संपादकीय

संपादकीय

संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर

नीलिमा गुंडी

अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्‍हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

या कार्यक्रमांची सुरुवात बहुधा शारदास्तवनाने होते. सुरुवातीला जर 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' या संस्कृत श्लोकाचे गायन असेल, तर त्यातील 'या शुभ्रवस्त्रावृता'चे अनेकदा 'या शुभ्रवस्त्रामृता' असे उच्चारण होते. आणि 'जय शारदे वागीश्वरी' हे शांता शेळके यांचे गीत असेल, तर त्याचे उच्चारण बऱ्याचदा 'जय शारदे वागेश्वरी' असे कानी पडते. अशा वेळी श्रोत्यांची सहनशीलता हीच त्यांच्या रसिकतेची कवचकुंडले ठरतात.

जाहीर कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोकप्रिय होत आहे. मात्र अनौपचारिक कशाला म्हणायचे, हा प्रश्नच आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषाविवेक न गमावलेली सहजता अपेक्षित असते. तशा सहज प्रसन्न भाषेचा वावर हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. भाषेचा नेटका, नेमका वापर करण्यातून सांस्कृतिक श्रीमंती व्यक्त होत असते. मात्र जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्षात घडते ते असे : प्रत्येक वक्ता आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावरील सर्वांची लांबचलांब विशेषणे वापरून नामावली घेण्याची औपचारिक परंपरा अजिबात सोडत नाही. प्रत्येक निमंत्रितामागे श्री०/श्रीमती/प्रा०/डॉ० अशा उपाधी हव्यातच, अशी सर्वसाधारण समजूत दिसते. त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा काहींना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल होत असते. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' हे किताब उपाधीसारखे वापरायचे नसतात, या संकेताचेही सहज उल्लंघन होत असते.

अनौपचारिक शैलीत पाहुण्यांचा परिचय करून देणारा वक्ता पाहुण्यांशी आपले फोनवरून कधी नि कोणते संभाषण झाले, पाहुण्यांशी आपली पहिली गाठभेट कशी झाली, त्या वेळी त्यांनी आपले आदरातिथ्य कसे केले, अशी साग्रसंगीत ओळख जाहीरपणे करून देतो. मनात येणारा प्रत्येक विचार कसलाही आडपडदा न बाळगता श्रोत्यांना तत्काळ सांगून टाकणे म्हणजे अनौपचारिक बोलणे, अशी काहींची समजूत असते. यामध्ये काही वेळा पाहुण्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्व सांगायचेच राहून जाते! याउलट औपचारिकपणे ओळख करून देणाऱ्याचा मार्ग दुसऱ्या टोकाचा असतो. तो म्हणजे पाहुण्यांनी दिलेला 'बायोडेटा' यांत्रिकपणे वाचून दाखवण्याचा! त्यामुळे पाहुण्यांचा जन्म कोठे झाला, त्यांना प्राथमिक शाळेत कोणती बक्षिसे मिळाली... इथपासून आजपर्यंतचे त्यांचे सारेच कर्तृत्व जाहीर केले जाते. अशा वेळी शहाणा पाहुणा संकोचून जातो. या परिचयप्रसंगी पाहुण्यांचे नावच न आठवणे, ते चुकीचे उच्चारले जाणे इत्यादी विविध प्रसंगनिष्ठ विनोद कधी कधी घडत असतातच. व्यासपीठावर उभे राहून बोलताना पूर्वतयारीशिवाय बोलल्यावर ते भाषण आपोआप उत्स्फूर्त आणि सहज ठरते, अशी (गैर)समजूत त्यामागे असते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यातील काही सूत्रसंचालकांनी भाषेचा मुक्तपणे केलेला वापर ही होय. सूत्रसंचालक हे जणू शब्दजीवी पात्र असते. या 'सुसूत्र' पात्राचा व्यासपीठावरील संचार गेली काही वर्षे अनिर्बंधपणे सुरू आहे. पूर्वी संगीताच्या कार्यक्रमांना निवेदक असत. गायकांना कार्यक्रमात मध्येमध्ये विश्रांती मिळावी आणि गीतकार, संगीतकार, इत्यादींची माहिती श्रोत्यांना व्हावी म्हणून निवेदकाने भाष्य करणे योग्य असते. पण आता कोठल्याही कार्यक्रमांना-चर्चासत्रांनाही-सूत्रसंचालक असतोच. एकेकाळी निवेदक व्यासपीठावरील जागा न अडवता कार्यक्रमाची सूत्रे सांभाळण्याचे काम अदबीने करीत असे. आता मात्र सूत्रसंचालक ही सर्वांत मोठी असामी असते. सूत्रसंचालकाचा भूतलावरचा वावर आता त्रिखंड हिंडणाऱ्या नारदाशीच तुलना करण्याजोगा ठरावा! (हल्ली लग्नसमारंभातही सूत्रसंचालक संचार करू लागला आहे!)

सतत बोलत राहणे (तेही लाडिकपणे!) आणि ऊठसूट श्रोत्यांकडून टाळ्यांची मागणी करणे, हे आपले काम असल्याची सूत्रसंचालकाची प्रामाणिक समजूत असते. अशा वेळी वाटते, एखाद्या उत्तम कलाविष्कारानंतर सभागृह क्षणभर अवाक् होते, हीदेखील कार्यक्रमाविषयी अनुकूल प्रतिक्रिया देण्याची प्रगल्भ रीत असू शकते, यावर आता आपला विश्वासच उरला नाही का? सूत्रसंचालकामुळे काव्यवाचनाच्या कार्यक्रमात काही वेळा एकाच वेळी दुहेरी मैफल चालू राहते. एक मैफल असते प्रत्यक्ष उपस्थित असणार्या कवींच्या कवितांची आणि दुसरी असते प्रत्येक कवीनंतर सूत्रसंचालक वाचून दाखवत असलेल्या कवितांची! पूर्वी रविकिरण मंडळाच्या काळी जेव्हा काव्यगायनाच्या जाहीर कार्यक्रमांना मागणी होती, तेव्हा आवाज नसलेल्या गायक कवींची श्रोत्यांनी व्यासपीठावरून सदेह उचलबांगडी केल्याच्या वार्ता वाचायला मिळत. त्यामानाने सूत्रसंचालकांच्या लीलांविषयी आजचा रसिकवर्ग फारच सोशिक व उदार दिसतो आहे!

कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचा उपचार असतो. आपण कार्यक्रमपत्रिकेत 'आभारप्रदर्शन' असे म्हणून मुळातच 'प्रदर्शना'ला वाव ठेवलेला असतो. त्यामुळे निरर्थक शब्दांचे बुडबुडे कानी पडतातच! हल्ली बोली भाषेतील एकारान्त शब्दाऐवजी अनुस्वारान्त शब्द वापरण्याची लकब आभारप्रदर्शनातही दिसू लागली आहे. त्यामुळे कधी कधी 'यांचे आभार' याऐवजी 'यांचं आभार' असा शब्दप्रयोग कानी पडतो. [आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान असले तर त्यामध्ये 'दुरिताचे तिमिर जावो' (पापकृत्याचा, पापाचा अंधार दूर होवो) याऐवजी हटकून 'दुरितांचे तिमिर जावो' असे ऐकू येते!] अशा वेळी वाटते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलावे (खरे तर कसे बोलू नये!) हे शिकविणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याची नितांत गरज आहे. शब्दांचे अवमूल्यन ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. त्या बाबीकडे वेळीच गंभीरपणे पाहायला हवे. नाहीतर 'औचित्याची ऐशीतैशी' अशी परिस्थिती सार्वजनिक भाषावापराबाबत सार्वत्रिकच होईल.

कवितेची भाषा

प्र०ना० परांजपे

'रत्नाकर' मासिकाच्या जुलै १९२९ अंकामध्ये पृष्ठ ५०२वर (म्हणजे पृ०२वर, कारण पानांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सलग क्रमांक देण्याची 'रत्नाकर'ची पद्धत होती.) अनंत काणेकरांची 'आला खुशीत् समिंदर' ही कविता प्रसिद्ध झाली आहे. कवितेच्या तळटीपेत काणेकरांनी म्हटले आहे की, 'समिंदर...सारख्या एखाद्या रांगड्या शब्दाचा मधून मधून उपयोग फक्त गाणे कोळ्याचे आहे हा भास कायम ठेवण्यापुरताच केलेला आहे.' याचा अर्थ असा की कवितेत 'रांगडे' शब्द वापरू नयेत असा संकेत रूढ होता. आज शब्दच काय संपूर्ण कविता आणि कवितासंग्रह 'रांगड्या' भाषेत लिहिले जात आहेत.

