बलवंत जेऊरकर

अपूर्ण कविता

अपूर्ण कविता एकटक पाहत राहतात शेवटच्या ओळीनंतर
कागदावर उरलेल्या मोकळ्या जागेकडं
त्यांना आशा असते की कधी ना कधी तरी त्या पूर्ण केल्या जातील
कुठं ना कुठं एखाद्या कवितेमध्ये उपयोगात येतील त्यांच्या ओळी
कित्येक दिवसांपर्यंत त्या अधून-मधून आपली दारं वाजवतात
जणू आठवून देतात की आम्ही इथंच आहोत बरं का आसपास!
आणि कित्येकदा ईर्षेमुळं नवीन कवितांच्या येण्याला सुद्धा थोपवून धरतात
एखादी नवीन ओळ येऊ-येऊ म्हणते
इतक्यात तिला जोरानं धक्‍का देत येते कुठलीतरी विसरलेली अपूर्ण कविता
अपूर्ण कविता कुरणात हरवलेल्या गायी आहेत ज्या रस्ता शोधत एक दिवस
परत येतात आणि बंद दारापुढं हंबरत राहतात
त्या आपल्या आसपास भटकणारे अतृप्त आत्मे आहेत
पण सारखं असंच होतं असं नाही
कधी कधी त्या निमूटपणे पडलेल्या असतात एखाद्या कागदाच्या कोपर्‍यात
कित्येक दिवस, कित्येक महिने आणि कधी-कधीतर आयुष्यभर
त्या आपल्या विस्मृतीच्या पडद्याआड कुठंतरी लपून बसतात
अनेकदा असं होतं की सारखं सारखं बोलवावं लागतं त्यांना
आणि तरीसुद्धा त्या येत नाहीत
अपूर्ण असल्याची जाणीव किंवा अपूर्णतेची घमेंड
त्यांना इतकं हट्टी बनवते
की त्या आपल्या जागेवरून हूं का चूं करत नाहीत
त्या काही बोलत नाहीत पण काहीतरी सांगताहेत असं वाटतं
आम्ही अपूर्णच ठीक आहोत
अशी कुठली कविता आहे जी पूर्णपणे अवतरली आहे धरतीवर
काहीतरी करून काही जोडून काही तोडून त्या पूर्ण होतात किंवा
पूर्ण केल्यासारख्या केल्या जातात कविता
तसं पाहिलं तर जगात अपूर्ण कवितांचीच संख्या जास्त आहे
पूर्ण कवितेत सुद्धा कुठं ना कुठंतरी राहिलेलीच असते एक अपूर्णता
प्रत्येकाला लिहायची असते एक पूर्ण कविता
दुसर्‍या कवीला दुसर्‍या पद्धतीनं
पण गंमत अशी आहे की असं केल्यानं पहिला कवीही समाधानी होत नाही आणि दुसराही नाही
प्रत्येक कवीला नेहमीच वाटतं की कवितेत कुठंतरी काहीतरी राहून गेलंय
जे असायला पाहिजे होतं... असू शकत होतं...!

आपली भाषा

भाषेतून पुकारण्याच्या आधी ती फक्त एक चिमणी होती
तिला चिमणीसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
भाषेनंच दिलं त्या झाडाला एक नाव
किंबहुना आपल्या भाषेच्या पलिकडं झाड फक्त झाड होतं
त्याला झाडसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
अशाच प्रकारे त्या असंख्य नद्या, झरे, पहाड...
कुणालाही माहिती नव्हतं
की आपली भाषा त्यांना कुठल्या नावानं ओळखते

त्यांना आपल्या भाषेशी काही देणं-घेणं नव्हतं
भाषा आपली सोय होती
आपण प्रत्येक गोष्टीला भाषेत रूपांतरित करण्यासाठी उतावीळ होतो
प्रत्येक गोष्टीला घाई-घाईनं भाषेत बसवण्याचा हट्ट
आपल्याला त्या गोष्टींपासून थोडं दूर घेऊन जात होता
कित्येकदा आपल्याला ज्या गोष्टींची नावं माहिती असायची
त्यांचे आकार आपल्याला ठाऊक नसायचे
आपण विचार करायचो की भाषा प्रत्येक गोष्टीला जाणून घ्यायचा दरवाजा आहे
याच तर्काच्या वाटेवरून काही भाषा सत्ताधीश झाल्या
दुबळ्यांची भाषा दुबळी मानून तिचा पराजय व्हायचा
भाषांचे आपापले अहंकार होते

झाडं, दगडं, पक्षी, नद्या, झरे, हवा आणि जनावरांजवळ
त्यांची स्वत:ची अशी भाषा होती की नाही कुणास ठाऊक
पण आपण सातत्यानं त्यांच्यामधून एक भाषा वाचवण्याचा प्रयत्‍न करायचो
अशाप्रकारे आपले अनुमान त्यांची भाषा घडवत होते
आपण विचार करायचो की आपले अनुमान म्हणजेच सृष्टीची भाषा होय
आपण विचार करायचो की या भाषेनं
आपण वाचून काढू अवघं ब्रह्मांड!

(‘दो पंक्तियों के बीच' या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या संग्रहातून)

दोन ओळींच्या दरम्यान

मी
कवितेच्या दोन ओळींच्या मधली अशी जागा आहे
जी नेहमीच ओसाड दिसत असते

बर्‍याचदा याच ठिकाणी कवीची अदृश्य सावली फिरत असते
मी कवीच्या ब्रह्मांडातील एक गुप्त आकाशगंगा आहे
बर्‍याचदा शब्द इथं येताना नजर चुकवतात
गडबडीत राहून गेलेलं एखादं संयुक्त क्रियापद किंवा एखादा शब्द
कधी-कधी वळचणीला आल्यासारखा एखाद्या कडेला येऊन बसतो
माझ्या परीघातून डोकावतात काही अनुस्वार आणि काही मात्रा
शब्दांमधून चाळत येतात इथं कितीतरी ध्वनी
कधी-कधी तर शब्दांचे काही अर्थ भटकत
येतात इथं
त्या हट्टी मुलासारखे जो फार पूर्वी पळून गेला होता
आपलं घर सोडून

जेवढी दिसते
तेवढी अकंपित, तेवढी निर्विकार जागा नाहीए
मी
बोलता-बोलता अचानक मधेच आलेली स्तब्धता आहे
जिच्यात तरंगत राहतात बोलण्यातले राहून गेलेले तुकडे
कितीतरी चोरवाटा सुरू होतात माझ्या गल्लीतून
ज्या घेऊन जातात
सगळ्यांची नजर चुकवून कवीच्या एका अज्ञात दुनियेपर्यंत
अथांगतेच्या या अरण्यात उड्या मारत असतात
कितीतरी अनोळखी सावल्या
शब्दांच्या उंच आडोशाच्या मध्ये मी एक मोकळं आकाश आहे
कवीच्या मनसुब्यांचे गरुड इथं उत्तुंग भरारी घेत असतात
अदृश्याच्या आडोशामागं लपली आहेत काही अशी भुयारं
जी आपल्या गुप्त रस्त्यानं
घेऊन जातात शब्दांच्या जन्मकथेपर्यंत

इथं येण्यापूर्वी चपला बाहेर सोडून ये
तुझ्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून
बाहेरचा जरासुद्धा आवाज नष्ट करेल
माझ्या अख्ख्या मायाजालाच्या गारुडाला!