत, त्यांना सुरुवातीला कितीही तर्काधिष्ठित अथवा दामटून नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी (प्राय: चिन्हाच्या यादृच्छिकतेच्या तत्त्वामुळे) भाषेचा कल अधिकाधिक वाक्प्रचारात्मक होण्याकडेच असतो.

इथे एक तात्त्विक विसंगती जाणवू शकते. ती अशी की आपण गोठलेल्या लक्षणा म्हणण्यासाठी ज्ञानात्मक भाषाविज्ञानाची कास धरत आहोत. आणि संयुक्त क्रियापदे आहेत / असतात असे म्हणताना पारंपरिक व्याकरणात मानल्या जाणार्‍या पदजातींना ग्राह्य धरत आहोत. त्याचे कारण असे की ज्ञानात्मक व्याकरणे कशी लिहावीत [पाहा लँगॅकर (२००८), राडन आणि दिर्वें (२००७)] मानवी बुद्धिगत भाषिक प्रक्रियांचा व्याकरणगत अनुबंध कसा असावा याची थोडीफार स्पष्टता भाषाविज्ञानात असली तरी संयुक्त क्रियापदांची संगती लावण्यासाठी अखेरीस ‘लेक्सिकन’ वरच सगळी जबाबदारी टाकली जाते. तसेच, ज्ञानात्मक पातळीवर समग्रपणे बोध होणे वेगळे आणि मनोबाह्य (ज्ञानात्मक नसलेल्या) व्याकरणामध्ये नाम, क्रियापद या भिन्न पदजाती मानणे वेगळे. मूळ तिढा असा की या लक्षणेने कळून येणार्‍या त्यांची व्यवस्था आपण कोणत्याही प्रकारच्या व्याकरणात लावणार का आणि कशी? सत्तरच्या दशकात चॉम्स्कीच्या ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ या निबंधानंतर लेक्सिकलिझमची लाट आली आणि अशा प्रकारे व्यवस्था न लागणार्‍या घटकांची व्यवस्था (त्यांचे वाक्यातील वर्तन, त्यांच्यासोबत येऊ शकणारे शक्यतम कारकार्थ इ० तपशील) सरसकट लेक्सिकन (शब्दकोश)मध्ये असते असे सांगितले जाऊ लागले. हे प्रकार वाक्यविचाराने अर्थविचारातून आपले अंग काढून घेण्यातलेच होते.

संदर्भ :
अर्जुनवाडकर, कृ० श्री० १९८७. ‘मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद’. सुलेखा प्रकाशन, पुणे.
ओझरकर, रेणुका. २०१०. ‘मराठीतील विवाद्य संयुक्त क्रियापदे’. भाषा आणि जीवन : हिवाळा, अंक १, पृ० ३३-३८
चॉम्स्की, नोम. १९७०. ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ (संपा० आर याकोब्झ आणि पी रोझनबाउम) ‘रिडिंग्झ इन इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर’ वॉल्टहॅम, मॅसॅचुसेट्स. गिन आणि कं०. पृ० १८४-२२१
राडन, ग्युंटर आणि दिर्वें, रेने. २००७. ‘कॉग्निटिव्ह इंग्लिश ग्रामर’, जॉन बेंंजामिन्झ पब्लिशिंग कंपनी, ऍमस्टर्डॅम.
लँगॅकर. २००८. ‘कॉग्निटिव्हर ग्रामर : अ बेसिक इंट्रडक्शन’ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यु यॉर्क.

अठरा विश्वे

(१)

शं० दे० पसारकर

'अठरा विश्वे' या शब्दप्रयोगाविषयी डॉ० ब्रह्मानंद देशपांडे यांचा लेख (भाषा आणि जीवन, पावसाळा २००९), आणि त्यावरील श्री०न० गुत्तीकर (हिवाळा २०१०) व विजय पाध्ये (उन्हाळा २०१०) यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. याविषयीची जुनीच माहिती या ठिकाणी जिज्ञासू वाचकांसाठी नव्याने देत आहे.

