डॉ. अशोक केळकर

लेखनविषयक शासन-निर्णयावरील प्रतिक्रिया

लेखनविषयक शासननिर्णय २००९ हा 'भाषा आणि जीवन'च्या संपादकांनी आपल्या वाचकांसमोर सविस्तर ठेवण्याचे ठरविले. (हिवाळा २०१०, उन्हाळा २०१० अंक पाहावेत.) याचा हेतू हा की त्यांचे लक्ष वेधावे आणि त्याबद्दल प्रचलित हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकव्यवहार आणि यांत्रिक संदेशग्रहण करणार्‍या मंडळींच्या व्यवहारात एकसूत्रीपणा यायला मदत व्हावी. लेखनविषयक चर्चा म्हटले म्हणजे शुद्धलेखनाची चर्चा सामान्यत: आपल्या डोळ्यांसमोर येते. (उदा० कवि की कवी, ब्राह्मण की ब्राम्हण, विसांवा की विसावा). या ठिकाणी मात्र ही चर्चा दृश्य आकारांच्या अधिक मूर्त पातळीवर उतरली आहे.अशोक रा० केळकर

लेखनविषयक शासननिर्णय २००९ हा 'भाषा आणि जीवन'च्या संपादकांनी आपल्या वाचकांसमोर सविस्तर ठेवण्याचे ठरविले. (हिवाळा २०१०, उन्हाळा २०१० अंक पाहावेत.) याचा हेतू हा की त्यांचे लक्ष वेधावे आणि त्याबद्दल प्रचलित हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकव्यवहार आणि यांत्रिक संदेशग्रहण करणार्‍या मंडळींच्या व्यवहारात एकसूत्रीपणा यायला मदत व्हावी. लेखनविषयक चर्चा म्हटले म्हणजे शुद्धलेखनाची चर्चा सामान्यत: आपल्या डोळ्यांसमोर येते. (उदा० कवि की कवी, ब्राह्मण की ब्राम्हण, विसांवा की विसावा). या ठिकाणी मात्र ही चर्चा दृश्य आकारांच्या अधिक मूर्त पातळीवर उतरली आहे. महाराष्ट्र शासनाने आपले पूर्वीचे १९६२ व १९६६चे निर्णय 'अधिक्रमित' करून नवा निर्णय प्रसृत केला आहे आणि तोही नव्या तंत्रविद्येमुळे एकसूत्रीपणाची निकड वाढत जाणार हे लक्षात घेऊन, ही समाधानाची गोष्ट आहे.

मराठी भाषेचे लेखन आणि उच्चारण आणि त्यात होत जाणारे बदल यांचा एक अभ्यासक या नात्याने माझी या निर्णयाची प्रतिक्रिया नोंदवणे अगत्याचे आहे असे मला वाटते म्हणून हा लेखनप्रपंच.

विशिष्ट तपशिलांची चर्चा करण्याअगोदर त्यामागच्या सर्वसाधारण धोरणाचा विचार करणे योग्य होईल. प्रचलित व्यवहार आणि त्याच्या गरजा लक्षात घेणे, त्यासाठी केवळ शाळेत शिकवल्या जाणार्‍या अक्षरांचा विचार न करता वर्णांचा विचार करणे (नुसत्या अंगभूत अशा सामावून घेणार्‍या क, ख... अक्षरांच्या बरोबर क्, ख्.... हे व्यंजनवर्ण, त्यांची जोडाक्षरातली क्, ा्र... ही व्यंजनरूपे, ा, ... ि ही स्वरचिन्हे) हे धोरण दिसते. याच धोरणाला अनुसरून एक समावेशकता या निर्णयात दिसते. (अ‍ॅ, ऑ यांचा वर्णमालेत समावेश, अक्षरांबरोबर आकडे आणि त्यांचे 'अक्षरी' लेखन, वर्णक्रमाचे संकेत, विरामचिन्हांचा लेखनव्यवस्थेत समावेश). परंपरेचा सादर राखणे पण त्यामुळे होणार्‍या गैरसोयी टाळणे (ख अक्षराचे दोन अवयव जोडून घेणे, श्री, क्ष, ज्ञ यांचा स्वीकार), देवनागरीची आणि तिच्या 'मराठी' वळणाच्या वैशिष्ट्यांची बूज राखणे (अ ची बाराखडी, इ, ई, अृ, ए... उर्दू लिपीतील आलिफला जेरसारखी स्वरचिन्हे जोडणारा पर्याय आणि श ऐवजी श किंवा ल ऐवजी ल हिंदी वळणाची आठवण देणारा पर्याय या दोहोंनाही शासकीय निर्णयात स्वीकारण्यात आलेले नाही. ही सगळी धोरणे मला पटण्यासारखी वाटतात.

तपशिलात जाताना सामान्य जिज्ञासूची भूक भागवण्याचा कुठे प्रयत्न दिसतो तो स्तुत्य वाटतो. उदाहरणार्थ, जोडाक्षरांची चर्चा करताना कधी मूळ व्यंजनाच्या आकाराबरोबर येणारा सुटा दंड ('ग' मधला). मधोमध येणारा दंड ('क' मधला), शिरोभागी आखूड दंड ('छ' मधला) यांच्याकडे लक्ष वेधले आहे, कधी जुन्या पूर्णाक्षरांची आठवण काढली आहे. उदाहरणार्थ, र च्या जागी ा्र (ग्र, ड्र), श च्या जागी श्र (श्र, श्व, पुर्‍या) मात्र, क च्या जागी क (क्त मधला) आणि त च्या जागी त् (त्र, त्त) यांची आठवण करून द्यायची राहिली आहे. वर्णक्रम देताना तो इंग्रजी ए, बी किंवा उर्दू आलिफ, बे प्रमाणे केवळ सांकेतिक किंवा दृश्य रूपांच्या सारखेपणावर आधारलेला (उर्दू बे, पे, ते प्रमाण), मराठीमध्ये बालांना किंवा प्रौढांना साक्षर बनवताना वापरला जाणारा ग, म, भ, न हा क्रम) असा नाही. तो उच्चाराची कंठ, तालू इत्यादी स्थाने आणि मुखविवर म्हणजे जबडयाचे कमी-अधिक उघडणे (इ ए, अ आ; उ ओ, य र ल व आणि श, ष, स, हे गट; स्वर, स्पर्श-व्यंजने, आणि या दोन गटांचा मधला गट (थोडेसे स्वरांकडे झुकणारे य, र, ल, व हे ईषद्विवृत आणि श, ष, स, ह, ळ हे ईषद्विवृत हे स्पर्शव्यंजनांकडे झुकणारे ही वर्णमालेची/अक्षरमालेची एकंदर मांडणी हे सर्व लक्षात घेता अ‍ॅ ला अ शी आणि ऑ ला आ शी जोडणे, निव्वळ ग म भ न च्या पातळीवर जाईल, शासनाची ए, ऍ आणि ओ ऑ ही मुखविवरावर म्हणजे जबडा कमीअधिक उघडण्यावर आधारलेली मांडणी पारंपरिक वर्णक्रमाच्या जवळ जाणारी राहील - हे सांगायचे राहून गेले नाही.

