जागतिकीकरणाच्या संदर्भात मराठी अस्मिता

अस्मिता याचा अर्थ आपल्या सत्त्वाची जाणीव असणे. अभिमान याचा अर्थ कदाचित गर्व असाही होईल. त्यामध्ये दंभ असू शकतो. दंभ अगर गर्वामध्ये अहंकार आहे. अस्मितेमध्ये सत्त्व आहे. भाषिक अस्मिता याचा अर्थ असाही होऊ शकतो की, माझ्या सत्त्वाची मला जाणीव आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व ही माझी 'ओळख' आहे. ती पुसताना वेदना होणार आहेत. 'विज्ञान आणि तंत्रज्ञाना'त झालेल्या क्रांतीमुळे, आधुनिक मानवाला आपल्या 'संस्कृती'चा शोध घेताना इतरांकडून घेण्याची आपली क्षमता किती आहे, यावर 'अस्तित्व' अवलंबून आहे. 'अस्तित्व' टिकवल्यानंतरच 'अस्मिते'चा जन्म होतो. आजच्या संक्रमणकाळात त्याचबरोबर जागतिकीकरणातून जे घडू लागले आहे, त्यातून 'माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांती'ने जगभरातील अनेक बोलीभाषा मृत्युपंथाला लागतील, असे भाषा वैज्ञानिक सांगू लागले आहेत.

आजचे सामाजिक वास्तव काय आहे? आजचा प्रगत समाज तो आहे की, ज्यांना या व्यवस्थेत सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांची प्रगती झाली आहे. जे संधीपासून वंचित आहेत, ते मागास राहिले आहेत. जे मागासलेले आहेत त्यांचा 'बुद्ध्यंक' कमी आहे, असा याचा अर्थ नाही. मागासलेपण हे संधीमधील विषमतेचे 'अपत्य' आहे. आज इंग्रजी ही प्रगत ज्ञान-विज्ञानाची, उच्च शिक्षणाची भाषा बनली आहे. केवळ इंग्रजांची ही भाषा राहिलेली नाही. भारतात इंग्रजी बोलणार्‍यांची संख्या ही इंग्लंडपेक्षाही जास्त आहे. हा वर्ग सर्व प्रकारच्या निर्णयप्रक्रियेमध्ये आहे. 'बहुजन समाज' हा आपल्या मातृभाषेतून आपला दैनंदिन भाषिक व्यवहार करतो आहे. बहुजनांना आपली उन्नती करून घ्यायची असेल, तर त्यांना 'निर्णयप्रक्रिये'त सहभागी व्हावे लागेल. त्यासाठी त्यांना ज्या भाषेत 'निर्णयप्रक्रिया' सुरू आहे, त्या भाषिक व्यवहारात सहभागी व्हावे लागेल. तरच त्यांचे 'अस्तित्व' टिकणार आहे.

अशा या संभ्रमित कालखंडात प्रगत समाज हा बहुभाषिक समाज असणार आहे. एकभाषिक समाज हा मागासलेला समाज असणार आहे. 'भाषिक अस्मिता' ही आपल्या सत्त्वाशी निगडित असल्याने इतर 'प्रगत भाषा' अवगत करताना आपल्या 'मातृभाषे'वर हे आक्रमण आहे, असा भ्रम होऊ शकतो. परंतु 'भाषा- विज्ञान' असे म्हणते की, मातृभाषेचा पाया उखडून कोणतीही इतर भाषा आत्मसात करणे चुकीचे आहे. ज्यांचे मातृभाषेवर प्रभुत्व असते, तेच इतरही भाषांवर प्रभुत्व मिळवू शकतात. आपल्या मातृभाषेतून भाषिक व्यवहार करणे कमीपणाचे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मातृभाषा चांगली असल्याखेरीज जगातील कोणतीही भाषा चांगली येऊ शकत नाही. बहुभाषिक प्रगत समाजात अनेक भाषा 'प्रथम-भाषा' राहणार आहेत. पूर्वी मानवी विकासाच्या पहिल्या टप्प्यात 'एकभाषिक' समाज होता. समाजाचे अभिसरण गतीने सुरू असल्याने 'बहुभाषिक' समाजाकडे वाटचाल होत आहे. काही मानववंशशास्त्रज्ञ आणि भाषा वैज्ञानिक असे म्हणू लागले आहेत की, मानवी समाज पुढे एकवंशीय आणि जगाची एकच भाषा असणारा बनेल. आजही एकभाषिक वसाहतवादी इथेही आहे. 'वसाहतवादी' हे शोषण करीत असतात.