'इसा' म्हणजे वीस वीस या संख्येचे गट (जोशी प्र०न० १९८२ : आदर्श मराठी शब्दकोश. विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे ६७). या शब्दाचे कृत्रिम संस्कृतीकरण म्हणजे 'विश्व'. 'गुंडम राउळ' यांना 'गोविंदप्रभू' किंवा 'अक्कलकोट' या गावाला 'प्रज्ञापूर' संबोधणे, अशापैकीच हा प्रकार. 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)

डॉ० नरेंद्र जाधव आपल्या आईविषयी सांगतात,"मातोसरींचा पैशांचा हिशोब हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही. शंभर म्हणजे पाच 'इसा' असे तिचे गणित असते" (जाधव नरेंद्र २००७ : आमचा बाप आन् आम्ही, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई ४६).

मी माझ्या बालपणी विदर्भातील माझ्या खेडेगावात 'एक इसा, दोन इसा, तीन इसा' अशा पद्धतीने नाण्यांचे ढीग करून पैसे मोजणारी माणसे पाहिली आहेत.

'उषास्वप्न'
126 ब, मार्कंडेय नगर, सोलापूर 413 003
दूरभाष : (0217)260 2301
भ्रमणभाष : 094207 80570

(२)

शकुन्तला फडणीस

अठरा विश्वे याबद्दल श्री० विजय पाध्ये यांचे टिपण वाचले. ('भाषा आणि जीवन' - उन्हाळा, पृ० ७४) मी भाषाशास्त्राची अभ्यासक नाही. तरीही अठरा विश्वेचा आणखी एक अर्थ सांगावासा वाटतो.

श्री० शं०ना० नवरे यांना 'गदिमा पुरस्कार' मिळाला त्यावेळच्या भाषणात शं०ना० म्हणाले होते -"शब्द वापरताना नेमका अर्थ माहीत असला पाहिजे. 'अठरा विश्वे दारिद्रय' हे शब्द वापरताना अठरा विश्वे कोणती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अठरा विसावे म्हणजे १८ गुणिले २० म्हणजे वर्षातील ३६० दिवस असलेले दारिद्रय हा अर्थ सापडला. प्रत्येक शब्दाची ओळख व्हावी असे मला वाटते. शब्दकोश पाहतो."

शं०नां०चे वरील विवरण 'मेहता मराठी ग्रंथजगत', जाने० २००९ या अंकात पृ०८९ वर प्रकाशित झाले आहे. अठरा विश्वे हे दोन शब्द नेहमी दारिद्रय या शब्दाला चिकटून येतात इतकेच मला माहीत आहे.

1233, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, रस्ता क्र० 4, पुणे 411 002
दूरभाष : (020)2447 2232

वर्ण आणि अक्षर

दिवाकर मोहनी

संदर्भ : 'शासनसंमत मराठी वर्णमाला', 'भाषा आणि जीवन' : वर्ष २८ अंक १ व २

प्रा० अर्जुनवाडकर ह्यांचा मुद्दा विचारणीय आहे. आपण उच्चार करताना बुङ्ढा, विट्ठल, सक्खा असाच करीत असतो. पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे; आपण नेहमी जसा उच्चार करतो तसे लिहीत नाही आणि आपण पूर्वीपासून जसे लिहीत आलो तसेच पुढेही लिहीत राहिल्याने आपले वाचन सुकर होत असते.

दुसरा मुद्दा असा की, आपल्या बोलीभाषा आणि संस्कृत ह्यांचे उच्चारच वेगवेगळे आहेत. आपल्या बोलीमध्ये म्हणजे देशज शब्दांमध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व करण्याचा प्रघात आहे. गप्पा, अप्पा, अण्णा, घट्ट, हट्ट, कच्चा, पक्का, हल्ला, किल्ला, पत्ता, गुत्ता, बत्ता असे उच्चार आम्हांला सहजपणे करता येतात. स्वास्थ्य, नि:स्पृहत्व, धृष्टद्युम्न असे शब्द आम्हांला प्रयत्नाने उच्चारावे लागतात.