काणेकरांच्या कवितेचे विश्लेषण बा०सी० मर्ढेकरांनी आपल्या 'वाङ्मयीन महात्मता' (१९४१) या निबंधात केले आणि त्या कवितेत 'लेखनगर्भ आत्मनिष्ठे'चा अभाव असल्याचे दाखवून दिले. कवितेची भाषा, कवितेत व्यक्त होणाऱ्या अनुभवातून उमलायला हवी, ती वरून लादता येत नाही असे मर्ढेकरांचा सिद्धांत सांगतो. कवितेची भाषा बदलते तेव्हा कवितेच्या अंतरंगात - म्हणजे कवीच्या अनुभवात व त्या अनुभवाकडे पाहाण्याच्या कवीच्या दृष्टिकोनात - बदल झालेला असतो. किंवा असे म्हणता येईल की कवितेच्या अंतरंगात बदल झाला असेल तरच कवितेच्या भाषेतील बदल समर्थनीय ठरतो; अन्यथा तो उपरा, कृत्रिम व अल्पजीवी ठरतो.

कवितेच्या भाषेत झालेल्या बदलांची काही उदाहरणे पाहिली तर हा मुद्दा स्पष्ट होईल. १७९८मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'लिरिकल बॅलड्स' या वर्डस्वर्थच्या कवितासंग्रहाने इंग्रजी कवितेत क्रांती घडवली. त्या संग्रहाच्या १८०० साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या आवृत्तीला जोडलेल्या प्रस्तावनेत ('प्रिफेस') वर्डस्वर्थने आपल्या दृष्टिकोनाचे विवेचन केले. तेव्हापासून इंग्रजी कवितेत रोमँटिसिझमचे युग सुरू झाले.

मराठी कवितेत अशी क्रांती केशवसुतांनी घडवली. 'काठोकाठ भरू द्या पेला', 'आम्ही कोण म्हणूनी काय पुसता', 'सतारीचे बोल' इ० कवितांनी कवितेच्या आशयाबद्दलच्या तोपर्यंत रूढ असलेल्या संकल्पनांचा धक्का दिला. आशयाप्रमाणे कवितेच्या रूपातही बदल घडून आले. सुनीतासारखा नवा पद्यबंध आला. झपूर्झासारखे नवे शब्द आले. आणि मराठीतही रोमँटिसिझमचा उदय झाला. या सर्वांच्या मुळाशी तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती होती. न्यायमूर्ती रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी घडवून आणलेली राजकीय जागृती, दुष्काळ, प्लेग सारखी संकटे, महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला शैक्षणिक व सामाजिक सुधारणांचा रेटा यांमुळे 'जुने जाऊ द्या'चे वारे वाहात होते. त्यामुळे सामाजिक जीवनातील बदल कवींच्याही मनोवृत्तीवर आघात करत होते.

दुसर्याआ महायुद्धामुळे १९४०नंतर सामाजिक जीवनात मूलभूत बदल घडून आले. शहरांकडे लोटणारे लोंढे, गिरण्यांमुळे वाढलेला कामगारवर्ग, महागाई, अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या मध्यमवर्गीय स्त्रिया, 'चले जाव'ची चळवळ, गांधींजींचे नेतृत्व, डॉ० आंबेडकरांच्यामुळे मागासवर्गीयांत झालेली जाणीवजागृती, आणि सामान्य माणसांचे सुरू झालेले अमानुषीकरण यांमुळे कवींच्या, निर्मितीशील कलाकार व साहित्यिकांच्या जगाकडे, जीवनाकडे व कलेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. शब्दांच्या 'रांगडे'पणाकडे पाहाण्याची दृष्टी बदलली. हे बदल मर्ढेकरांच्या 'नव'कवितेतून (आणि गाडगीळ-माडगूळकर-गोखले इत्यादींच्या 'नव'कथेतून) व्यक्त झाले. 'टांग', 'टिर्र्यात', 'फलाट', 'कांदेवाडी', 'बेकलाइटी' असे शब्द कवितेत आले. मर्ढेकरांच्या कवितेने रोमँटिसिझम नाकारला आणि आधुनिकतावाद, वास्तवतावाद आणि मानवतावाद स्वीकारला. पादाकुलकसारखे साधे, ओघवते मात्रावृत्त स्वीकारले.
मर्ढेकरांनंतरची कविता अतिशय प्रयोगशील झाली. ती मुक्तछंदातून, संवादलयीतून प्रकट होऊ लागली. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादींनी कवितेच्या आशयात अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, साम्यवाद यांच्या जीवनधारणेतून होणारे दर्शन मांडले. कवितेच्या सर्व घटकांमध्ये प्रयोग केले आणि कवितेची भाषा आणि लोकभाषा, व्यवहारभाषा यांमधील अंतर पुसून टाकले.
१९९०नंतरच्या कवितेने कवितेच्या भाषेबद्दलच्या वाचकाच्या अपेक्षा नाकारल्या, सभ्यतेची बंधने झुगारून दिली, आणि दुर्बोधतेच्या कक्षा विस्तारल्या असे म्हणता येईल. हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, सचिन केतकर, सलील वाघ इत्यादींच्या कविता वाचकांना धक्के देत आहेत.

मराठी अभ्यास परिषदेच्या या वर्षाच्या वर्धापनदिनाच्या (एक मे) कार्यक्रमात 'कवितेची बदलती भाषा' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात वाचल्या गेलेल्या निबंधांतील तीन निबंध या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. उरलेले दोन निबंध हातात आले की तेही पुढील अंकांत प्रसिद्ध होतील.

(भाषा) शिक्षणाचा खेळ(खंडोबा) - संपादकीय

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास शिक्षण मंत्र्यांना जाग येते आणि विविध शासकीय आदेश, धोरणे व योजना जाहीर होऊ लागतात. त्यातून सरकार आणि/किंवा शिक्षणमंत्री नवीन असेल तर विचारायलाच नको. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जाते. 'ज्याचे हाती शिक्षणाच्या नाड्या तोच देशाचा (व भावी पिढ्यांचा) उद्धारकर्ता' असे वाटत असल्याने आपल्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या पोतडीतून नवनवीन चिजा ते काढू लागतात. पाचवीऐवजी आठवीपासून इंग्रजी सुरू करण्याचा १९४८ सालचा खेर मंत्रिमंडळाचा निर्णयच पाहा. त्याचा परिणाम इंग्रजीचे महत्त्व वाढण्यात, इंग्रजी माध्यमाचे स्तोम निर्माण होण्यात आणि शेवटी पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात झाला. असे निर्णय घेताना पुरेसा गृहपाठ, संभाव्य ताबडतोबीच्या व दीर्घकालीन परिणामांचा विचार होतो की नाही अशी शंका त्यामुळे निर्माण होते.

दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांना एटीकेटी (अलाऊड टु कीप टर्म्ज), अकरावीच्या प्रवेशासाठी ९०%-१०%चा निर्णय, गेल्या वर्षीचा पर्सेण्टाइलच्या निर्णयाचा फियास्को, महाराष्ट्रात माध्यमिक शालान्त शिक्षण मंडळाचा शिक्षणक्रमच शिकवण्याची सर्वच शाळांना सक्ती करण्याचा विचार, अकरावीचे प्रवेश 'ऑनलाईन' पद्धतीने करण्याचे प्रयत्न अशा अनेक गोष्टी ताज्या आहेत. त्यातच दहावीची माध्यमिक शालान्त परीक्षाच रद्द करण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या निर्णयाची भर पडली आहे. याच संदर्भात आपल्या राज्यातील शाळांमध्ये कन्नड माध्यमाची सक्ती करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय व त्यासंबंधीचे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील दावे व त्यांवरील निर्णय आठवतात. शिक्षण हा विषय घटनाकारांनी राज्य व केंद्र सरकार या दोहोंच्याही अखत्यारीत ठेवलेला असल्यामुळे असा गोंधळ होत असावा असे ठरवून आता केंद्र सरकारने या बाबतीतले राज्यांचे अधिकार कमी करण्याचा किंवा ते मर्यादित करण्याचा विचार सुरू केला आहे.

