मराठीतील आघातांचे उच्चार व लेखन

(उच्चारदर्शनासाठी नागरी लिपीची अपर्याप्तता)

आपल्या मराठीसाठी वापरण्यात येत असलेली लिपी ही नागरी किंवा देवनागरी ह्या नावाने ओळखली जाते. हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या तीन भारतीय भाषांनी पूर्वी संस्कृतच्या लेखनासाठी वापरली जाणारी लिपी जशीच्या तशी उचलली. मराठी भाषेसाठी ती आपण अंदाजे एक हजार वर्षांपासून वापरीत आहोत. तिचा स्वीकार करताना ती आपल्या भाषेच्या उच्चारांसाठी पुरी पडते की नाही हे पाहिले गेले नाही.

त्या वेळी व तसे पाहिल्यास मुद्रण सुरू होईपर्यंत केल्या गेलेल्या लेखनाचा उपयोग मोठ्याने वाचण्यासाठी होत असे. तेसुद्धा स्वत: लिहिलेले स्वत:च मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी जास्त. वाचन हे बहुधा प्रकट होत असे. (आपली काही आडनावेसुद्धा त्याची साक्ष देतात : पाठक, पुराणिक, व्यास वगैरे). साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. पोस्ट ऑफिस नव्हते आणि ग्रंथांची सुरुवात 'श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिलेंजी येथ' अशी होत होती.

लोक बोलून व ऐकून भाषा शिकत होते. वाचिक आणि लिखित असे दोन्ही संकेत स्वतंत्रपणे, म्हणजेच परस्परनिरपेक्षपणेदेखील अर्थबोध करून देण्यास समर्थ आहेत हे तेव्हा माहीत झालेले नव्हते. दृष्टिगम्य संकेतांचे स्वत:च श्राव्य संकेतांमध्ये रूपांतर करून (म्हणजे शब्दांचा मोठ्याने उच्चार करून) मग त्या श्राव्य संकेतांपासून म्हणजे ध्वनीपासून लोक अर्थग्रहण करीत होते. अर्थ समजून घेण्यासाठी ते स्वत:ला व इतरांना ऐकवीत होते. लहान मुले वाचावयाला शिकतात तेव्हा त्यांना मोठ्याने वाचावे लागते. मनातल्या मनात वाचून चालत नाही. म्हणजे अर्थग्रहण करता येत नाही. पूर्वीचे वाचक जुन्या पोथ्यांवरून स्वत: नकलून घेऊन मोठ्याने वाचत असत त्यामुळे स्वत: मोठ्याने वाचताना त्यांच्या लेखनात झालेल्या चुका त्यांना त्रास देत नसत. उच्चारसातत्य कायम राखता येत असे. लेखनातल्या र्‍ह्स्वदीर्घांचे महत्त्व नसे. श्रोत्यांच्या कानांना नीट वाटेल (डोळ्यांना नव्हे) असे त्यांना उच्चारता येत असे. आपली हेमाडपंती मोडी अशाच हेतूने आजच्या शॉर्टहॅण्डसारखी वापरली जात होती. ती लिहिणार्‍याच्या मनातले बहुतेक सारे संदर्भ ती वाचणार्‍याला बहुधा माहीत असत.

आज मुद्रणविद्येच्या प्रसारामुळे कोणीएकाने लिहिलेले लाखो लोक वाचतात. नवीन नवीन विषयच नव्हे तर भाषासुद्धा पुस्तकावरून शिकतात. त्यामुळे पूर्वी शब्दांचे जे उच्चार ऐकून माहीत होत होते ते आता नवसाक्षरांसाठी किंवा नवीन विषयांत पुस्तकांच्या माध्यमांतून प्रवेश करणार्‍यांसाठी (त्यांच्या वाचनात अपरिचित शब्द येतात त्यामुळे) अक्षरांच्या साह्याने दाखविण्याची सोय करावी लागणार आहे; पण ही सोय, अर्थात केवळ उच्चार समजावून देण्यापुरती असावी, नित्य लेखनासाठी नको. त्याची कारणे पुढे येतील.

आजपर्यंत लिपिशुद्धीचे विचार, चारदोन अपवाद वगळता, आपल्या लिपीला मुद्रणसुकर बनविण्यासाठी आणि तिच्यातील 'जोडाक्षरांची' संख्या कमी करून तिला यंत्रारूढ करण्यासाठीच झालेले आहेत. आपले यथार्थ उच्चार दाखविण्यासाठी तिच्यात पुरेशा सुधारणा झाल्या नाहीत. केंद्र सरकारने पुरस्कारिलेल्या परिवर्धित देवनागरीमध्येसुद्धा याविषयी पुरेसा विचार झालेला नाही. नि:संदिग्ध अर्थ समजण्यासाठी लेखनात आणि उच्चारात सातत्य पाहिजे आणि तेवढयासाठीच लिप्यंतर नको.

