विश्वनाथ खैरे

बोलींचा अभ्यास

विश्वनाथ खैरे

(परीक्षित पुस्तक : बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती डॉ० कैलास सार्वेकर : प्रतिभास प्रकाशन, परभणी २०१०, पृष्ठे ७ + १६० किंमत : रु०१६०/-)

विविध विद्यापीठांतल्या मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये भाषा म्हणून भाषेच्या अभ्यासाला (साहित्य-समीक्षांच्या तुलनेने) खूपच कमी स्थान आहे. जे आहे त्याच्यावर एकोणिसाव्या शतकापासून चालत आलेल्या भारतयुरोपीय ऐतिहासिक प्रणालींचा पगडा आहे. विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या अंगावर फारसा भर नाही. त्यामुळे भाषाविषयाचे दुपदवीधरसुद्धा नंतरच्या काळात भाषासंशोधनाकडे विशेष वळत नाहीत. जे वळतात ते त्यांच्या आवडीने किंवा त्यांच्या मायबोलीच्या प्रेमाने. त्यांच्या अभ्यासावर किंवा संशोधनावर साहजिकपणेच विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे परिणाम दिसून येतात. बोलींच्या अभ्यासात सामाजिक आणि मानसिक घटकही काम करतात. असे असले तरी शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातलेही काही अभ्यासक बोलींच्या अभ्यासाकडे वळत आहेत, त्यांच्या अभ्यासू लेखनाची बूज ठेवली पाहिजे आणि आधी सांगितलेल्या प्रभावांची वजावट करून निखळ शास्त्रीय अभ्यासाकडे त्यांना वळवण्यासाठी भाषाविषयक संस्थांनी आणि विद्यापीठांनीही खास प्रयत्न केले पाहिजेत. प्रस्तुत पुस्तकाकडे मुख्यत: या दृष्टीने या लेखात पाहायचे आहे.

पुस्तकाचे लेखक डॉ० कैलास सार्वेकर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठीचे प्रपाठक आहेत. त्यांनी ग्रामीण कविता या विषयावर पीएचडी केली आहे. ते पंचवीस वर्षे नवापुरच्या आदिवासी शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. तेव्हा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी खास प्रयत्न आणि प्रयोग केले. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत. त्यांत नामे, नातेसंबंधाचे शब्द इत्यादी तीनचार लेखरे (लहान लेख) आहेत. बहिणाईंच्या कवितेची बोली लेवा आहे या आशयाचा एक लेख आहे. एक लेख खानदेशातील लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यांचे अनुबंध दाखवणारा आहे.
या सर्वांपेक्षा भाषाभ्यासाशी थेट आणि अधिक संबंध असलेले लेख बोलींवरचे आहेत. 'भाषा : इतिहास आणि भूगोल' (कालेलकर, १९८५) यातल्या विवेचनाचा आधार या लेखांमधल्या अभ्यासाला आहे. सार्वेकरांची मायबोली जामनेरी आहे. इतर बोलींचा अभ्यास त्यांनी मराठीचे अध्यापक असताना केला. खानदेशातील पावरा, कोंकणी आणि जामनेरी या बोलींची ओळख करून देणारे तीन लेख पुस्तकात आहेत. गुजराती आणि अहिराणी या 'भाषाभगिनी'ची तुलना करणारा एक लेख आहे. आदिवासी या नावात मावची, वसाव, कोंकणी, पावरा या चार बोलींचा समावेश आहे. या आदिवासी बोलींमधील म्हणी आणि गीते यांवर दोन लेख आहेत. 'आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड' घालवण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया यांचे दोन लेख आहेत. त्यांतल्या काही विद्यार्थ्यांनी शब्दजातींसह नोंदलेला आदिवासी बोलींमधला शब्दसंग्रह वर्गवारीने तक्त्यांमध्ये दिला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा चालते आणि निरनिराळ्या बोलींचाही वापर लहानमोठया क्षेत्रांवर होत असतो. त्यांतल्या एखाद्या बोलीचा अभ्यास (१) मराठीची पोटभाषा म्हणून (२) मराठीला लागून असलेल्या भाषा आणि मराठी यांचा तिच्यावरील परिणाम शोधण्यासाठी (३) सध्याच्या प्रमाण-मराठीहून तिचे वेगळेपण दाखवण्यासाठी (४) त्या बोलीचे निव्वळ वर्णन करण्यासाठी - असा विविध प्रकारांनी होऊ शकतो.

