द.भि.कुलकर्णी यांचा प्रतिसाद

शब्दसंक्षेप, वाक्यसंक्षेप
द०भि० कुलकर्णी
संपा० 'भाजी' यांस
स०न०वि०वि०
आ० व 'भाजी'च्या संपा०समि०च्या एक सद० मृ०श० असे आ० दो०नी मि० लिहि० संपा० टि०वा०सं० : भाजी व० २५, अं०१, हि०'०७.
अबब! संक्षिप्त रूपात वाक्य लिहिणे किती जिकिरीचे ते आता लक्षात आले. अशा प्रयत्नात वेळ व श्रम, प्रारंभी तरी, वाचत नाहीत; वाचकासही, वाचक म्हणून असाच अनुभव येईल.
याचा अर्थ असा आहे का की, शब्दांचे संक्षेपीकरण सुलभ पण वाक्याचे संक्षेपीकरण अवघड? पत्राच्या अखेरीस आपण 'मो०न०ल०आ०' असे लिहितो, हा अपवाद.

दुसरी गोष्ट : दोन व्यक्तींमधील व्यक्तिगत व्यवहारात शब्द व वाक्य यांचे संक्षेप सुसह्य ठरतील; पण व्यक्ती व समाज यांच्यातील सार्वजनिक व ज्ञानात्मक व्यवहारांत ते इष्ट व उपयुक्त ठरणार नाहीत? मस्करी व जाहिरातकुसर म्हणून अधूनमधून फक्त ते क्षम्य ठरेल?

पूर्वी मोडीमध्ये असे विविध संक्षेप सर्रास वापरले जात; त्याचे कारण मोडी ही लिपी सार्वजनिक नव्हती; तर ती फक्त स्वत:च्या माहितीसाठी नोंद करण्यासाठी व दोन परिचितांमधील संवादापुरती वापरली जाणारी खासगी लिपी होती.

साहेब, सार्वजनिक लेखन लेखकासाठी नसते, वाचकांसाठी असते; म्हणून तर लेखनविषयक नियम लेखकाच्या सोयीने करावयाचे नसतात; वाचकाच्या सोयीने करावयाचे असतात; जसे, 'विशद' व 'विषाद' हा भेद लेखकास जाचक वाटला तरी चालेल; तो वाचकाच्या सोयीचाच असतो. 'सलील-सलिल', 'रुपे-रूपे', 'शिर सलामत तो पगडी पचास' - 'शीर सलामत तो बुगडी पचास' - (पु०शि० रेगे) ही अशी आणखी काही उदाहरणे. लेखनविषयक नियमांचे सुलभीकरण लेखनकाराच्या अंगाने कधीही होता कामा नये; लेखन-नियमांत जितकी सूक्ष्मता व विवक्षा येईल तितके ते लेखन वाचकाच्या दृष्टीने अर्थसुलभ होईल.

संक्षेपीकरणाची प्रवृत्ती लेखनकाराच्या अंगाने सोयीची पण वाचकाच्या, समाजाच्या अंगाने गैरसोयीची व अपायकारक आहे; सार्वजनिक व्यवहारात तिचा प्रसार होऊ देणे हितकारक नाही.
आता संक्षेपचिन्हाबाबत : चोखंदळ लेखक-मुद्रक कटाक्षाने संक्षेपचिन्ह (०) वापरतात; एरवी अधिकांश लेखक-मुद्रक संक्षेपचिन्हाऐवजी पूर्णविराम चिन्हच (.) वापरतात. माझ्या एका लेखनिकाला मी संक्षेपचिन्ह द्यायला सांगितले त्याचा परिणाम असा झाला की तो पूर्णविराम व अनुस्वारही पोकळ देऊ लागला; दुसर्‍या एका लेखनिकाने इंग्रजी लिहितानाही संक्षेपचिन्ह वापरणे सुरू केले. एकदा माझ्या टेलिफोन डायरीत 'डो बो कुलकर्णी' अशी नोंद मला दिसली. ''हा कोण?'' म्हणून विचारले तर महाशय म्हणतात काय, ''सर, हे तुमचंच नाव.'' त्याने नोंद केली होती, ''KULKARNI DO BO''

विरामचिन्हांचा विचारही लेखन-विषयक नियमांमध्ये नीट व्हायला हवा आहे.

तुम्ही हेमाडपंती लिपीतील काही शब्दांची संक्षिप्त रूपे दिली आहेत; जसे, सोा, वीाा, मुाा, इत्यादी. त्यावरून असे दिसते की मोडीमध्ये एक दंड (।) व दोन दंड(।।) ही चिन्हे संक्षेपचिन्ह म्हणून योजिली जात. आपण त्याऐवजी (०) चिन्ह वापरतो; आता या पर्यायी चिन्हाचाही विचार व्हायला हवा - खासगी भाषा व्यवहारासाठी.

ज्येष्ठांस नमस्कार, धाकट्यांस आशीर्वाद.
आपला स्नेहाकांक्षी
दत्ताजी भिकाजी कुलकर्णी ऊर्फ दभि
'वसुधा', ई-००४, डीएसके विश्व, ऑफ सिंहगड रोड, धायरी, पुणे ४११ ०४१.
दूरभाष (०२०)२४३८ ०८९४