संस्कृत आणि मराठी ह्या दोन अगदी वेगळ्या भाषा आहेत. त्यांमध्ये जननीजन्यभाव नाही असे माझे मत आहे. त्यांची प्रत्येकीची उच्चारप्रकृती वेगळी आहे. त्यामुळे मराठीचे काही उच्चार संस्कृतमध्ये नाहीत आणि संस्कृतचे मराठीत नाहीत. संस्कृतमधल्या स्वरांपैकी 'ऋ''लृ' आणि अर्थात 'ॠ' 'लृ' मराठीत नाहीत. व्यंजनांपैकी 'ञ' नाही. 'मी त्याला यूं यूं बनविले', ह्यामध्ये किंवा यंव्-त्यंव् ह्यामधले उच्चार ञ् किंवा ञो सारखे होतात पण त्याखेरीज ञ चा उच्चार मराठीत अन्यत्र कोठेही आढळला नाही. व्यंजनासारख्या संस्कृत शब्दांमधला ञ् आपल्याकडे न् सारखा उच्चारला जातो. मूर्धन्य ष चा उच्चार मराठीत नाही. ष हा वर्णच नाही म्हणून क्ष नाही. आपल्या ज्या शब्दांमध्ये क्ष हा वर्ण येतो तो शब्द आपण संस्कृतमधून घेतला आहे असे निश्चित समजावे.

संस्कृत नसलेले रिक्षा, बक्षी, नक्षी असे काही शब्द आम्ही वापरतो पण त्यांचे उच्चार रिक्शा, बक्शी असेच आहेत. आम्ही त्यांमधला क्ष हा वर्ण केवळ लेखनसौकर्यासाठी घेतला आहे. मराठीमध्ये ञ नाही म्हणून ज्ञ (ज्ञ) हा वर्णदेखील नाही. ज्ञ चा उच्चार आपण कोठे द्र्य सारखा तर कोठे निव्वळ ग्य सारखा करतो. इतकेच काय तर वँ‌् हा उच्चारसुद्धा मूळ मराठीत कोठेही नाही. तसाच तो उत्तर भारतीय भाषांमध्येही नाही. सिंह, मांस, दंश, वंश, संस्कृत, हंस, संरक्षण, संशय ह्या सर्व शब्दांचा उच्चार करण्यास आम्हांला फार जास्त प्रयत्न करावा लागतो. तो उच्चार करावयाचा मराठी लोक संकोच करतात किंवा मांस, नपुंसक अशांसारख्या शब्दांमध्ये ते तो करीतच नाहीत. अन्यभाषी सिंहला सिंग किंवा सिन्हा, संवादाला सम्वाद असे करीत असतात. आपणही नरसिंहाला हाक मारताना नरसिंग असेच करीत असतो. संयममध्ये सञ्यम सारखा उच्चार होतो पण हा शब्द किंवा 'किंवा' सारखी अव्यये हे सारे शब्द तत्सम म्हणजे संस्कृत आहेत. आपल्या भाषेत तत्सम शब्दांचा भरणा फार मोठा आहे. हे तत्सम शब्द संस्कृत, हिंदी, कानडी, तेलुगू, अरबी, फारसी, गुजराती आणि इंग्लिश ह्या भाषांमधून आलेले ज्ञात आहेत. ह्यांपैकी आपल्या उच्चारप्रकृतीचा परिणाम होऊन जे मुळापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रतिपादनाच्या सोईसाठी तद्भव किंवा देश्य असे मानले आहे.

ह्या निबंधात मराठी किंवा मराठी भाषा हे शब्द जेथे जेथे पूर्वी वापरले आहेत किंवा पुढे वापरले जातील तेथे तेथे ते तत्समशब्दविरहित मराठीचे द्योतक आहेत असे मानावे आणि मराठी म्हणजे तद्भव किंवा देश्य शब्दांनीच बनलेली भाषा असे ह्या निबंधापुरते समजावे.

ह्यानंतर संस्कृत म्हणजे तत्सम शब्दांची उच्चारप्रकृती आणि मराठी म्हणजे तद्भव वा देश्यशब्दांमधून आढळणारी उच्चारप्रकृती ह्यांतील फरक अधिक विस्ताराने पाहू. यासाठी 'जोडाक्षरे' व अनुस्वार, तसेच रेफ (रफार) आणि विसर्गादी चिन्हे ह्यांचा विचार करावा लागेल.