पहिल्या प्रकारात ती बोली मराठी भाषेतून ध्वनिबदलाने काळाच्या ओघात सध्याच्या अवस्थेला आल्याचे धरले जाते. भाषाभ्यासातल्या भारतयुरोपीय प्रणालीचे हे गृहीतच होते. या प्रकारात लेखी मराठीतल्या लिपिबद्ध ध्वनींशी बोलीतल्या उच्चारणांची तुलना सार्वेकरांच्या बोलीविषयक लेखांमध्ये आली आहे. कालेलकरांनीच म्हटल्याप्रमाणे भाषा ही अनेक बोलींच्या संमीलनातून सिद्ध होते. भारतीय भाषासंभाराच्या बाबतीत ''लेखी ती भाषा आणि मुखी ती बोली'' अशी व्याख्या करता येईल. लेखी भाषेतून मुखी बोली निर्माण होत नाहीत हे मान्य केले तर प्रमाण मराठीतील अक्षरोच्चारणाला मानदंड मानण्याचे कारण नाही. बोलांचा अर्थ कळण्यासाठी लेखीतले शब्द अर्थातच वापरावे लागतील.

बोली-अभ्यासाचा दुसरा प्रकार म्हणता येईल अशी अहिराणी आणि दक्षिण-गुजराती या बोलींची एकाच कुळातल्या 'भाषाभगिनी' म्हणून तुलना केली आहे. कळत-नकळत अहिराणीला 'भाषा' पदवीला पोचवले आहे. यामागे प्रस्थापित भाषाकुलांच्या संकल्पनेचा प्रभाव आहे. सिंधुसंस्कृतीचे लोक इ०स० पूर्व १९व्या शतकापासून खानदेशात आले याचा आधार परस्परप्रभावासाठी दिला आहे. त्याने भारतीय भाषाकुलाच्या संकल्पनेला छेद मिळतो. सयाजीरावांच्या मराठीसंबंधातील कार्याचा उल्लेख केला आहे त्याचा अहिराणी-गुजराती यांच्या तुलनेत साक्षात संबंध नाही. बोलीविषयक लेखात इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक बाबींना स्पर्श करणे टाळले पाहिजे. तसेच 'वरील विवेचनावरून अहिराणीने मराठीकडून जशा काही गोष्टी घेतल्या तशा गुजरातीकडूनही घेतल्या. किंबहुना गुजरातीकडून अधिक घेतल्या असे म्हणता येईल' (पृ०३५) यांसारखी अतिव्याप्त विधाने करणे इष्ट नाही.

जामनेरी बोलीवरील लेखाच्या प्रास्ताविकात ही बोली 'आपले काहीएक वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व' टिकवून आहे असे म्हटले आहे. मुखपृष्ठावरील तक्त्यात मात्र जामनेर लेवा बोलीचा एक मुलूख म्हणून दाखवला आहे. प्रमाण मराठीतील औतचा जामनेरी उच्चार आउत होतो याला 'संयुक्त स्वरांची संधी' म्हटले आहे. 'कृषिजीवनाशी संबंध सांगणार्‍या अनंत म्हणी या बोलीत आहेत' हे अतिशयोक्त विधान आहे. अशा गफलती लेखात आहेत. मायबोलीचा अभिमान हे एक त्याचे कारण संभवते. बोलींना भाषेहून अशुद्ध किंवा खालच्या पायरीवरच्या मानण्याची शिष्टजनांची प्रवृत्ती जशी कमी होत जाईल तशी बोली अभ्यासकांनाही बोलींच्या स्तुतिपर लिहिण्याची गरज वाटणार नाही.

बोलीचे निवळ वर्णन करण्याच्या चौथ्या प्रकारचे उदाहरण 'परिशिष्ट ब - खानदेशी बोलींमधील तुलनात्मक शब्दसंग्रह' या तक्त्यांमध्ये आहे. हे तक्ते सार्वेकरांच्या तेगा पावरा आणि भाईदास बागुल या तृ०व० कला वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. वस्तू, शेती, धान्ये, भाज्या, फळे, नातेसंबंध इत्यादींचे सहा बोलींमधले शब्द त्यांत आहेत. घर - गूँ पोंगो, दरवाजा - बाणों बाणों जुपू, माठ - वेंडलो वेंडलो, मका - डोडा डोडा डुडा, भुईमुग - हिंडयो हिंग्या मुंग्या, आई - आयो याहकी, वडील - आबो बाहाको बाबा, भाऊ - बाहा पावुहू, लवकर - माहारी माहारी उतवाल, ही सहज टिपलेली या बोलीतली खास उदाहरणे. बोलींनी स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या शब्दांची उदाहरणे यांत दिसतात. या याद्या मर्यादित शब्दसंख्येच्या आहेत. पण त्या बोलीच्या जाणकारांनी नोंदल्या आहेत, तशाच मोठया प्रमाणावर मायबोली-अभ्यासकांनी नोंदल्या तर त्या त्या बोलीची विश्वसनीय नोंद आपल्याला मिळू शकेल. बोलीचे मूळ रूप, तिचे प्राचीनत्व, तिच्यावर झालेले इतर भाषा-बोलींचे परिणाम इत्यादी अभ्यास ही पुढची पायरी असेल. त्यांचा खुटपुट समावेश वर्णनात्मक नोंदीमध्ये करण्याची गरज नाही.

