आग्रह आणि दुराग्रह

भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. भाषा ही केवळ उच्चारलेल्या किंवा छापलेल्या शब्दांनी बनत नाही. भाषा हा तुम्ही-आम्हीच नाही तर अनेक वर्षे आपल्या पूर्वजांनी केलेला विचार आहे, जगलेले आयुष्य आहे. त्यामुळे आपण मराठीविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या जगण्याविषयी बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी बोलतो. इंग्रजीने तुम्हां-आम्हांला पुष्कळ दिले हे खरे, मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळणार्‍या लोकांविषयीची तक्रार आहे ती इंग्रजीशी भांडण आहे म्हणून नाही, तर ती माणसे कुठेच रुजत नाहीत म्हणून. ती धड इंग्रजीही होऊ शकत नाहीत आणि मराठीशीही त्यांचा संबंध तुटलेला असतो!पुष्पा भावे

भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. भाषा ही केवळ उच्चारलेल्या किंवा छापलेल्या शब्दांनी बनत नाही. भाषा हा तुम्ही-आम्हीच नाही तर अनेक वर्षे आपल्या पूर्वजांनी केलेला विचार आहे, जगलेले आयुष्य आहे. त्यामुळे आपण मराठीविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या जगण्याविषयी बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी बोलतो. इंग्रजीने तुम्हां-आम्हांला पुष्कळ दिले हे खरे, मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळणार्‍या लोकांविषयीची तक्रार आहे ती इंग्रजीशी भांडण आहे म्हणून नाही, तर ती माणसे कुठेच रुजत नाहीत म्हणून. ती धड इंग्रजीही होऊ शकत नाहीत आणि मराठीशीही त्यांचा संबंध तुटलेला असतो!

सत्यजित राय हे वास्तविक पाहता पूर्णत: बंगाली कलाकार. त्यांनी जो अनुभव मांडला तो बंगालमधला; पण आज जगातील प्रत्येक शहरात सत्यजित राय यांचा चित्रपट पोचला आहे. हे आहे वैश्विक होत जाणे!

मुख्य मुद्दा आहे तो संस्कृती रुजवण्याचा. कुठेतरी संस्कृतीत आपल्याला रुजावे लागते. आपण मराठी असू तर मराठीत रुजू. पण मराठी असणे याचा अर्थ केवळ मिरवणुका काढणे किंवा केवळ प्रतीके वापरणे असा होत नाही. मराठी नावाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा साध्या राहणीवर विश्वास होता. दुर्गाबाई भागवत का 'दुर्गाबाई' होऊ शकल्या? कारण त्यांना दोन खादीच्या साडया पुरत होत्या. आज त्या प्रकारे साधे आणि म्हणून स्वतंत्र राहणे अनेकांना अवघड झाले आहे. एवढे सर्वजण वेगवेगळया हव्यासाने बांधले गेले आहेत. मराठी असणे म्हणजे केवळ शिवाजी महाराजांचे नाव घेणे नाही, तर शिवाजी महाराज काय होते ते समजावून घेणे. आज शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍यांना ते फार समजले आहेत असे मला वाटत नाही. शिवाजी महाराजांनी आपली लाडकी लेक बजाजी निंबाळकरांना दिली होती, ज्या बजाजी निंबाळकरांनी आपल्या इच्छेने धर्मांतर केले होते. त्यामागे सामंजस्याची भूमिका होती. सरदारांच्या हातातून शस्त्र काढून घेऊन शिवाजी महाराजांनी ते मावळयांच्या हातात दिले तेव्हा त्यांनी हातात तलवार घेणार्‍यांचे या देशातील सगळे शास्त्रच बदलले. त्यामुळे कुठल्याही मराठीपणाचा विचार करताना, आपल्याला हे जे संचित मिळाले आहे त्याचा विचार करावा लागेल.