संस्कृतमध्ये सर्व संयुक्ताक्षरांचे उच्चार आघातयुक्त होतात. त्याला अपवादच नाही. म्हणजे येथे छन्द:शास्त्रातील संज्ञा वापरावयाची तर अशा सर्व संयुक्ताक्षरांपूर्वी येणार्‍या वर्णांचा उच्चार दोन मात्रांनी युक्त होऊन त्यांच्या ठिकाणी गुरुत्व येते. मराठीमध्ये मात्र ज्यांचा आघातयुक्त उच्चार होत नाही अशी जोडाक्षरे पुष्कळ आहेत. य ह्या वर्णाने युक्त, ह या वर्णाने युक्त आणि अनुनासिके. जे अनुस्वाराच्या योगाने दाखविले जाते त्याने युक्त असलेली बव्हंश जोडाक्षरे बहुधा निराघात जोडाक्षरे आहेत.

'य' ने किंवा खरे सांगावयाचे तर 'या' ने युक्त जोडाक्षरे फार जास्त आहेत. उद्या, मातक्यात्, म्यान, दरम्यान यांसारखे काही सुटे शब्द ह्या निराघात 'या' वर्णाने युक्त आहेत. पण मुख्य म्हणजे संबोधने : तात्या, बन्या, बग्या, बाळ्या, मन्या, पिल्या, बाब्या, मोळीविक्या, लाकूडतोड्या, हुजर्‍या, पाणक्या, पुतण्या अशा सर्व संबोधनांमध्ये व नामांमध्ये हा निराघात या येत असतो.

दुसरा फार मोठा वर्ग अनेकवचनांचा आहे. वाटया, गाड्या, माड्या, होड्या, वाड्या, साड्या, बांगड्या, ताटल्या, पुर्‍या, सुर्‍या, दर्‍या, कादंबर्‍या इ०

आणखी एक मोठा वर्ग सामान्य रूपांचा आहे. त्याच्या, माझ्या, तुझ्या, पुण्याला, करण्यासाठी, आचार्‍याला, त्याला, दिव्याखाली, खोर्‍याने वगैरे.

ह्या निराघात 'या' चा उच्चार फक्त मराठीत आहे. संस्कृतात नाही. आपण संस्कृतची लिपी घेतली. त्यामुळे विद्या, उद्यान, ह्यांमध्ये येणारा द्या आणि उद्या, लाद्या, गाद्या ह्यांतला द्या ह्यांमध्ये आपण फरक करू शकलो नाही. संस्कृतामध्ये उद्या हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा उच्चार दाखविण्याची त्यांनी सोय केली नाही. त्यामुळे ती मराठीतही आली नाही. पण मराठीला तिची गरज आहे.

उद्यासारख्या शब्दांमधल्या 'या' मुळे होणारे जोडाक्षर निराघात असल्यामुळे तेथले य हे व्यंजन केवलव्यंजन नसून तो अर्धस्वर आहे असे मी मानतो. ह्या अर्धस्वर य पासून जसा मराठीत या होतो तसे यी आणि ये सुद्धा होतात. उदा० गायी (गाई), सोयी (सोई), हुजर्‍ये, पाणक्ये, पुतण्ये, लाकूडतोड्ये, दात्ये, साठ्ये, परांजप्ये, मोत्यें, मी जात्ये, येत्ये वगैरे.

वर उल्लेखिलेल्या सर्व शब्दांमधील य चा उच्चार निराघात आणि त्यामुळे स्वरसदृश आहे. प्रमाण आणि नि:संदिग्ध उच्चारदर्शनासाठी हा स्वरसदृश उच्चार, मराठीत वेगळा दाखविणे, त्याची सोय करणे आवश्यक आहे.

'य' ह्या अर्धस्वरानंतर आपण आता व्यंजन ह आणि महाप्राण यांतील फरक लक्षात घेऊ. हा विचार मांडताना मी पुढे कदाचित चुकीची परिभाषा वापरीन, किंवा जुन्या पारिभाषिक शब्दांचा नवीन अर्थाने वापर करीन. त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्यातला विचार समजून घ्यावा.

कचटतप आणि गजडदब ह्यांपासून अनुक्रमे खछठथफ आणि घझढधभ होताना ते पहिले वर्ण महाप्राणयुक्त होतात असे मी पुढे म्हटले आहे. माझ्या मनातील कल्पना स्पष्ट होण्यासाठी ही व्यंजने अल्पप्राणाची महाप्राण झाली असे न म्हणता ती महाप्राणयुक्त झाली अशी भाषा मी वापरली आहे. त्यामुळे काहीसाठी माझे प्रतिपादन कदाचित दुर्बोध होईल.