शिक्षणात भाषेचा (खरं म्हणजे भाषांचा) दुहेरी संबंध येतो; एक विषय म्हणून आणि कोणताही विषय शिकण्या-शिकविण्याचे माध्यम म्हणून. पण या वस्तुस्थितीकडे आपण पुरेशा गंभीरपणाने पाहात नाही. मुळात कार्यक्षम वापर करण्याइतकी भाषा आत्मसात होण्याआधीच - आणि इंग्रजी (किंवा प्रमाण मराठी)च्या बाबतीत घर, परिसर व वातावरण यांत ती किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा विचार न करता - आपण तिच्यावर अन्य विषयांचा भार टाकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपल्याला आटापिटा करावा लागतो. त्यातून ३५% गुणांना 'उत्तीर्ण' मानणे, अनुत्तीर्णांचे प्रचंड प्रमाण, त्यामुळे होणारी गळती, आत्महत्या, बेकारी असे प्रश्न निर्माण होतात.

महाराष्ट्र शासनाने मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर केलेला करार हा अलीकडे उजेडात आलेला विषय. मूळ करार तीन वर्षांपूर्वीच करण्यात आला आहे. त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनी संगणक शिक्षक तयार करणार, ते शिक्षक इतर शिक्षकांना शिकवणार आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातले सारे विद्यार्थी संगणक-शिक्षित होऊन नोकऱ्या व व्यवसायांसाठी तयार होणार! या सगळयात आपण पुन्हा एकदा बौद्धिक गुलामगिरीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरची सक्ती, इंग्रजी अपरिहार्य ठरण्याची शक्यता आणि हे शिक्षण मराठीतून उपलब्ध झालेच तर त्या मराठीची संभाव्य भीषण अवस्था या सगळयातून आपण करत असलेला शिक्षणाचा व विशेषत: भाषा शिक्षणाचा खेळखंडोबा अधोरेखित होतो.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या पायावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा असतो. आपला हा पायाच कच्चा व डळमळीत आहे. कोठारी, राम जोशी, यशपाल यांच्या अहवालांची अंमलबजावणी करण्याऐवजी नवनवीन समित्या नेमण्यात व त्याद्वारे काहीतरी 'भरीव' काम केल्याचे समाधान मिळविण्यात आपण धन्यता मानतो. व्यावसायिक शिक्षणाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे महाविद्यालये ओसंडून वाहात आहेत हे लक्षात घेत नाही.

शिक्षणाचा आणि विशेषत: भाषा शिक्षणाचा हा खेळखंडोबा कोण, कसा व केव्हा थांबवणार हाच खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे.

- प्र०ना० परांजपे

मराठी भाषेच्या विकासाच्या वाटा - ६ : राजाश्रय व लोकाश्रय

कुठल्याही भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राजाश्रय व लोकाश्रय या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका आश्रयाच्या अभावी भाषेच्या विकासाचा प्रवाह अवरुद्ध होतो, कुंठित होतो. निदान हव्या त्या वेगाने तो वाहू शकत नाही. या दोन आश्रयांपैकी कोणता अधिक महत्त्वाचा हे ठरविणे अवघड आहे. सोव्हिएट रशियामध्ये रशियन भाषेला भक्कम आश्रय होता. पण त्या संघराज्यातील उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये रशियन भाषा फारशी प्रभावी ठरू शकली नाही; भारताच्याही विविध भागांत वेगवेगळ्या काळात पर्शियन, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या राजभाषा होत्या. पण त्या अल्पसंख्य सुशिक्षितांपर्यंतच मर्यादित राहिल्या. इंग्लंडमध्ये मात्र १६व्या शतकापासून इंग्रजीला राजाश्रय व लोकाश्रय यांचा लाभ झाला आणि त्यामुळे इंग्रजीचा विस्तार व विकास झपाट्याने झाला.
१९६० पूर्वी मराठीला राजाश्रय कधीच नव्हता. मराठीच्या गळचेपीविरुद्ध, तिला मिळणार्याश दुय्यम वागणुकीविरुद्ध ज्ञानेश्वरांना बंड करावे लागले. शहाजी राजांच्या पदरी असलेल्या कवींच्या यादीत मराठी कवींची संख्या संस्कृत कवींच्या तुलनेने अत्यल्प होती. शिवाजी महाराजांचा आश्रय होता तो भूषण या हिंदी कवीला. त्यांनी राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला तो संस्कृतच्या धर्तीवर. रामदास, तुकाराम यांचा राज्यकर्त्यांनी गौरव केला तो ते साधू, संत होते म्हणून; कवी होते म्हणून नव्हे! पेशवाईतही प्रतिष्ठा होती ती संस्कृतला. १८१८नंतर राज्यकारभाराच्या सोयीसाठी मराठीची गरज भासू लागली. त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्यांनी मराठी-इंग्रजी (मोल्सवर्थ) व इंग्रजी-मराठी (कॅंडी) हे दोन कोश तयार केले. दक्षिणा प्राइझच्या रूपाने मराठीतील ग्रंथरचनेला, भाषांतरांना उत्तेजन दिले. शालेय व पुढे महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षणात मराठीचा समावेश केला. पण प्रशासन, न्यायालय इत्यादी ठिकाणी मराठीला स्थान नव्हते; प्रतिष्ठेच्या जागेवर संस्कृतच्याऐवजी इंग्रजी आली होती.
पण या काळात मराठीला लोकाश्रय मात्र होता. संत-पंत-तंत यांच्या काव्याला लाभलेली प्रतिष्ठा व लोकप्रियता यामुळे मराठीचा, मंद गतीने का होईना, विकास होत राहिला. तिच्या भाषकांना तिच्याबद्दल अभिमान वाटत राहिला. तिचे पांग फेडण्याची ओढ त्यांना वाटत राहिली. त्यामुळे व्याकरण, पत्रकारिता, साहित्य, कोशरचना अशा तिला सशक्त करण्याच्या अनेक प्रयत्नांदची परंपरा निर्माण झाली. दुर्दैवाने असे प्रयत्न् राजाश्रयाच्या अभावामुळे एकांड्या शिलेदारीने होत राहिले. त्यांना संघटित, संस्थात्मक स्वरूप न लाभल्यामुळे त्यांच्यात सातत्य राहिले नाही. नवीन प्रयत्नांेना पूर्वप्रयत्नांाच्या अनुभवांचा व फलनिष्पत्तीचा आधार मिळत न राहिल्यामुळे प्रत्येकाला परत परत श्रीगणेशाय नम:पासून प्रारंभ करावा लागला.

१९६०नंतर हे चित्र काहीसे बदलले. पूर्वी कधी नव्हता तो राजाश्रय मराठीला लाभला. या वस्तुस्थितीला सुमारे पन्नास वर्षे झाली.

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळून पन्नास वर्षे होत आली, पण पूर्वीच्या संस्कृत व नंतरच्या इंग्रजीची प्रतिष्ठा मराठीला लाभली आहे, असे म्हणता येत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या दरवर्षी वाढते आहे आणि मोठ्या शहरातील मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे. मराठीचा प्राध्यापक असलेल्या एका मंत्र्याने इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय अंमलात आणून इंग्रजीच्या प्रतिष्ठेत भर घालण्याचे पुण्यकर्म केले. शब्दकोश, विश्वकोश अजून पूर्ण झालेले नाहीत. भाषा-आयोग नेमणे, मराठीच्या बोलींची पाहणी, नोंद, दस्तावेजीकरण याची निकड शासनाला अद्याप जाणवलेली नाही. मंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्व पुढारी चित्रवाणीला मुलाखती, मतप्रदर्शन, माहिती देताना मराठीचा आग्रह धरत नाहीत. शासनाने भाषाभिवृद्धीसाठी किती पैसे खर्च केले एवढा एकमेव निकष मराठीचा राजाश्रय सिद्ध करायला पुरेसा आहे का? मराठीकडे पाहण्याची दृष्टी, मराठीला वागविण्याची तर्हाआ, मराठीसाठी करावयाच्या कामांची तड लावण्याची आच - अशा गोष्टींकडे पाहिले तर मराठीला राजाश्रय आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

