डॉ० नीलिमा गुंडी

संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर

नीलिमा गुंडी

अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्‍हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

या कार्यक्रमांची सुरुवात बहुधा शारदास्तवनाने होते. सुरुवातीला जर 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' या संस्कृत श्लोकाचे गायन असेल, तर त्यातील 'या शुभ्रवस्त्रावृता'चे अनेकदा 'या शुभ्रवस्त्रामृता' असे उच्चारण होते. आणि 'जय शारदे वागीश्वरी' हे शांता शेळके यांचे गीत असेल, तर त्याचे उच्चारण बऱ्याचदा 'जय शारदे वागेश्वरी' असे कानी पडते. अशा वेळी श्रोत्यांची सहनशीलता हीच त्यांच्या रसिकतेची कवचकुंडले ठरतात.

जाहीर कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोकप्रिय होत आहे. मात्र अनौपचारिक कशाला म्हणायचे, हा प्रश्नच आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषाविवेक न गमावलेली सहजता अपेक्षित असते. तशा सहज प्रसन्न भाषेचा वावर हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. भाषेचा नेटका, नेमका वापर करण्यातून सांस्कृतिक श्रीमंती व्यक्त होत असते. मात्र जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्षात घडते ते असे : प्रत्येक वक्ता आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावरील सर्वांची लांबचलांब विशेषणे वापरून नामावली घेण्याची औपचारिक परंपरा अजिबात सोडत नाही. प्रत्येक निमंत्रितामागे श्री०/श्रीमती/प्रा०/डॉ० अशा उपाधी हव्यातच, अशी सर्वसाधारण समजूत दिसते. त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा काहींना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल होत असते. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' हे किताब उपाधीसारखे वापरायचे नसतात, या संकेताचेही सहज उल्लंघन होत असते.

अनौपचारिक शैलीत पाहुण्यांचा परिचय करून देणारा वक्ता पाहुण्यांशी आपले फोनवरून कधी नि कोणते संभाषण झाले, पाहुण्यांशी आपली पहिली गाठभेट कशी झाली, त्या वेळी त्यांनी आपले आदरातिथ्य कसे केले, अशी साग्रसंगीत ओळख जाहीरपणे करून देतो. मनात येणारा प्रत्येक विचार कसलाही आडपडदा न बाळगता श्रोत्यांना तत्काळ सांगून टाकणे म्हणजे अनौपचारिक बोलणे, अशी काहींची समजूत असते. यामध्ये काही वेळा पाहुण्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्व सांगायचेच राहून जाते! याउलट औपचारिकपणे ओळख करून देणाऱ्याचा मार्ग दुसऱ्या टोकाचा असतो. तो म्हणजे पाहुण्यांनी दिलेला 'बायोडेटा' यांत्रिकपणे वाचून दाखवण्याचा! त्यामुळे पाहुण्यांचा जन्म कोठे झाला, त्यांना प्राथमिक शाळेत कोणती बक्षिसे मिळाली... इथपासून आजपर्यंतचे त्यांचे सारेच कर्तृत्व जाहीर केले जाते. अशा वेळी शहाणा पाहुणा संकोचून जातो. या परिचयप्रसंगी पाहुण्यांचे नावच न आठवणे, ते चुकीचे उच्चारले जाणे इत्यादी विविध प्रसंगनिष्ठ विनोद कधी कधी घडत असतातच. व्यासपीठावर उभे राहून बोलताना पूर्वतयारीशिवाय बोलल्यावर ते भाषण आपोआप उत्स्फूर्त आणि सहज ठरते, अशी (गैर)समजूत त्यामागे असते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यातील काही सूत्रसंचालकांनी भाषेचा मुक्तपणे केलेला वापर ही होय. सूत्रसंचालक हे जणू शब्दजीवी पात्र असते. या 'सुसूत्र' पात्राचा व्यासपीठावरील संचार गेली काही वर्षे अनिर्बंधपणे सुरू आहे. पूर्वी संगीताच्या कार्यक्रमांना निवेदक असत. गायकांना कार्यक्रमात मध्येमध्ये विश्रांती मिळावी आणि गीतकार, संगीतकार, इत्यादींची माहिती श्रोत्यांना व्हावी म्हणून निवेदकाने भाष्य करणे योग्य असते. पण आता कोठल्याही कार्यक्रमांना-चर्चासत्रांनाही-सूत्रसंचालक असतोच. एकेकाळी निवेदक व्यासपीठावरील जागा न अडवता कार्यक्रमाची सूत्रे सांभाळण्याचे काम अदबीने करीत असे. आता मात्र सूत्रसंचालक ही सर्वांत मोठी असामी असते. सूत्रसंचालकाचा भूतलावरचा वावर आता त्रिखंड हिंडणाऱ्या नारदाशीच तुलना करण्याजोगा ठरावा! (हल्ली लग्नसमारंभातही सूत्रसंचालक संचार करू लागला आहे!)

