पानपूरके
भाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती
भाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते.
शैली आणि तंत्र
‘शैली आणि तंत्र’ या पारंपारिक भारतीय साहित्यविचारातल्या संज्ञा नाहीत. त्या अनुक्रमे ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ या इंग्लिश संज्ञांना पर्याय म्हणून मराठीत स्थिर झाल्या आहेत..... संस्कृतमध्ये ‘शील’ म्हणजे अनुशासनयुक्त संस्कारित अवस्था. माझ्या समजुतीप्रमाणे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी ‘शैली’ हा शब्द मराठीत प्रथम (कदाचित भारतीय भाषांत प्रथम) ‘स्टाईल’ या शब्दाला पर्याय म्हणून वापरला. (‘‘लिहिण्याची शैली’’ मराठी ज्ञानप्रसारक, एप्रिल,मे १८६३) ज्यामुळे कर्त्याचे शील प्रकट होते ती ‘शैली’ असा काही विचार ‘शैली’ शब्दाची निवड करण्यामागे असावा. साहित्यचर्चेत ‘टेक्नीक’ शब्द (आणि त्यामुळे ‘तंत्र’ शब्दही) बर्याच उशिरा शिरला. त्यापूर्वी ‘क्राफ्ट’ ह्या शब्दावर भागत असे. (मराठीतही ‘कुसर’ किंवा ‘कारागिरी’ हे शब्द वापरतात.) मराठी साहित्य चर्चेत ‘तंत्र’ शब्द प्रथम कुणी वापरला आणि ‘मंत्र’ शब्दाशी त्याची सांगड कुणी घातली याचाही शोध घ्यायला पाहिजे. (संस्कृतमध्ये तांत्रिक विद्येच्या संबंधात मंत्र, तंत्र, यंत्र असे एक त्रिक आहे; सुदैवाने मराठी साहित्य चर्चेत कुणी ‘यंत्र’ शब्द आणलेला नाही!) ‘टेक्नीक’ या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ‘विशिष्ट काम साधण्याची विशिष्ट पद्धत’ ... ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ हे शब्द इंग्लिशमध्ये साहित्याखेरीज इतर ललित कलांच्या संबंधातही वापरतात. (‘शैली’ आणि ‘तंत्र’ शब्दांच्या बाबतीत मराठीतही आता थोड्या उशिरा तेच घडते आहे.)
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ५0
काव्य, नाटय आणि नृत्य
‘नट’ ही संज्ञा सर्वच रंगकर्मींना लागू करण्यात येत असे- नाट्यातील आणि नृत्यातील रंगकर्मींना, नटेश्वर म्हणजे शंकर हे जसे नाटय-रंगकर्मींचे दैवत तसेच नृत्य-रंगकर्मींचे दैवत.
‘नृत्य’ ही संज्ञा भरताने व्यापक अर्थाने सर्वच नर्तनाला लावली आहे. केवळ नर्तन म्हणजे ‘नृत्त’ आणि सभिनय नर्तन म्हणजे ‘नृत्य’ हा फरक नंतरचा. मात्र आजही आपण ‘नृत्य’ ही संज्ञा मूळच्या व्यापक अर्थाने पुष्कळदा वापरतो. हा घोटाळा टाळण्यासाठी साभिनय नर्तनासाठी आपण काव्यनृत्य ही संज्ञा वापरू.
काव्याचे आपण भावकाव्य, कथनकाव्य, आणि नाटयकाव्य असे उपप्रकार मानले आहोत. ते उपप्रकार काव्यनृत्यालाही लागू पडतात असे दिसते.
भावनृत्य हाही वर्तमानकेंद्री स्वसंवाद असतो. कथक किंवा भरतनाटयम् शैलीमधील एकल काव्यनृत्य पुष्कळदा भावनृत्य स्वरूपाचे असते, एक भावस्थिती पकडून तिचा निरनिराळ्या अंगांनी विस्तार करणे हे अशा नृत्याचे कार्य राहते. सोबत भावकवित्व असेल वा नसेलही.
कथकनृत्य हा भूतकेंद्री अन्यसंवाद असतो. यक्षगान किंवा ‘कथा कहे सो कथक’ या मूळ प्रकृतीच्या जवळ राहणारे कथक या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारे कथनगीत हे त्याला अंगभूत असते.
