प्रतिसादः वर्‍हाडी बोलीची उच्चार प्रवृत्ती

[संदर्भ : 'पूर्व खानदेशच्या बोलींचा परस्परांवर प्रभाव : एक अभ्यास' - वासुदेव सोमाजी वले, 'भाषा आणि जीवन' २६ : १ (उन्हाळा २००८)]

वले यांनी अहिराणी, वर्‍हाडी, लेवापाटीदारी, तावडी ह्या बोलींमधील साम्य दाखविताना जी उदाहरणे दिली त्यांचा वर्‍हाडी बोलीसंबंधी विचार पुढीलप्रमाणे :
(१) बहिण-बहिन : वर्‍हा‍डीत मूर्धन्य 'ण' ऐवजी दन्त्य 'न'चा उच्चार होता. मात्र, प्रमाण मराठीतील काही शब्दांत स्वरांतर्गत 'ह' आल्यास वर्‍हाडीत त्याचा लोप होतो. 'बहीण' हा उच्चार वर्‍हाडीत 'बईन' असा आढळतो. (याप्रमाणे तहान -तान, नाही-नाई.)

(२) विळा-इया : 'इया' असा उच्चार अमरावतीकडे क्वचित तर अकोल्याकडे आढळत नाही. 'विळा' या शब्दाचा उच्चाचर मोठ्या प्रमाणात 'इवा' असा आढळतो.

(३) येथे/इथे - अढी/अढी
तेथे - तढी/तढी
कोठे - कुढी/कुढी
'येथे' ह्या प्रमाण मराठीतील क्रियाविशेषणाचा उच्चार अकोल्याकडे 'अती' तर अमरावतीकडे 'अथी' असा केला जातो. अकोल्याकडून बुलढाण्याकडे आपण जसजसे जातो तसतसा 'अठी/अटी' असा उच्चार भाषिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो.
याप्रमाणे 'अती'/'अथो'/'अठी' उच्चार केला जातो. मात्र, वरील उदाहरणातील 'अढी,' 'तढी', 'कुढी' यांचा उच्चार वर्‍हाडीत होत नाही. 'कुठी' या अर्थी वर्‍हाडीत 'कुकूळे'.

(४) ऐ - अय : यासंबंधित वल्यांनी उदाहरणे दिलेली नाहीत. वर्‍हाडीत 'ऐ' या संयुक्त स्वराचा उच्चार 'इ, अइ, अय, आय्' होतो.
ऐ > ई = म्हैस > म्हीस
ऐ > अई = चैन > चईन, बैल > बईल.
ऐ > अय = मैना > मयना, पैसा > पयसा, चैतन्य > चयतन
ऐ > आय = ऐक > आयक

(५) सौदेशी : स्वत: > सोता, सरस्वती > सरसोती ही प्रक्रिया वर्‍हाडीसंबंधी योग्य आहे. मात्र, 'सौदेशी' असा उच्चार वर्‍हाडीत आढळत नाही.

(६) अ > आ : वर्‍हाडीत 'अ' या स्वराऐवजी काही शब्दात 'आ' हा स्वर उच्चारला जातो.
उदा० अजून > आजूक. मात्र, (अवजड > आवजड) आवजड ह्या शब्दाऐवजी 'भारी' हा शब्द मोठ्या प्रमाणात उच्चारात आढळतो.
'असा' ऐवजी 'आसा' उच्चार वर्‍हाडीत नाही. येथे 'अ' चा 'आ' होत नसून 'अ' हा स्वरच उच्चारात आढळतो. उदा० 'असं कधी घळे? सासू जावयासाठी जळे?'

रावसाहेब काळे
मु० लोगी, पो० रिधोरा, ता० बाळापूर, जि० अकोला, बेळगाव ४४४ ३०२.