'बंगलो'

'भाषा आणि जीवन' (उन्हाळा २००९)च्या अंकातील' शब्दजिज्ञासा'मधल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचा 'बंगला' हा लेख वाचला. बंगला या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी त्यांनी चांगली माहिती दिली आहे.

इथे दोन संदर्भग्रंथांची आठवण होते. इंग्रजांच्या काळात बरेच भारतीय शब्द इंग्रजीत वापरले गेले. त्या शब्दांबद्दल माहिती देणारे दोन शब्दकोश म्हणजे जॉर्ज क्लिफर्ड व्हिटवर्थ यांचा 'अँग्लो-इंडियन शब्दकोश' आणि हॉब्सन-जॉब्सन 'अँग्लो-इंडियन शब्दकोश'. या दोन्ही कोशांमध्ये इंग्रजी 'बंगलो' या शब्दाबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

व्हिटवर्थच्या शब्दकोशात इंग्रजीमधला 'बंगलो' हा शब्द बंगालच्या बांग्लाचा अपभ्रंश असल्याचं म्हटलं आहे. बंगलो म्हणजे वाळलेल्या गवताच्या छपराचं एकमजली घर किंवा जमिनीवर स्वतंत्रपणे उभं असलेले कोणतेही घर, असं म्हटलं आहे.

हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात 'बंगलो' या इंग्रजी शब्दाचं 'एकमजली कौलारू घर' असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बंगल्याबद्दलचं किंवा बंगालचं काहीतरी ते बांग्ला असं पूर्वी हिंदुस्थानात म्हटलं जाई. त्यामुळे युरोपियनांनी बंगालसारखी घरं इतरत्र बांधली, तेव्हा त्याला बंगला, बंगाली पद्धतीचे घर अशी नावे दिली. इंग्रजी 'बंगलो' ही संज्ञा बंगालमधील युरोपियनांनी स्थानिक घरांच्या पद्धतीवरून घेतली असल्याचं हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात म्हटलं आहे.

या दोन्ही कोशांबद्दल आणखी थोडी माहिती देते. व्हिटवर्थ यांचा शब्दकोश केगन पॉल, ट्रेंच आणि कंपनी, लंडन यांनी १८८५ मध्ये प्रकाशित केला आणि १९७६ साली इंडिया डॉक्युमेंटेशन सर्व्हिस, गुरगाव यांनी पुनर्मुद्रित केला. त्या वेळी वापरात असलेले आणि भारतीय संदर्भात विशिष्ट अर्थ असलेले पण नेहमीच्या इंग्रजी किंवा भारतीय शब्दकोशांत स्पष्टीकरण नसलेले शब्द व संज्ञा या व्हिटवर्थच्या शब्दकोशात घेतलेल्या आहेत. कलम, कच्चा, पिठोरी, लाख, कडिया इ० अशा जवळजवळ ५ हजारापर्यंत शब्दांची व्युत्पत्ती किंवा भारतीय संदर्भ त्यात दिलेले आहेत. ३५० पानांचा हा शब्दकोश संशोधकांसाठी आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांमध्ये रुची असणार्‍यांसाठी उत्तम संदर्भग्रंथ आहे.

हॉब्सन-जॉब्सन अँग्लो इंडियन शब्दकोश हा हेन्‍री यूल व ए०सी० बर्नेल यांनी तयार केला आहे. १९०३ मध्ये लंडनच्या जॉन मरे यांनी मूलत: प्रकाशित केलेल्या ह्या कोशाचं दुसरं पुनर्मुद्रण नवी दिल्लीच्या एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेसने २००६ साली केलं आहे. यामध्येही अचार, बझार, घी, लोटा, फकीर, झुला इ० इ० सारखे जवळजवळ ५ हजारांपर्यंत शब्द आहेत. शिवाय शब्द पटकन सापडण्यासाठी तीस पानांची शब्दसूची शेवटी दिलेली आहे. तसेच या कोशात ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ आले आहेत, त्या त्या पुस्तकांची पूर्ण नावे असलेली २० पानी एक यादीही दिलेली आहे. जिज्ञासूंनी या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यास या एक हजार पानी पुस्तकाच्या आवाक्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

व्हिटवर्थचा शब्दकोश आणि हॉब्सन-जॉब्सन शब्दकोश हे दोन्ही संदर्भग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

अलका कानेटकर

302, तनुजा सोसायटी, प्रेमनगर, खारेगाव, कळवा (पश्चिम) 400605
दूरभाष : (022) 25372672
भ्रमणभाष : 09969445097