वर्णमाला आणि अक्षरमाला यांना स्पष्ट वेगळे काढून त्यांना अनुक्रमे शास्त्रीय पातळी आणि शालेय पातळी यांच्याशी जोडणे हा विवेक स्वागतार्ह आहे. चिन्हांच्या गटांना पारिभाषिक संज्ञा अधिक आखीवरेखीव करण्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे, तो अधिक पुढे नेता येण्यासारखा आहे. एकाच दृश्य रूपाला एकाधिक कार्ये हा विवेक बाळगणे हिताचे होईल. शिरोबिंदू एकच पण कार्ये अनुस्वार (शंख, चंची, तंटा, तंत्र, पंप, संयम, संरक्षण, संलग्न किंवा संशय, दंष्ट्रा, सिंह मधले ङ्, न्, ण्, न्, म्, ञ्, वँ, वँ् किंवा अनुनासिक लँ्, व्ँ, व्े, व्ँ, व्ँ, व्ँ, हे वर्ण) अनुनासिक (एेंशी, ब्यांयशी मधला). द्विबिंदू एकत्र कार्ये विसर्ग हा वर्ण, अपूर्ण विराम हे कार्य, त्रिबिंदू एकच रूप पण खंडविराम. शब्दलोप ही कार्ये. द्विखंड ऽ एकच पण कार्ये अक्षरलोप प्लुती. याच्या उलट कार्य एकच पण दृश्य रूपे अनेक. यथोपरिकार्य एकच. पण '', -. लोप हे कार्य एकच पण दृश्य रूपे अण्णासाो, '८३ किंवा, 'नगर, ०घोडा, डी., ०डे. संक्षेप हे कार्य आणि दृश्यरूपे स. न., स० न०

काही नियम अनाठायी वाटतात. उदा० उद्‍गार किंवा उद्गार चालेल, पण उद्गीरची लढाई चालणार नाही. हायफन आणि डॅश साठी काही हस्तलेखक फरक करीत नाहीत. त्याची मुद्रणावर छाया पडते. संयोग-चिन्ह आणि वियोग-चिन्ह या संज्ञा पुरेशा पारदर्शी आहेत. अपसरण (दूर सारणे) आणि अपसारण (दूर सारणे) या संज्ञा पुरेशा परिचयसुलभ नाहीत हीसुद्धा त्यातली एक अडचण ठरू शकेल. रु आणि रू यात हस्तलेखन, मुद्रण, टंकलेखन यात नित्य दोन्हीऐवजी रु येतो. त्यासाठी काही दिवस रु, रू हे पर्याय चालू द्यायला काय हरकत आहे? अर्धा ळ, पाऊण य, शिरोरेफ र् , मध्यरेफ ऱ् अधोरेफ ्र , पाऊण रेफ ा्र यांसारख्या काही नव्याजुन्या पारिभाषिक संज्ञा म्हणून रूढ करता येतील. टंकनामध्ये मध्यरेफच्या ऐवजी चुकीने संयोग-चिन्ह येते, कर्‍हेचे पाणीऐवजी क-हेचे पाणी. ऋ स्वराची दोन दृश्यरूपे ऋ G अशी आहेत, त्यातले दुसरे हिंदी वळणाचे आणि दीर्घ ऋ वाटू शकणारे आहे ते टाळावे. शिरोबिंदू, शिरोरेफ, डावी व उजवी वेलांटी अर्धचंद्र यांचा टकरी शिरोरेखेच्या वर होण्याची भीती असते. त्या टाळण्याच्या युक्त्या असतात. उदा० अंटार्क्टिका खंड यातील पसरट डावी वेलांटी मुद्रकाला जमली नाही तर अंटार्क्टिका असे काही करावे लागते. भाषा आणि जीवनमधल्या शंका या सदरासाठी इच्छुकांनी अवश्य लिहावे. समाधान यथाशक्ती मिळावे.

मी या सर्व प्रकारणी बरीच वर्षे काम करून लेखन करीत आहे. मी आपल्या प्रतिक्रिया नोंदताना जरूर तितकी उदाहरणे आणि साधकबाधक मुद्दे दिलेले आहेत. जिज्ञासूंनी खाली दिलेल्या संदर्भसूचीवरून शोध घ्यावा.

* मराठी देवनागरी वर्णक्रमी : एक टिपण - महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक २०२ : ६०-४, १९७७ : समावेश, वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार, मॅजेस्टिक; मुंबई १९८३, दुसरी आवृत्ती : स्नेहवर्धन, पुणे, २००७

* मराठीचे श्रवणप्रत्ययी लेखन, मराठी संशोधन पत्रिका २५:२, ३१-४६, समावेश : मराठी संशोधन पुस्तिका ११, १९७८ : वैखरी १९८३; दुसरी आवृत्ती २००७

* मराठीमधील विशेषनामांचे उच्चारण व लेखन (शब्दवेध), मसापत्रिका १७६-७:१२३-७, १९७१. वैखरी १९८०, दुसरी आवृत्ती २००७

* मराठी लेखनातील विरामचिन्हांचा उपयोग, भाषा आणि जीवन समावेश : मध्यमा, मेहता पुणे, १९९६ : ७:४, ६-३५ : दिवाळी १९८९. इंग्लिश : Deccan College bulletin 50, 1990, (यात विरामचिन्हांबरोबर *+ सारखी संदर्भचिन्हे, पायमोड, द्विखंड सारखी भेदकचिन्हे, शब्दांची तोड-जोड परिच्छेद सारखे मांडणीचे (Layout) विशेष यांचाही विचार केला आहे.)

* मराठी भाषा आणि वाचिक अभिनय, नवभारत : दिवाळी १९९२. समावेश : मध्यमा, मेहता, पुणे, १९९६ इंग्लिश : Deccan College bulletin 51-2, 1991-2, (यात शब्दांपेक्षा मोठ्या घटकांची चर्चा आहे.)

मूळ शासकीय निर्णय काय किंवा माझ्या आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया काय यांचा प्रचलित अराजकसदृश व्यवहारावर काही थोडा परिणाम व्हायचा असेल तर लोकशिक्षण आणि शालेय शिक्षण यांच्याद्वारे त्यांचा पाठपुरावा केला गेला पाहिजे.

धनंजय, 759/83 भांडारकर रस्ता, पुणे 411 004
दूरभाष : (020) 2565 4901

स्तिमित करणारा बौद्धिक आवाका

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.(परीक्षित पुस्तक : रुजुवात - अशोक रा० केळकर. लोकवाङ्मय गृह, मुंबई. २००८. पृष्ठे २४+३१६. किंमत रु० ६००/-)

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.

डॉ० केळकरांची प्रज्ञा अनेक विद्याशाखांत अधिकारवाणीने संचार करताना दिसते. बहुतेकांना त्यांची ओळख एक श्रेष्ठ भाषावैज्ञानिक म्हणून असते. या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली आहे. पण भाषाविज्ञानाच्या क्षेत्राबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी अतिशय सूक्ष्मदर्शी, अंतर्दृष्टियुक्त लिखाण केले आहे. या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामगिरीच्या संदर्भात एक मार्मिक विधान प्रा० मे०पुं० रेगे यांनी केले आहे. ते या संग्रहाच्या 'भलावणीत' (ब्लर्ब) उद्धृत केलेले आहे. प्रा० रेगे म्हणतात, ''तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास इत्यादी अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे (डॉ० अशोक केळकर) अधिकारी पंडित (आहेत). डॉ० केळकरांच्या ''मिस्टिकल अनुभवाकडे पाहण्याची नवी दृष्टी'' देणार्‍या लेखाच्या संदर्भात प्रा० रेगे यांनी हे विधान केले. हे लेखन नंतर 'भेदविलोपन' या पुस्तिकेद्वारे वाचकांना उपलब्ध झाले. ते साहित्य-समीक्षक आहेत, साहित्य मीमांसक आहेत, त्यांना संगीतमीमांसक (म्यूझिकॉलॉजिस्ट) म्हणून संबोधिता येईल अशा प्रकारचे त्यांचे संगीतविषयक चिंतन आहे. नृत्य, शिल्प, वास्तुकला अशा कलाप्रकारांवर त्यांनी त्यांच्या तलस्पर्शी, सूक्ष्मदर्शी आणि अंतर्दृष्टियुक्त चिंतनाने वाचकाला त्या-त्या कलांच्या स्वरूपाबद्दल नव्याने विचार करायला लावील अशा प्रकारचे लिखाण केलेले आहे.

