भाषेवर वर्चस्व कुणाचं?
मनोहर राईलकर
‘भाषा आणि जीवन’च्या पावसाळा २००४ (२२:३) च्या अंकात वृषाली देहाडरायांचा ‘गमती भाषेच्या’ अशा शीर्षकाचा लेख आहे. प्रत्यक्षात असं काही असतं का, ह्याबद्दल मला शंका आहे. कारण तशी उदाहरणं घेऊन भाषेवर स्त्रियांचंच वर्चस्व असतं, हे मी दाखवू शकेन. तोच ह्या लेखाचा उद्देश आहे. खरं तर भाषा ह्या शब्दापासूनच ह्या वर्चस्वाची ‘सुरुवात’ होते. (आरंभ होतो, असं मुद्दामच म्हटलं नाही!)
श्रीमती देहाडरायांनी पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी एकाच पोतडीत बांधली आहेत आणि संस्कृतचा विचार केला तर त्यात पाच अष्टमांश तथ्यही आहे. कारण आठ विभक्तींपैकी (पुन्हा स्त्रीलिंगीच?) प्रथमा, द्वितीया, संबोधन वगळता सगळ्या प्रकारच्या नपुंसकलिंगी शब्दांची रूपं पुंलिंगी शब्दांसारखीच असतात. आणि संबोधन शब्द जरी नपुंसकलिंगी असला तरी (ती) विभक्तीच!
श्रीमती देहाडरायांनी दिलेली काही उदाहरणंच घेऊन आपण पाहू या. त्या म्हणतात, मोठा असेल तर डबा आणि लहान असेल तर डबी. पण अगदीच लहान असलं तर त्याला डबडं म्हणतात ना. मोठा असेल तो बंगला आणि लहान असेल ती झोपडी. त्यावर मी असं म्हणतो की तो बंगला असला तरी दहा-दहा पंधरा-पंधरा मजली इमारत ‘ती’च असते की! इतकासा असलेला खटारा पुंलिंगीच पण लांबलचक सोळा-अठरा-वीस डब्यांची झाली तरी रेल्वेगाडी स्त्रीलिंगीच. (अगदी ‘मेल’ गाडी असली तरीसुद्धा). म्हणजे आकारावरून लिंग ठरतं असं काही सिद्ध होत नाही. एखादा प्रचंड दगड, पत्थर जरी पुंलिंगी असला तरी इमारतीची कोनशिलाच नाव मिळवून आणि भाव खाऊन जाते की नाही? आणि तेही कायमचं! बिचारे पत्थर कायमचे पायात गाडले जातात. त्यांना पुन्हा कधी सूर्यदर्शन होण्याचा सुतराम् संभव नाही. भूकंपात मोठमोठाली बांधकामं उद्ध्वस्त झाली तरी त्या कोनशिला तशाच तगल्याची प्रकाशचित्रं तुम्ही पाहिली नाहीत का?
प्रकाशचित्रं नावावरून आठवलं! वास्तविक ‘प्रकाश’चित्र हा शास्त्रशुद्ध शब्द. पण
फोटोकरता प्रथम ‘छाया’चित्र हेच नाव कुणीतरी ठरवलं आणि आता कितीही धडपड केली तरी ‘प्रकाश’वरची छायेची छाया काही जाणार नाही. ती ‘प्रकाश’ला ग्रासूनच राहणार. कारण शास्त्राद्रूढिर्बलीयसी! पुन्हा इथंही नपुंसकलिंगी शास्त्रापेक्षा स्त्रीलिंगी रूढीच प्रभावी! अहो एवढा मोठा सूर्य. पण पृथ्वीच्या पावपट असलेल्या चंद्राची छाया त्याला झाकतेच की नाही? शिवाय स्त्रीलिंगी पृथ्वीची स्त्रीलिंगी छाया पुंलिंगी चंद्रालाही ग्रासतेच की!
एक आंबा पुंलिंगी असला तरी आंब्यांच्या शेकडो झाडांची आमराई स्त्रीलिंगीच असते. आणि तो कागद असला तरी अनेक कागदांची वही किंवा चोपडी स्त्रीलिंगीच! अनेक पुंलिंगी दुवे एकत्र जोडल्यावरच स्त्रीलिंगी साखळी बनते ना? आणि अनेक पुंलिंगी डबे जोडल्यानंतरच स्त्रीलिंगी रेल्वे बनते.