नाटयनृत्य हा भविष्यकेंद्री अन्योन्यसंवाद असतो. वगावर आधारलेले लावणीनृत्य किंव अभिजात भारतीय नृत्यावर आधारित अर्वाचीन काळातील ‘बॅले’ - सदृश् नृत्य या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारी नाटयगीते किंवा नाटयसंवाद ही त्याला अंगभूत असतात.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ८५
मोहरमच्या सणात शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लीम मंडळी या ‘हसन, या हुसेन’ असा आक्रोश करतात. ‘हाय दोस्त दूलाह बेधूला’ असे म्हणत छाती पिटतात. भराभर उच्चारताना (‘जा पोरी जा’चं जसं ‘झपूर्झा’ झालं) पहिल्या तीन शब्दाचं ‘हैदोसधुल्ला’ झालं. इंग्रजांच्या कानांना ‘या हसन या हुसेन’ हे शब्द अनाकलनीय भासत. रमजानची वर्णने विलायतेस कळवणार्यांनी या शोकघोषाचा कधी ‘जॅक्सम बॉक्सम’, तर कधी ‘हॉब्सन-जॉब्सन’ असा उल्लेख केला. भारतातील कंपनीच्या गोर्या नोकरवर्गांत अगदी ओळखीचा असणारा हा वाक्प्रचार कोशाच्या वेगळ्या वाटेकडे लक्ष वेधणारा ठरला. शिवाय रचनाकर्त्यांच्या जोडगोळीचाही अप्रत्यक्ष निर्देश त्यात सूचित झाला (अ व्हेल्ड इंटिमेशन ऑफ डयुअल ऑथरशिप).
- श्री०बा० जोशी (‘उत्तम मध्यम’मधील ‘हॉब्सन-जॉब्सन’मधून)
(प्रेषक : विजय पाध्ये)
शब्दार्थाची सांस्कृतिकता
भाषेतील शब्द, अर्थ आणि त्यांची जोडणी (शब्दार्थसंबंध) ही सगळीच एक सांस्कृतिक निर्मिती आहे हे साहित्याचा अनुवाद करताना, विशेषत: परकी भाषेत करताना, तेव्हाच ध्यानात येते. जो मजकूर मराठी भाषकांच्या कानाला गोड वाटेल तो बांगला भाषकाच्या कानाला खरखरीत वाटू शकेल, जो मजकूर मराठीत रोखठोक/आर्जवी वाटेल तो हिंदीत अनुक्रम उद्धट/रोखठोक वाटेल. जर एखाद्या भाषेमध्ये रोखठोक/आर्जवी, औपचारिक/अनौपचारिक अशा वाक्सरणी उपलब्ध असल्या तर त्यांना एक मानसिक परिमाणही असते. उदाहरणार्थ, मजकुरात स्वर, लकार, नासिक्य व्यंजने यांची रेलचेल असली तर तो कोणत्याही भाषेत कानाला गोड लागण्याचा संभव अधिक किंवा कुणाच्या भाषाप्रयोगात छोटी छोटी वाक्ये नेहमीच अधिक असली तर त्या व्यक्तीची विचार धारण करण्याची क्षमता तोकडी असावी किंवा तिला संबोधित व्यक्तीच्या ग्रहणशक्तीचा भरवसा वाटत नसावा असे लक्षात येते.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २१९
सहेतुक भाषासरणी
भाषा आणि साहित्य ह्यांना जोडणारी संकल्पना म्हणजे ‘शैली’ (style). शैलीचा आपण प्रथम भाषेच्या अंगाने विचार करू, नंतर साहित्याच्या अंगाने.
‘शैली’ची व्याख्या भाषेच्या अंगाने द्यायची तर ती ‘सहेतुक भाषासरणी’ अशी देता येईल.
समजा, आपल्याला एक खुर्ची बनवायची आहे. ती बनवताना कच्चा माल, पैसा, हत्यारे, वेळ, बळ, कौशल्य इत्यादिकांची आपल्याजवळ जी काय उपलब्धी आहे तिच्या काही मर्यादा आपल्यावर पडतील. तसेच आपल्याला काय उपलब्ध करायचे आहे, काय साधायचे आहे ह्याचीही बंधने आपल्यावर आहेत. इतके वजन पेलायचे आहे, गुरुत्वमध्य इतका खाली आणायचा आहे, खर्ुच्या वाहून न्यायला आणि एकावर एक डाळून ठेवायला सोप्या असाव्यात ह्या किंवा अशा अटी आपल्याला पाळायच्या आहेत. प्रत्यक्ष खुर्ची तयार झाल्यावर, तिचे रंगरूप निश्चित झाल्यावर तिच्याकडे पाहिले तर ह्या दोन्ही प्रकारच्या मर्यादा कमीअधिक यशस्वी रीतीने संभाळल्याचे आपल्या ध्यानात येते. मात्र हा मर्यादापालनाचा हिशोब आपण वजा घातला तर खुर्चीच्या निर्मात्याने निवडीचे स्वातंत्र्य उपभोगल्याचे दिसून येते. ही श्रीशिल्लक म्हणजे शैली. (शैलीहीनता आणि कुशैली ह्यांमध्ये रेषा ओढायला हवी.)