युरोपियन इतिहासामधील विद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या (रिनॅसन्सच्या) काळात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होती, ज्यांना आदराने 'रिनॅसन्समॅन' म्हटले जाई. मानव्य विद्यांच्या अनेक शाखांतील त्यांचा अधिकार सर्वमान्य असे. डॉ० केळकरांकडे पाहिले की ते आपल्या काळातील 'रिनॅसन्समॅन'च आहेत असेच त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते.

डॉ० केळकर स्वत: उत्तम शिक्षक होते आणि शिक्षणप्रक्रियेतही त्यांना विशेष रस होता. प्रस्तुत संग्रहामध्येही 'शिक्षणाचे एक माध्यम - कला', 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' या लेखांतून किंवा व्यावहारिक समीक्षा या चौथ्या विभागातील 'उपरी भाषा आणि थलकरी भाषा : लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'च्या संदर्भात' या लेखाच्या इतिकथनात जे संदर्भ दिलेले आहेत ते ध्यानात घेतले तरी त्यांची शिक्षकाची भूमिका कळून येते. असेही म्हणता येईल की या ग्रंथातील अनेक लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्म, तरल अशा प्रकारचे विश्लेषण करीत असतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतात. तेव्हाही विद्यार्थ्यांना नव्या दिशांनी विचार करायला लावणार्‍या शिक्षकाचे ते प्रश्न आहेत असेच जाणवते.

या ग्रंथामध्ये संग्रहित केलेल्या लेखांचे वर्गीकरण डॉ० केळकर यांनी चार विभागांत केले आहे. पहिला विभाग सैद्धांतिक समीक्षेचा आहे. यामध्ये डॉ० केळकर यांनी कविता ('कवितेचे असतेपण' - १९६९), 'कवितेचे सांगतेपण, करतेपण' (१९८३), 'शैली आणि तंत्र' (१९८५), 'भाषा आणि साहित्य' (१९७०,८१) 'कलावती वाणी : बोलणे, म्हणणे, गाणे' (१९९६) हे साहित्यविषयक लेख आहेत. त्याचप्रमाणे नाटक या विषयावर 'नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास' (१९९६) आणि 'नाटक : एक होणे' (१९८७). याचबरोबर संगीत आणि नृत्य यांवरही दोन लेख आहेत. यांपैकी 'कवितेचे असतेपण' हा विशेष महत्त्वाचा लेख आहे. कवितेच्या असतेपणाचा प्रश्न चार प्रश्नमालिकांत दडलेला आहे, असे डॉ० केळकर मानतात. या चार प्रश्नमालिका

१) स्वत्वाचा प्रश्न २) अस्तित्वाचा, अस्तित्वकक्षेचा प्रश्न

३) धर्मित्वाचा प्रश्न ४) अर्थवत्तेचा किंवा तार्किकतेचा प्रश्न

अशा आहेत. या चार प्रश्नमालिकांची सविस्तर मांडणी डॉ० केळकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काटेकोर चिकित्सकपणे केलेली आहे. डॉ० केळकरांच्या विवेचनशैलीच्या वैशिष्ट्यांसह अशा प्रश्नांच्या विवेचनात नेहमी वापरल्या जाणार्‍या शब्दांचा (संज्ञांचा) वापर चुकीचा आहे हे सांगत असतानाच ते काही धोक्याचे कंदीलही दाखवतात. उदा० कोणत्याच विशिष्ट कवितेचा विचार करायचा नाही. काव्य हा शब्द वर्ज्य. कारण तो 'गोलाकार'. या संग्रहातील बर्‍याच लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्मात जाऊन चिकित्सा करतात आणि योग्य अन्वर्थक शब्द मिळाल्यानंतरच त्यांचे विश्लेषण थांबते. हा काथ्याकूट नाही, तर अ‍ॅरिस्टॉटलच्या वचनाप्रमाणे 'अचूक व्याख्या करणे हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे', या विधानाची साक्ष पटविणारे आहे. या लेखातील विश्लेषणातून कवितेच्या व्याख्येकडे ते वाचकाला आणतात. कविता म्हणजे १) संहिता २) एक मुद्दाम रचलेला वाचनीय वा श्रवणीय मजकूर, एक शैलीबद्ध अ-निर्हेतुक, अ-सहज संहिता ३) एक शैलीबद्ध भाषेचा कच्चा माल, द्रव्य म्हणून उपयोग करणारी आणि अर्थसंक्रामक चिन्ह (कम्युनिकेटिव्ह सिंबल) म्हणून वावरणारी स्वायत्त कलाकृती. अशा प्रकारे कवितेच्या नेहमीच्या व्याख्येपेक्षा अगदी निराळीच जाणीव ते करून देतात. म्हणजेच कविता हा भाषिक चिन्ह-व्यवहार आहे असे ते पटवून देतात. त्यांच्या शब्दात, ''कविता वाहनाच्याद्वारे भाषिक संकेतांनुसार कविता-पाठ्य चिन्हित होते आणि कविता पाठ्याद्वारा एक नवीन अनंगवस्तू चिन्हित होते.'' ''पण या नव्या चिन्हीकरण - व्यवहारातून उभी राहते ती एक स्वत:त सामावलेली, आतून अभंग अशी वस्तू'' (पृष्ठ १९). आपली नव्या चिन्हीकरणाची कल्पना आणि दि० के० बेडेकर यांनी मांडलेली 'विकल्पन' ही संकल्पना आणि संस्कृत साहित्य मीमांसेमधील 'भाव' या संज्ञेने सुरुवातीच्या काळात दर्शविली गेलेली संकल्पना एकच आहेत असेही ते नमूद करतात (पृष्ठ १९) आणि अशा प्रकारे कवितेच्या चर्चेला भाषाविज्ञान, चिन्हविज्ञान या शाखांशी जोडतात.

'कवितेचे सांगतेपण, करतेपण' या लेखाची सुरुवात 'कवितेचे असतेपण' या लेखाप्रमाणेच आर्चिबाल्ड मक्लिश या कवीच्या A poem should not mean / But be या विधानाने होते आणि या दोन लेखांमधील दुवाही त्यामुळे सिद्ध होतो. ''कवितेची व्याख्या करणे अवघड, कारण ती जात्या विवादग्रस्त संकल्पना आहे. ... कविता कवितांमध्ये ... फार/तर कुलसाम्य शोधावे हे बरे''. कवितेची व्याख्या करताना निर्माण होणारे वादविषय ध्यानात घेऊन डॉ० केळकरांनी कविता आणि काव्य यांच्या संबंधात १) आनंदवादी २) आशयवादी ३) रूपवादी ४) जीवनवादी आणि ५) आशयरूपवादी असे कविता-वाचकांचे वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण या ग्रंथातील इतर काही लेखांतही आपल्याला भेटते.

कवितेची भाषा आणि सामान्य व्यवहाराची भाषा ह्यांमध्ये फरक आहे हे नमूद करून पाठ्यरूपी कविता आणि कलावस्तुरूपी कविता यांचे नाते स्पष्ट करताना डॉ० केळकर तंत्र आणि शैली यांचे विवेचन करतात. हे विवेचन 'सांगतेपणा'च्या अर्थवत्तेच्या चर्चेचा पुढचा टप्पा गाठते. यानंतर 'सांगतेपणा'-कडून 'करतेपणा'कडे वाचकाला नेताना डॉ० केळकर, 'कलावस्तूमुळे आणखी काही चिन्हित होते का (पृष्ठ ४२) आणि कविता श्रोत्यावर-वाचकावर, श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय करते, निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय करते आणि समाजासाठी काय करते असा मुद्दा विचारात घेतात आणि वर नमूद केलेले पाच प्रकारचे 'वादी' काय म्हणतील याची मांडणी करतात.'