बोलींच्या नोंदी हा पदवीधरांच्या कामाचा भाग झाला. बोलीच्या परिसरातून प्रमाणभाषेच्या पदवीपर्यंत पोचण्यात बोलीकांना न्यूनगंडासारखे मानसिक अडथळे पार करावे लागतात. सार्वेकरांनी त्या (महाविद्यालयीन) विद्यार्थ्यांचा न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयत्न केले. दहा वर्षे मराठी शाळेत शिकूनही त्यांची क्षमता पुरेशी वाढली नव्हती यावरून माध्यमिक पातळीपर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची दशा लक्षात येते. त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की भाषेच्या लेखीपणाचाच धसका बोलीकांना जास्त बसतो. पहिली-दुसरीत बोलीतून शिकवून बोलीतल्या शब्द-वाक्यांच्या लेखी रूपांनी लिपीची ओळख करून दिली तर हा धसका कमी होईल का याचा विचार आणि प्रयोगात्मक आचार झाला पाहिजे. या न्यूनगंडातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बोलींचे शब्दसंग्रह करण्याचे कामही केले आहे. अशा विद्यार्थ्यांशी विद्यापीठातील शिक्षकांचा संपर्क राहावा आणि त्यांनी बोलींच्या अभ्यासात अधिक कामगिरी करावी यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. एका लेखात आदिवासी बोलींतल्या म्हणी नोंदल्या आहेत. मार्गदर्शन लाभले तर बोलीक विद्यार्थी त्या म्हणींचा खोल अभ्यास करून बोलीकांचा इतिहास समजण्याला सामग्री देऊ शकतील.

भारतीय भाषा बोलींबाबतचे नोंदीचे किंवा अभ्यासाचे कार्य भारतीय भाषक-बोलीकांनी करणे उचित आणि गरजेचे आहे. विदेशी अभ्यासकांनी इंग्रजीत नोंदलेले अभ्यास प्रमाण मानून त्यांचे संदर्भ भारतीयांनी देण्याचा प्रकार थांबायला हवा. उच्चार नेमके टिपणे, संस्कृतिविषयक अनुबंध समजून घेणे भारतीयांनाच चांगल्या प्रकारे करता येईल. मराठी मुलखातल्या बोलींच्या नोंदी त्या मायबोलीच्या अभ्यासकांनी कराव्या यासाठी विद्यापीठे आणि संशोधनसंस्था यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. परिषदा आणि कार्यशाळा वगैरे घेऊन या अभ्यासकांना कामाच्या पद्धती समजावून दिल्या पाहिजेत आणि नोंदी संकलित करणारी यंत्रणा सिद्ध केली पाहिजे.

या पुस्तकावर लिहावे म्हणून संपादकांनी ते माझ्याकडे पाठवले. ते वाचून झाल्यावर पुस्तकात दिलेल्या चलफोनवर मी सार्वेकरांशी सविस्तर बोललो. (संपर्काच्या आधुनिक सोयी!) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठीच्या अभ्यासक्रमात बोलींच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान देण्यासाठी त्यांच्या पदावरून ते प्रयत्न करू शकतात असे त्यांच्याकडून कळले. तो त्यांनी करावा, मायबोलींच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उत्तेजन द्यावे आणि लेखनाच्या बाबतीतही या पुस्तकावर थांबू नये.

374 सिंध सोसायटी, औंध, पुणे 411 007
दूरभाष : (020) 2585 1187

संस्कृत आणि प्राकृतहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले. यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. या सगळ्या कथेचे 'कुमारसंभवम्' हे संस्कृत महाकाव्य कालिदासाने लिहिले.