सतत बोलत राहणे (तेही लाडिकपणे!) आणि ऊठसूट श्रोत्यांकडून टाळ्यांची मागणी करणे, हे आपले काम असल्याची सूत्रसंचालकाची प्रामाणिक समजूत असते. अशा वेळी वाटते, एखाद्या उत्तम कलाविष्कारानंतर सभागृह क्षणभर अवाक् होते, हीदेखील कार्यक्रमाविषयी अनुकूल प्रतिक्रिया देण्याची प्रगल्भ रीत असू शकते, यावर आता आपला विश्वासच उरला नाही का? सूत्रसंचालकामुळे काव्यवाचनाच्या कार्यक्रमात काही वेळा एकाच वेळी दुहेरी मैफल चालू राहते. एक मैफल असते प्रत्यक्ष उपस्थित असणार्या कवींच्या कवितांची आणि दुसरी असते प्रत्येक कवीनंतर सूत्रसंचालक वाचून दाखवत असलेल्या कवितांची! पूर्वी रविकिरण मंडळाच्या काळी जेव्हा काव्यगायनाच्या जाहीर कार्यक्रमांना मागणी होती, तेव्हा आवाज नसलेल्या गायक कवींची श्रोत्यांनी व्यासपीठावरून सदेह उचलबांगडी केल्याच्या वार्ता वाचायला मिळत. त्यामानाने सूत्रसंचालकांच्या लीलांविषयी आजचा रसिकवर्ग फारच सोशिक व उदार दिसतो आहे!

कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचा उपचार असतो. आपण कार्यक्रमपत्रिकेत 'आभारप्रदर्शन' असे म्हणून मुळातच 'प्रदर्शना'ला वाव ठेवलेला असतो. त्यामुळे निरर्थक शब्दांचे बुडबुडे कानी पडतातच! हल्ली बोली भाषेतील एकारान्त शब्दाऐवजी अनुस्वारान्त शब्द वापरण्याची लकब आभारप्रदर्शनातही दिसू लागली आहे. त्यामुळे कधी कधी 'यांचे आभार' याऐवजी 'यांचं आभार' असा शब्दप्रयोग कानी पडतो. [आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान असले तर त्यामध्ये 'दुरिताचे तिमिर जावो' (पापकृत्याचा, पापाचा अंधार दूर होवो) याऐवजी हटकून 'दुरितांचे तिमिर जावो' असे ऐकू येते!] अशा वेळी वाटते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलावे (खरे तर कसे बोलू नये!) हे शिकविणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याची नितांत गरज आहे. शब्दांचे अवमूल्यन ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. त्या बाबीकडे वेळीच गंभीरपणे पाहायला हवे. नाहीतर 'औचित्याची ऐशीतैशी' अशी परिस्थिती सार्वजनिक भाषावापराबाबत सार्वत्रिकच होईल.

नव्या शतकाची नांदी

'भाषा आणि जीवन'चा एकशेएकावा अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांला समाधान वाटत आहे. यानिमित्ताने थोडे सिंहावलोकन करणे योग्य ठरेल. १ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'ने जून (पावसाळा) १९८३ पासून 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकाशन सातत्याने चालू आहे.

सुरुवातीचे प्रमुख संपादक होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ० अशोक रा० केळकर. (कार्यकाल वर्ष १ अंक १ ते वर्ष ८ अंक १) त्यानंतर प्रमुख संपादक व त्यांचा कार्यकाल पुढीलप्रमाणे आहे. डॉ० कल्याण काळे (वर्ष ८ अंक २ ते वर्ष १५ अंक ४), डॉ० विजया देव (वर्ष १६ अंक १ ते वर्ष १८ अंक ४) डॉ० मृणालिनी शहा (वर्ष १९ अंक १ ते वर्ष २२ अंक ४). वर्ष २३ अंक १ पासून प्रा० प्र०ना० परांजपे प्रमुख संपादक आहेत. प्रमुख संपादकांना संपादकमंडळातील इतरांचेही सहकार्य मिळते.

पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या ३६ आणि किंमत १० रुपये होती. या दोहोंमध्ये वाढ होत होत आज अंकाची पृष्ठसंख्या आहे ७२ ते ८० आणि अंकाची किंमत २५ रुपये झाली आहे. सुरुवातीला अडीचशेच्या आसपास असलेली वर्गणीदारांची संख्या आता हजाराच्या जवळ पोहोचली आहे. या नियतकालिकाला १९९५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनकडून मिळालेला वैचारिक नियतकालिकाचा पुरस्कार म्हणजे समाजमानसात त्याला मिळालेली प्रतिष्ठेची पावतीच आहे. मात्र अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण अध्यापकवर्ग, आणि नागरी आणि ग्रामीण वाचनप्रेमी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्हांला गाठायचे आहे आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्‍नही चालू आहेत. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकांची स्पर्धा आयोजित केली जात आहे. वाचकांचे वर्तुळ भाषाभ्यासकांपुरते मर्यादित न राहता त्यात सर्वसामान्य वाचकही सहभागी व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्‍नशील आहोत. भाषाभ्यासकांना उपयुक्त जशी साधनसामग्री (उदाहरणार्थ भाषाशास्त्रीय लेखन, संशोधन अहवाल, भाषाविषयक लेखनसूची इत्यादी) अशी अंकात असते, तशीच सर्वसामान्य वाचकांना स्वारस्य वाटावे अशी लेखनसामग्री (उदाहरणार्थ रंजक पानपूरके, हलक्याफुलक्‍या शैलीतील भाषाविषयक निरीक्षणे, भाषेचे विभ्रम टिपणारे लेखन, पुस्तक-परीक्षणे इत्यादी) देखील त्यात समाविष्ट असते.

भाषा ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचे जीवनानुभवाशी साक्षात नाते असते. 'भाषा आणि जीवन' च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते! भाषा आणि जीवन यांच्यातील अनेकपदरी नात्याचा सर्वसामान्य वाचकांना प्रत्यय येत असतो तर त्याच्यातील गुंतागुंत अभ्यासकांना जाणून घ्यावीशी वाटते. भाषा ही लोकव्यवहाराचे साधन असते, ज्ञानव्यवहाराचे माध्यम असते, ती संस्कृतीची वाहक असते आणि कलात्मक निर्मितिव्यवहारात ती जणू अनुभवाचे द्रव्य असते. व्यक्‍तीच्या भावजीवनात ती भावना, विचार व संवेदना यांचे केंद्रच असते, भाषेच्या अशा जीवनव्यापी अस्तित्वाचे काही पैलू 'भाषा आणि जीवन' च्या अंकांमधून उलगडले जातात; असे वाचकांना आढळेल.

भाषा ही सांस्कृतिक परंपरा असते. कोणतीही सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम मुख्यतः शिक्षणक्षेत्राकडे येते. कारण पुढच्या पिढ्यांशी संवाद साधण्याचे काम पाठ्यपुस्तके करीत असतात. त्यामुळे प्रमाणभाषेचे अध्यापन, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन, अभ्यासक्रमात मराठीचे स्थान या विषयांवरील लेखनही 'भाषा आणि जीवन'मध्ये देण्यात येते. मराठीतून शिकवणारा शिक्षक हा मराठीचाही शिक्षक असतो, हे लक्षात घेऊन विविध सामाजिक शास्त्रांचे मराठीतून अध्यापन करताना येणार्‍या अडचणींची चर्चा अंकात होत असते. त्याचबरोबर त्या त्या शास्त्रांमधील परिभाषानिर्मितीच्या प्रक्रियेला गती देणारे लेखनही अंकात समाविष्ट असते. विविध ज्ञानक्षेत्रांशी संबंधित पारिभाषिक संज्ञांच्या सूचीचा अंतर्भावही अंकात आवर्जून केला जातो. शिक्षणविषयक समकालीन प्रश्नांना भिडण्याचे आव्हान 'भाषा आणि जीवन'ने वेळोवेळी स्वीकारले आहे. 'पहिलीपासून इंग्रजी', 'शालान्त परीक्षेतील मराठी विषयाचा चिंताजनक निकाल' अशा बाबींचा साधकबाधक विचार तज्ज्ञांनी केला आहे.