कवितेची चर्चा करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात याची ही उत्तम मांडणी आहे.

डॉ० केळकरांनी कल्पिलेले पाच गट/पाच भूमिका हवाबंद नाहीत, हे उघड आहे. त्यांच्यातल्या संभाव्य स्थित्यंतराची दखलही डॉ० केळकरांनी घेतली आहे. त्यामुळे मराठीतील काव्यमीमांसेच्या संदर्भातील त्यांची विधाने जशीच्या तशी स्वीकारणे कठीण आहे. तथापि या वादात वापरण्यात येणार्‍या रूपवाद, जीवनवाद इत्यादी कल्पनांच्या भोंगळ वापराबद्दल ते आपल्याला जागृत (अ‍ॅलर्ट) करतात हे या विवेचनाचे खरे मोल आहे.

या दोन लेखांची नोंद थोडी विस्ताराने घेण्याचे कारण डॉ० केळकरांची मांडणीची पद्धत, त्यांच्या विवेचनपद्धतीच्या लकबी या दोन लेखांत स्पष्ट होतात आणि हीच दृष्टी मग इतर निबंधांतही दिसून येते. फक्त तपशील विषयानुसार बदलत राहतात. डॉ० चंद्रशेखर जहागिरदार यांनी आपल्या प्रस्तावनेत 'डॉ० केळकर... मांडणीची पूर्वतयारी म्हणून संबंधित विषयाचा एक नवीन संकल्पनात्मक नकाशाच व्यवस्थित मांडतात.' (पृष्ठ सात) असे म्हटले आहे. या नकाशात कोणत्या वाटा फसव्या म्हणून बंद आहेत, वर्ज्य आहेत, याचेही दिग्दर्शन डॉ० केळकर करतात अशी त्यात भर घालावीशी वाटते.

याच संदर्भात डॉ० केळकर यांच्या भूमिकेचा प्रश्नही अपरिहार्यपणे उपस्थित होतो. त्याचे उत्तर देताना 'मी स्वत:ची भूमिका मांडण्याचे कटाक्षाने टाळले आहे... तशी भूमिका मांडण्याची तार्किक अपरिहार्यता अंगीकारलेल्या वाटाडयाच्या कामासाठी वाटली नाही म्हणून टाळले आहे,' असे ते म्हणतात. डॉ० केळकरांची वाटाड्याची भूमिका इतर लेखांतही जाणवते. असे असले तरी भूमिकेचा प्रश्न उपस्थित होतोच. स्वत: डॉ० केळकरांनी 'लेखकाचे मनोगत'मध्ये असे म्हटले आहे की ''मी मार्क्सवादी नाही - ना साम्यवादी ना समाजवादी. पुस्तकाच्या अग्रभागी जोडलेली नांदी पाहावी म्हणजे मी तटस्थ नाही एवढा दिलासा निश्चित मिळेल...माझी भूमिका सांगणे कसे गुंतागुंतीचे आहे याचाही उलगडा होईल.'' समीक्षेत तटस्थ कसे राहणार? समीक्षेतली विधाने... व्याख्यादेखील जात्या पक्षपाती आणि म्हणून वादग्रस्त आणि प्रश्नांकित असतात... समीक्षेतली विधाने वाईट अर्थाने वादग्रस्त होऊ नयेत म्हणजे वितंडाग्रस्त होऊ नयेत (म्हणून) सुसंगतपणे एक समान विवादभूमी सादर करणे महत्त्वाचे आहे.'' म्हणजे येथेही डॉ० केळकर एक प्रकारे आपली भूमिका अनुच्चारित ठेवतात. इतरत्रही 'मला स्वदेशीवादाचा, नेटिव्हिझमचा पुरस्कार करायचा नाही' (पृष्ठ २७४) अशा प्रकारची विधाने त्यांच्या लिखाणात आढळतात. तेव्हा आपण डॉ० केळकरांची भूमिका काय याचा पाठपुरावा न करता त्यांनी सादर केलेल्या साहित्यविचाराच्या मांडणीतून काय जाणवते याचा शोध घेणे इष्ट होईल.

१९६०नंतर मराठी समीक्षेमध्ये डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांनी 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आणि संज्ञांची ओळख करून देऊन समीक्षेची समज वाढवणारी भर घातली. डॉ० केळकर या घडामोडीत सहभागी होते आणि त्यांच्या लिखाणात 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आपल्याला बर्‍याच वेळा आढळून येते. या दोन व इतर काही लेखांतही त्यांच्या विवेचनामध्ये अमेरिकन नवसमीक्षक आणि इंग्रजी समीक्षकांचा पुष्कळ वेळा उल्लेख येतो. उदा० वेलेक आणि वॉरेन (थिअरी ऑफ लिटरेचर) जॉन क्रो रॅन्सम, टी०एस० एलियट, एल०सी० नाइट्स, आय०ए० रिचर्ड्स आणि प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी 'इंटेन्शनल फॅलसी', 'अफेक्टिव्ह फॅलसी' या संज्ञांच्या वापरातून सूचित झालेले ब्रुक्स, विम्सॅट, बिअर्ड्सली ह्या टीकाकारांनी मांडलेल्या साहित्य-विचाराचे स्वरूप पाहिले तर काही गोष्टी जाणवतात. त्या, माझ्या मते, डॉ० केळकरांच्या मांडणीलाही लागू होतात.

१. या टीकाकारांची मांडणी विशेष करून 'कविता' या साहित्यप्रकाराशी निगडित आहे. त्यातही विश्लेषणासाठी ते लिरिकचा वापर करताना दिसतात. डॉ० केळकर स्वत: 'कविता' ही 'रोमँटिक लिरिक'पेक्षा निराळी आहे असे म्हणतात आणि 'कविता' अधिक व्यापक करतात. सैद्धांतिक समीक्षा या विभागातील पहिल्या पाच लेखांतील त्यांचे विवेचनही 'कविता' या साहित्य-प्रकाराशीच निगडित आहे. अर्थात त्यांच्या भाषावैज्ञानिक अंतर्दृष्टी (इनसाइट्स) मुळे, तंत्र, शैली यांच्या अतिशय सूक्ष्म, तरल विश्लेषणामुळे आणि चिन्हांकन आणि चिन्हीकरण या संज्ञांच्या वापरामुळे वर नमूद केलेल्या टीकाकारांच्या ते कितीतरी पुढे गेले आहेत असे जाणवते. तरीही विवेचन प्रामुख्याने कवितेविषयी आहे असेच वाटते.

२. अशा कविताकेंद्री मांडणीमुळे साहित्याच्या इतर रूपांकडे उदा० कादंबरी आणि इतर गद्यप्रकार यांच्या सैद्धांतिक समीक्षेला फारसे स्थान उरत नाही. जेव्हा त्यांचा विचार होतो तेव्हा अशा कृती 'कविते'च्या गुणधर्मांनी युक्त असणार्‍या असतात आणि त्यांचा विचारही जणू काही त्या 'कविता' असाव्यात अशा पद्धतीने भाषा, शैली अशा बाबींकडे विशेष लक्ष देऊन केला जातो.

३. अशा प्रकारे लिरिसिझम (कवितात्मता) या बाबीवर लक्ष केंद्रित केले तर साहित्य-विचारातील वास्तव, वास्तववाद यांकडे दुर्लक्ष होते. विम्सॅट आणि ब्रुक्स यांनी लिहिलेल्या 'लिटररी क्रिटिसिझम : ए शॉर्ट हिस्ट्री'मधील 'वास्तववाद' (रिअ‍ॅलिझम) विषयक प्रकरण पाहिले तर अशा मांडणीमुळे साहित्याच्या काही अंगांकडे कसे दुर्लक्ष होते, इतकेच नव्हे तर त्यांच्यावर कसा अन्यायही होतो हे लक्षात येईल. मराठी साहित्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर वास्तववादाची सैद्धांतिक मांडणी नसणे ही मोठी उणीव होईल, कारण आधुनिक मराठी साहित्यामध्ये वास्तववाद महत्त्वाचा आहे.

