क्रियापदाचे बदलले स्थान

सलील वाघ

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ. त्यातून बुद्धिवादी. शिवाय सहिष्णू. वर समाजकारण राजकारणात माहीर. मात्र भाषेबद्दल अव्वल अनास्था. प्रस्तुत लेखकाने केले एक अनौपचारिक सर्वेक्षण. यात निरीक्षली मराठीतली प्रमुख वृत्तपत्रे, दोन हजार पाच सालापासून. 'महाराष्ट्र टाइम्स,' 'लोकसत्ता', 'सकाळ', 'केसरी', 'लोकमत', 'पुढारी' ही वृत्तपत्रे आणि आजतक, स्टार, अल्फा, झी, आयबीएन, साम ही बातम्यांची चॅनेल्स, यांचे केले वाचन - आणि घेतली नोंद. त्यातून लक्षात आली ही बाब. मराठीवर पडतो आहे प्रभाव. शब्दक्रमासहित वाक्यरचनेचे केले जाते आहे अनुकरण. त्यामुळे क्रियापदाचे बदलले स्थान! ही नुसती नाही निव्वळ एक भाषाशास्त्रीय गोष्ट. याला आहे उद्याची अनेक मानवी परिमाणे. आज संस्कारक्षम वयात असलेली (४ ते १४) मराठी पिढी मोठी होणार आहे ऐकून हीच भाषा. आपण होत चाललो आहोत का जास्त जास्त अ‍ॅक्शन ओरिएंटेड? आपल्याला हवी 'क्रिया' अगोदर म्हणून येत आहे 'क्रियापद' अगोदर. याला नाही केवळ एक व्याकरणिक परिमाण. याचे संदर्भ आहेत अजून खोलवर. क्रिया म्हणजे ‍अ‍ॅक्शन. अ‍ॅक्शन म्हणजे एक्साइटमेंट. समकालीन मराठीभाषकाचे सार्वजनिक जीवन झाले आहे सवंग. खाजगी जीवन झाले आहे खोखले. त्यामुळे ही दोन्हीकडची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला काहीही करून हवी आहे एक्साइटमेंट. एक्साइटमेंटला वापरू इथे मराठी शब्द 'सनसनाटी'. मराठयांना हवी आहे सनसनाटी. म्हणून सरकले आहे क्रियापद आधी.