डॉ. यास्मिन शेख

मराठी प्रमाणभाषेचे लेखननियम

मराठी प्रमाणभाषेची लेखनपद्धती काय असावी, यासंबंधी इ०स० १८३६ पासून अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले आहेत. याचा अर्थ असा, की लेखनपद्धतीसंबंधी मराठी विचारवंतांत जागरूकता आली ती जवळजवळ १७०-७२ वर्षांपासून. इतकी वर्षे या विषयावर विद्वानांची मतमतान्तरे प्रचलित आहेत. त्या सर्व मतांचा परामर्ष घेण्याचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. एका विद्वानाचा मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी त्यांच्या १८६९ साली प्रसिद्ध झालेल्या 'मराठी भाषेची लेखनशुद्धी' या पुस्तकात मराठी लेखनातील अनुच्चारित अनुस्वार वगळावेत, हा त्या वेळच्या रूढ नियमांना धक्का देणारा क्रांतिकारक विचार मांडला होता, हे मला विशेष वाटते.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाल्यावर 'मराठी साहित्य महामंडळा'ने आपली लेखनविषयक १४ नियमांची यादी महाराष्ट्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवली, ती १९६२ मध्ये. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि शिक्षणक्षेत्रात आणि इतरत्रही ते त्वरित अंमलात आणावेत, असा आदेश काढला. काही अपवाद वगळता, आपण मराठी माणसे त्या नियमांनुसार मराठीचे लेखन करतो आहोत.
प्रमाणभाषा ही एक संकल्पना (कॉन्सेप्ट) आहे. आपण व्यवहारात मराठीची कोणतीतरी बोली बोलत असतो. लेखन करताना आपण प्रमाणभाषा वापरतो. ही प्रमाणभाषा कोठे वापरली जाते? शास्त्रीय साहित्यात, नियतकालिकांत, वैचारिक, तात्त्विक लेखनात, औपचारिक पत्रव्यवहारात, पाठ्यपुस्तकांतील ललितेतर पाठांत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इत्यादी पुस्तकांत, दूरचित्रवाणीवरील बातम्यांच्या किंवा इतर लेखनात, जाहीरनाम्यांत, रस्त्यावरील व इतरत्र लावलेल्या सूचना-फलकांत प्रामुख्याने प्रमाणभाषेचा वापर होतो; निदान तशी अपेक्षा असते. या प्रमाणभाषेच्या लेखनासंबंधी काही नियम करावे लागतात. लेखनात एकवाक्यता असावी, हा त्यामागचा हेतू असतो.
आपण उच्चारानुसारी लिहितो, असा अनेकांचा गैरसमज असतो. आपण बोलतो, विशेषत: आपली मातृभाषा बोलतो, तेव्हा त्या भाषेचे नियम वेगळे समजून घेण्याची आवश्यकता नसते. कोणतीही भाषा ही नियमबद्धच असते. प्रत्येक भाषेला तिचे नियम असतात, ते त्या भाषेतच अनुस्यूत असतात. आपण अनुकरणाने भाषा बोलायला शिकतो. भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेचे नियम आपल्याला कोणी शिकवत नाही, तरी आपण नियमांनुसार बिनचूक बोलतो. बोलताना एखाद्याने चूक केली, तर ती आपण दुरुस्तही करतो. फार तर त्यामागील व्याकरणाचा नियम आपल्याला सांगता येणार नाही, इतकेच. ते नियम शोधून काढावयाचे काम व्याकरणकाराचे असते. हे भाषेचे नियम म्हणजे भाषेचे व्याकरण. व्याकरण हा भाषेचा प्राण आहे. त्यामुळे 'भाषेला व्याकरणातून मुक्त करा' हा विचारच चुकीचा आहे.