'भारतीय भाषां'मध्ये सर्वांत प्राचीन भाषा 'तमिळ' आहे. 'मराठी'ला हजार एक वर्षांची परंपरा आहे. ज्ञानग्रहणाची परंपरा संस्कृतमधून होती. बुद्ध, महावीर आणि बसवेश्वर यांनी भाषिक क्रांती करून जनसामान्यांच्या भाषांना धर्मभाषा बनविले. चक्रधरांनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. इतिहास असेही सांगतो की, प्रतिक्रांती करून यांना संपविण्यात आले. बहुजनांची पुन्हा अधोगती झाली. वर्ण आणि जातिसंघर्ष हा भारतीय समाजात सतत मध्यवर्ती राहिलेला आहे. सर्व प्रकारच्या सत्तेपासून जो समाज दूर फेकला जाईल, तो प्रगती करू शकत नाही. इंग्रजी ही आज जागतिकीकरणाची भाषा आहे. सर्वच भारतीय भाषांना थोर परंपरा आहे, तरीही त्यांना त्या-त्या प्रदेशाच्या मर्यादा आहेत. याचा अर्थ, त्यांच्या वैचारिकतेलाही मर्यादा आहेत असे नाही. तरीही इंग्रजांपासून दूर राहाल तर फेकले जाल.

समाजातील नवशिक्षितवर्ग हा आपल्या मातृभाषेपासून अलग होऊ पाहतो आहे. इंग्रजी भाषा ही जरी प्रगत समाजाच्या भाषिक व्यवहाराची भाषा असली, तरी एकच मातृभाषा असणारे दोन बुद्धिजीवी आपल्या मातृभाषेतून संवाद न करता इंग्रजीतून संवाद करताना दिसतात. इतरांपासून आपण वेगळे आहोत हे त्यातूनच दाखविणे किंवा आपल्या मातृभाषेतून बोलणे मागासलेपणाचे आहे असे वाटणे, यातील फरक आपण समजून घेत नाही. त्यामुळे आपल्या मातृभाषेच्या विकासाला मर्यादा पडतात. आपल्या मातृभाषेची शब्दसंख्याही मर्यादित राहते. ज्या भाषांनी जगभरच्या भाषांतील शब्दांचा स्वीकार केला, त्याच भाषा समृद्ध बनल्या आहेत. म्हणून आपल्याकडून इतरांनी किती घेतले यावरून आपली उंची मोजत बसण्यापेक्षा इतरांकडून, इतर भाषांकडून आपण किती घेतले, हे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच आपल्या भाषेचा विकास होणार आहे. आपले जीवन समृद्ध बनणार आहे.

मानव हा अनेक भाषा बोलणारा आहे. त्यामुळे प्रगत समाज हा बहुभाषिक समाज असणार आहे. भारतातील 'शहरे' हे त्याचे मॉडेल राहणार आहे. या प्रगत समाजात आपल्याच मातृभाषेतून संवाद करण्यासाठी आपल्याच मातृभाषेतील समूह सभोवताली असणार नाही. त्यांच्या मातृभाषा वेगवेगळ्या असणार आहेत. त्यांची संपर्कभाषा म्हणून 'इंग्रजी' घडली आहे. तिला आज दुसरा पर्याय नाही. इतरांशी संवाद साधणे हेच भाषेचे प्रधान उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळया 'ध्वनी व्यवस्था' निर्माण झाल्या. प्रत्येक भाषा वेगळी आहे; कारण प्रत्येक भाषेची 'ध्वनी व्यवस्था' वेगळी आहे. मानवी प्रयत्नांतून ती निर्माण झाली आहे. लिपी ही तर 'ग्राफिक सिंबॉल' आहे. ती उच्चारशास्त्राप्रमाणे असेलच असे नाही.

मानवाला प्रथम आपल्या 'अस्तित्वा'साठी संघर्ष करावा लागेल. जोवर आपण आपल्या मातृभाषांतून दैनंदिन भाषिक व्यवहार करीत राहू, तोवरच त्या भाषा जिवंत राहणार आहेत. दरवर्षी अनेक भाषा मरत आहेत; कारण ते समूह लहान आहेत. आफ्रिकेतील अनेक भाषा मृत्युपंथाला लागल्या आहेत. मराठीतून मोठ्या प्रमाणात व्यवहार आजही सुरू आहे. इंग्रजी भाषा हे आक्रमण नसून इंग्रजी आत्मसात करूनच मराठी जिवंत राहणार आहे; कारण भारतातील 'बहुजन' हे 'बहुभाषिक' आहेत.

इरगोंडा पाटील
दै० महाराष्ट्र टाइम्स, दि० १ मे २००८