'सैद्धांतिक समीक्षा' विभागातील ''भाषा आणि साहित्य'' या लेखातील मांडणी १९७० साली नक्कीच नवपथप्रदर्शक झाली असणार. आज सुमारे चाळीस वर्षांनंतर त्यातील बहुतेक विवेचन वाचकांच्या अंगवळणी पडले आहे.

''शैली आणि तंत्र'' या लेखातील प्रतिपादन थोडयाफार फरकाने आधीच्या लेखात आलेले आहे. ''कवितेचे सांगतेपण-करतेपण'' या लेखातील आनंददायी, रूपवादी, आशयवादी, जीवनवादी आणि आशयरूपवादी या वर्गीकरणाचा वापर करून या प्रत्येक भूमिकेचे तंत्र आणि शैली यांबाबत काय म्हणणे आहे हे मांडण्यात आले आहे. या विवेचनाच्या शेवटी शैली म्हणजे केवळ भाषासरणी हे समीकरण खोडून काढण्यात आले आहे. शैलीचा विचार माध्यमाशी निगडित आहे आणि म्हणून साहित्यशैलीला भाषाविज्ञानाची शाखा मानल्यामुळे 'शैली माध्यमाच्या पातळीवर असते आणि केवळ भाषा या साधनद्रव्याच्या पातळीवर नसते हे नजरेआड करणे' ही चूक होते. तसेच 'शैलीचा विचार...समीक्षेसारख्या जात्या वादग्रस्त संकल्पना आणि मूल्य-विवेक यात गुंतलेला उद्योग आहे हे लक्षात न घेण्याची चूक' (पृष्ठ ५६) (होते) हा अतिशय मूलगामी आणि महत्त्वाचा विचार कबीर आणि तुकाराम यांच्या चार कवितांचा शैली-विचार करताना मांडला आहे.

'कलावती वाणी' या लेखात वाणीच्या बोलणे, म्हणणे आणि गाणे या तीन आविष्कारांची चर्चा करण्यात आली आहे. 'मनुष्यजीवनाच्या विविध आविष्कारांत वाणी, आणि शास्त्र आणि कला मोडतात.' भाषा ही वाणीची मुख्य परिणती आहे. वाणी हा भाषेचा मुख्य आविष्कार आहे. अनुभवाला आणि वर्तनाला अर्थ देण्याची, 'कशाला काय म्हणू नये' हे ठरवण्याची क्रिया भाषेच्या द्वारे पूर्ण होते.

भाषा ही वाणीची मुख्य परिणती असली तरी वाणी भावाविष्काराचे एक साधन आणि संगीताचे वाहनद्रव्यही असते. त्यामुळे वाणी जेव्हा 'कलावती' होते तेव्हा भावाविष्कार तसेच वाणीचे संगीताशी असलेले नाते विचारात घ्यावे लागते. डॉ० केळकर भाषा आणि संगीत या दोन ध्रुवांच्या दरम्यानची, त्यांना जोडणारी जी साम्यस्थळे आहेत त्यांचे विवेचन करतात. कलावती वाणी ही कलेचे वाहनद्रव्यही बनलेली असते. या वाहनद्रव्याचा जेव्हा आशयद्रव्याशी संयोग होतो तेव्हा कलेचे माध्यम निष्पन्न होते. (पृष्ठ६७) डॉ०केळकर माध्यमाचा तंत्रपातळीवर आणि शैलीपातळीवर सूक्ष्म भेद स्पष्ट करीत विवेचन करतात. त्यामध्ये त्यांनी नाट्यधर्मी आणि लोकधर्मी या संज्ञा वापरताना भरताने त्यांचा दिलेला अर्थ जसाचा तसा ठेवलेला नाही. (डॉ० केळकर यांच्या एक्लेक्टिक - विविध क्षेत्रांतून आपल्याला उपयुक्त आणि आवश्यक 'कच्चा माल' घेऊन त्यातून नवीन मांडणी करण्याच्या - वृत्तीचे हे चांगले उदाहरण आहे.) परिणामत: या विवेचनात नाट्यधर्मी व लोकधर्मी यांच्या संदर्भात अंतर्दृष्टियुक्त (इन्साइटफुल) दिशादर्शक अशी अनेक विधाने आहेत. 'कलावती वाणी' हा या ग्रंथातील एक महत्त्वाचा लेख आहे. इतिकथनात या लेखातील मांडणीच्या उपयोजनाच्या काही दिशाही त्यांनी कळकळीने मांडल्या आहेत. पण गेल्या १४/१५ वर्षांत कुणी प्रतिसाद दिला नाही याची खंतही ते व्यक्त करतात, तिची गंभीर दखल अभ्यासकांनी घेणे आवश्यक आहे. डॉ० केळकरांच्या मते या अनास्थेचे कारण 'सध्याचा वैचारिक गारठा' हे आहे. कदाचित तथाकथित 'वैचारिक' दूधभात गटकन गिळण्याची सवय लागलेल्या वाचकांना हा तोंडाला भरपूर व्यायाम देणारा विचारप्रपंच मानवत नसावा.

या विभागातील ऊर्वरित लेख नाटक, संगीत आणि नृत्य या विषयांवर आहेत. डॉ० केळकरांची 'कलावती वाणी'मध्ये वाणी कलावती कशी आणि कोणत्या व्यवहारात होते हे ध्यानात घेतले तर ही मांडणी अपरिहार्य होते.

कवितेचा विचार करताना वापरलेल्या पद्धतीप्रमाणे येथेही विवेचन आहे. ''सर्जनशील लेखनाचा नाट्य हा सर्वोत्तम आणि सर्वात शाश्वत आविष्कार आहे. काव्याच्या विविध प्रकारांपैकीच नाट्य एक प्रकार आहे.'' (पृष्ठ७८) हे टी०एस० इलियटचे विधान उद्धृत केले आहे. नाटकाला सर्वश्रेष्ठ काव्य का मानतात याचा उलगडा करण्यासाठी डॉ० केळकर नाट्याची तीन वैशिष्टये विशद करतात:

१. कवी-निरपेक्ष आणि रसिक-निरपेक्ष असा अन्योन्य संबंध केंद्रस्थानी असणे.

२. नाट्यकाव्यातला वर्तमान(काळ) भविष्यकाळाला पोटात बाळगणारा, भविष्यकाळावर अवलंबलेला असतो. या वैशिष्ट्याला केळकर 'भविष्यगर्भ वर्तमानकाळ' म्हणतात.

३. नाटक रचणारा कवी असो,... दिग्दर्शन करणारा कविमित्र असो, कविमित्राचे रंगकर्मी मित्र किंवा प्रयोगात तन्मय होणारा रसिक ... आपापल्या जागी राहून पुन्हा एकत्र काम करण्याचा आनंद नाटकात मिळून जातो. (पृष्ठे७६-७८)

आपल्या या विवेचनाच्या पुष्टीसाठी डॉ० केळकर नाट्यकर्मीची स्वभाववैशिष्टये विशद करतात. ती कीट्सच्या दोन सुप्रसिद्ध वचनांच्या आधारे मांडली आहेत. सर्व रंगकर्मींना - नाट्यकवी, नाट्यदिग्दर्शक, रंगकर्मी आणि नाट्यरसिक या सर्वांना 'परकाया प्रवेश' करण्याची क्षमता आवश्यक असते. 'तटस्थता आणि आत्मीयता यांच्या पलीकडे जाणे म्हणजे तन्मयता (पृष्ठ७९)'.