एकाच व्यंजनाचे द्वित्व करावयाचे हे आमच्या मनात अगदी पक्के ठसले असल्यामुळे आम्ही महाप्राण व्यंजनांचेसुद्धा लेखनात द्वित्व करतो. तसा उच्चार करणे प्राय: अशक्य असले तरी! वाचनसौकर्यासाठी हा लेखनदोष स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते.

प्रा० अशोक केळकर ह्यांनी सुचविलेल्या रु, रू लाही तेवढ्याचसाठी माझा आक्षेप आहे. ज्या अक्षरांची आपल्या डोळयांना सवय झाली आहे ती मोडू नये ही एक गोष्ट आणि जुनी पुस्तकेही लोकांच्या वाचनात येत राहणार असल्यामुळे ह्या दोन प्रकारच्या अक्षरांचा डोळयांना त्रास होईल ही दुसरी. म्हणून लेखनात फरक करण्याऐवजी अक्षरांतील ऱ्हस्वत्वाच्या खुणा डावीकडे वळतात आणि दीर्घत्वाच्या उजवीकडे (रु, रू) हे वाचकाला एकदा नीट समाजवून देणे इष्ट असे माझे मत आहे. (बघा : मि मी, मु मू)

डॉ० केळकर ह्यांच्या पत्रात अर्धचन्द्र हा शब्द एकदा आला आहे; अर्धचन्द्र ह्या शब्दाला निराळा संदर्भ आहे. त्यांना तेथे 'चन्द्र' अपेक्षित आहे हे उघड आहे. कारण चन्द्र ह्या शब्दाने पौर्णिमेचा पूर्ण चन्द्र सूचित होत नाही. चन्द्राची चतुर्थीची किंवा पंचमीची कलाच सूचित होते. ( ॅ)

केवल-व्यंजनांच्या मालेला वर्णमाला म्हणणे आणि सस्वर-व्यंजनांच्या मालेला अक्षर-माला म्हणणेही चुकीचे आहे. आपल्या नागरी लिपीत ज्याचा उच्चार होऊ शकत नाही असे काहीही लिहिता येत नाही. केवल व्यंजनांचा उच्चार कोणालाही करता येत नाही. उत्, ऋक्, धिक्, वत्, विद् ह्या शब्दांतील व्यंजने मागच्या स्वराच्या आधाराने उच्चारली गेली आहेत. त्यांच्यापुढे स्वर आल्याबरोबर ती व्यंजने पुढच्या स्वराला जाऊन चिकटतात. उन्नयन, ऋक्साम, विद्वान्, सदसद्विवेक अशी त्यांची शेकडो उदाहरणे आहेत. एवढ्याचसाठी वर्णमाला क् ख् ग् घ् ङ् अशी कधीही लिहू नये. ती क ख ग घ ङ अशीच लिहावी. वाटल्यास उच्चारसौकर्यासाठी ती तशी लिहिली आहे असे सांगावे.

वर्ण हा अर्थशून्य असतो तर अक्षर हे अर्थपूर्ण असते. त्याचप्रमाणे 'वर्ण' हा समूहाचा एक घटक असतो. ख, भू ही वाक्यात वापरली तर 'अक्षरे' - क ख ग घ, भ भा भि भी भु भू हे वर्ण - हे जाणून जुन्या संज्ञा बदलू नयेत. मंत्र, वृत्ते ही सारी अक्षरसंख्येने ओळखली जातात, वर्णसंख्येने नाही!

गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440 010
भ्रमणभाष : 098819 00608

‘म्हणून’ची चूक

शकुंतला क्षीरसागर

उज्ज्वला जोगळेकर यांनी ‘उच्चारणातून व्यक्त होणारे संयुक्त तर्कसूचक अव्ययांचे ‘अर्थ’कारण’ (भाषा आणि जीवन वर्ष २८ अंक १ हिवाळा २०१०) या लेखात ‘म्हणून’, ‘म्हणून तर’, ‘म्हणून तरी’, ‘काही’ या उभयान्वयी अव्ययांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे दिली आहेत. हा लेख त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवतो.

श्री०के० क्षीरसागर यांनी ‘म्हणून’च्या चुकीच्या उपयोगाचे एक उदाहरण दिले आहे. ते वाक्य असे आहे, ‘‘त्या काळी विद्यालये नव्हती; ते म्हणून पदवी घेऊ शकले नाहीत.’’ या वाक्यातील चूक दाखवताना त्यांनी म्हटले आहे की, ‘विद्यालय’ ऐवजी ‘विद्यापीठ’ हवे; ‘ते म्हणून’ या ऐवजी ‘म्हणून ते’ असे हवे. ‘ते म्हणून’चा अर्थ, त्यांच्याऐवजी दुसरा कोणी असता तर अन्य प्रकार घडला असता, असा होतो. हल्ली हा चुकीचा प्रयोग मुंबईच्या काही गटांनी जोराने चालू केला आहे. यात फक्त ‘ही देअरफर’ (He therefore) या इंग्रजी वळणाचे अनुकरण आहे.’’

संदर्भ : क्षीरसागर, श्री०के० २००० मराठी भाषा : वाढ आणि बिघाड, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई. (मूळ लेख ‘आजची मराठी भाषा : वाढ आणि बिघाड’ या नावाने मनोरा, सप्टेंबर १९७४, पृ० १५-१६ मध्ये प्रकाशित)

21/418 लोकमान्यनगर, पुणे 411 030

वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ

मराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. स्वतंत्र 'मराठी विद्यापीठ' या आपल्या संपादकीयावरील डॉ० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद वाचला. (भाषा आणि जीवन, हिवाळा २०१०)

मराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. १९६६मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी हिरिरीने विद्यापीठाच्या प्रशासनात मराठीचा वापर सुरू केला. नागपूर विद्यापीठाचा नवा परिसर विकसित झाला, तोही त्यांच्याच कारकिर्दीत. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचे कामही याच काळात त्यांनी प्रा० वामनराव चोरघडे यांच्याकडे सापवले. शास्त्रीय व तांत्रिक विषयांवरील अनेक ग्रंथ त्या कालखंडात या ग्रंथनिर्मिती मंडळाने तज्ज्ञ प्राध्यापकांकडून लिहून घेतले व प्रकाशित केले. डॉ० भाऊसाहेब कोलते यांच्या संपर्कात आलेले प्राध्यापक मराठी माध्यमाचा आग्रह धरीत. परंतु अन्य प्राध्यापकांनी मात्र मराठी माध्यमाचा आग्रह धरला नाही. आम्हांला आमचे विषय मराठी माध्यमातून शिकवणे जड जाते. आम्हांला निवृत्त होऊ द्या आणि मग मराठी माध्यम सुरू करा. ह्या अशा प्राध्यापकांच्या कदुष्म (ल्युकवॉर्म) वृत्तीमुळे विद्यापीठ स्तरावरील शास्त्रीय विषयांच्या बाबतीत मराठी माध्यमाचा प्रश्न पुढे बारगळला आणि महाविद्यालयांत मराठी माध्यम स्थिरावू शकले नाही. नंतरच्या कुलगुरूंनीही (महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या) हा प्रश्न तडीस नेला नाही. मराठी सिद्ध झालेल्या सर्वच ग्रंथांकडे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे ग्रंथ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाच्या कपाटांमध्ये व शासकीय मुद्रणालयाच्या गोदामांमध्ये राहिले. प्राध्यापकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत.