आपल्या भाषेचा आग्रह जरूर असायला हवा; पण आग्रह स्वत:साठी, दुसर्‍यांसाठी नाही. आपल्याकडे दुसर्‍याच्या भाषेचा विचार करण्याचा सुंदर इतिहास आहे. गुजरातीचे पहिले व्याकरण लिहिले आपल्याकडील गांधीवादी काकासाहेब कालेलकर यांनी. ख्रिस्तपुराण फादर स्टीफन्सनी लिहिले. आपल्या संस्कृतीचा आग्रह धरणे आवश्यक, पण तो आग्रह धरत असताना दुसर्‍या संस्कृतीचा अधिक्षेप होता कामा नये. ज्या सहजपणे आपण सरदारजींचे विनोद सांगतो, त्या सहजपणे आपण स्वत:ची चेष्टा करतो/सहन करतो का? विनोदामध्ये स्वत:कडे पाहून हसणे हे खूप महत्त्वाचे असते. पण आपण चटकन दुसर्‍याला लक्ष्य करतो. भारत ही अनेक संस्कृतींची भूमी आहे, भाषांची भूमी आहे हे अत्यंत ताकदीचे आहे. प्रांतवर भाषारचना नंतर आली. त्याआधी भारताची भाषा नैसर्गिक रचनेनुसार असे. सोलापूरला जा, माणसे द्वैभाषिक होताना दिसतात. ती मराठी बोलतात, कानडी बोलतात, तेलगूही बोलतात. सीमेवरील माणसे एकापेक्षा अधिक भाषा बोलतात. त्यामुळे भाषा हा भांडणाचा मुद्दा करण्याची गरज नाही.

आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारून पाहावे की मराठीचा वापर कमी झाला आहे याला मी स्वत: जबाबदार आहे की नाही? व्यवहाराचा मुद्दा सांगून आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो तेव्हा हे विसरतो की जयंत नारळीकर बनारसला हिंदी भाषेतून शिकले, जे जगविख्यात वैज्ञानिक झाले आणि नंतर त्यांनी मराठीतून विज्ञानकथांचे लेखन केले. माणसाला अधिक भाषांचे संचित मिळाले की मनुष्य अधिक संपन्न होतो. केवळ संपन्नच नव्हे तर उदारहृदयी होतो, त्याची नजर विस्तृत होते.

माझा आक्षेप आहे तो मुठी आपटून भाषेविषयी बोलण्यावर. आज या मुठी आपटणार्‍यांचा तरुणांवर खूप प्रभाव आहे. या तरुणांनी मुठी आपटणार्‍यांच्या मागे राहावे यासाठी भाषाभिमानाचे कारण पुढे केले जाते; तेव्हा त्या तरुणांच्या प्रयत्नांची ईर्ष्या कमी होते. ही ईर्षा कमी होण्याला माझा आक्षेप आहे. तुम्हांला नोकर्‍या मिळत नाहीत, कारण परभाषकांना नोकर्‍या मिळतात. तुम्हांला नोकर्‍या मिळत नाहीत, कारण परप्रांतीयांना नोकर्‍या मिळतात... हे सारखे-सारखे सांगत राहण्याने ते सोपे वाटत जाते.

एका संस्थेतील नोकरीची संधी मराठी तरुणांना मिळावी म्हणून कानाकोपर्‍यात त्याची जाहिरात पोहोचविली, माहिती दिली; पण फक्त दोन मराठी मुले आली आणि बाकी सर्व अमराठी, असेही अनुभव आहेत. त्यामुळे आपण मराठी मुलांना त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे प्रोत्साहन देणार की नाही? सारखी सोपी कारणे दाखविली तर ते गप्प बसणार, कधी तरी आपले नेते आपले भले करतील अशी आशा बाळगत राहणार. अशी आशाळभूतांची सेना समाजाला वर येऊ देईल का? मराठी पेय प्या यासारख्या अनेक गोष्टी जागतिकीकरणाविरोधी प्रचार करताना आम्ही गावोगावी सांगतो. पण या वरवरच्या गोष्टींनी मराठीपण येईल का? खरोखर मराठी मराठी म्हणून ओरडणारी माणसे मराठी वाचतात का? मराठीकडे गंभीरपणे पाहतात का असाच माझा प्रश्न आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारखी संस्था डबघाईला येऊन अनेक वर्षे झाली. आम्ही खूप प्रयत्न केले. दुर्गाबाई आणि मी उपोषणाला बसलो. तरी पुढे काही झाले नाही. अशी एखादी संस्थासुद्धा आपल्याला चालवता येत नाही? लाखो रुपये खर्च करून जिथे प्रत्येक उपनगरात देवळे बांधली जातात त्या महाराष्ट्र देशी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय चालत नाही, मराठीच्या संशोधनासाठी जागा निर्माण होत नाहीत याला केवळ शासनच नव्हे; तर आपणही जबाबदार आहोत.