उपलब्धी आणि उपयुक्तता ह्यांमधून वेगळी वाट काढून साध्य गाठणे म्हणजे शैली. मग ती शैली त्या व्यक्तीने स्वतंत्र शिल्पिलेली असो किंवा संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या तयार वळणांपैकी एकाचे थोड्याफार फरकाने केलेले अनुकरण असो किंवा विशिष्ट कालखंडात विशिष्ट संस्कृतीने उपलब्ध केलेल्या एकच एक पर्यायाची पृथगात्मता असो.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २६
कवितेचे करतेपण
कवितेच्या करतेपणाबद्दल आपल्याला तीन प्रश्न उपस्थित करता येतील. एक म्हणजे : कविता आपल्या श्रोत्यावर-वाचकावर आणि श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय कार्य करते? दुसरा प्रश्न : कविता आपल्या निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय कार्य करते? तिसरा प्रश्न : काव्य आपल्या श्रोते-वाचक आणि निर्माते-कवी मिळून बनलेल्या समाजावर आणि समाजासाठी काय कार्य करते? हे तीनही प्रश्न (अर्थातच!) वादग्रस्त आहेत. त्या सर्वांच्या संभाव्य उत्तरांचा शोध आपण घेतला तर कवितेच्या कर्तृत्वाच्या, करामतीचा म्हणा पाहिजे तर थोडा अंदाज आपल्याला यावा.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ४३-४४
शैलीचे दुहेरी स्वरूप
शैलीचा प्रादुर्भाव होण्याचे व्यक्तिनिर्मित, व्यक्तिनिर्वाचित, आणि समाजनिर्वाचित असे जे तीन प्रकार सांगितले, त्यांपैकी दुसरा प्रकारच भाषेच्या बाबतीत सामान्यत: दिसून येतो. एकापेक्षा अधिक सरणी भाषा उपलब्ध करते. उदाहरणार्थ ‘माझा भाऊ हल्ली नाशकालाच असतो’ आणि ‘आमच्या बंधूंचे वास्तव्य सांप्रत नाशिक येथेच असते’ अशा अनुक्रमे साहजिक आणि प्रौढ सरणी मराठीच्या प्रमाणबोलीत उपलब्ध आहेत. वधूपित्याशी बोलायला किंवा कुणाची थट्टा करायला ही प्रौढ सरणी उपयोगी पडते. क्वचित एखाद्या व्यक्तीची ती स्थायी सरणी ठरेल आणि इतरांना ते अती औपचारिक वागणुकीचा किंवा अहंमन्य व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार वाटेल... भाषागत शैलीचा हा सोपा प्रकार. त्याहून सोपा प्रकार म्हणजे भाषाच बदलणे, निदान बोली बदलणे. मनची गोष्ट बोलायला गावाकडच्या बोलीचा आश्रय घेणे किंवा ठासून सांगण्यासाठी इंग्लिशचा आश्रय घेणे हा प्रकार मराठी भाषिकांमध्ये आढळतो. परंतु भाषा जे पर्याय उपलब्ध करते ते नेहमीच अशा जवळजवळ रेडीमेड शैलींच्या स्वरूपाचे नसतात. त्याऐवजी पर्यायांच्या फुटकळ जोड्या किंवा लहान पुंज भाषेत नेहमी हजर असतात. त्यांपैकी काही निर्हेतुक असतात. उदा०, ‘चावी’ आणि ‘किल्ली’, ‘कर्मणूक’ आणि ‘करम्णूक’, ‘बस’ आणि ‘बैस’, ‘तू आंबा खाल्ला’ आणि ‘तू आंबा खाल्लास’, ‘जात असे’ आणि ‘जाई’, ‘ऐशी’ आणि ‘एेंशी’ (सानुनासिक ऐ). बोलणारा किंवा लिहिणारा कोणता पर्याय निवडतो ह्यावरून ग्रहणकर्ता काही अनुमाने कदाचित् काढीलही - उदाहरणार्थ, बोलणारा परगावचा दिसतो, वयस्क असावा, इत्यादी... पण ही अनुमाने शैलीची प्रतीती ह्या स्वरूपाची नाहीत...मात्र त्यांच्यापैकी काही पर्याय-पुंज सहेतुक निवडीला अवसर देतात - उदा०, ‘मला ताप आला’ आणि ‘ताप मला आला’ (आणि लाड मात्र तुझे झाले); ‘जाणार आहे’ आणि ‘जाईल’; ‘साडेतीनशे’ आणि ‘तीनशे पन्नास’; ‘तू’, ‘तुम्ही’, आणि ‘आपण’; ‘लहान’, ‘बारका’ आणि ‘छोटा’; ‘जायला हवे’, ‘गेले पाहिजे’, ‘जाणे जरूर आहे’, आणि ‘जाणे आवश्यक आहे’, ‘आई’, ‘माता’, आणि ‘जननी’. अशा पुंजांतून जी निवड होईल तिच्यावरून ग्रहणकर्त्याला प्रेषकाचा हेतू स्पष्ट होतो. हा हेतू त्या मजकुराच्या आशयाच्या बाजूला जमा होतो हे खरे, पण त्याचबरोबर एका सलग वाक्यबंधनातून असे जे सहेतुक निवडीचे कण येतील त्यांच्यामधून एक शैलीही आकार घेते हेही तितकेच खरे. अभिव्यक्ती ही नुसता आशयाचा आविष्कार करीत नाही, तर आशयात भर घालते. भाषागत शैलींचे स्वरूप असे दुहेरी आहे.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २७, २८