पुस्तक-परीक्षणः लाटांचे मनोगत

[परीक्षित पुस्तक : 'लाटांचे मनोगत' - डॉ० नीलिमा गुंडी. पद्मगंधा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १५९. मूल्य रु० १३०/-]

डॉ० नीलिमा गुंडी या मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विमर्शक आहेत. त्या स्वत: कवयित्री आहेत. तसेच मराठी कवितेच्या काही चांगल्या संपादनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. 'लाटांचे मनोगत' हे त्यांचे काव्यसमीक्षेचे पहिलेच प्रकाशित पुस्तक होय.

इ०स० १९५० ते २००० या कालखंडातील मराठीतील स्त्रियांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास यातून त्यांनी वाचकांसमोर मांडलेला आहे. 'लाट' ही त्यांना स्त्रीत्वाची प्रतिमा वाटते, असे स्पष्टीकरण प्रास्ताविकात आलेले आहे. परंतु वाचकांना हा अर्थ सहजासहजी जाणवेलच असे नाही. शीर्षकावरून हे ललित गद्य असावे, असा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशयावर अधिक प्रकाश पडेल, असे शीर्षक जास्त समर्पक झाले असते.

विविध निमित्ताने झालेला या विषयाचा अभ्यास त्यांनी या पुस्तकात एकत्रित केलेला आहे. इ०स० १९५० ते १९७५ व इ०स० १९७५ ते २००० असे दोन टप्पे पाडून त्यामधील स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि अभिव्यक्ती त्यांनी दोन प्रकरणांमध्ये लक्षात घेतली आहे. तसेच एकूणच स्त्रियांच्या कवितेचे म्हणून लक्षात येणारे काही ठळक पैलूही त्यांनी स्वतंत्र प्रकरणात मांडले आहेत. 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' या विषयावरही स्वतंत्रपणे विवेचन आहे. या सर्व अभ्यासातून जाणवलेल्या तथ्यांच्या आधारे समारोप केला आहे. याशिवाय परिशिष्टांमध्ये पाच परिक्षणे, निवडक आधारग्रंथ व कवयित्रींची निर्देश सूची दिलेली आहे.

स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि त्याच्या अभिव्यक्तीसंबंधी विवेचन करणारा या पुस्तकामधील भाग हा उद्दिष्टाच्या दृष्टीने त्याचा गाभा म्हणता येईल. इ०स० १९५० ते २००० मधील कवितेची ही चर्चा करणार्‍या प्रकरणांमध्ये स्त्रियांचे विशिष्ट संवेदन, त्यातील उत्कटता, भोवतालच्या जगाविषयीचे त्यांचे आकलन, त्यातले प्रामुख्याने काव्यविषय होणारे घर, नातेसंबंध यांसारखे घटक, बदलत्या काळात बदलत गेलेले स्वत:विषयीचे भान, कळत नकळत जीवानानुभवावरच पडलेली मर्यादा आणि त्यामुळे अभिव्यक्तीवरही येणारी दडपणे अशा विविध मुद्यांच्या आधारे घेण्यात आलेला परामर्श त्या काव्याचे स्वरूप नेमके उलगडून दाखवणारा आहे.

१९७५ पर्यंतच्या कवितांचा विचार करताना या दडपणांचा उल्लेख त्यांनी केला आहे. या कवयित्री परंपरेने उभी केलेली 'मूक सोशिक' स्त्रीची आदर्श प्रतिमा रंगविण्यातच रमल्या होत्या, असे त्या म्हणतात (पृ० ४३). इंदिराबाईंच्या 'कधी कधी न अक्षरात/मन माझे ओवणार' या ओळी उद्धृत करून, हे व्रत घेऊनही तेथे सूचक, तरल प्रतिमांमधून मन व्यक्त होऊ लागल्याचे त्या सांगतात. एक विचार येथे मनात येतो. त्या काळात मौनात केवळ स्त्रीत्वाचीच प्रतिष्ठा होती का? की एकूण मराठी कवितेवरच अभिजातवादी प्रवृत्तींचाही काही प्रभाव होता? कुसुमाग्रजांच्या कवितेतील 'काही बोलायचं आहे/पण बोलणार नाही' सारख्या अनेक ओळींचे येथे स्मरण होते. त्यामुळे स्त्रियांच्या कविता अगदी सुट्या न काढता समकालीन कवी कोणती मूल्ये मानत होते, हेही पाहिले पाहिजे असे वाटते. अन्यत्र या कवितेवर प्रभाव टाकणार्‍या कवींची चर्चा त्यांनी केलेली आहे (पृ० १९). यात बदल झाला त्याला विविध गोष्टी कारणीभूत आहेत. १९७५ नंतर आपल्याकडे पोचलेला 'पर्सनल इज पोलिटिकल' हा स्त्रीवादी विचार हे त्यातले एक ठळक कारण आहे.