मग प्रश्न असा उपस्थित होतो, त्याच भाषेचे लेखन करताना चुका का होतात? लेखनासाठी नियम कशाला हवेत? याचे उत्तर असे आहे, की बोलणे आणि लिहिणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. भाषा म्हणजे बोलणे. (भाष् - भाषते = बोलणे), आणि त्याच भाषेचे लेखन ही दोन वेगळी माध्यमे आहेत. भाषा (बोलणे) ही ध्वनींची बनलेली - ध्वनिरूप - आहे, ती श्राव्य आहे; पण तिचे लेखन हे दृश्य, चिन्हांकित, सामाजिक संकेतांनी मान्य केलेले, दुय्यम रूप आहे. बोलणे क्षणभंगुर तर लेखन हे स्थिर स्वरूपाचे असते. भाषा प्रवाही असते. ती सतत, नकळत पण निश्चितपणे हळूहळू बदलत असते. त्या बदलाचे प्रतिबिंब कालान्तराने लेखनात पडत असते. पण लेखनातील स्थिरता आवश्यक असते. भाषा व्यक्तीगणिक थोडी थोडी वेगळी असतेच. 'मी जसं बोलतो, तसंच लिहीन', असा आग्रह प्रत्येकाने धरला, तर लेखन व्यवहारात इतका गोंधळ होईल, की एकाचे लिखाण दुसर्‍याला कळणार नाही. बोलताना आपण ’तल्वार' म्हणतो, पण लिहितो 'तलवार'. 'उपसली' ह्या शब्दाचा उच्चार 'उपस्ली' असा होतो. आपण 'महत्व' म्हणतो, लिहितो 'महत्त्व', आपण 'अक्षरशहा' उच्चारतो, लिहितो 'अक्षरश:' अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे उच्चारानुसारी लेखन हा विचार मान्य होणार नाही, आणि म्हणूनच कोणत्याही भाषेला लेखनविषयक नियमांची आवश्यकता असते.

या लेखनविषयक नियमांत बदल करावा किंवा नियमांचे सुलभीकरण करावे, अशी हाकाटी सध्या मोठ्या प्रमाणात पिटण्यात येत आहे. (माझी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करते : प्रचलित नियमांत कोणताही महत्त्वाचा बदल करू नये.) हे नियम सामान्य मराठी माणसाला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यातील संस्कृतप्रचुर शब्दयोजनेमुळे चटकन आकलन होत नाहीत; त्या नियमांची अंमलबजावणी करणे त्यामुळे अवघड होते अशी तक्रार केली जाते. मला एक सूचना करावीशी वाटते, ती अशी - या नियमांची सोप्या, सहजपणे आकलन होईल अशा भाषेत मांडणी करता येईल का याचा विचार व्हावा. तसेच, काही नियमांत थोडी भर घालून व अधिक उदाहरणे देऊन जर त्यांची पुनर्मांडणी केली, तर लेखन करणार्‍याला त्या नियमांचे पालन करणे सुकर होईल. शिवाय, प्रस्तुत नियम मराठीतील सर्व शब्दांना, विशेषत: ज्यांच्या लेखनाबद्दल सामान्य माणसाला निर्णय करता येत नाही अशा शब्दांना, समाविष्ट करून घेत नाहीत, म्हणजेच ते नियम सर्वसमावेशक नाहीत. अशा शब्दांच्या लेखनासाठी या नियमावलीत आणखी काही नियमांची भर घालावी.

याशिवाय, आणखी एक सूचना करते. मराठी वर्णमालेचा या नियमावलीत समावेश करावा व ती सुरुवातीलाच द्यावी. मराठीची जी प्रचलित वर्णमाला आहे, तिच्यात काही बदल सुचवता येतील. १८३६ साली दादोबा - पांडुरंगांनी मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले, तेव्हा त्यांच्यापुढे आदर्श होता तो संस्कृत व्याकरणाचा. संस्कृत वर्णमाला त्यांनी मराठीसाठी जशीच्या तशी स्वीकारली. तिच्यात आपण आजपर्यंत अगदी थोडेच बदल केले आहेत. तिच्यात आणखी बदल करावेत, असे मला वाटते.
(१) स्वरमालेतून 'लृ' या स्वराचे उच्चा टन करावे. मराठीत एकमेव शब्द आहे, ज्यात लृ ह्या स्वराची योजना आढळते. तो शब्द आहे - 'क्लृप्ती'. पण या शब्दाचा उच्चार 'क्लुप्ती' असाच केला जातो. तेव्हा एका शब्दासाठी (आणि तेही उच्चारात नसलेल्या त्यातील स्वरासाठी) ’लृ' हा स्वर वर्णमालेत ठेवणे योग्य नाही.
(२) मराठी वर्णमालेत 'ऍ' आणि 'ऑ' या दोन स्वरांचा समावेश करावा. या स्वरांचे स्थान 'अ' नंतर 'ऍ' आणि 'आ' नंतर 'ऑ' की 'ए' नंतर 'ऍ' व 'ओ' नंतर 'ऑ' हे भाषाशास्त्रज्ञांनी ठरवावे.
(३) 'अं' आणि 'अ:' हे स्वर नव्हेत; कारण प्रवाहित्व हे स्वरांचे लक्षण त्यांना लागू पडत नाही. त्यांना स्वरमालेतून वगळावे. त्यांचा उल्लेख अनुस्वार किंवा शीर्षबिंदूचे चिन्ह(ं) आणि विसर्गाचे चिन्ह (:) असा करावा. आणि या चिन्हांचे उच्चार स्थानपरत्वे बदलतात हे उदाहरणे देऊन स्पष्ट करावे. जसे,- आंबा - आम्बा, उंट - उण्ट, अक्षरश: (शहा), मन:पूर्वक (न्ह).