राजभाषा मराठी ही सक्षम 'ज्ञानभाषा' व्हावी, यासाठी असे प्रयत्‍न करीत असतानाच ती सर्वांच्या तोंडी सहज रुळेल, अशी 'लोकभाषा' व्हावी, या दिशेनेही 'भाषा आणि जीवन'ने पावले उचलली आहेत. लोकशिक्षण विशेषांकात (वर्ष १० अंक ४, संपादनसंयोजन : आशा मुंडले) याचे प्रत्यंतर येईल. न्यायालये, कार्यालये अशा क्षेत्रांमधील प्रशासकीय मराठी; वैद्यकक्षेत्र, प्रसारमाध्यमे, मुलाखती इत्यादी क्षेत्रांमधील व्यावहारिक मराठी यांविषयीचे भाषिक अनुभव आणि मार्गदर्शन यांना अंकात स्थान मिळाले आहे. मराठीला विकासाचा मोठाच पल्ला अजून गाठायचा आहे, याचे भान त्या लेखांमधून येते. प्र०ना० परांजपे यांची 'मराठीच्या विकासाच्या वाटा' ही पाच भागांतील संपादकीय लेखमाला यादृष्टीने उद्‍बोधक ठरेल.

अंकामध्ये भाषेचा सामाजिक अंगाने विचार करणारे लेख तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. प्रमाणभाषेचे मध्यवर्ती स्थान मान्य असतानाच इतर बोलींविषयीही 'भाषा आणि जीवन'ला आस्था आहे. अहिराणी, झाडी, वर्‍हाडी, सौराष्ट्री अशा प्रादेशिक बोलींबरोबरच वैदू, कोकणी, कैकाडी, भाट, आदिवासी अशा समाजविशिष्ट बोलींची आम्ही दखल घेतली आहे. इतकेच काय मूकबधिरांच्या भाषेचाही विचार अंकात झाला आहे. 'शालेय मराठी आणि झोपडपट्टी' (विजया चिटणीस, वर्ष २ अंक १), 'सर्वनामांचे समाजशास्त्र' (राजीव साने, वर्ष २ अंक २), 'सूनबाईंचे भाषाशिक्षण' (द०दि० पुंडे, वर्ष २० अंक ४), 'म्हणी, सुभाषितं, अवतरणं' (कल्याण काळे, वर्ष २ अंक ३), 'जातीची चिवट भाषा' (मृणालिनी शहा, वर्ष १५ अंक २), 'एका संकेतव्यवस्थेचा अनुभव' (विजया देव, वर्ष २१, अंक ३) आणि बालभाषेविषयीची निरीक्षणपर लेखमाला (नीलिमा गुंडी) अशा काहींचा यासंदर्भात उल्लेख करता येईल.

मराठी वाचकांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट असले तरी 'कुठलीही भाषा ही एखाद्या राज्याची राजभाषा असली तरी ती त्या राज्यापुरतीच मर्यादित नसते' हे तत्त्व संस्थेने स्वीकारले आहे; तसेच 'स्वतःच्या भाषेचे सामर्थ्य व मर्यादा इतर भाषांशी तुलना केल्याने अधिक प्रमाणात लक्षात येतात' ही वस्तुस्थिती सतत समोर ठेवली आहे. त्यामुळे भाषिक अस्मितेच्या संकुचितपणाच्या कक्षा ओलांडायला प्रवृत्त करणारे लेखन 'भाषा आणि जीवन'मध्ये येते. गोवा, मध्यप्रदेश, मदुरै इत्यादी ठिकाणच्या मराठीच्या स्थितिगतीविषयी यात विचारविनिमय आढळतो. तसेच तेलुगु, हिंदी, संस्कृत, इंग्लिश इत्यादी भारतीय भाषांमधील उच्‍चारणसंकेत, त्यांचे व्याकरण, त्यांतील चुकांचे विश्‍लेषण याविषयीचा अभ्यासही आढळतो. साहित्याबरोबरच व्याकरण, भाषाविज्ञान, मुद्रणकला, ग्रंथपालनशास्त्र, संख्यालेखन, नाटक-चित्रपट इत्यादींशी संबंधित भाषाव्यवहाराच्या विस्तारणार्‍या जगाचे भान 'भाषा आणि जीवन'ने बाळगलेले आहे.