एक काळ होता गौरवाचा. केतकरांनी एकहाती ज्ञानकोश तयार केला. शास्त्रीबुवांनी संस्कृतिकोश केला, पण आता त्यासाठी संस्था उभ्या कराव्या लागतील. ही कामे प्राधान्याने हाती घ्यावी लागतील. त्यासाठी झिजणारे तरुण हवेत. केवळ घोषणांनी मराठीचे भले कसे होणार? आंदोलने महत्त्वाची आहेतच; पण तोंडात भडकावली; त्याऐवजी हात जोडून सत्याग्रह केला असता तर मराठीची शान वाढली असती.

प्रत्येक गोष्ट मला किंवा माझ्या नेत्याला पटलीच पाहिजे हे विपरीत आहे. लोकशाहीविरोधी आहे. सगळे आपल्या मनाप्रमाणे घडू शकणार नाही. सेन्ससचे भाषांतर करताना आपण शिरगणती हा शब्द वापरतो. धडगणती म्हणत नाही. ज्याला खांद्यावरचा विचार करण्याचा भाग आहे तो नागरिक. नेतृत्वाची केवळ भाषा संमोहक असणे पुरेसे नाही; लोकशाहीतील वक्तृत्व दुसर्‍याच्या विचारांना प्रवृत्त करणारे असावे. हात उचलून संवाद कसा होईल? थोडीशी त्या हातालापण शिस्त लावायला हवी. हाही मराठी संस्कृतीचाच भाग आहे.

मराठी संस्कृतीला तर इतके आयाम आहेत, ती अभिजनांची आहे, बहुजनांची आहे. ज्यांना ज्ञानेश्वर हा शब्द उच्चारता येत नाही त्यांनी ग्यानबा-तुकोबा म्हणत मराठीला जपले. छपाई नसताना, पाठांतराने वाढवले. मराठी या सगळया वेगवेगळ्या लोकांची आहे. बायाबापड्यांची आहे याची कृतज्ञता जाणली पाहिजे. त्यांच्या जगण्याशी माझे काय नाते आहे याचा विचार आजच्या पिढीला शिकवला नाही तर मराठीविषयी ओरडणार आणि नंतर डिस्कोला जाणार अशी विसंगती निर्माण होते.

मराठी भाषा आणि मराठी असण्याबद्दलचा अभिमान बरोबर आहे. पण त्या अभिमानाचा अहंकार आणि पोकळ अहंकार होणार नाही; हे पाहिले पाहिजे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विद्यार्थी म्हणून आम्ही सहभागी होतो. आम्ही जी स्वप्ने पाहिली ती आजही पूर्ण झालेली नाहीत. अनेक शासकीय समित्यांवर काम केल्यावर आज मी अत्यंत ठामपणे सांगू शकते की शासनाच्या पातळीवरील मराठीला मराठी कारकूनच जास्त विरोध करतात. इंग्रजी तर्जुमा तयार असतो, तो मराठीत आणायचा आळस! आज अनेक ठिकाणी हा आळस दिसतो आहे. विचार करण्याचाही आळस आला आहे.

नवीन पिढीतील अनेक मराठी तरुणतरुणी अनेक क्षेत्रांत पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याने मराठीला निश्चितच उंची मिळेल. अशा वेळी आम्ही ठरवू चित्रपटांत काय दाखवायचे ते आणि आम्ही ठरवू कलाकारांनी काय करायचे ते असे बोलून कसे चालेल? चार मूठभर माणसांनी एकत्र येऊन सर्वांचे मत ठरवणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे महात्मा फुल्यांनीही सार्वजनिक सत्यधर्मात सांगितले आहे. त्यामुळे या प्रकारचा दुराग्रह मोडावा लागेल. मराठीच्या गाभ्यात फार सुंदर गोष्टी आहेत. त्या आपण विसरत चाललो आहोत. तुम्ही मिरवणुकीत किती मिरवता हे महत्त्वाचे नाही. या गोष्टी जपण्यासाठी, तरुणांना तेथपर्यंत नेण्यासाठी, विचार करण्यासाठी प्रयत्न झाले तर काहीतरी निर्माण झाले असे म्हणता येईल. क्रौर्यालाच शौर्य मानणार्‍या, आवेशाला बळी पडणार्‍या तरुणांच्या फौजा निर्माण करण्याने काहीही साधणार नाही.

दै० लोकमत, दि० २९ नोव्हेंबर २००९

शब्दांकन : दीप्ती राऊत

(प्रेषक : नीलिमा गुंडी)