नाटकातल्या 'भविष्यगर्भ वर्तमानाने निर्माण केलेला ताणतणाव हाताळण्यासाठी रंगधर्मीजवळ आवश्यक असणारे स्वभाववैशिष्टय म्हणजे एक प्रकारची बौद्धिक तितिक्षा.'

नाटकाच्या तिसर्‍या वैशिष्ट्याला डॉ० केळकर समाराधन म्हणतात. समाराधन म्हणजे सर्व संबंधितांची एकत्र खुषी होणे आणि एका घटकाने दुसर्‍याची खुषी राखणे.

अशा प्रकारे परकायाप्रवेशाची क्षमता, वैचारिक आणि भावनिक तितिक्षाबळ आणि समाराधनशीलता हे तीनही गुण नाट्यकर्मींच्या अंगी असावे लागतात. नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा संबंध दोन्ही दिशांनी आहे. तो परस्परपोषक आहे हे सांगून डॉ० केळकर या दृष्टीने नाट्यकर्मींच्या शिक्षणाच्या दृष्टीने जी मांडणी करतात त्यात शिक्षकी तळमळ व्यक्त होते. तसेच 'या तीन गुणांच्या जोपासनेला एक सामाजिक बाजू आहे' (पृष्ठ८२) याचेही निकडीचे भान त्यांना आहे हे दिसते. या लेखाच्या शेवटच्या भागात हिंदी भाषी प्रदेशात 'नाटका'ची जी अवस्था आहे तिच्याबाबत उद्बोधक विवेचन केले आहे.

'नाटक : एक होणे' हा लेख मांडणीच्या बाबतीत 'कवितेचे असतेपण' या लेखासारखा आहे, हे नाटक म्हणजे काय ह्या अतिशय सूक्ष्म विश्लेषणावरून सिद्ध होते. ह्या लेखाच्या शेवटच्या भागात डॉ० केळकरांनी अनेक प्रश्न असलेल्या दोन कार्यक्रमपत्रिका सादर केल्या आहेत. त्या किंवा लेखाच्या आधीच्या भागात त्यांनी वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न पाहता डॉ० केळकरांची त्यांच्या मांडणीच्या बाबतीत आग्रही भूमिका नसून वाद-संवादातून तत्त्वबोध करून घेणार्‍या अधिकारी जिज्ञासूची आहे असे दिसते.

संगीत किंवा नृत्य या कलाप्रकारांची चिकित्सा करतानाही ('संगीताची भाषा आणि मनोव्यापार : एक प्रश्नाचे मोहोळ,' 'नृत्य, कथक, आणि रोहिणी भाटे : एक सम्यग्दर्शन') यांत डॉ० केळकरांनी अशाच प्रकारची कळकळ दाखवली आहे. त्यांचा संगीतावरचा लेख ते एक उत्तम 'म्युझिकॉलॉजिस्ट' आहेत याचा प्रत्यय देतो. संगीताच्या अभ्यासाच्या तीन पायर्‍या विशद करून भारतीय संगीत परंपरांच्या (उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी) अभ्यासात उद्भवणारे काही प्रश्न त्यांनी चिकित्सक पद्धतीने मांडले आहेत. इतर म्युझिकॉलॉजिस्टांप्रमाणे ही मांडणी नाही. ती केवळ अमूर्त, सैद्धांतिक पातळीवरची, पढीक (अ‍ॅकॅडेमिक) नाही तर संगीतव्यवहाराच्या प्रत्यक्ष अवलोकनातून आणि भारतीय संगीत हे जे आपले मोलाचे सांस्कृतिक संचित आहे त्याबद्दलच्या आस्थेतून केलेली मांडणी आहे. 'भारतीय संगीत' हा आपल्या रास्त अभिमानाचा विषय आहे. दुर्दैवाने या संगीताचा जो सैद्धांतिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास भारतात होत आहे त्याबद्दल रास्त अभिमान बाळगण्यासारखी स्थिती नाही' या खेदजनक वस्तुस्थितीमुळे व्यथित होऊन ही मांडणी केली आहे. नाटकावरच्या लेखांप्रमाणेच येथेही डॉ० केळकरांनी चर्चा योग्य दिशेने जाणारी, तत्त्वबोधाचा वेध घेणारी असावी म्हणून प्रश्नांचे मोहोळ उठवलेले आहे.

'द्रव्य', 'माध्यम' आदि संज्ञांचे सूक्ष्म विश्लेषण करून मांडणी करण्याची पद्धतीच नृत्याच्या खास वेगळेपणाची जाण ठेवून त्यांनी वापरली आहे. 'नृत्य' म्हणजे काय आणि काय नाही याची जाणीव वाचकाला या लेखातून मिळते.

ग्रंथाच्या 'आस्वादाकडून समीक्षेकडे' या दुसर्‍या भागात पाच लेख आहेत. 'आस्वाद-व्यापार' हा १९७० पूर्वीचा लेख आहे असे त्याला जोडलेल्या इतिकथनावरून ध्यानात येते. त्या काळी मराठी साहित्यचर्चेमध्ये 'सौंदर्यशास्त्रीय' चर्चेची हवा होती आणि दबदबाही होता. डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांची नावे ठळकपणे आठवतात. सौंदर्यशास्त्रातील बा०सी० मर्ढेकरांचे योगदान पुन्हा एकदा तपासून घेणे हा एक प्रमुख मुद्दा या चर्चांमध्ये असे. डॉ० केळकरांनीही या चर्चेत प्रथमपासूनच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी 'सौंदर्यशास्त्र' या संज्ञेऐवजी 'आस्वाद-व्यापार' ही संज्ञा सुचवली आहे आणि तिचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण 'आस्वाद-व्यापार', 'आस्वाद-मीमांसा' यांचे क्षेत्र अधिक व्यापक करते हे दिसून येते. 'आस्वाद-व्यापाराविषयी' या लेखात आस्वाद-व्यापार, आस्वाद्य वस्तू, आस्वाद घटना, आस्वाद गुण यांचा काटेकोरपणे मागोवा घेतला आहे आणि हे करताना अनेक घोटाळ्यांवर, कमतरतांवर प्रकाश टाकला आहे. शैलीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोण या ग्रंथातील इतर लेखांमध्येही स्पष्ट झाला आहे. या लेखातही त्यांनी केलेले शैलीचे विवेचन मुळातून पाहावे. 'शैलीमीमांसा कुठल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आस्वाद-व्यापार मीमांसेचा ती एक महत्त्वाचा भाग कशी ठरते... शैलीचा नीट विचार झाल्याशिवाय आस्वाद-व्यापारासंबंधीच्या कूट प्रश्नांचा उलगडा होणार नाही' अशी ही भूमिका आहे. 'समीक्षक : एक साक्षीभोक्ता' या लेखावर 'थिअरी ऑव्ह लिटरेचर' ची दाट छाया आहे. समीक्षा-व्यवहारामध्ये नेहमी उपस्थित होणार्‍या 'साहित्याचे सर्वस्पर्शित्व लक्षात घेऊन त्याचा आंतरक्षेत्रीय अभ्यास व्हायला पाहिजे' येथून सुरुवात करून 'साहित्यिक रसग्रहणातून साहित्य-समीक्षा' आणि 'समीक्षेचे सहभागी निरीक्षण म्हणजे साहित्य-मीमांसा' (पृष्ठ १५५) असे डॉ० केळकर म्हणतात. काही प्रमाणात या लेखातले प्रतिपादन आता आपल्या अंगवळणी पडले आहे. (ते सर्वस्वी स्वीकारले आहे किंवा स्वीकारावे असे नाही.) पण तरीही डॉ० केळकरांच्या विश्लेषक अन्वेषण पद्धतीचा नमुना म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.