मग लोकाश्रयाचे काय? मराठीला पूर्वी असणारा लोकाश्रय आज त्या प्रमाणावर आणि त्या पातळीवरचा आहे का? खरं पाहाता, राजाश्रयामुळे लोकाश्रयात वाढ व्हायला हवी. त्याची व्याप्ती व खोली वाढायला हवी. भाषेच्या विकासाला वेग यायला हवा. पण मराठीच्या बाबतीत तसे चित्र आज दिसत नाही. मराठीबद्दलचा अतिरिक्त (आणि बर्या च वेळा असमंजस) अभिमान वेळोवेळी दिसून आला तरी त्याचे परिवर्तन भक्काम व भरीव कृतीत होत नाही. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या व गुणवत्ता वाढण्याऐवजी त्या बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक धडपडत आहेत; त्यासाठी देणगी व अव्वाच्या सव्वा शुल्क मोजायची त्यांची तयारी आहे. नऊ-दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती ५०० प्रतींची असते! इंग्रजी बोलायला शिकवणार्यां खासगी वर्गांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांचे रकाने भरलेले असतात; पण मराठी शिकवणार्याल वर्गाची जाहिरात औषधालाही आढळत नाही. मराठी वृत्तपत्रांना इंग्रजी शीर्षकांच्या पुरवण्याच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्याची आवश्यकता वाटते. ही सगळी लक्षणे मराठीच्या लोकाश्रयाची आहेत असे म्हणता येईल का?

आज मराठीचा राजाश्रय तोंडदेखला आहे, औपचारिक आहे आणि लोकाश्रय तकलादू आहे. लोकांना हे जाणवते; व्यवहारात त्याचा त्यांना अनुभव येतो. दुकानांवर देवनागरीतील पाट्या लागल्या तरी दुकानांत मराठी बोलले जाईलच असे नाही. मराठीचा विकास व्हायचा असेल राज्यकर्त्यांच्या वृत्तीत व आचरणात मूलभूत फरक व्हायला पाहिजे; मराठीला खर्याय अर्थाने राजाश्रय मिळायला पाहिजे. तो मिळाला की लोकांच्या दृष्टिकोनात फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले की लोकाश्रय भक्केम होईल.
मग मराठीच्या विकासाला कुणीही, कसल्याही सीमा घालू शकणार नाही.

प्र० ना० परांजपे

नव्या शतकाची नांदी

'भाषा आणि जीवन'चा एकशेएकावा अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांला समाधान वाटत आहे. यानिमित्ताने थोडे सिंहावलोकन करणे योग्य ठरेल. १ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'ने जून (पावसाळा) १९८३ पासून 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकाशन सातत्याने चालू आहे.

सुरुवातीचे प्रमुख संपादक होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ० अशोक रा० केळकर. (कार्यकाल वर्ष १ अंक १ ते वर्ष ८ अंक १) त्यानंतर प्रमुख संपादक व त्यांचा कार्यकाल पुढीलप्रमाणे आहे. डॉ० कल्याण काळे (वर्ष ८ अंक २ ते वर्ष १५ अंक ४), डॉ० विजया देव (वर्ष १६ अंक १ ते वर्ष १८ अंक ४) डॉ० मृणालिनी शहा (वर्ष १९ अंक १ ते वर्ष २२ अंक ४). वर्ष २३ अंक १ पासून प्रा० प्र०ना० परांजपे प्रमुख संपादक आहेत. प्रमुख संपादकांना संपादकमंडळातील इतरांचेही सहकार्य मिळते.

पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या ३६ आणि किंमत १० रुपये होती. या दोहोंमध्ये वाढ होत होत आज अंकाची पृष्ठसंख्या आहे ७२ ते ८० आणि अंकाची किंमत २५ रुपये झाली आहे. सुरुवातीला अडीचशेच्या आसपास असलेली वर्गणीदारांची संख्या आता हजाराच्या जवळ पोहोचली आहे. या नियतकालिकाला १९९५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनकडून मिळालेला वैचारिक नियतकालिकाचा पुरस्कार म्हणजे समाजमानसात त्याला मिळालेली प्रतिष्ठेची पावतीच आहे. मात्र अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण अध्यापकवर्ग, आणि नागरी आणि ग्रामीण वाचनप्रेमी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्हांला गाठायचे आहे आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्‍नही चालू आहेत. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकांची स्पर्धा आयोजित केली जात आहे. वाचकांचे वर्तुळ भाषाभ्यासकांपुरते मर्यादित न राहता त्यात सर्वसामान्य वाचकही सहभागी व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्‍नशील आहोत. भाषाभ्यासकांना उपयुक्त जशी साधनसामग्री (उदाहरणार्थ भाषाशास्त्रीय लेखन, संशोधन अहवाल, भाषाविषयक लेखनसूची इत्यादी) अशी अंकात असते, तशीच सर्वसामान्य वाचकांना स्वारस्य वाटावे अशी लेखनसामग्री (उदाहरणार्थ रंजक पानपूरके, हलक्याफुलक्‍या शैलीतील भाषाविषयक निरीक्षणे, भाषेचे विभ्रम टिपणारे लेखन, पुस्तक-परीक्षणे इत्यादी) देखील त्यात समाविष्ट असते.

भाषा ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचे जीवनानुभवाशी साक्षात नाते असते. 'भाषा आणि जीवन' च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते! भाषा आणि जीवन यांच्यातील अनेकपदरी नात्याचा सर्वसामान्य वाचकांना प्रत्यय येत असतो तर त्याच्यातील गुंतागुंत अभ्यासकांना जाणून घ्यावीशी वाटते. भाषा ही लोकव्यवहाराचे साधन असते, ज्ञानव्यवहाराचे माध्यम असते, ती संस्कृतीची वाहक असते आणि कलात्मक निर्मितिव्यवहारात ती जणू अनुभवाचे द्रव्य असते. व्यक्‍तीच्या भावजीवनात ती भावना, विचार व संवेदना यांचे केंद्रच असते, भाषेच्या अशा जीवनव्यापी अस्तित्वाचे काही पैलू 'भाषा आणि जीवन' च्या अंकांमधून उलगडले जातात; असे वाचकांना आढळेल.

भाषा ही सांस्कृतिक परंपरा असते. कोणतीही सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम मुख्यतः शिक्षणक्षेत्राकडे येते. कारण पुढच्या पिढ्यांशी संवाद साधण्याचे काम पाठ्यपुस्तके करीत असतात. त्यामुळे प्रमाणभाषेचे अध्यापन, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन, अभ्यासक्रमात मराठीचे स्थान या विषयांवरील लेखनही 'भाषा आणि जीवन'मध्ये देण्यात येते. मराठीतून शिकवणारा शिक्षक हा मराठीचाही शिक्षक असतो, हे लक्षात घेऊन विविध सामाजिक शास्त्रांचे मराठीतून अध्यापन करताना येणार्‍या अडचणींची चर्चा अंकात होत असते. त्याचबरोबर त्या त्या शास्त्रांमधील परिभाषानिर्मितीच्या प्रक्रियेला गती देणारे लेखनही अंकात समाविष्ट असते. विविध ज्ञानक्षेत्रांशी संबंधित पारिभाषिक संज्ञांच्या सूचीचा अंतर्भावही अंकात आवर्जून केला जातो. शिक्षणविषयक समकालीन प्रश्नांना भिडण्याचे आव्हान 'भाषा आणि जीवन'ने वेळोवेळी स्वीकारले आहे. 'पहिलीपासून इंग्रजी', 'शालान्त परीक्षेतील मराठी विषयाचा चिंताजनक निकाल' अशा बाबींचा साधकबाधक विचार तज्ज्ञांनी केला आहे.

राजभाषा मराठी ही सक्षम 'ज्ञानभाषा' व्हावी, यासाठी असे प्रयत्‍न करीत असतानाच ती सर्वांच्या तोंडी सहज रुळेल, अशी 'लोकभाषा' व्हावी, या दिशेनेही 'भाषा आणि जीवन'ने पावले उचलली आहेत. लोकशिक्षण विशेषांकात (वर्ष १० अंक ४, संपादनसंयोजन : आशा मुंडले) याचे प्रत्यंतर येईल. न्यायालये, कार्यालये अशा क्षेत्रांमधील प्रशासकीय मराठी; वैद्यकक्षेत्र, प्रसारमाध्यमे, मुलाखती इत्यादी क्षेत्रांमधील व्यावहारिक मराठी यांविषयीचे भाषिक अनुभव आणि मार्गदर्शन यांना अंकात स्थान मिळाले आहे. मराठीला विकासाचा मोठाच पल्ला अजून गाठायचा आहे, याचे भान त्या लेखांमधून येते. प्र०ना० परांजपे यांची 'मराठीच्या विकासाच्या वाटा' ही पाच भागांतील संपादकीय लेखमाला यादृष्टीने उद्‍बोधक ठरेल.

