ऊंझा-जोडणी
ऊंझा-जोडणी म्हणजे गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) र्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ी ) व र्हस्व उ ( ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा० वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ० )
गुजराती भाषेच्या लेखनात विसाव्या शतकाच्या तिसर्या दशकापर्यंत शुद्धलेखनाच्या बाबींत एकसूत्रता नव्हती. सर्वमान्य अशा निश्चित नियमांची व्यवस्थाच मुळी नव्हती. या संदर्भात नर्मद, नवलराम इत्यादी सुप्रसिद्ध साहित्यकारांच्या काळात काही ऊहापोहास सुरुवात झाली, परंतु एकवाक्यता निर्माण होऊ शकत नव्हती. महात्मा गांधींनी १९२९मध्ये शुद्धलेखनाचे नियम निश्चित करवून घेऊन गुजरात विद्यापीठाद्वारे एक 'जोडणीकोश' (शब्दकोश) प्रकाशित करविला. 'गुजरात सार्थ जोडणीकोश' या कोशास १९३९मध्ये गुजराती साहित्य परिषदेने मान्यता दिली. इ०स० १९४०मध्ये सरकारी मान्यताही मिळाली. गुजरात विद्यापीठाच्या या शब्दकोशास सर्वमान्यता मिळवून देण्याच्या कार्यात म० गांधींचा मोठा प्रभाव दिसून येतो.
वास्तविकरीत्या शुद्धलेखनाचे नियम घडविण्याने भाषकास शुद्ध शुद्धलेखनाची किल्ली मिळावयास हवी. शुद्ध म्हणजे मान्यताप्राप्त, चूक केल्याशिवाय लिहिण्याची क्षमता लेखकात निर्माण व्हावयास हवी. परंतु तसे काही घडू शकले नाही. त्याचे मुख्य कारण नियमांची जटिलता, गुंतागुंत हे होय. विशेषतः ई-ऊ संबंधात घडलेले नियम (नियमांमधील विसंगती किंवा नियमांचीच अनियमितता). या संदर्भात काही विद्वानांचे अभिप्राय विचारात घेण्याजोगे आहेत. ते असे :
तद्भव शब्दांमध्ये र्हस्व दीर्घ ई-उ संबंधित नियम पाहा. लगेच लक्षात येईल की हे तंत्र नव्हे; पण अतंत्रच म्हणावे लागेल. ई-उ युक्त शब्दांची अक्षरसंख्या, त्या 'ई-उ'चे स्थान, जोडाक्षरांचे सान्निध्य, अनुस्वार, निरनुस्वार शब्दांची स्थिती, अनुस्वाराची मंदता-तीव्रता (उच्चारित-अनुच्चारित, स्वल्पउच्चारित, पूर्णउच्चारित), शब्दांचे मूळ रूप, नामिक रूप, आख्यातिक रूप — या सर्वांमध्ये 'ई-उ'चा अगदी गोंधळच माजलेला दिसतो. त्याव्यतिरिक्त व्युत्पत्ती, प्रचलितता व स्वरभाराप्रमाणे लेखनाचे धोरणही पाळावे लागते, ते वेगळेच.
गुजराती शब्दकोशात 'ई-उ' युक्त शब्दलेखनासाठी आठ नियम दिलेले आहेत व त्यांस सात अपवाद देण्यात आले आहेत. त्यासाठी सात स्पष्टीकरण-नोंदी आहेत. हे सर्व विशेषतः 'ई-उ' साठीच. परंतु ही स्पष्टीकरणे मुळीच तर्कसंगत नसून चालू न शकणारी आहेत. साक्षात बृहस्पती पण त्यांचा बिनचूक वापर करू शकणार नाही.
समग्रपणे पाहता स्थिती अशी दिसते की, नियम आपल्याला अमुक एक सीमेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. शेवटी तर शब्दकोशालाच शरण जावे लागते. त्यावरही कडी करणारी स्थिती अशी की शब्दकोश (मान्य) स्वतःच ठरविलेल्या नियमांचे पालन करू शकलेला नाही असे आढळते.