(४) मराठीत च्, छ्, ज्, झ् ही व्यंजने तालव्य आहेत. उदा० चार, छत्री, जेवण, झीज. त्याचप्रमाणे च्, ज्, झ् ही व्यंजने दंतमूलीयही आहेत. उदा० चारा, जहाज, झरा. मात्र तालव्य व दंतमूलीय वर्णांना मराठीत वेगळी चिन्हे नाहीत. (संस्कृतातील वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारल्यामुळे हे घडले आहे.) अगदी सुरुवातीला छापलेल्या मराठी पुस्तकात दंतमूलीय 'च', 'ज', 'झ' या पद्धतीने त्या व्यंजनावर उभी रेष दिलेली आढळते; पण त्या चिन्हाचे साम्य मात्रेशी असल्यामुळे पुढे ते चिन्ह काढून टाकण्यात आले. दंतमूलीय वर्णाखाली हिंदीप्रमाणे नुक्ता (वर्णाखाली टिंब) द्यावा, असे वाटते. पण त्यात अडचण काय आहे, पाहा -
मराठी मातृभाषा असलेले पुष्कळ सुशिक्षित लोक चादर ऐवजी चादर (चारमधील 'चा'चा तालव्य उच्चार), तसेच चाबूक ऐवजी चाबूक (तालव्य उच्चार), समाज ऐवजी समाज (दंतमूलीय उच्चार) करताना आढळतात. त्या उच्चारांपैकी कोणता उच्चार स्वीकारायचा असा प्रश्न पडतो. दुसरी अडचण, माझा (दंतमूलीय) पण माझी (तालव्य), त्याचा (दंतमूलीय) पण त्याची (तालव्य), माज (दंतमूलीय) पण माजी (तालव्य). मराठीत ’इ' हा स्वर तालव्य असल्यामुळे ’माझा' यातील 'झा' खाली नुक्ता दिल्यास 'माझी' मधील 'झी' खाली नुक्ता देऊ नये, हे चटकन लक्षात येणे कठीण. ज, झ यांच्या बाबतीतही हीच अडचण येईल. इंग्लिशमध्ये 'S' या अक्षराचा उच्चार वेगवेगळा होतो तो सवयीने आपण बरोबरच करतो. उदा० Some, Sure, Season, thieves. ते उच्चार वेगळे आहेत तेव्हा त्यांचे स्पेलिंग वेगळे हवे, असा अट्टहास कोणी करीत नाही. त्याच पद्धतीने मराठीत एका वर्णाचे दोन उच्चार (किंवा दोन उच्चारांसाठी एक वर्ण) मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
(५) 'श' आणि 'ष्' या दोन वर्णांचे उच्चार मराठी भाषेत वेगळे होत नाहीत. संस्कृतात श् हा तालव्य आणि ष् हा मूर्धन्य आहे. मराठी बोलण्यात मूर्धन्य उच्चार जवळजवळ लुप्त झाला आहे. पण अनेक तत्सम शब्दांत 'ष्' हे व्यंजन असल्यामुळे तो लेखनात राहू द्यावा. ('ष्' असलेले तत्सम शब्द - विशेष, विषय, विष, षष्ठी इ०) मराठीत अपवादात्मक एखादाच 'ष्' असलेला शब्द दाखवता येईल शोक पण षौक (अर्थ भिन्न आहे.)
(६) अनुस्वारविषयक नियमांत (नियम १ ते ४) काहीही बदल करू नयेत, असे माझे मत आहे. फार तर सामान्य मराठी माणसाला सुलभ वाटावेत यासाठी ते अधिक सोप्या भाषेत लिहावेत. संसार, सिंह, हंस इ० शब्दांतील अनुस्वाराचा उच्चार सानुनासिकापेक्षा वेगळा होतो, हे कंसात नमूद करावे. (उदा० - संव्सार, हंव्स, इ०)
(७) र्‍हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (नियम ५ ते ८). यांत एकच बदल सुचवावासा वाटतो. तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावेत, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास ते दीर्घच राहतात; फक्त सामासिक शब्दांत हे शब्द पूर्वपदी आल्यास, ते संस्कृताप्रमाणे र्‍हस्व लिहावेत, असा नियम आहे. ते शब्द सामासिक शब्दांत पूर्वपदीही दीर्घ लिहिल्यास या नियमाचे सुलभीकरण होऊ शकेल. संस्कृतची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला, हा बदल केल्यामुळे, सामासिक शब्दलेखन करणे अधिक सोयीस्कर होईल. हाच नियम तत्सम इन्-प्रत्ययान्त (विद्यार्थिन्, पक्षिन्) शब्दाच्या बाबतीतही स्वीकारता येईल. जसे : विद्यार्थी - विद्यार्थीगृह, पक्षी - पक्षीमित्र.