विशेष म्हणजे 'धन परक्याचे', 'वसा आंतरभारतीचा' या सदरांच्या माध्यमातून इतर भारतीय व परकीय भाषांमधील अनुवादित कथा, कविता, लेख इत्यादी साहित्य देण्यात येते. मराठीचे अध्ययन व अध्यापन करणार्‍या परभाषक मंडळींच्या अनुभवांनाही यात स्थान दिले जाते. या मंडळींना मराठीच्या ज्या वेगळ्या कंगोर्‍यांचे दर्शन घडते, ते आपल्याला चकित करते. डॉ० मॅक्सिन बर्नसन यांचा 'जीव घाबरा करणारी भाषा' (वर्ष २ अंक १) आण इरीना ग्लुश्कोवा (रशियन अभ्यासक) यांचा 'मराठी भाषेतील आंबटगोड धक्के' (वर्ष ७ अंक १) हे लेख यादृष्टीने वाचनीय आहेत. भाषेचे सांस्कृतिक मूल्य ठसवणार्‍या 'भाषा आणि जीवन'च्या अनुवादविशेषांकाचा (संपादन : अंजली सोमण) येथे खास उल्लेख करायला हवा.

अंकातील इतर काही सदरांचा उल्लेखही अनाठायी ठरणार नाही. 'पुनर्भेट' सदरातून भाषिक परंपरेचे सत्त्व वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. 'भाषाविचार'मधून विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ आपटे, डॉ० श्री०व्यं० केतकर, वि०वा० शिरवाडकर वगैरेंच्या भाषेचा अभ्यास सादर केला आहे. 'दखलयोग्य'मधून भाषाक्षेत्रातील ताज्या घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. 'शब्दायन'मधून शब्दाच्या अनेक अर्थछटा सांगून भाषेचे भान तल्लख राहील, याची खबरदारी घेतली आहे. अंकांतील गुणग्राहक तर कधी परखड पुस्तकपरीक्षणांचाही विशेष उल्लेख केला पाहिजे. अशी परीक्षणे आता अन्यत्र सहसा वाचायला मिळत नाहीत.

'भाषा आणि जीवन'मध्ये सुरुवातीपासून सातत्याने लेखन केलेल्या काहीजणांचा नामनिर्देश करायला पाहिजे. उदाहरणार्थ :– माधव ना० आचार्य, कृ०श्री० अर्जुनवाडकर, मिलिंद मालशे, ब्रह्मानंद देशपांडे, द०भि० कुलकर्णी, द०न० गोखले, गौरी देशपांडे, वा०के० लेले, हे०वि० इनामदार, विद्युल्लेखा अकलूजकर, सुमन बेलवलकर, शरदिनी मोहिते, मनोहर राईलकर, दिलीप धोंडगे. अलीकडच्या काळात माणिक धनपलवार, विश्‍वनाथ खैरे, शुभांगी पातुरकर, शिवाजी पाटील, उमाकांत कामत, कैलास सार्वेकर, केशव देशमुख, प्रशांत बागड, वासुदेव वले, जया परांजपे, विजय पाध्ये प्रभृतींची भर पडली आहे. भाषाभ्यासाच्या विविध अंगांकडे लक्ष वेधणार्‍या विषयांची यादी अंकात देऊन आम्ही लेखकांना लिहिण्यासाठी आवाहन करतो. त्याला जुन्यानव्या लेखकांकडून अधिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद अपेक्षित आहे.