डॉ० कोलते हे भाषा सल्लागार मंडळाचे १९६१पासून अगोदर सदस्य व नंतर अध्यक्ष होते. या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध शास्त्रीय व तांत्रिक विषयांचे कोश तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने भाषा संचालनालयाने गेल्या चाळीस वर्षांत प्रकाशित केले आहेत. या शैक्षणिक उपक्रमात मराठी विज्ञान परिषदेचाही बराच मोठा वाटा आहे. शास्त्रीय व तांत्रिक शब्दावली निर्मितीच्या आणि प्रसाराच्या कामात सुरुवातीपासूनच मराठी विज्ञान परिषद सहभागी होती.

तिसांहून अधिक अशा शास्त्रीय परिभाषा कोषांचा उठाव महाविद्यालयांतून कमीच झाला, असे म्हणावे लागेल. कारण फारच थोडया परिभाषा कोषांच्या दुसर्‍या आवृत्त्या निघाल्या. पारिभाषिक शब्द हे वापरामुळे भाषेला समृद्धी आणतात. शक्य तेथे मानक पारिभाषिक शब्दांचा वापर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि जनतेने करणे हे भाषेच्या अभिवृद्धीसाठी नितांत आवश्यक आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.

मराठी विद्यापीठ संस्थापित झाल्यास सध्या मराठीसाठी काम करणारी जी शासकीय व निमशासकीय मंडळे आहेत ती, एका छत्राखाली येतील. त्यांच्या कार्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम सोपे होईल. स्वायत्तेमुळे मराठीचा विकास काळानुरूप वेगाने होईल. महाराष्ट्र वैभवाचे शिखर गाठू शकेल.

न०ब० पाटील
A-37, कमलपुष्प,
जन० अरुणकुमार वैद्य मार्ग, वांद्रे रेक्लमेशन (प०) मुंबई 400 050
दूरभाष : (022) 2642 9309

मराठी विद्यापीठ

'भाषा आणि जीवन'मध्ये अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. असे लेख संपादन करून त्यांची विषयवार विभागणी करून ते प्रसिद्ध पुस्तकरूपाने झाले तर मराठीच्या अभ्यासकांना ते संकलित स्वरूपात मिळतील. अधिक संशोधनासाठी ते उपयुक्त ठरतील. असे नवीन विचारधन विस्मृतीमध्ये जाऊ नये यासाठी असा प्रकल्प याच त्रैमासिकाने योजावा असे मला वाटते.सदाशिव देव

१. 'भाषा आणि जीवन'मध्ये अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. असे लेख संपादन करून त्यांची विषयवार विभागणी करून ते प्रसिद्ध पुस्तकरूपाने झाले तर मराठीच्या अभ्यासकांना ते संकलित स्वरूपात मिळतील. अधिक संशोधनासाठी ते उपयुक्त ठरतील. असे नवीन विचारधन विस्मृतीमध्ये जाऊ नये यासाठी असा प्रकल्प याच त्रैमासिकाने योजावा असे मला वाटते.

२. याच अंकात प्रा० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद विभागात 'स्वतंत्र मराठी विद्यापीठ' हा लेख वाचला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ० वि०भि० कोलते यांचा हा विचार पुन्हा एकदा मराठी वाचकांच्यासमोर प्रा० प्रभुदेसाई यांनी मांडला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

गेल्या काही दशकांत भारतात संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांच्या अभ्यासासाठी विद्यापीठे निर्माण झाली आहेत व त्यांना सरकारी मान्यता आहे. पण ही विद्यापीठे त्या-त्या भाषांच्या सखोल अभ्यास करण्याबरोबर त्या भाषांतून अन्य विषयांचे अध्यापन आणि संशोधन करताना मात्र दिसत नाहीत. विद्यापीठ या नावाला साजेल असे ज्ञानक्षेत्र निर्माण करायचे तर सर्व मानव्यविद्या, विज्ञाने, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आयुर्विज्ञान इत्यादी विषयांचे पदव्युत्तरपर्यंतचे व संशोधन-पदवीपर्यंतचे ज्ञान त्याच भाषांतून दिल्याशिवाय ही विद्यापीठे पूर्ण अर्थाने ज्ञानकेंद्रे होणार नाहीत.