'मूल्यनिर्णय आणि साहित्यव्यवहार' हा लेख साहित्यकृती विषयक मूल्यनिर्णयाची काटेकोर आणि बहुसमावेशक चौकट निर्माण करतो. येथेही डॉ० केळकरांच्या 'असतेपण, सांगतेपण आणि करतेपण' या त्रयीची उपस्थिती जाणवते. आधीच्या लेखांप्रमाणेच या लेखातले बरेचसे मुद्देही वाचकांच्या परिचयाचे झाले असतील. 'इतिहास, साहित्याचा इतिहास आणि समीक्षकाचे कार्य' हा एक महत्त्वाचा लेख आहे. नेहमीप्रमाणे डॉ० केळकर प्रथम 'इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करतात आणि या विवेचनात उपस्थित झालेल्या मुद्दयांचा साहित्याच्या इतिहासाशी काय अनुबंध असतो, असावा यांचे दिग्दर्शन करीत साहित्याच्या इतिहासाची मांडणी करतात हे माझ्या मते नोंद घेण्याजोगे आहे.

'कवितेचे सांगतेपण-करतेपण' या लेखात समीक्षेतील पाच विविध भूमिका ते पुन्हा मांडतात आणि या पाच भूमिकांची साहित्य-इतिहासाविषयी काय धारणा असेल याची मांडणी करतात. येथील फरक-साम्य यांच्या विश्लेषणामुळे आपल्या विचाराला नव्याने चालना नक्कीच मिळते.

'कला आणि कलाव्यवहार' या विभागातील पहिले दोन लेख - 'शिक्षणाचे एक माध्यम - कला' आणि 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' - डॉ० केळकरांना शिक्षक या नात्याने कला आणि कविता यांच्याविषयी किती आस्था आहे याची साक्ष देतात.

'व्यावहारिक समीक्षा' या विभागात काही साहित्यकृतींची समीक्षा आहे. 'कोसला'चे परीक्षण आणि लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'चे परीक्षण सोडता बाकी सर्व परीक्षणे कवितांची आहेत. 'कोसला' तिच्या शैलीमुळे रूढ कादंबरीपेक्षा निराळी आहे आणि 'उपरा'चे विश्लेषण प्रामुख्याने भाषा आणि भाषिक स्थित्यंतर याविषयी आहे हे ध्यानात घेतले तर इथे प्रस्तुत केलेली समीक्षा (ती अतिशय अंतर्दृष्टिपूर्ण आणि कलाकृतींचे अंतरंग सूक्ष्मपणे उलगडून दाखवणारी आहे हे मान्यच आहे.) कविता, शैली आणि भाषाव्यवहार या अंगांनी जाणारी आहे असे दिसते.

'भारतीय ललितकला (आधुनिक) वयात येतात' हा लेख - डॉ० केळकर त्याला निबंध म्हणतात - सांस्कृतिक समीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय समाजजीवनात जो गुणात्मक फरक घडून आला त्याचे स्वरूप आणि व्याप्ती (खरे तर मर्यादा) - ललितकलांच्या संदर्भात - स्पष्ट करणारा हा लेख आहे. या फरकाला किंवा परिवर्तनाला काय म्हणायचे येथून डॉ० केळकर आपल्या विवेचनाला सुरुवात करतात. त्याला रिनेसन्स (पुनरुज्जीवन) म्हणायचे की 'एनलायटन्मेंट' (प्रबोधन) म्हणायचे? नेहमीप्रमाणे डॉ० केळकर दोन्हींची उकल प्रथम करतात. युरोपियन रिनेसन्सचा 'विद्यांचे पुनरुज्जीवन' हा एक पैलू होता. त्याच्या इतर राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक पैलूंचाही डॉ० केळकर मार्मिक खुलासा करतात. एकोणिसाव्या शतकापासून झालेल्या भारतातील पुनरुत्थानाबद्दल विवेचन करताना ते या स्थित्यंतराचा युरोपीय आधुनिकतेशी संबंध जोडतात आणि त्या आधुनिकतेशी निगडित असलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद, उपयुक्ततावाद तसेच समता आणि राष्ट्रभावना ही मूल्ये आणि ऐहिक परतत्त्वाच्या संदर्भात व्यक्तिवादाची कास धरणे आणि आध्यात्मिक परतत्त्वाच्या संदर्भात इहवादाचा आश्रय करणे या वैशिष्टयांचा परामर्श घेतात.

पश्चिमेकडून आलेल्या या विचारांबाबत डॉ० केळकर एक महत्त्वाचा विचार मांडतात. युरोपियन स्थित्यंतर 'आतून उपजलेले' होते तर त्याचा भारतीय उपखंडात झालेला स्पर्श बाह्यप्रेरणेमुळे झाला, यामुळे दोन क्रियांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर पडले असे ते म्हणतात (पृष्ठ २६७). आणि जरी ते मांडत नसले तरी या अंतराला १९व्या शतकारंभाची भारताची सांस्कृतिक चणही कारणीभूत आहे. त्यामुळे भारतीय पुनरुत्थान अनेकश: दुभंगलेले आहे (पृष्ठ २६७). निरनिराळया जमातींत, प्रदेशांतही हा परिणाम कमीअधिक प्रमाणात जाणवतो. या भारतीय प्रबोधनाचा परिणाम तत्कालीन ललितकलांशी कसा पोचतो हे ऊर्वरित लेखात मांडले आहे. मांडणीचे कार्य 'भावी संशोधनासाठी एक दिशा सुचविणे एवढेच राहील' (पृष्ठ२६८) असे ते स्वत:च म्हणतात. भारतीय ललितकलांचे त्यांनी चार गटांत वर्गीकरण केले आहे. इंग्रजी भाषेचा उपयोग, वापर यांवर या कलांच्यात कमीअधिक प्रमाणात आणि खरीखुरी अथवा व्याज-आधुनिकता येणे कसे अवलंबून होते याचे दिग्दर्शन येथे होते. ब्रिटिशांनी दिलेल्या आश्रयानंतर काही कला अकॅडेमिक झाल्या, तर इतर काही कला ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक पुनर्रचनेमध्ये साहित्य मध्यमवर्गाच्या प्रभुत्वाखाली जाण्यात आणि परिणामत: संकुचित होण्यात झाला. या कोंडीतून सुटण्याचे काही मार्ग (लोकसाहित्याचा वाढता प्रभाव) त्यांनी सुचवले आहेत. 'पाश्चात्त्य प्रभाव भारतीय संदर्भात आत्मसात करायचे कुणाच्या मनातही आले नाही' (पृष्ठ २७२), ही 'घटी'ची बाजू मांडल्यावर डॉ० केळकरांनी प्रबोधनातून मिळालेल्या विधायक स्वरूपाच्या जमेची बाजू मांडली आहे. त्यात इतर आशियाई किंवा वसाहती असलेल्या देशांपेक्षा भारतात प्रबोधन अधिक प्रमाणात रुजले आहे. याबाबत 'हिंदूंची एकंदर जीवनदृष्टी आणि आधुनिकतेची मूल्ये यांमध्ये एक लक्षणीय बंध आहे' असे प्रतिपादन डॉ० केळकर करतात.

आधुनिकतेचे आव्हान भारतीयांचे कलाजीवन पेलेल का? हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याबाबत देशीवादाचा पुरस्कार त्याज्य ठरवला आहे. त्याबाबतीत 'स्व-राज्य' कल्पनेचा पाठपुरावाच आपल्याला आधुनिकतेला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी उपयोगी पडणार आहे असे ते सुचवतात.