मराठीमध्ये महाप्राण खछठथफ आणि घझढधभ ह्या वर्णांप्रमाणेच ण्ह न्ह म्ह य्ह र्‍ह ल्ह व्ह ह्या वर्णांमध्येही येत असतो. संस्कृतात तो येथे कोठेही येत नाही. (मी निराघात य हा अर्धस्वर आणि निराघात ह ला महाप्राण असे मानतो. ह्यामधली णनम ही अनुनासिके तर यवरल हे अर्धस्वर आहेत हे ध्यानात घेण्याजोगे आहे. यवरल ह्या वर्णांचा उपयोग व्यंजनांसारखा आणि अर्धस्वरांसारखा असा दोनही प्रकारांनी होऊ शकतो. व्यंजनांसारखा केल्यास त्यांचा उच्चार आघातयुक्त तर अर्धस्वरासारखा केल्यास जोडाक्षरांमधला त्यांचा उच्चार निराघात होतो. त्यामुळे य्ह व्ह र्‍ह ल्ह यामध्ये कोणतेच व्यंजन नाही, असे म्हणणे भाग आहे. अर्थात शब्दांमध्ये त्यांचा उच्चार निराघात होत असल्यास जेथे असा अर्धस्वर आणि महाप्राण ह्यांचा संयोग झाला आहे तेथे त्यांच्या ठिकाणचे पौर्वापर्य ठरविणे दुष्कर आहे. आजच्या लेखनामध्ये अडचण अशी की ही अक्षरे व्यंजने कधी असतात ते कळत नाही.

ण्ह- कण्हणे, न-न्हावी, उन्हाळा, पन्हे, पन्हाळा, तान्हुल्याला पाहून आईला पान्हा फुटला, म्ह-म्हशी, म्हातारा, म्हणून, आम्ही, य्ह-बय्हा (बावळट ह्या अर्थाचा नागपुरी शब्द) र्‍ह्-तर्‍हा, पर्‍हा, गोर्‍हा, ल्ह-कल्हई, कोल्हापूर, विल्हेवाट, वल्हवणे, वेल्हाळ, व्हा-जिव्हाळा, जिव्हारी, न्हावाशेव्हा, चव्हाण, पाव्हणा, देव्हारा इ० आता उच्चारलेल्या सर्व शब्दांमधला हा हे व्यंजन नसून तो महाप्राण आहे, असे मी मानतो ह्याचे कारण महाप्राणाचे लक्षण अर्धस्वराप्रमाणे निराघात उच्चार हे आहे असे मला वाटते. ह हे येथे व्यंजन असते तर त्याचा येथे साघात उच्चार करावा लागला असता. हा महाप्राण आपण व्यंजनासारखा लिहितो, हा आपल्या मराठी लेखनातला दोष आहे. आपण अशा दोषांसाठी रोमन आणि उर्दू या लिप्यांना हसतो, पण आपल्या मराठीच्या लेखनातला हा दोष अतिपरिचयामुळे आपल्याला त्रास देत नाही. तो पुरतेपणी आपल्या ध्यानातही आला नाही.

महाप्राण सगळीकडेच व्यंजनाप्रमाणे लिहिला तर काय होईल बघा. क मध्ये महाप्राण घातल्यावर तो क्ह असा होत नसतो तर ख असा होत असतो. अखण्ड ह्या शब्दाचा उच्चार ह हे व्यंजन वापरून केल्यास अक् हण्ड असा होईल, साघात होईल कारण दोन व्यंजनांचा उच्चार ती एकाच वर्णात आली असताना साघात करावयास हवा आणि त्याच नियमाप्रमाणे साघातमधील घा चा उच्चार साग्हात असा करावा लागेल. ह्या दोन उच्चारांवरून महाप्राण आणि व्यंजन ह ह्यांचा उच्चारांमध्ये कसा फरक आहे ते कळून येईल. पाहा (क-ख, ग-घ, च-छ, ज-झ, ट-ठ, ड-ढ, त-थ, द-ध, प-फ, ब-भ) का बनविली ते कळून येईल. आघातयुक्त उच्चाराबद्दलही काही गैरसमज आहेत. दिव्यातून आणि दिव्यांतून यामधील दुसर्‍या दिव्यामध्ये दोन व येतात असा काहींचा समज आहे. तेथे एकदाच व् आणि त्यानंतर दुसरे व्यंजन य हे आले असल्यामुळे त्याचा उच्चार आघातयुक्त होतो इतकेच.