डॉ० वि०भि० कोलते यांनी केलेली मराठी विद्यापीठाची कल्पना ही या अर्थाने व्यापक आणि अर्थपूर्ण आहे. या मार्गानेच मराठी भाषा 'ज्ञानभाषा' या अभिमानास्पद पदावर आरूढ होईल. 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन अधिक प्रबोधन करावे व अशा शासकीय निर्णयासाठी व्यापक पार्श्वभूमी तयार करावी अशी सूचना आहे.

12, प्रेसी बिल्डिंग, मळा, पणजी (गोवा), 403 001
दूरभाष : (0832) 222 5816

'बंगलो'

'भाषा आणि जीवन' (उन्हाळा २००९)च्या अंकातील' शब्दजिज्ञासा'मधल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचा 'बंगला' हा लेख वाचला. बंगला या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी त्यांनी चांगली माहिती दिली आहे.

इथे दोन संदर्भग्रंथांची आठवण होते. इंग्रजांच्या काळात बरेच भारतीय शब्द इंग्रजीत वापरले गेले. त्या शब्दांबद्दल माहिती देणारे दोन शब्दकोश म्हणजे जॉर्ज क्लिफर्ड व्हिटवर्थ यांचा 'अँग्लो-इंडियन शब्दकोश' आणि हॉब्सन-जॉब्सन 'अँग्लो-इंडियन शब्दकोश'. या दोन्ही कोशांमध्ये इंग्रजी 'बंगलो' या शब्दाबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

व्हिटवर्थच्या शब्दकोशात इंग्रजीमधला 'बंगलो' हा शब्द बंगालच्या बांग्लाचा अपभ्रंश असल्याचं म्हटलं आहे. बंगलो म्हणजे वाळलेल्या गवताच्या छपराचं एकमजली घर किंवा जमिनीवर स्वतंत्रपणे उभं असलेले कोणतेही घर, असं म्हटलं आहे.

हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात 'बंगलो' या इंग्रजी शब्दाचं 'एकमजली कौलारू घर' असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बंगल्याबद्दलचं किंवा बंगालचं काहीतरी ते बांग्ला असं पूर्वी हिंदुस्थानात म्हटलं जाई. त्यामुळे युरोपियनांनी बंगालसारखी घरं इतरत्र बांधली, तेव्हा त्याला बंगला, बंगाली पद्धतीचे घर अशी नावे दिली. इंग्रजी 'बंगलो' ही संज्ञा बंगालमधील युरोपियनांनी स्थानिक घरांच्या पद्धतीवरून घेतली असल्याचं हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात म्हटलं आहे.

या दोन्ही कोशांबद्दल आणखी थोडी माहिती देते. व्हिटवर्थ यांचा शब्दकोश केगन पॉल, ट्रेंच आणि कंपनी, लंडन यांनी १८८५ मध्ये प्रकाशित केला आणि १९७६ साली इंडिया डॉक्युमेंटेशन सर्व्हिस, गुरगाव यांनी पुनर्मुद्रित केला. त्या वेळी वापरात असलेले आणि भारतीय संदर्भात विशिष्ट अर्थ असलेले पण नेहमीच्या इंग्रजी किंवा भारतीय शब्दकोशांत स्पष्टीकरण नसलेले शब्द व संज्ञा या व्हिटवर्थच्या शब्दकोशात घेतलेल्या आहेत. कलम, कच्चा, पिठोरी, लाख, कडिया इ० अशा जवळजवळ ५ हजारापर्यंत शब्दांची व्युत्पत्ती किंवा भारतीय संदर्भ त्यात दिलेले आहेत. ३५० पानांचा हा शब्दकोश संशोधकांसाठी आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांमध्ये रुची असणार्‍यांसाठी उत्तम संदर्भग्रंथ आहे.