अंकामध्ये भाषेचा सामाजिक अंगाने विचार करणारे लेख तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. प्रमाणभाषेचे मध्यवर्ती स्थान मान्य असतानाच इतर बोलींविषयीही 'भाषा आणि जीवन'ला आस्था आहे. अहिराणी, झाडी, वर्‍हाडी, सौराष्ट्री अशा प्रादेशिक बोलींबरोबरच वैदू, कोकणी, कैकाडी, भाट, आदिवासी अशा समाजविशिष्ट बोलींची आम्ही दखल घेतली आहे. इतकेच काय मूकबधिरांच्या भाषेचाही विचार अंकात झाला आहे. 'शालेय मराठी आणि झोपडपट्टी' (विजया चिटणीस, वर्ष २ अंक १), 'सर्वनामांचे समाजशास्त्र' (राजीव साने, वर्ष २ अंक २), 'सूनबाईंचे भाषाशिक्षण' (द०दि० पुंडे, वर्ष २० अंक ४), 'म्हणी, सुभाषितं, अवतरणं' (कल्याण काळे, वर्ष २ अंक ३), 'जातीची चिवट भाषा' (मृणालिनी शहा, वर्ष १५ अंक २), 'एका संकेतव्यवस्थेचा अनुभव' (विजया देव, वर्ष २१, अंक ३) आणि बालभाषेविषयीची निरीक्षणपर लेखमाला (नीलिमा गुंडी) अशा काहींचा यासंदर्भात उल्लेख करता येईल.

मराठी वाचकांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट असले तरी 'कुठलीही भाषा ही एखाद्या राज्याची राजभाषा असली तरी ती त्या राज्यापुरतीच मर्यादित नसते' हे तत्त्व संस्थेने स्वीकारले आहे; तसेच 'स्वतःच्या भाषेचे सामर्थ्य व मर्यादा इतर भाषांशी तुलना केल्याने अधिक प्रमाणात लक्षात येतात' ही वस्तुस्थिती सतत समोर ठेवली आहे. त्यामुळे भाषिक अस्मितेच्या संकुचितपणाच्या कक्षा ओलांडायला प्रवृत्त करणारे लेखन 'भाषा आणि जीवन'मध्ये येते. गोवा, मध्यप्रदेश, मदुरै इत्यादी ठिकाणच्या मराठीच्या स्थितिगतीविषयी यात विचारविनिमय आढळतो. तसेच तेलुगु, हिंदी, संस्कृत, इंग्लिश इत्यादी भारतीय भाषांमधील उच्‍चारणसंकेत, त्यांचे व्याकरण, त्यांतील चुकांचे विश्‍लेषण याविषयीचा अभ्यासही आढळतो. साहित्याबरोबरच व्याकरण, भाषाविज्ञान, मुद्रणकला, ग्रंथपालनशास्त्र, संख्यालेखन, नाटक-चित्रपट इत्यादींशी संबंधित भाषाव्यवहाराच्या विस्तारणार्‍या जगाचे भान 'भाषा आणि जीवन'ने बाळगलेले आहे.

विशेष म्हणजे 'धन परक्याचे', 'वसा आंतरभारतीचा' या सदरांच्या माध्यमातून इतर भारतीय व परकीय भाषांमधील अनुवादित कथा, कविता, लेख इत्यादी साहित्य देण्यात येते. मराठीचे अध्ययन व अध्यापन करणार्‍या परभाषक मंडळींच्या अनुभवांनाही यात स्थान दिले जाते. या मंडळींना मराठीच्या ज्या वेगळ्या कंगोर्‍यांचे दर्शन घडते, ते आपल्याला चकित करते. डॉ० मॅक्सिन बर्नसन यांचा 'जीव घाबरा करणारी भाषा' (वर्ष २ अंक १) आण इरीना ग्लुश्कोवा (रशियन अभ्यासक) यांचा 'मराठी भाषेतील आंबटगोड धक्के' (वर्ष ७ अंक १) हे लेख यादृष्टीने वाचनीय आहेत. भाषेचे सांस्कृतिक मूल्य ठसवणार्‍या 'भाषा आणि जीवन'च्या अनुवादविशेषांकाचा (संपादन : अंजली सोमण) येथे खास उल्लेख करायला हवा.

अंकातील इतर काही सदरांचा उल्लेखही अनाठायी ठरणार नाही. 'पुनर्भेट' सदरातून भाषिक परंपरेचे सत्त्व वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. 'भाषाविचार'मधून विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ आपटे, डॉ० श्री०व्यं० केतकर, वि०वा० शिरवाडकर वगैरेंच्या भाषेचा अभ्यास सादर केला आहे. 'दखलयोग्य'मधून भाषाक्षेत्रातील ताज्या घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. 'शब्दायन'मधून शब्दाच्या अनेक अर्थछटा सांगून भाषेचे भान तल्लख राहील, याची खबरदारी घेतली आहे. अंकांतील गुणग्राहक तर कधी परखड पुस्तकपरीक्षणांचाही विशेष उल्लेख केला पाहिजे. अशी परीक्षणे आता अन्यत्र सहसा वाचायला मिळत नाहीत.

'भाषा आणि जीवन'मध्ये सुरुवातीपासून सातत्याने लेखन केलेल्या काहीजणांचा नामनिर्देश करायला पाहिजे. उदाहरणार्थ :– माधव ना० आचार्य, कृ०श्री० अर्जुनवाडकर, मिलिंद मालशे, ब्रह्मानंद देशपांडे, द०भि० कुलकर्णी, द०न० गोखले, गौरी देशपांडे, वा०के० लेले, हे०वि० इनामदार, विद्युल्लेखा अकलूजकर, सुमन बेलवलकर, शरदिनी मोहिते, मनोहर राईलकर, दिलीप धोंडगे. अलीकडच्या काळात माणिक धनपलवार, विश्‍वनाथ खैरे, शुभांगी पातुरकर, शिवाजी पाटील, उमाकांत कामत, कैलास सार्वेकर, केशव देशमुख, प्रशांत बागड, वासुदेव वले, जया परांजपे, विजय पाध्ये प्रभृतींची भर पडली आहे. भाषाभ्यासाच्या विविध अंगांकडे लक्ष वेधणार्‍या विषयांची यादी अंकात देऊन आम्ही लेखकांना लिहिण्यासाठी आवाहन करतो. त्याला जुन्यानव्या लेखकांकडून अधिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद अपेक्षित आहे.

'भाषा आणि जीवन'ला जिज्ञासू वाचकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य मिळते. वाचकांशी असलेले आत्मीयतेचे नाते ही अंकांची जमेची बाजू आहे. सुरुवातीला 'ठरावीक लेखकमंडळी'मुळे अंकाची 'गटपत्रिका' होईल, हा जागरूक वाचकांनी वेळीच दिलेला धोक्याचा इशारा असो किंवा अंकातील चुका संपादकांच्या लक्षात आणून देण्यातील काटेकोरपणा असो– त्यातील वाचकांची आस्थाबुद्धी महत्त्वाची ठरते. अंकामध्ये 'शंकासमाधान', 'ज्याची त्याची प्रचीती', 'सादप्रतिसाद' अशा सदरांमधून वाचकांचा सहभाग आढळतो. एखादा 'बहुश्रुत' वाचक सादाला प्रतिसाद देत 'परार्ध'चा अर्थ कळवतो; तर एखादा 'ओ०के०' (O.K) ची कुळकथा सादर करून इतरांच्या माहितीत भर घालतो. वाचकांच्या कुतूहलाचे भरणपोषण अंकातून सातत्याने चालू असते. शब्दांच्या व्युत्पत्तीचा शोध घेणारे यातील लेखन वाचकांचे कुतूहल तेवत ठेवते. 'सडासंमार्जन', 'कानडा विठ्ठलु', 'रीरी म्हणजे पितळ' अशा शब्दांविषयीची अंकातील रंगलेली मतमतांतरे वाचनीय आहेत. 'कापावे की चिरावे?' हा प्रश्न (वर्ष ८ अंक ४) आमच्या अंकाच्या पानावर कधी नाट्यपूर्ण बनतो, तर कधी 'प्राण्यांना कसे हाकलतात' याविषयीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांतील कवितेचा बालबोध सूर भाषेच्या बारकाव्यांमुळे नव्याने लक्ष वेधून घेतो. (वर्ष ७, अंक ४)

