आरपार लयीत प्राणांतिक

('आरपार लयीत प्राणांतिक' - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५. मूल्य रु० ६०/-)

कवयित्री प्रज्ञा पवार यांची 'आरपार लयीत प्राणांतिक' ही दीर्घकविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या लावणीसम्राज्ञीच्या जगण्याचे सारसर्वस्व शब्दांकित करण्याचा प्रयत्न करते. काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे. डॉ० माया पंडित यांनी 'निमित्ताने' या प्रस्तावनेतून दलित-कष्टकरी स्त्रीच्या सांस्कृतिक संघर्षाची वाचकांना जाणीव करून दिली आहे.

'पवळा हिवरगावकर ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर,' तसेच 'लावणीसम्राज्ञी ते जोगवा मागणारी असहाय स्त्री' या विठाबाईंच्या दंतकथासदृश जीवनप्रवासाचे - त्यातील चढउताराचे - दर्शन या दीर्घकवितेतून प्रभावीपणे घडते. पुरुषसत्ताक मनोवृत्तीची दांभिकताही त्यातून उजेडात येते. विठाबाईंविषयीची कवयित्रीची सहसंवेदना यात विविध नात्यांनी घट्ट विणली गेली आहे. स्त्री, दलित आणि कलावंत या तीनही पातळयांवर कवयित्रीला विठाबाईंशी नाते जोडता आल्यामुळे विठाबाईंची व्यक्तिरेखा यात विविध परिमाणांतून साकार झाली आहे.

कवयित्रीने मार्मिक प्रतिमांच्या द्वारे विठाबाईंच्या अभावग्रस्त जगण्याचे शोकात्म रूप आणि कलासंपन्न जगण्याचे दिमाखदार रूप यातील अंतर्विरोध सूचित केला आहे. ''बाई असण्याच्या चिरंतन ढोलकाठीचा खेळ', 'अभावाची ढोलकी', 'भुकेचा आदिम वग', 'षड्- विकारांची ओटी' ही यातील रूपके अर्थगर्भ आहेत. ही दीर्घकविता भावकवितेच्या अंगाने विकसित होते. त्यामुळे यात वर्णन-निवेदन यांना फाटा देऊन भावना-संवेदना-चिंतन यांच्या आवेगातून आलेला प्रवाहीपणा जाणवतो. शीर्षकातूनही याचा प्रत्यय येतो. यातील चिंतन स्त्रीत्व आणि दलितत्व यांच्याशी निगडित शोषणापुरतेच मर्यादित नसून नवभांडवलशाहीच्या नावाखाली लावणीकलाकारांची होणारी लैंगिक लूटही लक्षात आणून देणारे आहे.

''नवजात अर्भकाला जन्म देऊन,
दगडानं त्याची नाळ ठेचून,
पुन्हा फडावर रंगबाजी करताना,
तुझ्या मायांगातून ओघळणारा घाम,
वेदना अश्शी कापत जाते
माझ्या संज्ञेला''

अशा यातील ओळी उत्कट आहेत आणि धारदार उपरोधामुळे जिव्हारी झोंबणार्‍याही आहेत.
कवयित्री आणि विठाबाई यांच्या सहसंवेदनेच्या नात्यावर उभ्या राहिलेल्या या दीर्घकवितेचा बाज लयबद्ध तर आहेच, शिवाय आशयगर्भही आहे.

नीलिमा गुंडी
neelima.gundi@gmail.com