दैवी विवाहाचे वर्णन
    त्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. वेताच्या आसनावर त्यांना बसवून हिमालयाने त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले की, "आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे." त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजीत होती. तिच्या आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, "ही शिववधू आपणांस नमस्कार करतेय." तिला अरुंधतीने मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्‍की केली.
    सातव्या सर्गात लग्नघरातले आणि विवाहसोहळ्याचे वर्णन आहे. शुक्लपक्षातल्या शुभतिथीला वधूला विवाहदीक्षा दिली. परिवारातल्या आणि बाहेरच्याही कितीकांनी मांडीवर घेऊन तिला आशीर्वाद दिले. चंद्र फाल्गुनी नक्षत्रात असताना लेकुरवाळ्या सुवासिनींनी तिचा शिणगार केला. तिला चौकात नेऊन सुवर्णकुंभांनी न्हाऊ घातले. धूपाने केस सुकवून दुर्वा, गोपीचंदन, मोहफुलांच्या माला यांनी तिला सजवले. तिची पावलं रंगवल्यावर सख्या म्हणाल्या, "पतीच्या माथ्यावरच्या चंद्रकलेला हे लाव बरं का." मग तिची आई मेना हिने तिला विवाहतिलक लावला, कुलदेवतांना आणि सुवासिनींना नमस्कार करायला लावले. तिकडे कैलासावर सप्त मातृकांनी शिवालाही अलंकारिले. नंदीवर बसून शंकर निघाले, त्यांच्यामागे मातृका आणि महाकाली होत्या. गंगायमुना मूर्तरूपाने चवर्‍या ढाळीत होत्या. सप्तर्षींना 'तुम्ही माझे पुरोहित' असे शिवाने सांगितले. औषधिप्रस्थ नगरापाशी पोचल्यावर भूमीवर उतरून शिवाने वंदन केले तेव्हा हिमालयच लाजल्यासारखा झाला. शिवाला पाहण्यासाठी स्त्रियांची एकच गडबड उडाली. लग्नघरात, रत्‍ने टाकलेले पाणि शिवाच्या पायांवर घातले आणि हिमालयाने रेशमी वस्त्रे दिली ती शिवाच्या अंगावर घालून त्याला वधूकडे नेले. वधूवरांनी हातात हात घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. पुरोहिताने वधूच्या हाताने लाजाहोम करविला आणि तिला म्हटले, "तुझ्या विवाहाला अग्नी साक्ष आहे. पती शिवासह धर्माने वाग." शिवाने तिला ध्रुवतारा दाखवला. मग त्यांनी ब्रह्मदेवाला जोडीने नमस्कार केला. त्याने 'वीरप्रसू हो' असा आशीर्वाद दिला. नंतर ती दोघे सोन्याच्या आसनावर बसली तेव्हा लोकरीतीने भाताची कोवळी रोपे त्यांच्यावर टाकली. नंतर त्या दोघांवर स्वतः लक्ष्मीने लांब दांड्याच्या कमळाचे छत्र धरले.

कविकालीन वास्तव
    कालिदासाने देवदेवतांच्या विवाहाचे वर्णन केले असले तरी विधींचे तपशील मात्र त्याच्या समकालीन समाजातल्या चालीरीतींचेच आहेत. भारतात सामाजिक विधी-उत्सव शेकडो वर्ष साजरे होत आले आहेत. त्यामुळे भाताची कोवळी रोपे अंगावर टाकण्याच्या विधीला चौथ्यापाचव्या शतकातला कालिदास 'लौकिक' म्हणतो आणि चौदा-पंधराव्या शतकातला मल्लिनाथ 'लौकिक आचार मनानेही डावलू नये' असा त्याला शास्त्राधार देतो. थोड्याफार पद्धतीने आजचेही विवाह असेच होतात. त्यामुळे शिवपार्वतीच्या विवाहाचे वर्णन आपल्याला फार ओळखीचे वाटण्यासारखे आहे. वधूवर, आप्तगोत आणि वर्‍हाडी भले दैवी अतिमानवी (पर्वत, नद्यासुद्धा) असोत, त्यांची चालचलणूक कवीच्या परिसरातल्या माणसांसारखीच वर्णिलेली असते. त्याचमुळे कथेतल्या पात्रांचे चरित्र जरी अद्भुतांनी भरलेले असले तरी ते (आजच्या अर्थाने) ऐतिहासिक नसते.
    पुराणकथेचा हा विशेष समजून घेतला तर तिच्या शब्दवर्णनांना आपण प्रमाण मानणार नाही किंवा पुराणकथांवरून इतिहास काढणार नाही. तरीसुद्धा त्या शब्दवर्णनांच्या मागे कविकालीन वास्तव दडलेले असते ते चिकित्सकपणे पाहिले तर सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची एखादी झलक आपल्याला मिळते.