'भाषा आणि जीवन'ची मुखपृष्ठेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. काव्यातील अवतरणे, र०कृ० जोशी यांची सुलेखने, अनिल अवचट, शाम देशपांडे, बालम केतकर, वसंत आबाजी डहाके यांची रेखाचित्रे, शि०द० फडणीस यांची व्यंग्यचित्रे, विनय सायनेकर व सुप्रिया खारकर यांची संगणकीय अक्षरचित्रे यांतून भाषेतील दृश्यात्मकता प्रभावीपणे व्यक्‍त झाली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या मुखपृष्ठांवर ज्येष्ठ भाषावैज्ञानिकांना स्थान मिळाले आहे.

प्रस्तुत संपादकीयासाठी 'नव्या शतकाची नांदी' या शीर्षकाची योजना करण्यामागे विशेष प्रयोजन आहे. अंकांचे एक शतक संपवून या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाला प्रारंभ करीत आहोत एवढाच मर्यादित आम्हाला अभिप्रेत नाही. नव्या – म्हणजे एकविसाव्या – शतकातील आव्हानांचीही जाणीव आम्हाला आहे. ही बाबही या शीर्षकातून आम्हाला अधोरेखित करावयाची आहे. जागतिकीकरणामुळे मराठी भाषेपुढे (आणि मराठी भाषकापुढे) अनेक आव्हाने उभी राहात आहेत. जगभर पांगणार्‍या मराठी भाषकांची अस्मिता मराठी भाषेमध्ये (आणि तिच्यातून व्यक्‍त होणार्‍या संस्कृतीमध्ये) सामावली आहे; पारंपरिक तंत्राच्या लेखन व मुद्रणामुळे तिच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे याचे भान मराठी अभ्यास परिषदेला व 'भाषा आणि जीवन'ला आहे. म्हणूनच आम्ही नुकतेच (म्हणजे १ मे रोजी) www.marathiabhyasparishad.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. सभासदांशी, वर्गणीदारांशी संपर्क साधणे, अंक व अन्य उपयुक्‍त माहिती व मजकूर उपलब्ध करून देणे व दूरदूरच्या (अगदी दूरदेशीच्या सुद्धा) मराठी माणसांच्या भाषिक गरजांचे भरणपोषण करणे या संकेतस्थळामुळे आवाक्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात त्यासाठी मनुष्यबळ, आर्थिक बळ व जागा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. पण आव्हाने अवघड आहेत म्हणून हातपाय गाळून निष्क्रिय बसण्यापेक्षा आपल्या परीने प्रयत्‍न सुरू करणे हेच मराठीपणाचे लक्षण आहे. त्याच जिद्दीने १९८२मध्ये मराठी अभ्यास परिषदेची स्थापना झाली, १९८३मध्ये 'भाषा आणि जीवन'चा प्रारंभ झाला, आणि आता या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाची नांदी करीत आहोत.

डॉ० नीलिमा गुंडी

शंभराव्या अंकाचे संपादकीय: साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर

विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' या कादंबरीच्या अखेरीस येणार्‍या ब्रिटिश नाविक अधिकार्‍याच्या तोंडी एक वाक्य आहे.: "I know Jolly good show, Like the Coral Island" ("आय नो, जॉली गुड शो, लाइक द कोरल आयलंड"). या कादंबरीचे जी०ए० कुलकर्णी यांनी मराठी भाषांतर केले आहे. त्यात या वाक्याचे भाषांतर म्हणून पुढील वाक्ये येतात : "आलं ध्यानात ! तुम्ही येथे सगळी मजाच केली म्हणायची ! प्रवाळ-द्वीपविषयीच्या पुस्तकात नेहमी असते तशी! निळे स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू, पिकलेली रसरशीत, सहज हाताला येणारी फळे, निष्पाप गोड खेळ, नाटके, खोट्या खोट्या लढाया, गोड गोड गाणी! आणि मग सगळं विसरून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून चांदण्याखाली गोड स्वप्न पाहात घेतलेली गुलाबी झोप - चांगली चैन केलीत तुम्ही!"

असं का व्हावं? एका 'कोरल आयलंड'च्या भाषांतरासाठी जी०एं०ना इतका विस्तार करण्याची आवश्यकता का भासली?

ललित साहित्याच्या भाषांतरामध्ये येणार्‍या एका महत्त्वाच्या समस्येचं दर्शन यातून घडते. आणि या समस्येच्या सोडवणुकीचा एक निश्चित, प्रमाण असा मार्ग नाही.

काय आहे ही समस्या? 'कोरल आयलंड' ही आर०एम० बॅलंटाइन या ब्रिटिश लेखकाची १८५७ मध्ये प्रसिद्ध झालेली रोमँटिक कादंबरी आहे. एका बेटावर अडकलेल्या तीन ब्रिटिश मुलांची साहसकथा आहे. त्या कादंबरीचा उल्लेख करून गोल्डिंगने आपल्या कादंबरीला एक संदर्भ चौकट दिली आहे. गोल्डिंगच्या कादंबरीतही एका बेटावर अडकलेली मुले आहेत; पण त्यांचे वर्तन 'कोरल आयलंड'मधील मुलांच्यापेक्षा फार भिन्न आहे. स्वार्थ, मत्सर, हेवेदावे, खोटेपणा, अंधश्रद्धा आणि हिंसा यांमुळे ती सुसंस्कृत, शिस्तबद्ध मुले हळूहळू रानटी 'आदिवासी' बनत जातात. 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मध्ये या बदलाचे धक्‍कादायक दर्शन होते. मुले निष्पाप असतात, ती 'देवाघरची फुले' असतात, या १९व्या शतकात लोकप्रिय असलेल्या समजुतीला छेद देणारी ही कादंबरी १९५४ मध्ये (म्हणजे 'कोरल आयलंड'नंतर ९७ वर्षांनी प्रसिद्ध झाली. आपल्या कादंबरीने वाचकांना 'कोरल आयलंड'ची आठवण व्हावी आणि त्यांच्यात व्यक्त होणार्‍या दृष्टिकोणांमधील विरोध वाचकांच्या लक्षात यावा म्हणून गोल्डिंगने नाविक अधिकार्‍याच्या तोंडी 'कोरल आयलंड'चा उल्लेख घातला आहे.

(ज्या वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली आहे त्यांना तिच्या उल्लेखामुळे 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' सुन्न करील, अंतर्मुख करील यात शंका नाही. माणूस समजण्याच्या बाबतीत १९व्या शतकातील लोक भाबडे होते का?)

दोन महायुद्धांमुळे (लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मधील काळ तिसर्‍या महायुद्धाचा आहे.) माणसात मूलभूत फरक पडला आहे का? स्वार्थ-द्वेष-मत्सर-हेवा व हिंसा यांमुळे माणूस स्वतःचाच नाश ओढवून घेणार आहे का? असे अनेक प्रश्न त्याला पडतील. त्यामुळे ब्रिटिश वाचकांच्या दृष्टीने 'कोरल आयलंड'चा उल्लेख महत्त्वाचा आहे यात शंका नाही.

पण मराठी वाचकांचे काय? मराठी वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली असेल असे गृहीत धरता येत नाही. मग भाषांतरकाराने हा उल्लेख जशाच्या तसा ठेवायचा ? की तो पूर्णतः वगळायचा? की जी०एं०नी केला आहे त्याप्रकारे त्या उल्लेखाचा विस्तार करावयाचा ? की त्यावर एक पदटीप देऊन त्याचा अर्थ स्पष्ट करायचा ? या प्रश्नाला सर्वांना मान्य होईल असे एक 'प्रमाण' उत्तर नाही, हे उघड आहे.