'छ' ह्या अक्षराचा उच्चार मात्र वरच्या नियमाला अपवादात्मक आहे. ते महाप्राणयुक्त लिहिले जात असले तरी तेथे मुद्दाम आघात घ्यावा अशी संस्कृत भाषेची सूचना आहे. (मराठीची नाही.) त्यासाठी 'ह्रस्वस्य पिति कृति तुक्' असे सूत्र आहे. ह्या सूत्राप्रमाणे कोठल्याही ह्रस्व वर्णापुढे छ हा वर्ण आल्यास नियमाने आणि दीर्घ वर्ण आल्यास विकल्पाने तुगागम करावा, (तेथे एक जास्तीचा त् घालावा) असा नियम सांगितला आहे. उदा० वि+छेद = विच्छेद, परि+छेद = परिच्छेद, शब्द+छल = शब्दच्छल, मातृ+छाया = मातृच्छाया, पितृ+छत्र = पितृच्छत्र इ० एखाद्या दीर्घस्वरानंतर विकल्पाने तुगागम होत असल्यामुळे लक्ष्मीछाया आणि लक्ष्मीच्छाया अशी दोनही शुद्ध रूपे सिद्ध होतात. नाहीतरी दीर्घ वर्णांच्या उच्चारानंतर आघाताची आवश्यकता कमी झालेली असते. आघात घेण्याचा हेतू उच्चारात त्या वर्णाच्या ठिकाणी गुरुत्व आणणे असा आहे. तो हेतू दीर्घत्वामुळे साध्य झालेलाच असतो. शिवाय च्छ आणि च्ह ह्यांच्या उच्चारांमध्येही सकृद्दर्शनी जाणविण्यासारखा भेद नाही.

मराठीमध्ये पडछायासारखे 'छ' चे निराघात उच्चार होत असतात. परिणामी मराठीत अन्नछत्र, पितृछत्र, मातृछाया, मुक्तछंद, नाटयछटा, रंगछटा अशी संस्कृत शब्दांची (चुकीची) सामासिक रूपे रूढ झाली आहेत. उलट संस्कृत भाषेची जेथे शक्य असेल तेथे आघात घेण्याची प्रकृती असल्यामुळे तिच्यामध्ये उद्+हर = उद्धर, तस्मिन् + एव =तस्मिन्नेव्, इन्+अन्त = इन्नन्त असे संधी होत असतात. मराठीमध्ये एक+एक = एकैक असा संधी होत नाही तर एकेक असा उच्चार आपण करीत असतो.

खघछ ह्याविषयी सांगून झाले. ठथफझढधभ ह्या महाप्राणयुक्त अक्षरांबद्दल वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

व्यंजन र् हा वर्णदेखील मराठीत नसल्यासारखाच आहे. र हा स्वरयुक्त (अजन्त-एकाच्) वर्ण मराठीत आहे. पण संस्कृतमध्ये (व्यंजन र्) पुष्कळ ठिकाणी वापरला जातो. तसा तो मराठीत आढळत नाही. व्यंजन र् चे चिन्ह संस्कृतात रेफ किंवा रफार (र् ) हे आहे. ते ज्या शब्दांमध्ये आहे ते सर्व शब्द मराठीतर आहेत असे समजावे. ह्या रेफाने युक्त शब्द बघा : अर्क, मूर्ख, वर्ग, अर्घ, शार्ङ, अर्चा, जर्जर, निर्झर, अर्णव, आर्त, अर्थ, सूर्य, पूर्व, कीर्ती, मूर्ती असे असंख्य.

मराठीमध्ये सर्रास, हर्रास, किर्र, कोकर्डेकर, किर्लोस्कर, वगैरे शब्दांमधला रेफ व्यंजन र् चा द्योतक नसून निभृत र चा आहे. किरलोसकर (गावाचे मूळ नाव किरलोसी असे आहे.) कोकरडेकर (गावाचे नाव कोकरडा, स्थानिक उच्चार कोकल्डा असासुद्धा होतो.) असे हे मूळचे शब्द, शब्दांमधल्या काहींचे मधल्या किंवा शेवटच्या अक्षरांचे उच्चार निभृत करण्याच्या आपल्या पद्धतीप्रमाणे आणि उच्चारानुरूप केलेल्या लेखनामुळे किर्लोस्कर, कोकर्डेकर असे लिहिले जाऊ लागले.

सर्रास, हर्रास आणि किर्र ह्या शब्दांमध्ये मात्र व्यंजन र् चा उच्चार होतो असे मला वाटू लागले आहे. ह्या ठिकाणी ह्या शब्दांमुळे मराठीच्या उच्चारप्रकृतीचा आणखी एक विशेष आपल्या लक्षात येणार आहे. मराठीत किंबहुना सर्वच देश्य उत्तर भारतीय भाषांमध्ये जी आघातयुक्त जोडाक्षरे आहेत ती बहुधा ज्यांच्यामध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे अशी आहेत. या नियमाला मला आतापर्यंत दोनचारच अपवाद दिसले आहेत. आधी नियम पाहू व मग अपवाद.

