मराठीचा ओढा

हैदराबादेतील मराठी समाजाचे मराठी विषयाचे प्रेम जागृत होते व ते अस्सल होते. १९५५ ते १९५८ हा काळ अंशत: संभ्रमात गेला. त्याच वेळी दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या सरकारमान्य व विद्यापीठमान्य ओरिएंटल लॅंग्वेजिज या परीक्षांचे अभ्यासक्रम समोर आले. प्राज्ञ, विशारद ऐवजी ओरिएंटल लॅंग्वेज पदविका व पदवी हे नामाभिधान झाले. हे कार्य करण्यासाठी मराठी संस्था असणे गरजेचे होते. त्यातून समाजाची ऊर्मी ओळखून संस्था स्थापन झाली - मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश व लगेच वर्गांना आरंभ झाला. विद्यापीठीय मान्यतेचे सोपस्कार चटकन उरकले व पाहता पाहता आजच्या मराठी महाविद्यालयाने जन्म घेतला. त्याचे मूळ सामाजिक गरजेपोटी व मराठीच्या ऊर्मीपोटी होते. शासनमान्यता व विद्यापीठमान्यता होती. परंतु ह्या वर्गांना शिकवायचे कुणी? संस्था तर नवीन होती. जवळ काहीच नाही, एका निष्ठेशिवाय. सगळ्या मराठीच्या प्राध्यापकांनी आपापले काम वाटून घेतले. कधी काळी श्री० दि०कृ० केळकर संस्कृत घेऊन एम०ए० झाले होते. ते धोतराचा काचा मारून वकिलीची पुस्तके बाजूला ठेवून 'उत्तररामचरित' शिकवायला मैदानात उतरले. 'ओढा सार्‍यांना मराठीच्या पाशात' हा मंत्र मुळात हैदराबादचा आहे. दत्तो वामन पोतदारांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या १९४३च्या नांदेड संमेलनात तो उच्चारला होता व तो महामंत्र ठरला.

त्या वेळीही स्वाध्याय मंडळ चालू होतेच. एखाद्या पुस्तकावर, कवितेवर चर्चा, वादविवाद होत असत. याच काळात बा०सी० मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ इ० नवकविता, नवकथा लिहिणारी मंडळी येऊन गेली. तेव्हा त्यांच्याबरोबरची चर्चाही अतिशय रंगली. त्या वेळी केवळ मराठीचेच नव्हे तर इतर भाषाविषयांचे प्राध्यापकही या स्वाध्याय मंडळात येत असत. मला आठवतं, विंदांची 'दाताकडून दाताकडे' ही कविता ए०वि० जोशी यांनी इतकी छान समजावून दिली होती की ती विसरणे अशक्यच. हाच प्रकार 'त्रिधा राधे'चा.

तर ही वीणा म्हणा वा माळ म्हणा कहाळेकरांनी द०पं० जोशींच्या गळ्यात अडकवली. एवढे खरे की हा गजर अद्याप चालूच आहे. मराठी मंत्र वातावरणात घुमतो आहे.

डॉ० उषा जोशी, "म-मराठीचा'' (मराठी महाविद्यालय सुवर्णमहोत्सव स्मरणिका) २००८, पृ० ५