'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' या कादंबरीचे शीर्षकच पाहा. त्याचे भाषांतर करायचे नाही असा निर्णय भाषांतरकार व प्रकाशकांनी घेतला. बायबलच्या 'सेकंड बुक ऑफ दी किंग्ज' च्यापहिल्या प्रकरणाच्या दुसर्‍या परिच्छेदात बाल्झेबब (Balwze-bub) चा उल्लेख आहे. हिब्रू भाषेत त्याचा अर्थ ' माश्यांचा स्वामी' असा आहे. खोट्या देवांच्या पैकी तो एक आहे. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ 'सैतान' असा आहे. ('न्यू टेस्टामेंट'मधील मॅथ्यूच्या पुस्तकातील १२व्या प्रकरणात परिच्छेद २४ व २७ मध्येही बील्झेबबचा उल्लेख आहे.) कादंबरीत मृत वैमानिकाच्या प्रेतावर माश्या घोंघावत आहेत आणि पॅरॅशूटमध्ये अडकलेले ते प्रेत वार्‍यामुळे मागेपुढे हलताना दिसते. त्यालाच मुले 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' समजतात. त्याला प्रसन्न करण्याचे बेत आखतात. अर्थात हा 'माश्यांचा स्वामी' म्हणजे मुलांच्या मनातील भीतीचेच प्रतीक आहे. (देवांचा जन्म अशा गूढ अनामिक भीतीतूनच होतो.) या शीर्षकाला असलेला बायबलचा संदर्भ लक्षात यावा म्हणून इंग्रजी शीर्षकात बदल करण्यात आला नसावा. (अर्थात याचे भाषांतर 'सैतान' असे होऊ शकते आणि मुलांच्या मनात जाग्या होऊ पाहणार्‍या दुरिताचा तो अन्वर्थक ठरू शकतो. शिवाय सैतान या शब्दाला ख्रिश्चन धर्माचा - पर्यायाने बायबलचा संदर्भ आहे. पण ते शीर्षक फार भडक ठरण्याचा धोका आहे.) साहित्यात मुरलेले सांस्कृतिक संदर्भ भाषांतरकारापुढे समस्या निर्माण करतात त्या अशा !

प्र०ना० परांजपे

पन्नासाव्या अंकाचे संपादकीय : पन्नासावा अंक

'भाषा आणि जीवन'चा हा अंक पन्नासावा आहे. 'भाषा आणि जीवन'ची मातृसंस्था, मराठी अभ्यास परिषद, १ जानेवारी, १९८२ रोजी अस्तित्वात आली. आता संस्थाही पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे; आणि 'महाराष्ट्र फाउंडशेन'ने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या तीन वैचारिक नियतकालिकांमध्ये 'भाषा आणि जीवन'ची नुकतीच निवड केली आहे. म्हणून या टप्प्यावर थोडे मागे वळून पाहावे, असे वाटणे साहजिकच आहे. या नियतकालिकाचे नाव दुपदरी आहे. 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका' हा त्यातील एक पदर. नियतकालिकांच्या नोंदणी करणार्‍या कार्यालयाच्या दृष्टीने हे नाव अधिकृत आणि निरपदवाद. वर्णनात्मक आणि दुसर्‍या कुणी न वापरलेले. पण मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 'भाषा आणि जीवन' हा दुसरा पदर अधिक महत्त्वाचा, कारण त्यातून मातृसंस्थेचा दृष्टिकोन व्यक्त होतो. 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे.' (अंक १, पृष्ठ १)

'भाषा आणि जीवन' हे धंदेवाईक विचारवंतांनी धंदेवाईक विचारवंतांसाठी चालविलेले नियतकालिक नाही. भाषातज्ज्ञ आणि इतरेजन यांनी विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण करावी, परस्परांपासून शिकण्यासारखे असेल, ते शिकावे, आणि त्याद्वारे आपल्या समाजाचे भाषिक आणि सामाजिक जीवन विकसित आणि समृद्ध व्हावे, या हेतूने निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे. मराठीतून हे प्रकाशित होत असले, तरी ते मराठीपुरते मर्यादित नाही. मराठी भाषकांच्या सर्वच गरजा भागविण्याचा प्रयत्‍न करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्याचे 'भाषा आणि जीवन' हे एक साधन आहे. भाषिक गरजा या केवळ शिक्षण, व्यवसाय, अर्थार्जन यांच्यापुरत्या सीमित नसतात. व्यक्तीचे व समाजाचे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पोषण भाषेतून घडत असते. त्यासाठी कोणतीही एकच भाषा पुरी पडण्याचा संभव — जागतिकीकरणाच्या आधुनिक रेट्यात तर विशेषत्वाने— कठीण दिसते. इतर भाषांतील ज्ञान, साहित्य यांचा यथार्थ परिचय व संस्कार आपल्या भाषेच्या विकासाला हातभार लावू शकतो. जीवनाच्या बदलत्या रूपांना व आव्हानांना सामोरे जाण्याइतकी क्षमता व लवचिकता भाषेमध्ये असेल, तर ती तिचा वापर करणार्‍यांच्या गरजा भागवू शकते. केवळ प्रतिशब्द, परिभाषा, भाषांतरे करण्याने भाषा विकसित होऊ शकत नाही. त्यासाठी नवीन संकल्पना, नवे अनुभव भाषेत व जीवनात मुरवावे लागतात. या मुरण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याच्या प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'ने आपल्या परीने गेल्या ४९ अंकांतील २५०० हून अधिक पृष्ठांमध्ये केला आहे. आमचे हे उद्दिष्ट वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'च्या सर्व अंगांतून वाचकांना जाणवला असेल. नियतकालिकाचे पहिले दर्शन असते, ते त्याच्या मुखपृष्ठाचे. 'भाषा आणि जीवन'च्या पहिल्या चार वर्षांतील अंकांवर अनिल अवचटांनी रेखांकित केलेले मोर वाचकांना भेटले. (मोर हे सरस्वतीचे वाहन आणि आपला राष्ट्रीय पक्षी आहे.) त्यानंतर पाच वर्षे भाषिक संज्ञापनाचे व्यंग्यचित्ररूप दर्शन शि०द० फडणिसांनी घडविले. बालम केतकरांची चित्र-कविता, शाम देशपांड्यांची लिपिचित्रे, संतकाव्यातली वेचक उद्धृते, आणि लोककला यांचे दर्शन नंतरच्या अंकांच्या मुखपृष्ठावर घडले. या मुखपृष्ठांची अर्थपूर्णता वाचकांच्या नक्‍कीच लक्षात आली असेल.

'भाषा आणि जीवन'ची संपादकीये संपादन-समितीच्या सभासदांनी लिहिलेली असतात. मातृसंस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा विषयांवरील या संपादकीयांमध्ये त्यामुळे विषय, दृष्टिकोन, मांडणी व शैली या बाबतींत विविधता आली. 'भाषा आणि जीवन'मधील विविध सदरे, त्या सदरांची नावे, पानपूरके यांमधूनही आमच्या प्रयत्‍नांचा प्रत्यय वाचकांना यावा. 'दखलपात्र', 'ज्याची त्याची प्रचीती, 'पुनर्भेट', 'विचारसंकलन', 'भाषानिरीक्षण', 'शंका आणि समाधान', 'पुस्तक-परीक्षण', इत्यादी सदरांमध्ये तज्ज्ञ आणि इतरेजन यांना सारखाच वाव आहे. 'भाषा आणि जीवन'मध्ये कवितांना स्थान आहे, साहित्याला स्थान आहे, त्याचप्रमाणे प्रशासन, कायदा, वैद्यक यांनाही आवर्जून जागा देण्यात आली आहे. त्याच्यात मराठी भाषकांबरोबरच गुलाबदास ब्रोकर, श्यामविमल, इरिना ग्लुश्कोव्हा, मॅक्सीन बर्नसन अशा अन्य भाषकांनीही लेखन केले आहे. भाषाविज्ञान, भाषाध्यापन, सुलेखन, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, मुलाखत, लोकशिक्षण, अनुवाद, अशा अनेक विषयांवरील लेख 'भाषा आणि जीवन'ने छापलेले आहेत. लेखसूची, संदर्भसूची, लेखनसूची, साहित्यसूची, शब्दसूची परिभाषासूची अशा विविध सूची उपलब्धतेनुसार छापण्यावरही आमचा कटाक्ष आहे. केवळ मराठीच नव्हे, तर अन्य भाषांबद्दलचे लेखन आणि अन्य भाषांमधील लेखनाचे अनुवादही आम्ही छापले.