डॉ० केळकरांच्या विवेचनातल्या तपशिलांबाबत, काही निष्कर्षांबाबत मतभेद होऊ शकतील. एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. डॉ० मीनाक्षी मुखर्जी त्यांच्या 'द पेरिशेबल एंपायर' या पुस्तकात डॉ० डी०आर० नागराज यांना उद्धृत करतात. “It is possible to identify three streams in the existing theories of colonialism : the schools that are defined by the idea of total conquest, the ones that are organised around the idea of a cultural soul and the ones that stress mutual transformation. The first is represented by the likes of Frantz Fanon, Albert Memmi and Edward Said, the second by the likes of Anand Kumarswamy and Sayyad Hossein Nasr, the third by Ashis Nandy.” डॉ० डी०आर० नागराज यांनी आपल्या 'एग्झाइल्ड अ‍ॅट होम' या संग्रहाच्या प्रस्तावनेत हे विवेचन केले आहे. डॉ० मुखर्जी यांनी तिसर्‍या गटात सुप्रसिद्ध समीक्षक हरीश त्रिवेदी यांचाही समावेश केलेला आहे.

डॉ० केळकर यांच्या विवेचनात रवींद्रनाथ ठाकुरांचा दोनतीन वेळा ओझरता उल्लेख येतो, पण आधुनिकतेच्या संदर्भातले रवींद्रनाथांचे योगदान त्यांनी विचारात घेतलेले नाही. कुमारस्वामींचाही उल्लेख नाही. यांच्या विचारांचा परामर्श माझ्या मते जमेची बाजू वाढवणारा आहे. देशीवादाच्या मुद्दयावर डॉ०केळकरांची भूमिका मान्यच करावी लागते. पण स्वत:चा सांस्कृतिक आत्मा ओळखण्याचा आग्रह धरणार्‍या आणि तिसर्‍या गटातल्या, समावेशक असण्याचा आग्रह धरणार्‍या विचारवंत, समीक्षक आणि कलाकारांचाही विचार प्रस्तुत ठरला असता.

या परीक्षणाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे डॉ० केळकरांचा बौद्धिक आवाका स्तिमित करणारा आहे. त्यांची अन्वेषण-पद्धती मर्मग्राही, अंतर्दृष्टी देणारी आहे. वाचकाशी मोकळेपणाने संवाद करीत (कधीकधी चिमटे काढीत) ते मांडणी करतात. त्यांच्या या प्रचंड बौद्धिक प्रयत्‍नांना साजेसा प्रतिसाद (संवाद, वाद-विवाद या स्वरूपात) मिळत नाही याविषयी ते रास्तपणे दु:खी आहेत. पण हे लेख वाचताना आणि डॉ० केळकरांची व्यथा समजून घेत असताना असेही वाटते की या स्तब्धतेकडे सद्यकालीन (अपरिहार्य?) वैचारिक गारठा असे म्हणून चालणार नाही. डॉ० केळकरांना अभिप्रेत असलेला वाद-संवादाला अनुकूल असा बौद्धिक स्वरूपाचा पुरेसा सशक्त 'पब्लिक स्फिअर' आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. १९व्या शतकाच्या आरंभी गद्याचा अवतार झाला. त्याच्याशीही सुसंगत असा अत्यंत प्राथमिक स्थितीतल्या वादविवाद-तत्त्वबोधाला आवश्यक असा 'पब्लिक स्फिअर' अस्तित्वात आला होता, पण तो सतत शबल राहिला आहे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात अशा प्रकारचा 'पब्लिक स्फिअर' निर्माण करण्यात नियतकालिकरूपी व्यासपीठाचा आणि 'कॉफी हाऊस'रूपी सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग होता. आपण आपल्याभोवती घालून घेतलेल्या अनेक कुंपणांमुळे आपल्याकडे हा 'पब्लिक स्फिअर' पुरेशा परिणामकारकपणे कार्य करू शकत नाही. डॉ० केळकरांनी जन्माला घातलेले 'भाषा आणि जीवन' आता खूपच बाळसेदार झाले आहे. ते अशा प्रकारच्या वादसंवादासाठी आदर्श व्यासपीठ होऊ शकेल आणि त्यातील चर्चांमुळे डॉ० जहागिरदार यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ही 'रुजुवात' सार्थ होईल.

सीताराम रायकर
दूरभाष :०२०-२५४२४४३०८
भ्रमणभाष : ०९८८१९००६०८

पहिल्या अंकाचे संपादकीय : भाषा आणि जीवन


ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात वाणीला उद्देशून एक ऋचा आहे (१० : ७१ : ४)

उत त्वः पश्चन्न ददर्श वाचम् उत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम्
उतो त्वस्मै तन्वं विसस्त्रे जायेव पत्य उशती सुवासाः

(अर्थ : तो वाणीला पाहतो पण पाहतच नाही, तो तिला ऐकतो पण ऐकतच नाही, पण त्याच्यापुढे वाणी आपल्याला संपूर्ण प्रकट करते, जशी उत्तम वस्त्र ल्यालेली पत्नी पतीच्यापुढे.) मूळ कवीला वाणीच्या गूढ स्वरूपाविषयी काही सूचित करायचे असावे. पण मला मात्र तुमच्याआमच्या प्रकट वाणीच्या अभ्यासकाला सुद्धा यातून काही सूचित होते असे वाटते. भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चाराचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो, पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही तोपर्यंत ती त्याच्या अधीन होत नाही, आपले सगळे गुपित त्याला सांगत नाही. आणि भाषेवर प्रेम करायचे तर तिला ती ज्या व्यवहारात परिणत होते आणि ज्या भाषाव्यवहारातून जन्म घेते त्या भाषाव्यवहारात, संपूर्ण जीवनाच्या संदर्भातच पाहता आले पाहिजे. भाषेत जीवन ओतप्रोत भरलेले आहेत. किती ते परभाषीयाच्या चष्म्यातून आपल्या भाषेकडे पाहू लागले की तेव्हाच जाणवते.

    पण भाषा आणि जीवन यांचे हे अतूट नाते इथेच संपत नाही.भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे. कसे ते पाहा. पांढरपेशा मुलाची पाण्याशी ओळख होते आणि दलित मुलाची पाण्याशी काही निराळी ओळख होते-- 'पाणी' हा एकच शब्द त्यांना काहीशा वेगळ्या जीवनभरल्या अर्थांची ओळख त्यामुळे पटवतो. जीवन भाषेला व्यापते ते असे. ओतप्रोत, काठोकाठ, शिगोशीग हे तीन काहीशा समान अर्थांचे पण वेगळ्या प्रतिमा घेऊन येणारे शब्द पाहा. (प्रतिमा अनुक्रमे उभेआडवे विणलेले धागे, पाण्याने भरलेले भांडे, धान्याने भरलेले माप). या प्रतिमाही इंग्रजीलाही ठाऊक आहेत : warp aud woof, full to the brim, पण या इंग्रजी शब्दांनी आपले समाधान होत नाही, अधिकपणा सुचवण्यासाठी रूपाची पुनरुक्ती साधण्याची खास भारतीय लकब त्या शब्दांत नाही. (उगीच नाही इंग्रजी बोलताना भारतीय माणसाला same to same, little little knowledge असे इंग्रजीला ठाऊक नसणारे प्रयोग करावे लागत!) जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते. भाषा जीवनाला व्यापते ती अशी.

    कधीकधी या लकबीचा वैताग येतो हे मात्र खरे, 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे' हे माझे वाक्य ऐकल्यावर तुम्ही मनात तडफडला असाल (वैताग ! लागला हा माणूस भाषिक कोलांट्या मारायला ). एव्हाना तो वैताग निमाला असेल असे वाटावे.
                
                                                                अशोक रा. केळकर