जरी दरवाजा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला जन्मभर स्त्रीलिंगी चौकटीतच अडकून राहावं लागते, हे तर सर्वज्ञातच आहे. आणि त्याचं काम बंद करणार्या कडीची सर्वांवर कडीच नाही का? अनेक नारळ एकाच पेंडीच्या आश्रयाला असतात. कितीही पुरुष असले तरी त्यांची समितीच बनते. पैसा पुंलिंगी असला तरी त्याला स्त्रियांच्या पर्समध्येच राहावं लागतं. आणि फार झाला तर तो तिजोरीत किंवा बँकेच्याच आश्रयाला जातो. सर्वत्र स्त्रियाच! परकर, पायजमा पुंलिंगी असले तरी स्त्रीलिंगी नाडीशिवाय जागेवर राहतात काय? हार आणि हारातले मणी भले पुंलिंगी असतील. पण त्या सर्व मण्यांना एकत्र बांधून हाराच्या पायरीपर्यंत नेणारी दोरीच की नाही? पुन्हा पायरीसुद्धा स्त्रीच.
शिवणारा दोरा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला सुई जशी नेईल, तिच्यामागून तसंच फरफटत जावं लागतं, हा सार्वत्रिक अनुभव आहे. शिवाय करून सवरून मोकळी होते, ती सुईच. दोरा तिथंच अडकून राहतो, कायमचा, जन्मभराच्या गाठी! पुन्हा दोर्याची कधीच मुक्तता होऊ नये म्हणून त्याला आधी आणि शेवटीही मारलेल्या गाठीही स्त्रीलिंगीच की! पतंगही पुंलिंगी असला तरी त्याचं नियंत्रण स्त्रीलिंगी दोरीच करीत राहते ना? आणि काही कारणानं तीच कापली गेली तर बिच्चारा पतंग! कुठंतरी भरकटत जातो. मुसळ जरी नपुंसकलिंगी असलं तरी त्याला उखळीच्या बाहेर जाता येत नाहीच. गेलंच तर कांडणार्याच्या किंवा कांडणारणीच्या पायावर दणका! पलंग खरा तर पुंलिंगी. पण त्यावर गादी, चादर असल्याशिवाय निरुपयोगीच ना?
ओंडका जरी पुंलिंगी असला तरी त्याला कापणारी करवत स्त्रीलिंगीच असते. शंख जरी पुंलिंगी असला तरी त्याला ज्या अडणीवर बसून राहावं लागतं ती स्त्रीलिंगीच असते. तीच गत माठाची. त्यालाही तिवईच्या आश्रयानंच राहावं लागतं. खिळ्याला भिंतीच्या अंतरंगात शिरायचं असलं तर डोक्यावर स्त्रीलिंगी हातोडीचे घाव सहन करावे लागतातच. एरवी भिंत त्याला दाद थोडीच देईल? इतकंच काय, तो खिळा भिंतीतून पुन्हा उपटून बाहेर काढायचा झाला तर, नावाप्रमाणंच मजबूत पकड असलेली पकडच लागते. अहो बिचार्या पुंलिंगी दगडालाही टाकीचे किंवा छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळतं का कधी?
पायात काटा गेला तर त्यालाही हुसकावून, उपटून काढण्याकरता सुईच लागते. आणि पुंलिंगी आजाराला पळवून लावण्याकरताही सुईच लागते. चंद्र तो असला तरी त्याला पृथ्वीच्या कक्षेतच फिरावं लागतं!
दुसर्याच्या (झाडाच्या किंवा वृक्षाच्या) आधारावर वाढणार्या वेलीला स्त्रीलिंगी मानलं जातं आणि जगावं लागतं, असं श्रीमती देहाडराय म्हणतात. पण वेल शब्द पुंलिंगीही आहेच. कार्ल्याचा, तोंडलीचा, पडवळाचा, भोपळ्याचा वेल असतो. त्यांच्या आधारानंच कार्ली, टोमॅटो, भोपळा, कलिंगड सर्व पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी मंडळी वाढतात. वेलु जरी गगनावरि गेला तरी बिच्चार्या भोपळ्याला कुठंही जाता येत नाही, कायमचं जमिनी(!) वरच अडकून पडावं लागतं. शिवाय, ह्या सर्वच वेलांना वाढण्याकरता झाडाच्या फांदीचा किंवा जमिनीत रोवलेल्या काठीचाच आधार लागतो.