नियम असा की मराठी शब्दांमध्ये असलेली जोडाक्षरे एकाच वर्णाचे द्वित्व होऊन होतात. उदा० कल्ला, किल्ला, गल्ला, हल्ला, हल्ली, गिल्ला, गिल्ली, दिल्ली, सल्ला, बल्ली, फल्ली, कच्चा, पक्का, खड्डा, जख्ख, मख्ख, चक्क, गच्ची, खच्ची, कच्चीबच्ची, लुच्चा, थुच्चा, सच्चा, झक्की, नक्की, चक्की, कित्ता, पत्ता, भत्ता, गुत्ता, ढिम्म, घुम्म, गप्प, मुद्दा, गुद्दा, हुद्दा, पट्टा, बट्टा, थट्टा, चिठ्ठी, विट्टी, सुट्टी, पट्टी, बट्टी, चट्टी, भट्टी, खट्ट, घट्ट, गट्ट, मठ्ठ, लठ्ठ, आप्पा, बाप्पा, अण्णा, भय्या, अय्या, इश्श, वगैरे वगैरे.

अपवाद फक्त स्त, क्त ह्या वर्णांचा (गोष्ट हा शब्दसुद्धा गोठ असा उच्चारला जात असे) उदा० फस्त, मस्त, शिस्त, भिस्त, सुस्त, स्वस्त, जास्त, दुरुस्त, फक्त, मक्ता वगैरे.

आपण मराठीत ज्याला अनुस्वार म्हणतो ते पुष्कळ ठिकाणी नुसते बिन्दुचिन्ह असते. मराठीतल्यासारखा त्याचा गैरवापर अन्यत्र क्वचित झाला असेल. ते एकच चिन्ह मराठीने संस्कृत भाषेतील अनुस्वार म्हणून ङ्ञ्ण्न्म् आणि वँ् या अनुनासिक व्यंजनांच्या ऐवजी; अं, हं, सारख्या अनुनासिका उच्चारांसाठी; दोन सारख्या शब्दांमधला अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी, नामांच्या ठिकाणी तृतीया, सप्तमी अशा विभक्तींचा, बहुवचनाचा, नपुंसकलिंगाचा आणि क्रियापदांच्या ठिकाणी अपूर्ण वर्तमानकाळाचा आणि प्रथमपुरुषी कर्त्याचा असे निर्देश करण्यासाठी इतकेच नव्हे तर खास मराठीचे जे उच्चार आहेत - झालं, केलं, गेलं इत्यादी, ते दाखविण्यासाठीही सरसहा वापरले आहे. त्यामुळे वाचकाची कोठे अर्थ समजण्याच्या बाबतीत सोय तर कोठे उच्चार करण्याच्या बाबतीत गैरसोय झाली आहे.

अनुच्चारित अनुस्वार हा वदतोव्याघात आहे. मराठीत आपण वापरतो ते वास्तविक बिन्दुचिन्ह आहे. म्हणून अनुस्वार व बिन्दुचिन्ह ह्यांच्या खुणा वेगळया असणे आवश्यक आहे. अनुच्चारित अनुस्वार म्हणून आपण संस्कृतची परिभाषा चुकीच्या अर्थाने वापरीत आहोत. 'सर्वांशी मिळून मिसळून राहा म्हणजे तू सर्वांशी यशस्वी होशील' ह्या वाक्यांतील दुसर्‍या सर्वांशी (सर्व अंशांनी) हा उच्चार मराठीत नाही आणि पहिला उच्चार संस्कृतात नाही.

अनुस्वार (बिन्दुचिन्हे नव्हे) आणि रफार ही दोनही व्यंजनचिन्हे आहेत. ही दोनच व्यंजने शिरोरेखेच्या वर येणारी व्यंजने होत. ज्या अक्षरांवर ती येतात ती अक्षरे त्यामुळे जोडाक्षरे मानली गेली पाहिजेत. रेफ हे चिन्ह नेहमीच अक्षरातील स्वरांशाला चिकटलेले असते आणि अनुस्वार तसा नसतो. त्यामुळे रेफ हा त्याच्या खाली लिहिलेल्या अक्षराच्या आधी उच्चारला जातो आणि न चिकटलेला अनुस्वार नंतर.

अनुस्वार आणि चंद्रबिंदू यांच्यातही फरक करणे भाग आहे. अनुस्वार हा अनुनासिक व्यंजनाचा आघातयुक्त उच्चार असून चंद्रबिंदू हा स्वरांना होणारा विकार आहे व त्यामुळे तो निराघात आहे. पण मग इंग्रजी शब्दांमधले अँड, बँक सारखे उच्चार दाखविण्यासाठी निराळी सोय करावी लागेल. आणि आपला चंद्रबिंदू कँवरसाहेब, हँ हँ आणि हँ हँ हँ (हं हं आणि हं हं हं हे श्री० दिनकर देशपांडे यांच्या एका नाटकाचे नाव आहे) अशा उच्चारांसाठी वापरला तर अँ साठीही वेगळे चिन्ह शोधावे लागेल.