भाषेच्या अभिमानाचे दुरभिमानात, हेकटपणात आणि इतर भाषांबद्दलच्या तुच्छतेत रूपांतर होऊ नये, असे मराठी अभ्यास परिषदेला वाटते. त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्‍न आम्ही 'भाषा आणि जीवन'मध्ये केला आहे. भाषा आणि जीवन'चे अंक ठरवलेल्या वेळीच प्रकाशित होतात, असे नाही. याची आम्हाला जाणीव आहे. अलीकडच्या एक-दोन अंकांतील छपाईही समाधानकारक नव्हती. आम्हांला जाणवणार्‍या तीन अडचणींचे ते दृश्य रूप आहे. लेखनाचा तुटवडा, कबूल केलेले लेखन वेळेवर (कधी अजिबात) हाती न येणे ही पहिली अडचण. लेखकांशी प्रत्यक्ष व टपालाने संपर्क साधणे, नवीन लेखक शोधणे, विषयांची यादी देऊन त्यावरील लेख पाठविण्याचे जाहीर आवाहन करणे असे काही उपाय या पहिल्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही वापरले. दुसरी अडचण आर्थिक क्षमतेच्या अभावाची. सभासदांची वर्गणी, साहित्य, आणि संस्कृती मंडळाचे अनुदान आणि आता महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेले पारितोषिक यांमुळे आर्थिक अडचण काही प्रमाण काही प्रमाणात दूर होते. तरीही कागद व मुद्रणाच्या वाढत्या दरांमुळे आणि टपालखर्चामुळे आर्थिक अडचण आमची यापुढेही सोबत करीत राहील, अशी शक्यता आहे. मुद्रणतंत्रात होणारे बदल आणि त्यामुळे वेळोवेळी करावी लागलेली नवी मुद्रणव्यवस्था ही आमची तिसरी अडचण. तीही आम्ही प्रयत्‍नपूर्वक दूर करीत आहोत. आत्तापर्यंत आम्हांला वाचकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. आमच्या प्रयत्‍नांचे त्यांनी स्वागत केले, कौतुक केले, काही वेळा आमच्या चुकाही दाखवून दिल्या. पण त्यांच्या यापेक्षा अधिक सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या लेखनाबद्दलच्या प्रतिक्रिया पाठवण्याबरोबरच त्यांनी लेखनसहकार्यही करायला हवे. ऐकू येणारे संवाद, इतरत्र वाचायला मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण लेखन, भाषेच्या वापराबद्दलची आपली निरीक्षणे, इ० अनेक गोष्टींबद्दल त्यांना लिहिता येईल. विशेषतः पानपूरकांसाठी त्यांना मजकूर पाठवता येईल. पानपूरके हे 'भाषा आणि जीवन'चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची संख्या रोडावल्यामुळे 'भाषा आणि जीवन'मधील पांढर्‍या जागेचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. वाचक जागरूक राहिले, तर पुन्हा एकदा पानपूरकांचे पीक चांगले येईल, अशी आम्हांला आशा आहे.

'मराठी अभ्यास परिषदे'ची स्थापना १ जानेवारी, १९८२ ला झाली आणि १९८३ च्या तिसर्‍या तिमाहीत 'भाषा आणि जीवन'चा पहिला अंक बाहेर पडला. त्यानंतर 'का०स० वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था', 'महाराष्ट्र प्रतिष्ठान' या अशासकीय संस्थांची आणि शासनपुरस्कृत 'राज्य मराठी विकास संस्थे'ची स्थापना झाली. त्यामुळे मराठी अभ्यास परिषदेने आपल्यासाठी आखून घेतलेले कार्यक्षेत्र किती महत्त्वाचे व तातडीचे आहे, हे सिद्ध झाले. एखाद्या कार्याला जेवढे जास्त हात लागतील, तितके ते अधिक हलके होते आणि आटोक्यातही येते. शासकीय पातळीवरील संस्थेकडे जशा अनेक सुविधा असतात, तशा तिच्यावर अनेक मर्यादाही असतात. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या विविध कामांमध्ये शासनाला अशासकीय संस्थांचे भरघोस व महत्त्वाचे साहाय्य होऊ शकते ही वस्तुस्थिती आता केंद्र व राज्य शासनांनीही मान्य केली आहे. म्हणून शासकीय पातळीवरील संस्थेने उद्या एखादे नियतकालिक सुरू केले, तर 'भाषा आणि जीवन'ची गरज संपणार नाही. नुकत्याच जाहीर केलेल्या पारितोषिकामुळे 'भाषा आणि जीवन'बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे, याची आम्हांला जाणीव आहे. वाचकांच्या प्रेमाबरोबरच त्यांचा सक्रिय सहभाग वाढत्या प्रमाणात मिळाला, तर आमचे काम सोपे होईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.

प्रभाकर नारायण परांजपे

पहिल्या अंकाचे संपादकीय : भाषा आणि जीवन


ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात वाणीला उद्देशून एक ऋचा आहे (१० : ७१ : ४)

उत त्वः पश्चन्न ददर्श वाचम् उत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम्
उतो त्वस्मै तन्वं विसस्त्रे जायेव पत्य उशती सुवासाः

(अर्थ : तो वाणीला पाहतो पण पाहतच नाही, तो तिला ऐकतो पण ऐकतच नाही, पण त्याच्यापुढे वाणी आपल्याला संपूर्ण प्रकट करते, जशी उत्तम वस्त्र ल्यालेली पत्नी पतीच्यापुढे.) मूळ कवीला वाणीच्या गूढ स्वरूपाविषयी काही सूचित करायचे असावे. पण मला मात्र तुमच्याआमच्या प्रकट वाणीच्या अभ्यासकाला सुद्धा यातून काही सूचित होते असे वाटते. भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चाराचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो, पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही तोपर्यंत ती त्याच्या अधीन होत नाही, आपले सगळे गुपित त्याला सांगत नाही. आणि भाषेवर प्रेम करायचे तर तिला ती ज्या व्यवहारात परिणत होते आणि ज्या भाषाव्यवहारातून जन्म घेते त्या भाषाव्यवहारात, संपूर्ण जीवनाच्या संदर्भातच पाहता आले पाहिजे. भाषेत जीवन ओतप्रोत भरलेले आहेत. किती ते परभाषीयाच्या चष्म्यातून आपल्या भाषेकडे पाहू लागले की तेव्हाच जाणवते.

    पण भाषा आणि जीवन यांचे हे अतूट नाते इथेच संपत नाही.भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे. कसे ते पाहा. पांढरपेशा मुलाची पाण्याशी ओळख होते आणि दलित मुलाची पाण्याशी काही निराळी ओळख होते-- 'पाणी' हा एकच शब्द त्यांना काहीशा वेगळ्या जीवनभरल्या अर्थांची ओळख त्यामुळे पटवतो. जीवन भाषेला व्यापते ते असे. ओतप्रोत, काठोकाठ, शिगोशीग हे तीन काहीशा समान अर्थांचे पण वेगळ्या प्रतिमा घेऊन येणारे शब्द पाहा. (प्रतिमा अनुक्रमे उभेआडवे विणलेले धागे, पाण्याने भरलेले भांडे, धान्याने भरलेले माप). या प्रतिमाही इंग्रजीलाही ठाऊक आहेत : warp aud woof, full to the brim, पण या इंग्रजी शब्दांनी आपले समाधान होत नाही, अधिकपणा सुचवण्यासाठी रूपाची पुनरुक्ती साधण्याची खास भारतीय लकब त्या शब्दांत नाही. (उगीच नाही इंग्रजी बोलताना भारतीय माणसाला same to same, little little knowledge असे इंग्रजीला ठाऊक नसणारे प्रयोग करावे लागत!) जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते. भाषा जीवनाला व्यापते ती अशी.

    कधीकधी या लकबीचा वैताग येतो हे मात्र खरे, 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे' हे माझे वाक्य ऐकल्यावर तुम्ही मनात तडफडला असाल (वैताग ! लागला हा माणूस भाषिक कोलांट्या मारायला ). एव्हाना तो वैताग निमाला असेल असे वाटावे.
                
                                                                अशोक रा. केळकर