संगणक तर पुंलिंगीच. अगदी परम १०,००० क्षमतेचा झाला तरी. पण, सर्वार्थानं त्या संगणकाचं नियंत्रण करण्याकरता चिप नावाची जी क्षुद्र आयसी लागते, ती तर स्त्रीलिंगीच नाही का?
वास्तविक पूर्वीच्या काळी लेखनाकरता बोरू वापरले जायचे. त्याला नीट तासून त्याची जीभ कापावी लागे. तेव्हा ती ‘द्विजिह्वा न च सर्पिणी’ बाई चुरुचुरू लेखन कार्य करी. आणि बोरू जरी पुंलिंगी असला तरी त्याचं काव्यमय वर्णन लेखणी याच सदरात केलं जाई. कशानंही लिहिलं तरी कुणी लेखनकार्यासारखं बोरनकार्य किंवा बोरीव काम म्हणत नसे. म्हणून तर ‘साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि तरवारी घ्या’, असं आवाहन केलं गेलं. आणि आमच्या लहानपणी तरवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ असा वाद रंगत असे. तिथं कुणी बोरू शब्द वापरीत नसे. रंगणार्या दोन्ही स्त्रियाच!
ही नावं बघा सीताराम किंवा जानकीजीवनराम, राधाकृष्ण किंवा राधामोहन, उमामहेश्वर किंवा उमाशंकर, लक्ष्मीनारायण, किंवा रमामाधव सर्व नावांत स्त्रिया प्रथम! इतकंच कशाला? शंकराला आवाहन करायचं तर पार्वतीपते असं म्हणून मगच हरहर महादेव म्हणावं लागतं. आणि रामालाही सीतापते राम असंच संबोधावं लागतं ना?
आता तंबोरा पाहू. त्याचा दांडा आणि भोपळासुद्धा पुंलिंगीच. पण तारा, त्या ज्यांच्यावरून जातात त्या घोड्या आणि तारा सुरांत लावण्याकरता पिळायच्या खुंट्या. सगळं महिलामंडळच! पण इतक्यानं भागतंय होय? सुरांना गांभीर्य प्राप्त व्हावं म्हणून जवार लावायची तीही स्त्रीलिंगीच. तेव्हा कुठं त्या गवयाचं समाधान व्हायचं! आणि त्याच्या गळ्यातून सा लागायचा!
आता एक शेवटचा मुद्दा. तबला किंवा पखवाज पुंलिंगी. पण एरवी त्यांना नुसतंच खोड (नपुंसकलिंगी. स्त्रीलिंगी नव्हे!) असं नामाभिधान असतं. त्यांना मढवण्याकरता पुडी लागते. मुळात कातडं (नपुं०) त्याचीच पुडी होते. त्या पुडीला शाई लावावी लागते, तिला चाट लागते. त्या पुडीला सर्व बाजूंनी वेणी घालायची, त्या वेणीतून वादी ओवायची. वादीला पुरेसा ताण राहण्याकरता खुंट्या अडकवायच्या. मगच तो मढवला जायचा. पण हे सर्व महिलामंडळच. पण तेवढ्यानं भागलं म्हणता का? हातोडीनं सर्व बाजूनं त्याला व्यवस्थित ठोकल्याशिवाय तो सुरांत बोलेल का? नाव नाही. पखवाजाची तर फारच दयनीय अवस्था. कारण त्याला दोन्ही बाजूंनी स्त्रीलिंगी पुड्या लावून मढवायचा. वरचं सगळं महिलामंडळ तर हवंच. पण एका बाजूनं तबल्यासारखा आहे म्हणून हातोडीनं ठोकून तो जरी सुरांत लावला तरी तो मृदुंग, म्हणजे ज्याचं अंगही स्त्रीलिंगी मातीचं आहे, त्यालाही मुखलेप हवाच. हा मुखलेप (पुं०) वाटत असला तरी प्रत्यक्षात कणीकच (स्त्री०) वापरायची! मगच तो मधुरध्वनी करतो. शिवाय दोन्ही बाजूंनी स्त्रियांनी जखडलेल्या अवस्थेत बिचार्याला दोन्ही हातांनी वादकाच्या थपडा (!) खाव्या लागतात. आणि त्या खाताना थापेचा (!) मधुर आवाज केल्याशिवाय गत्यंतरच नाही! हाय रे दैवा!