सुचेता कडेठाणकर

पायरीबद्ध प्रक्रिया का?

हल्ली कोणाला वाचायला काय आवडतं असं विचारलं, तर जास्तीत जास्त लोकांचा कल 'सेल्फ हेल्प' प्रकारच्या पुस्तकांकडे असतो. यामध्ये सपाटीकरण आलंय. 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल', 'ट्वेल्व वेज टु लीड हेल्थी अँड सक्सेसफुल लाइफ', 'टेन स्टेप्स टुवर्डस मेंटल सॅटिस्फॅक्शन', 'एटिफाइव्ह टिप्स टु लुज वेट'. असंच काहीतरी. म्हणजे सगळं आकड्यांच्या किंवा स्टेप्सच्या भाषेत हवं. याचा संबंधसुद्धा आय०टी०मधल्या एका विशिष्ट प्रकारच्या कार्यपद्धतीशी लावता येऊ शकेल.
आय०टी०मध्ये करता येण्याजोग्या प्रत्येक गोष्टीची एक 'प्रोसेस' बनवून टाकलेली आहे. एका विशिष्ट पद्धतीनेच प्रश्नांची उत्तरं शोधली गेली पाहिजेत. एका विशिष्ट पद्धतीनं किंवा क्रमानंच एखादी गोष्ट केली गेली पाहिजे हा आग्रह. कारण एकच : कोणीही ती गोष्ट केली, त्याच क्रमानं केली आणि काही कारणानं ती गोष्ट अयशस्वी झाली तर नेमक्या कोणत्या स्टेपमध्ये गोची आहे हे पटकन लक्षात यावं!

सुचेता कडेठाणकर, साप्ताहिक सकाळ, ५-४-०८

सपाटीकरणाची सुरुवात

आय०टी०चं क्षेत्र इथं रुजलं, तशी एकमेकांना केवळ नावानं हात मारायची पद्धत रूढ झाली. पारंपरिक क्षेत्रांना सरावलेल्या आपल्याला सुरवातीला आपल्या मॅनेजरला, इतकंच काय आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटलादेखील त्याच्या नावानं हाक मारण्याची कल्पना जड गेली. कामाच्या अमेरिकन संस्कृतीचा एक भाग म्हणून रुजवली गेलेली ही पद्धत खरं म्हणजे सपाटीकरणाचा एक अविभाज्य आणि मूलभूत घटक बनून गेली आहे. जगाच्या त्या कोपर्या त वेगळ्याच अक्षांश-रेखांशावर राहणारा कोणी आपला सहकारी. त्याच्याशी बोलताना जेव्हा Good Morning ची. Mike वरून Hey Mike अशी भाषा येऊ लागली, तेव्हा आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नसल्याची भावना निर्माण होणं साहजिक होतं. समुद्रापलीकडे राहणार्याआ त्या लोकांबद्दल वाटणारं अप्रूप, वाटणारी भीती या अशा प्रकारच्या अनौपचारिक संवादांमधून हळूहळू गळून पडली. एकेरीमध्ये संवाद होऊ लागल्यामुळे आपण सर्वच जण समान पातळीवर असल्याची भावना निर्माण झाली. इतकंच नाही तर लातूरचा सोपान, मुंबईचा राहूल, पुण्याची रचना, दिल्लीचा राजीव, चेन्नईचा वेंकट आणि उत्तरांचलचा कैलाश हे सगळेच जण, सारखंच शिक्षण घेतलेले, सारखाच पगार घेणारे... एक टीम म्हणून काम करू लागले आणि एक टीम म्हणून या अमेरिकेच्या मॅनेजरशी एकेरीत संवाद साधू लागले. सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवणारी ही फार मोठी आणि वेगळी गोष्ट आय०टी०नं इथल्या वर्ककल्चरमध्ये रुजवली. सपाटीकरणाची सुरवात इथून झाली.

सुचेता कडेठाणकर, साप्ताहिक सकाळ, ५-४-०८