हॉब्सन-जॉब्सन अँग्लो इंडियन शब्दकोश हा हेन्‍री यूल व ए०सी० बर्नेल यांनी तयार केला आहे. १९०३ मध्ये लंडनच्या जॉन मरे यांनी मूलत: प्रकाशित केलेल्या ह्या कोशाचं दुसरं पुनर्मुद्रण नवी दिल्लीच्या एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेसने २००६ साली केलं आहे. यामध्येही अचार, बझार, घी, लोटा, फकीर, झुला इ० इ० सारखे जवळजवळ ५ हजारांपर्यंत शब्द आहेत. शिवाय शब्द पटकन सापडण्यासाठी तीस पानांची शब्दसूची शेवटी दिलेली आहे. तसेच या कोशात ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ आले आहेत, त्या त्या पुस्तकांची पूर्ण नावे असलेली २० पानी एक यादीही दिलेली आहे. जिज्ञासूंनी या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यास या एक हजार पानी पुस्तकाच्या आवाक्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

व्हिटवर्थचा शब्दकोश आणि हॉब्सन-जॉब्सन शब्दकोश हे दोन्ही संदर्भग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

अलका कानेटकर

302, तनुजा सोसायटी, प्रेमनगर, खारेगाव, कळवा (पश्चिम) 400605
दूरभाष : (022) 25372672
भ्रमणभाष : 09969445097

प्रतिसादः वर्‍हाडी बोलीची उच्चार प्रवृत्ती

[संदर्भ : 'पूर्व खानदेशच्या बोलींचा परस्परांवर प्रभाव : एक अभ्यास' - वासुदेव सोमाजी वले, 'भाषा आणि जीवन' २६ : १ (उन्हाळा २००८)]

वले यांनी अहिराणी, वर्‍हाडी, लेवापाटीदारी, तावडी ह्या बोलींमधील साम्य दाखविताना जी उदाहरणे दिली त्यांचा वर्‍हाडी बोलीसंबंधी विचार पुढीलप्रमाणे :
(१) बहिण-बहिन : वर्‍हा‍डीत मूर्धन्य 'ण' ऐवजी दन्त्य 'न'चा उच्चार होता. मात्र, प्रमाण मराठीतील काही शब्दांत स्वरांतर्गत 'ह' आल्यास वर्‍हाडीत त्याचा लोप होतो. 'बहीण' हा उच्चार वर्‍हाडीत 'बईन' असा आढळतो. (याप्रमाणे तहान -तान, नाही-नाई.)

(२) विळा-इया : 'इया' असा उच्चार अमरावतीकडे क्वचित तर अकोल्याकडे आढळत नाही. 'विळा' या शब्दाचा उच्चाचर मोठ्या प्रमाणात 'इवा' असा आढळतो.

(३) येथे/इथे - अढी/अढी
तेथे - तढी/तढी
कोठे - कुढी/कुढी
'येथे' ह्या प्रमाण मराठीतील क्रियाविशेषणाचा उच्चार अकोल्याकडे 'अती' तर अमरावतीकडे 'अथी' असा केला जातो. अकोल्याकडून बुलढाण्याकडे आपण जसजसे जातो तसतसा 'अठी/अटी' असा उच्चार भाषिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो.
याप्रमाणे 'अती'/'अथो'/'अठी' उच्चार केला जातो. मात्र, वरील उदाहरणातील 'अढी,' 'तढी', 'कुढी' यांचा उच्चार वर्‍हाडीत होत नाही. 'कुठी' या अर्थी वर्‍हाडीत 'कुकूळे'.