बिन्दुचिन्हांचे प्रकार

1. खणखणीत अनुनासिक व्यंजन उदा० (क) शिंके, पंखा, गंगा, तंटाभांडण, भिंत, तिंबूनाना (येथे परसवर्णाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार होतो.)
2. चिंच, मांजर, पंछी, पंजा (येथे परसवर्णाप्रमाणे उच्चार होत नाही कारण मराठीत ञ् आणि वँ नाहीत.)
2. अनेकवचनदर्शक : उदा० शब्दांमध्ये, लोकांसाठी, सर्वांपर्यंत
3. अनुनासिक स्वर उदा० अं, आं, इं, ईं, उं, ऊं, - अं, हं! वगैरे
4. झालं, केलं, गेलं असे उच्चार.

अनुच्चारित (नवीन प्रमाण लेखन-नियमांनुसार हे अनुस्वार लिहिले जात नाहीत.)

1. विभक्तिप्रत्यय - (मीं, तूं, आम्हीं) काळ (जातां, जातां) करूं - कर्ता (डोळयांनी बघतों, ध्वनी परिसतों कानीं, पदीं चालतों)
2. अर्थभेद - (नांव, कांच, पांच) - (क्रियापदें, आज्ञार्थी क्रियापदें, करीं, देईं)
3. लिंग - नपुंसकत्वाचा निर्देश (गुरुं, कुत्रीं, कार्टीं, कोकरूं, लेकरूं लिंबूं)
4. अव्यये - मुळें, साठीं, करितां

मराठीत पुष्कळशा अक्षरांचे उच्चार निभृत होत असतात. त्यांपैकी काही दाखविण्याचा तर काही न दाखविण्याचा प्रघात पडला आहे. दोन्ही, तिन्ही, चार्‍ही मधील निभृत उच्चार व्यंजनांसारखे दाखविले आहेत. उदगीर, नागपूर, यांमध्ये तसे ते होत असले तरी ते दाखविण्याची पद्धत नाही.

संस्कृत भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या चिन्हांनी मराठीत निभृत उच्चार दाखवू नयेत. त्यासाठी वेगळी चिन्हे निर्माण करावीत. अर्थात हा विचार यथार्थोच्चार-दर्शनाबाबत आहे. नित्यलेखनासाठी नाही.

विसर्गाचा विचार केल्याखेरीज आघातविचार पूर्ण होत नाही. विसर्गाचा उच्चार मराठीच्या प्रकृतीला पूर्णपणे परका आहे. जोडाक्षरांच्या ठिकाणी फक्त एकदाच कोठेतरी आघात घ्यावयाचा इतकेच मराठीला माहीत आहे. त्यामुळे विसर्ग व त्यापुढे 'जोडाक्षरे' असे एका शब्दात एकापुढे एक आले की विसर्गाचा लोप करून फक्त जोडाक्षराचा उच्चार करावयाचा अशी मराठीची प्रकृती आहे. नि:श्वास, नि:स्पृह, मन:स्वास्थ्य, मन:क्षोभ, यश:श्री अशांसारख्या शब्दांचे उच्चार निश्वास, निस्पृह, मनस्वास्थ्य, मनक्षोभ, यशश्री असे होतात. 'दु:ख'चा उच्चार, दुक्ख किंवा दुख्ख असा होतो. विसर्ग आणि जोडाक्षर एकापुढे एक आल्यामुळे एकाच शब्दामध्ये दोन आघात घ्यावे लागतात. पण आघात कमी घेण्याकडे मराठीचा कल असल्यामुळे आणि सरधोपट उच्चार करण्याची तिची प्रवृत्ती असल्यामुळे दोन आघातांचे उच्चार मराठीत कधीच होत नाहीत. उदा० उद्ध्वस्त, उद्द्योत, तज्ज्ञ, महत्त्व इ० महाप्राण, विसर्ग आणि व्यंजन 'ह' ह्यांमधील भेद मराठीला माहीत नसल्यामुळे अक्षरश: सारखे शब्द अक्षरशहाप्रमाणे धिक्कार, धि:कारप्रमाणे, अध:पात, अन्त:करण हे अधप्पात, अंतक्करणाप्रमाणे उच्चारले जातात व त्यामुळे ते तसे लिहिले जातात.