(८) नियम ११ मध्ये भर घालावी. हळूहळू, मुळूमुळू इ० शब्दांतील दुसरा व चवथा स्वर दीर्घ लिहावा, असा नियम आहे. याला अपवाद ध्वन्यानुसारी शब्दांचा द्यावा. जसे : रुणुझुणु, झुळुझुळु, कुहुकुहु. तसेच, चिवचिव, रिमझिम (उपान्त्य स्वर र्‍हस्व लिहावा.)
(९) नियम ९ : ग्रामनामास पूर लावताना पू दीर्घ लिहावा, असा नियम आहे. उदा० नागपूर, पंढरपूर, सोलापूर. हा नियम वेगळा देण्याचे कारण नव्हते. (र्‍हस्व-दीर्घविषयक नियमांत याचा अंतर्भाव करता आला असता.) पण जर हा नियम वेगळा द्यायचा असेल, तर या नियमाला पुस्ती जोडावी. या शब्दाचे सामान्यरूप होताना उपान्त्य 'पू' नियमाप्रमाणे र्‍हस्व होईल; पण विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना शेवटचा अक्षराचे सामान्यरूप होत नसेल, तेव्हा उपान्त्य 'पू' दीर्घच राहील. जसे - नागपूरची (संत्री), पंढरपूरचा (विठोबा), सोलापूरकडे (जाणारा रस्ता), तारापूरमध्ये इ०
नियम १२ : ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे' हा नियम आहे. उदा० करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना. या नियमात भर घालणे आवश्यक आहे. एकारान्त आडनावाचे सामान्यरूप केले नाही, तरी ते चूक मानू नये. जसे - दामले - दामलेंना, फडकेंचा, इ०
नियम १३ : 'लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.' हा नियम संदिग्ध आहे. पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे 'बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे' म्हणजे नेमके कसे हे लक्षात येत नाही. खरे पाहता हा नियम, 'शब्दातील शेवटच्या किंवा उपान्त्य एकाराऐवजी बोलण्यात त्या अक्षरावर जो आघात येतो, (घरे - घरं) म्हणजे शेवटच्या अक्षरातील एकाराऐवजी बोलण्यात जो पूर्ण उच्चारित अ येतो, त्यावर शीर्षबिंदू द्यावा', असा हवा. त्या अक्षरावर शीर्षबिंदू दिला नाही, तर त्या शब्दाचा उच्चार 'घर्' (अनेकवचनी) असा होईल. बोलण्यातील अन्त्य वा उपान्त्य (एवढंसं आभाळ) अक्षरातील एकाराऐवजी येणारा 'अ'वरील आघात दाखवण्यासाठी लेखनात त्या अक्षरावर शीर्षबिंदू द्यावा. मात्र शास्त्रीय, वैचारिक, गंभीर लेखनात एकार असू द्यावेत. पण समजा एखाद्या लेखकाने अशा लेखनात 'ए'ऐवजी आघातयुक्त 'अ'(शीर्षबिंदू देऊन) लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले तर, ते चूक मानू नये. त्याचप्रमाणे शीर्षबिंदूचा अनुनासिकाशिवाय हा एक वेगळा उपयोग लेखनात होतो, हेही स्पष्ट करावे.
सारांश, मी एकाच नियमात (सामासिक शब्दाच्या लेखनात) बदल सुचवीत आहे. इतर नियमांत भर घालावी, असे सुचवते आहे. शिक्षकांनी हे नियम समजावून घेतले, तर विद्यार्थ्यांना नियम न सांगता नियमांनुसार लिहिण्याची सवय लावता येईल.
शासनाने महामंडळाच्या सहकार्याने तज्ज्ञांची समिती नेमून त्या समितीने घेतलेले निर्णय मान्य करावेत आणि ते सर्वांनी स्वीकारावेत, कारण ती समिती सर्व महत्त्वाची मते विचारात घेऊन योग्य तोच निर्णय घेईल, असा विश्वास वाटतो.

यास्मिन शेख
विसावा हाइट्स, इमारत क्र० ४, फ्लॅट क्र० २, डी०पी० रोड, औंध, पुणे ४११००७.
दूरभाष ०२० - २५८८४४७२-