श्री० भृगुराय अंजारिया यांनी म्हटले आहे की, 'शुद्धलेखन करण्यासाठी शिकू इच्छिणार्यांना किंवा शिकवू इच्छिणार्या शिक्षकांना सुद्धा हा शब्दकोश कानाचे मार्गदर्शन, तर्काचे मार्गदर्शन किंवा स्वतः कोशाने ठरविलेल्या नियमांचे मार्गदर्शन करण्यात तोकडा पडतो, मार्गदर्शनासाठी वावच राहू देत नाही. 'हे नियम अपूर्ण असून विसंवादी आहेत.
शुद्धलेखनाची जटिलता मुख्यत्वे र्हस्व-दीर्घ इ-ई व उ-ऊच्या संदर्भात विशेष रूपाने जाणवते. भाषाविद व विद्वत्वर्यांच्या मते अर्वाचीन गुजराती उच्चारांमध्ये ई-उ वगैरे स्वरांची र्हस्वता-दीर्घता यांमध्ये भेदच उरलेला नाही. भाषकास त्याचे भेदभानच राहिलेले दिसत नाही. शब्दांच्या अर्थबोधासाठी स्वरांची मात्रा कुठल्याही प्रकारे साधक ठरू शकत नाही. म्हणूनच आमचे म्हणणे असे आहे की, र्हस्वता-दीर्घता सुचविणारी दोन-दोन लिपिचिन्हे ठेवण्याची आवश्यकताच नाही. पंडित बेचरदास दोशी, प्रबोध पंडित, के०के० शास्त्री, डॉ० दयाशंकर जोशी, डॉ० योगेन्द्र व्यास, पुरुषोत्तम मिस्त्री, के० जयंत कोठारी आणि इतर अनेक भाषाशास्त्रज्ञ सुद्धा एकच ई-उ असावेत या विचाराचे समर्थन करतात. के०के० शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भरविलेल्या गुजराती साहित्य परिषदेत 'जोडणी सुधारणा समिती'ची स्थापना झाली होती. त्या समितीने १९८७मध्ये एकच ई-उ ठेवण्याचे सुचविले होते. परंतु हा निर्णय काही अगम्य कारणांस्तव उंच खुंटीवर सुरक्षित ठेवण्यात आला.
जे शिक्षक-प्राध्यापक अनेक वर्षांपासून गुजराती भाषा शिकवीत आहेत त्यांना प्रचीती आली आहे की संपूर्ण निष्ठेने गुजरात विद्यापीठाच्या कोशाने मान्य केलेले नियम कसोशीने पाळूनसुद्धा विद्यार्थ्यांवर त्याचा अपेक्षित प्रभाव-संस्कार झालेला दिसत नाही. नियमांची जटिलता लक्षात घेता अपेक्षित प्रभाव होईलच असा संभवही वाटत नाही. त्यांना सतत वाटते की, निश्चित केलेल्या नियमांचा पुनर्विचार करून त्यांत सुधारणा केलीच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. या संदर्भात विद्यापीठास अनेकानेक विनंत्या करून झाल्या; परंतु त्या सर्व बधिर कानांवर आदळून अदृश्य झाल्या. पालथ्या घागरीवरी पाणी ओतल्यास सर्व व्यर्थ.