मराठीची उच्चारप्रकृती शक्यतो निराघात उच्चार करण्याची असल्यामुळे जेथे कोठे आघातामुळे गुरुत्व येते तेथे दीर्घत्वाची गरज नाही असे मराठी बोलणारे लोक समजतात. ह्या कारणामुळे प्राविण्य, नाविन्य, प्रित्यर्थ, धुम्रपान, रविन्द्र, दिक्षित, आशिर्वाद, तिर्थरूप, पुर्ण, पुर्व, सुर्य, किर्तन, जिर्णोद्धार, परिक्षा, अधिक्षक असे उच्चार करतात व तसेच लिहितात. मराठीमध्ये शब्दाच्या अन्त्यस्थानी 'अ' स्वर व उपान्त्यस्थानी 'इ' किंवा 'उ' असल्यास ते दीर्घ लिहावे असा नियम आहे. तद्भव शब्दांच्या बाबतीत मराठीची उच्चारप्रकृती लक्षात घेऊन, शिस्त, भिस्त, उंट, सुरुंग, तुरुंग, चिंच, भिंत असे शब्द वर सांगितलेल्या नियमाला अपवादस्वरूप मानावे असे सांगितले आहे. संस्कृत भाषेमध्ये स्वरांचे दीर्घत्व आणि आघात हे दोनही वेगवेगळे मानले गेल्यामुळे कीर्ती, तीर्थक्षेत्र, जीर्णोद्धार, आशीर्वाद, सूर्य, पूर्व, मूर्ख अशा सर्व शब्दांमध्ये दीर्घत्व कायम ठेवून आघात घेतला जातो.

काही सूचना - (कोशांमध्ये उच्चारदर्शनासाठीच वापरण्यासाठी; नेहमी लिहिण्यासाठी नाही.) रेफ किंवा रफार हे चिन्ह दर्या-दर्‍या, आचार्यांना-आचार्‍यांना अशा उच्चारांतील फरक दाखविण्यासाठी आपण वापरीत असतो. ते तसेच वापरीत राहावे. अर्धस्वर दाखविण्याची सोय जर वेगळया पद्धतीने करता आली तर अर्धा र् (र्‍) त्या चिन्हाची गरज पडणार नाही, कारण ते सध्या निराघात व्यंजन र् दाखविण्यासाठी वापरले जात आहे.

निराघात 'या' दाखविण्यासाठी विनोबांनी लोकनागरीमध्ये सुचविलेला म् असा कान्या वापरण्यास काही हरकत नाही. त्यामुळे रजा आणि राज्य ह्या दोन शब्दांचे सामान्यरूप डोळयांस वेगळे दिसेल.

आपल्या लिपीतील एका स्वरयुक्त उच्चारासाठी एक अक्षर ही कल्पनाच मोठी मनोरम आहे. उध्द्वस्तमधल्या ध्द्व मध्ये तीन व्यंजने व त्यांच्याबरोबर एक स्वर, धाष्टर्य मध्ये चार व्यंजनांच्या सोबत एक स्वर, कार्त्स्न्यमध्ये पाच व्यंजने-स्वराच्या आधी व एक नंतर अशा सहा व्यंजनांचे एक अक्षर आपण लिहितो. कमी अक्षरांमुळे नि:संदिग्धता येण्यास मदत होते. जलद वाचनास व अर्थग्रहणासही साह्य होते हा आपल्या लिपीचा गुण नष्ट होऊ देऊ नये. आपल्या डोळयांना एकाच प्रकारच्या जोडाक्षरांची सवय व्हावी असे मी मानतो. एकच जोडाक्षर जर नेहमी वापरावयाचे तर ते पूर्वीपासूनचेच का नको असा मला प्रश्न पडतो. त्यासाठी एक आपद्गस्त हा शब्द मी लिहून दाखवितो : 'आपद््‍ग््‍रद्ग्रस्त', 'आपद्ग्रस््त', 'आपद्गरस्त', 'आपद्गरस्त' - वगैरे. हे अनेक पर्याय डोळयांना त्रासदायक होतात म्हणून त्यांच्यापैकी एका रूपाचे प्रमाणीकरण करावे. छापताना सर्वत्र एकच प्रमाणित रूप वापरावे. थोडक्यात काय तर वाचकाची सोय लेखकाने आणि मुद्रकानेही पाहावी.

मराठीतले दंत्यतालव्य च, ज, झ, देहे दु:ख हे सूख मानीत जावे ह्यांतील र्‍ह्स्व एकार, कोठे र्‍ह्स्व ओकारही असेल, एका मात्रेपेक्षा कमी असलेले काही वर्णांचे अर्ध्या किंवा पाव मात्रेचे उच्चारही असतील. त्यांचा विचार पूर्वी पुष्कळांनी केला आहे. म्हणून मी तो येथे केलेला नाही. त्यातून हा निबंध मुख्यत: आघाताविषयी आहे. म्हणून येथे त्याचाच विस्तार केलेला आहे.

दिवाकर मोहनी
मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर 440010
भ्रमणभाष : 09881900608