संस्कृत-प्राकृतांचा उपयोग
    शिवपार्वतीच्या या विवाहात लक्ष्मी छत्र धरायला आली; पाठोपाठ सरस्वतीही स्तवन करायला आली. "सरस्वतीने दोन प्रकारच्या भाषेने त्या दोघांच्या जोडप्याची स्तुती केली. त्या सुयोग्य वराची संस्कारपूत भाषेत, तर वधूची समजायला सोप्या भाषेत!" (द्विधाप्रयुक्तेन च वाङ्मयेन सरस्वती तन्मिथुनं नुनाव । संस्कारपूतेन वरं वरेण्यं वधूं सुखग्राह्यनिबन्धेन ।।७.९०।।) या श्लोकातल्या पदांचा अर्थ टीकाकार मल्लिनाथने स्पष्ट केला आहे. "'द्विधाप्रयुक्तेन' म्हणजे संस्कृत-प्राकृत या दोन रूपांत म्हटलेल्या. 'संस्कारपूतेन' म्हणजे प्रकृतिप्रत्ययविभागशुद्ध संस्कृतात, वराची स्तुती. 'सुखग्राह्यनिबन्धेन' म्हणजे सुबोध रचनेत अर्थात प्राकृतात, वधूची स्तुती. शिव हा पुरुष म्हणून त्याच्यासाठी संस्कृत, पार्वती स्त्री म्हणून तिच्यासाठी प्राकृत!"
देवता असली, जगन्माता असली, तरी पार्वती स्त्री असल्यामुळे तिला संस्कृत समजणारे नव्हते. तिला सरस्वतीनेसुद्धा प्राकृतच ऐकविणे लोकरीतीला धरून होते.  हा सामाजिक नियम होता.  स्त्रियांना संस्कृत समजत नव्हते, त्यांचा व्यवहार प्राकृतातच होत होता. प्राचीन काळापासून चालत असलेली ही स्थिती पाचव्या ते पंधराव्या शतकात तशीच होती. प्राचीन काळापासून नाटकांमधल्या स्त्रीपात्रांचे बोलणे प्राकृतात असावे असा दंडकच होता. कालिदासाच्याच 'शाकुंतल' नाटकाच्या सातव्या अंकात मारीच ऋषी आणि त्यांची पत्‍नी अदिती (दाक्षायणी) यांचा संवाद आहे. ऋषी संस्कृतात सांगतात, "तुझ्या पुत्राच्या (इंद्राच्या) बाजूने आघाडीवर लढणार हा बघ दुष्यन्त नावाचा जगाचा राजा." त्यावर पत्‍नी अदिती प्राकृतात म्हणते, “त्याच्या आकृतीवरूनच तसं वाटतं." (संभावणीआणुभावा से आकिदी! - "संभावनीयानुभावा अस्य आकृतिः।") प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याची आई संस्कृतात बोलत नाही. (नवर्‍याचे संस्कृत संदर्भाने तिला समजते असे मानले पाहिजे!)
भारतीय संस्कृतीने स्त्रियांना नेहमी पुरुषांच्या खालचे स्थान दिले. भारतात स्त्री-शूद्रांना संस्कृत ऐकण्याची मुभा नव्हती. काव्य-कथांमध्ये या स्थितीचे प्रतिबिंब साहजिकच पडले आहे. खुद्द संस्कृतचे रूप आणि स्थिती काय होती? "...स्थलकाल-लोक या बंधनांना बाजूस ठेवून आपल्या ज्ञानव्यवहारासाठी विद्वान एखादी प्रशिष्ट संभाषण कृती घडवीत राहतात. संस्कृत ही अशी प्रशिष्ट कृती - (अ‍ॅ-कल्चरेटेड) आर्टिफॅक्ट) होती; ती प्रत्यक्ष बोली नव्हती" (माहुलकर २००२, पृ० ४६) व्यवहारातली बोली नसलेल्या अशा प्रशिष्ट कृतीतून प्राकृतांसारख्या भाषा निघाल्या किंवा भारतार्य म्हटलेल्या भाषांचे मूळ तिच्यात आहे, अशा प्रणाली वास्तवाला किंवा इतिहासाला धरून नाहीत. विद्यापीठांमधले भाषाविज्ञानाचे अभ्यासक्रम मात्र याच गृहीतावर ठाम आहेत. भाषा-कथा-संस्कृतींचा समवायाने विचार करून भारतीय भाषाविज्ञानात जरूर ते फेरबदल केले पाहिजेत.

(संदर्भ: माहुलकर, दिनेश द० २००२. वृद्धि: राज्य मराठी विकास संस्था, मुंबई)