'भाषा आणि जीवन'ला जिज्ञासू वाचकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य मिळते. वाचकांशी असलेले आत्मीयतेचे नाते ही अंकांची जमेची बाजू आहे. सुरुवातीला 'ठरावीक लेखकमंडळी'मुळे अंकाची 'गटपत्रिका' होईल, हा जागरूक वाचकांनी वेळीच दिलेला धोक्याचा इशारा असो किंवा अंकातील चुका संपादकांच्या लक्षात आणून देण्यातील काटेकोरपणा असो– त्यातील वाचकांची आस्थाबुद्धी महत्त्वाची ठरते. अंकामध्ये 'शंकासमाधान', 'ज्याची त्याची प्रचीती', 'सादप्रतिसाद' अशा सदरांमधून वाचकांचा सहभाग आढळतो. एखादा 'बहुश्रुत' वाचक सादाला प्रतिसाद देत 'परार्ध'चा अर्थ कळवतो; तर एखादा 'ओ०के०' (O.K) ची कुळकथा सादर करून इतरांच्या माहितीत भर घालतो. वाचकांच्या कुतूहलाचे भरणपोषण अंकातून सातत्याने चालू असते. शब्दांच्या व्युत्पत्तीचा शोध घेणारे यातील लेखन वाचकांचे कुतूहल तेवत ठेवते. 'सडासंमार्जन', 'कानडा विठ्ठलु', 'रीरी म्हणजे पितळ' अशा शब्दांविषयीची अंकातील रंगलेली मतमतांतरे वाचनीय आहेत. 'कापावे की चिरावे?' हा प्रश्न (वर्ष ८ अंक ४) आमच्या अंकाच्या पानावर कधी नाट्यपूर्ण बनतो, तर कधी 'प्राण्यांना कसे हाकलतात' याविषयीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांतील कवितेचा बालबोध सूर भाषेच्या बारकाव्यांमुळे नव्याने लक्ष वेधून घेतो. (वर्ष ७, अंक ४)

'भाषा आणि जीवन'ची मुखपृष्ठेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. काव्यातील अवतरणे, र०कृ० जोशी यांची सुलेखने, अनिल अवचट, शाम देशपांडे, बालम केतकर, वसंत आबाजी डहाके यांची रेखाचित्रे, शि०द० फडणीस यांची व्यंग्यचित्रे, विनय सायनेकर व सुप्रिया खारकर यांची संगणकीय अक्षरचित्रे यांतून भाषेतील दृश्यात्मकता प्रभावीपणे व्यक्‍त झाली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या मुखपृष्ठांवर ज्येष्ठ भाषावैज्ञानिकांना स्थान मिळाले आहे.

प्रस्तुत संपादकीयासाठी 'नव्या शतकाची नांदी' या शीर्षकाची योजना करण्यामागे विशेष प्रयोजन आहे. अंकांचे एक शतक संपवून या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाला प्रारंभ करीत आहोत एवढाच मर्यादित आम्हाला अभिप्रेत नाही. नव्या – म्हणजे एकविसाव्या – शतकातील आव्हानांचीही जाणीव आम्हाला आहे. ही बाबही या शीर्षकातून आम्हाला अधोरेखित करावयाची आहे. जागतिकीकरणामुळे मराठी भाषेपुढे (आणि मराठी भाषकापुढे) अनेक आव्हाने उभी राहात आहेत. जगभर पांगणार्‍या मराठी भाषकांची अस्मिता मराठी भाषेमध्ये (आणि तिच्यातून व्यक्‍त होणार्‍या संस्कृतीमध्ये) सामावली आहे; पारंपरिक तंत्राच्या लेखन व मुद्रणामुळे तिच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे याचे भान मराठी अभ्यास परिषदेला व 'भाषा आणि जीवन'ला आहे. म्हणूनच आम्ही नुकतेच (म्हणजे १ मे रोजी) www.marathiabhyasparishad.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. सभासदांशी, वर्गणीदारांशी संपर्क साधणे, अंक व अन्य उपयुक्‍त माहिती व मजकूर उपलब्ध करून देणे व दूरदूरच्या (अगदी दूरदेशीच्या सुद्धा) मराठी माणसांच्या भाषिक गरजांचे भरणपोषण करणे या संकेतस्थळामुळे आवाक्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात त्यासाठी मनुष्यबळ, आर्थिक बळ व जागा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. पण आव्हाने अवघड आहेत म्हणून हातपाय गाळून निष्क्रिय बसण्यापेक्षा आपल्या परीने प्रयत्‍न सुरू करणे हेच मराठीपणाचे लक्षण आहे. त्याच जिद्दीने १९८२मध्ये मराठी अभ्यास परिषदेची स्थापना झाली, १९८३मध्ये 'भाषा आणि जीवन'चा प्रारंभ झाला, आणि आता या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाची नांदी करीत आहोत.

डॉ० नीलिमा गुंडी