अशी विनंती करण्यात वडनगर (उत्तर गुजरात)चे प्राध्यापक रामजीभाई पटेल (सध्या अहमदाबाद) यांनी पुढाकार घेतला होता. अगदी तपस्वी मनुष्याप्रमाणे या कार्यास वाहून घेऊन, या कामास जीवनध्येय बनवून त्यांनी आजतागायत त्यांचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. परंतु विद्यापीठाने अशी जिद्द व जडता दाखवून संपूर्णपणे कानाडोळा केला व स्पष्ट सांगितले की, 'कोशाच्या नियमांमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.' कारण या नियमांवर गांधीजींनी शिक्कामोर्तब केलेले आहे. (शब्दकोशाच्या प्रथम पानावर गांधीजींचे कथन असे नमूद केलेले आहे, 'आता यापुढे कोणासही मनस्वीपणे जोडणी करण्याचा अधिकार नाही. ')
वास्तविकात अशी आहे की, गुजराती साहित्य परिषदेने विद्यापीठाच्या शब्दकोशास मान्यता दिली त्या वेळी गांधीजींनी स्वतः के०के० शास्त्री यांना सांगितले होते की, 'ह्या कोशामुळे (माझ्या कथनामुळे) जोडणी सुधारणेचा मार्ग बंद होत नाही.' विशेषतः हा कोश तयार करणार्यांत प्रमुख असलेल्या काकासाहेब कालेलकरांनी पण कोशाच्या प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, 'एकदाची अव्यवस्था दूर होऊन व्यवस्था झाली की मग सुधारणेचे कार्य अधिक सुरळीत व सुगमपणे होऊ शकेल. ' परंतु हा 'परंतु' सर्वत्र नडतो. विद्यापीठाच्या कोशकार्यालयाने वरील सर्व विचार फेटाळून लावून नियम-सुधारणा-पुनर्विचारासाठी आपली सर्व दारे घट्ट लावून घेतली आहेत. (औरंगजेबाचे संगीताच्या वाद्यांचे दफन सहज आठवते. )
विद्यापीठ किंवा साहित्य-निर्मिती-संस्था याबाबतीत मौन धारण करून आहेत, काही करण्यास तयार नाहीत, ह्या सत्याची खात्री झाल्यानंतर श्री० रामजीभाईंनी जोडणी सुधारणा-परिषद भरविण्यासाठी आंदोलनाचा शंखनाद केला. या कार्यात सुरतेत स्थायी झालेले श्री० उत्तमभाई गज्जर यांनी पांचजन्याच्या पाचारणास देवदत्त शंखाचा जोरदार प्रतिसाद दिला. पाचारण झाले आणि एका पाठीमागे एक याप्रमाणे डॉ० जयंत कोठारी, दयाशंकर जोशी यांच्यासारख्या मोठ्या दर्जाच्या भाषाविदांनीही आपापले शंख फुंकून उत्तम पाठिंबा दिला. ('शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक्') काही उत्तम शिक्षकही यात सामील झाले. या सर्वांच्या जोरदार प्रतिसादाचा सरळ भावनात्मक परिणाम म्हणून जानेवारी १९९९मध्ये ऊंझा गावी ही परिषद भरविली गेली. ऊंझा येथील अनेक संस्थांनी यात आर्थिक सहकार्य केले; एवढेच नव्हे, तर परिषदेची उत्तम व्यवस्थाही स्वशिरी घेतली.
या परिषदेत २५०च्या वर विद्वान, भाषाविद, शिक्षक, संपादक, साहित्यकार उपस्थित होते. या सर्वांमध्ये एक प्रखर अभ्यासू, मूलतः उत्तम मेडिकल डॉक्टर व भाषाविषयक नितांत प्रेम व अध्यापन असलेले डॉ० निशीथ ध्रुव व लंडनस्थित विपुल कल्याणीसारखे वर्तमानपत्राचे संपादक, तसेच साहित्य-सर्जनात कर्मरत असे अनिवासी भारतीय पण सक्रियपणे सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या सघन विचार-चर्चा-चिंतनाच्या अखेरीस परिषदेने सर्वानुमते पुढील ठराव केला :
अखिल गुजरात जोडणी परिषदेचा ठराव
गुजराती भाषेचे प्रचलित ई-उ संबंधित नियम अतार्किक व परस्पर विसंगत आहेत. गुजराती भाषेत 'ई-उ'चे र्हस्वत्व-दीर्घत्व अर्थभेदक-अर्थबाधकही नाही व वास्तविकही नाही. म्हणून आता ह्यानंतर हे नियम रद्द करावेत आणि लेखनात सर्वत्र एकच ई व उ ची योजना व्हावी. ई साठी फक्त दीर्घ ई व चिन्ह ( ी ) व उ साठी फक्त एकच र्हस्व उ व चिन्ह ( ु ) वापरावे. ( ऊंझा ता० ९/१० जानेवारी १९९९)
ऊंझा परिषदेच्या ह्या निर्णयानुसार गुजराती लेखनात दीर्घ ई व र्हस्व उ युक्त शब्द राहतील. या ठरावास 'ऊंझा जोडणी' म्हणून ओळखले जाते.