इ०स० १९७५ ते २००० या कालखंडातील कवितेबाबत विवेचन करताना त्यात अपरिहार्यपणे स्त्रीवादाचा संदर्भ येतो. स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेचे पुनर्मूल्यांकन या कवयित्री करीत जातात. भोवतालचे वास्तव, प्रेमानुभव, नातेसंबंध, मातृत्व या सार्‍यांविषयीच त्यांची जाणीव अधिक डोळस होते आहे. काव्याच्या आविष्काररूपांवरही या परिवर्तनाचा परिणाम होतो आहे हे डॉ० गुंडी नेमकेपणाने दाखवून देतात. हे स्पष्ट करताना त्यावर पडू पाहणार्‍या मर्यादांचीही त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. या प्रकरणातच समाविष्ट होऊ शकला असता असा भाग 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' म्हणून त्यांनी वेगळा ठेवला आहे. त्यांचे तेथील विवेचन स्त्रीवादाच्या प्रभावातील सकारात्मक अंगाचीही अधिक खोलवर जाऊन दखल घेणारे आहे. (तशी ती घेणे आवश्यकही होते.) हे लेखन पुस्तकरूपात येताना एकत्र करणे सयुक्तिक ठरले असते. इ०स० १९७५ नंतरच्या कवितेचे आकलन त्यामुळे सलग स्वरूपात समोर आले असते.

'स्त्रियांच्या काव्याचे काही पैलू' हे प्रकरण सुटे तीन लेख एकत्र करूनच आकारले आहे. वेगवेगळ्या पैलूंचा विचार असल्याने त्यांचे सुटेपण खटकत नाही. यातील 'वारसा स्त्रीत्वाचा आणि कवितेचा' या शीर्षकाच्या भागातील आई-मुलीच्या नात्याचे बदलते स्वरूप आणि त्याची तशीच वेगळी अभिव्यक्ती यासंबंधीचे विवेचन महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या कवितेतील एक वेगळा पदर त्यातून उलगडला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला वाटणारी संवादाची गरज आणि त्यामुळे कवितेतून सुरू होणारा आत्मसंवाद याबाबतचे 'शब्दवती कविता' या शीर्षकाखाली मांडलेले निरीक्षणही मार्मिक आहे.
परिशिष्टांत कवयित्रींच्या काव्यसंग्रहांची पाच परीक्षणे दिलेली आहेत. हे संग्रह चांगले आहेत. त्यांची वैशिष्ट्ये लेखिकेने नेमकी दिली आहेत, मात्र मुळातल्या शब्दमर्यादेमुळे त्यातली दोन परीक्षणे फार त्रोटक आहेत. लेखिकेकडून विश्लेषणाबाबत असलेल्या अपेक्षा त्यामुळे फारशा पूर्ण होत नाहीत. नियतकालिकांच्या मर्यादेत अधिक विवेचन त्या त्या वेळी शक्य नसले, तरी आता पुस्तकात समावेश करताना त्यात भर घालता आली असती, असे वाटते.

प्रस्तुत पुस्तकातून या कालखंडातील कवयित्रींच्या काव्याच्या स्वरूपावर चांगला प्रकाश पडतो. डॉ० गुंडी यांनीच दिलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात पाहिले तर त्यापैकी निवडक काव्यसंग्रहांचाच विचार त्या येथे करू शकल्या आहेत, हे लक्षात येते. मात्र त्यांची निवड प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी आहे. मूळ निबंधांना पुस्तक म्हणून एकत्रित करताना पुनर्लेखनाची गरज होती, असे वाटते. तरीही एकूण विवेचन आणि संदर्भ यामुळे प्रस्तुत पुस्तकही अभ्यासकांस उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

विद्यागौरी टिळक
प्रपाठक, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७. दूरभाष ०२०-२५६९ ०९८७