(४) ऐ - अय : यासंबंधित वल्यांनी उदाहरणे दिलेली नाहीत. वर्‍हाडीत 'ऐ' या संयुक्त स्वराचा उच्चार 'इ, अइ, अय, आय्' होतो.
ऐ > ई = म्हैस > म्हीस
ऐ > अई = चैन > चईन, बैल > बईल.
ऐ > अय = मैना > मयना, पैसा > पयसा, चैतन्य > चयतन
ऐ > आय = ऐक > आयक

(५) सौदेशी : स्वत: > सोता, सरस्वती > सरसोती ही प्रक्रिया वर्‍हाडीसंबंधी योग्य आहे. मात्र, 'सौदेशी' असा उच्चार वर्‍हाडीत आढळत नाही.

(६) अ > आ : वर्‍हाडीत 'अ' या स्वराऐवजी काही शब्दात 'आ' हा स्वर उच्चारला जातो.
उदा० अजून > आजूक. मात्र, (अवजड > आवजड) आवजड ह्या शब्दाऐवजी 'भारी' हा शब्द मोठ्या प्रमाणात उच्चारात आढळतो.
'असा' ऐवजी 'आसा' उच्चार वर्‍हाडीत नाही. येथे 'अ' चा 'आ' होत नसून 'अ' हा स्वरच उच्चारात आढळतो. उदा० 'असं कधी घळे? सासू जावयासाठी जळे?'

रावसाहेब काळे
मु० लोगी, पो० रिधोरा, ता० बाळापूर, जि० अकोला, बेळगाव ४४४ ३०२.

प्रतिसादः मराठी भाषेतील सौजन्य

'भाषा आणि जीवन'चा उन्हाळी अंक (एप्रिल २००८) आत्ताच वाचला. मराठी भाषा सौजन्यपूर्ण नाही याविषयी अच्युत ओक यांनी लिहिलेलं मत तितकसं बरोबर नाही, असं मला वाटतं.

आपण इतरांशी बोलताना 'जरा पाणी देता का?', 'जरा ती फाईल मला पाठवता का?' या अशा स्वरूपाच्या वाक्यात आपण 'जरा' हा शब्द वापरतो. 'कृपया' या शब्दाला 'जरा' हा प्रतिशब्द आहे. 'मी बोलू का?', 'मी भेटायला येऊ का?' 'अभिनंदन', 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा तर्‍हेचे कितीतरी शब्द आपण नित्याच्या व्यवहारात वापरतो. या शब्दांमध्ये सौजन्य असतं. हे या शब्दांचं सौजन्य मुद्दाम वर्गात शिकवावं लागत नाही. घरात चांगले संस्कार असले तर मुलं आणि मुली हे शब्द नेहमी वापरतात. ज्येष्ठ व्यक्तींना आपण 'माननीय' किंवा 'आदरणीय' असे शब्द नेहमी वापरतो. माझ्या म्हणण्याचा आशय इतकाच की, मराठी भाषा सौजन्यपूर्ण आहे; पण बरीच मराठी माणसं वृत्तीने सौजन्यपूर्ण नसतात. आपल्या मनात दुसर्‍यांबद्दल आस्था आणि आदर असला तर आपण सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण 'आहो' 'जाहो' म्हणतो, 'तुम्ही', 'तुमचा', 'आपण' असे शब्द वापरतो तेही सौजन्य म्हणूनच. नाही तर 'अरे-तुरे'चीच भाषा सगळीकडे वापरली गेली असती.

आज्ञार्थी वाक्यांबद्दल सांगायचं झालं तर, लहान मुलांशी बोलताना घरातले लोक, विशेषत: आई, मुलाला 'अरे राजा (बाबा, सोन्या, बाळा अशी वेगवेगळी विशेषणे लावून आज्ञा करते) अंघोळ करून घे' ही विशेषणे प्रेमळ आणि सौजन्यपूर्णच असतात. उलट आपण मराठी भाषेत लहान मुलांशीसुद्धा सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

प्र.चिं.शेजवलकर
संचालक, एएसएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन, पुणे ४११ ००४.

Pages