विशेष लक्षात घेण्याची गोष्ट ही की जोडणीमध्ये एकच 'ई-उ'चा हा विचार नवीन नाही. 'सरस्वतीचंद्र' (भाग १ ते ४)चे लेखक व कर्मधर्मसंयोगाने गुजराती साहित्य परिषदेचे प्रथम अध्यक्ष कै० गोवर्धनरान त्रिपाठींनी पण त्यांच्याच काळात हा विचार मांडला होता. त्यापूर्वीही भाषासाहित्याचे सघन अध्ययन करणार्या दोन परदेशी भाषाविदांनीही नमूद केलेले आहे की, 'गुजराती भाषेत र्हस्व-दीर्घ स्वरभेद प्रत्यक्षात दिसत नाही.' हे प्रसिद्ध विद्वान म्हणजे आर०आर० टर्नर व लुडविग आल्सडॉर्फ हे होत. या परदेशी विद्वानांची गोष्ट सोडून दिली तरी फक्त 'सरस्वतीचंद्र'चे लेखक महाविद्वान गोवर्धनराम त्रिपाठी यांच्यासारखे धुरंधर 'ऊंझा जोडणी'च्या विचारास समर्थन देत होते, एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे.
नोंद : परिषदेने वरील एकच सुधारणा तूर्त केली आहे. इतर कुठलाही फरक केलेला नाही. गुजराती लेखनात वरील एक फरक सोडा. गुजरात विद्यापीठाच्या 'सार्थ जोडणीकोश'मध्ये दिलेले इतर सर्वच्या सर्व नियम यथावत राहू दिले आहेत. वरील ठराव झाला त्याच दिवसापासून आणंद येथे प्रकाशित होणारे 'मध्यान्तर' दैनिक व जवळजवळ वीस नियतकालिकांचे मुद्रण वरील ठरावानुसार होऊ लागले. अंदाजे पन्नास लेखकांची साठाहून अधिक पुस्तके अशा 'ई-उ'च्या फरकाप्रमाणे प्रकाशित झालेली आहेत. अजूनही होत आहेत. गुजराती भाषेतील वरिष्ठ प्रकाशन संस्था 'इमेज पब्लिकेशन्स' व सुरतेची 'साहित्य संकुल' वगैरे कित्येक प्रकाशन संस्था पण ऊंझा जोडणीच्या धोरणानुसार प्रकाशने करीत आहेत.
'ऊंझा जोडणी परिषद' : एक दस्तावेज
वरील नावाचा २०० पृष्ठसंख्या व रु० १२५/- किंमत असलेला एक ऐतिहासिक ग्रंथ 'गुजराती भाषा परिषदे'तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. ९/१० जानेवारी १९९९मध्ये ऊंझा येथे झालेल्या जोडणी परिषदेच्या ऑडियो रेकॉर्डिंगवरून तो ग्रंथस्थ झालेला आहे. भाषाप्रेमी श्री० रतिलाल चंद्रय्या यांची प्रेरणा व आर्थिक साहाय्य यांमुळे सहा वर्षांनंतर याचे प्रकाशन होऊ शकले आहे. परिषदेच्या सर्व बैठकांमध्ये उपस्थित सर्व वक्त्यांची वक्तव्ये, अभिप्राय, चर्चा, प्रश्नोत्तरे, प्रत्येक बैठकीच्या अध्यक्षांची वक्तव्ये व विद्वतापूर्ण भाषणे, सहभागी विद्वानांची नामावली इत्यादी सर्व बारीकसारीक बाबींची लिखित नोंद यात आहे.
[ ग्रंथप्राप्तीसाठी लिहा : श्री० इंद्रकुमार जानी, सचिव : गुजराती भाषा परिषद, खेत भवन आश्रमाजवळ, अहमदाबाद ३८० ०२७ (भारत) ]
बळवंत पटेल
प्लॉट ६६७, सेक्टर -२१, 'पंचशील', गांधीनगर, ३८२ ०२१, भारत