पुस्तक-परीक्षणः अक्षरस्पंदन

[परीक्षित पुस्तक : 'अक्षरस्पंदन' - डॉ० नीलिमा गुंडी. उन्मेष प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १६८. किंमत रु० १२०/-]

साहित्याच्या रसिक वाचकांची अभिरुची प्रत्येक पिढीनुसार बदलत असते. अभिरुचीच्या या घडणीत समकालीन साहित्याचा फार मोठा वाटा असतो. साहित्यातील संक्रमणाची नोंद प्रत्येक पिढी आपापल्या परीने घेत असते. डॉ० नीलिमा गुंडी यांचे 'अक्षरस्पंदन' हे पुस्तक प्रामुख्याने अशा समकालीन कवी आणि लेखकांच्या साहित्याविषयी आपले अनुभवकथन करते. 'रसिकांमधल्या सुप्त प्रतिभाशक्तीला समर्पित' असे हे पुस्तक अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीचा मागोवा घेते.

वेगवेगळ्या निमित्ताने निरनिराळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. त्यामध्ये 'कवितेशी गट्टी जडण्याचे (जमण्याचे) दिवस' हा पहिला लेख आहे. आधीच्या पिढीकडून गेय, छंदोबद्ध कवितांमधून काव्य कसे भेटले हे लेखिकेने त्यात सांगितले आहे. 'कवितेचे भावतरंग'मध्ये 'बालभारती'मधील 'झुळुक मी व्हावे' या काहीसे अज्ञात असलेल्या कवी दा०आ० कारे यांच्या कवितेचे रसग्रहण आहे. आज पन्नाशीत असलेल्यांना पाठ्यपुस्तकांमधून मिळालेले 'कवितेचे पाथेय' हा एका लेखाचा विषय आहे. याशिवाय कुसुमाग्रजांची बालकविता, विंदा करंदीकरांची बालकविता, 'विशेषणात न मावणारा कवी' (विंदा करंदीकर), 'विशाखा'ने आम्हांला काय दिले?', 'अष्टपैलू वसंत बापट' असे निवडक कवींवर सहा लेख या संग्रहात आहेत. रेल्वे, पक्षी, झाडे, वसंत ऋतू, पाणवठे, पंढरपूरची रुक्मिणी, आई, बाप आणि मुलगी, बाप आणि दलित काव्य, ईश्वर अशा शीर्षकांखाली असलेल्या कवितांचे तुकडे गोळा करून लेखिकेने जवळपास अकरा लेख लिहिले आहेत. एका लेखात तर कुसुमाग्रजांच्या 'स्वप्नाची समाप्ती' या प्रसिद्ध कवितेची मजरुह सुलतानपुरींच्या एका चित्रपटगीताशी तुलना केली आहे.

'चाळ' (मुंबईतली) या घटकाची साहित्यातील प्रतिबिंबे यावर एक लेख आहे. अर्थात 'कथाकादंबर्‍यांमधील बदलती स्त्री-प्रतिमा' हा प्रबंधाला शोभेल असा भारदस्त विषयही लेखिकेने निवडला आहे. प्रकाश संत यांचा 'लंपन', मिलिंद बोकील यांची 'शाळा,'इरावतीबाईंचे 'ललितलेखन' आणि 'भाषेचे भाष्यकार' हा डॉ० अशोक केळकर यांच्यावरील व्यक्ती आणि वाङ्मयविषयक लेख असे गद्यासंबंधी लेख या संग्रहात आहेत.

लेखिका स्वत: साहित्याची साक्षेपी वाचक आणि मराठी साहित्य या विषयाची प्रदीर्घ काळ अध्यापक आहे. भाषा-विषय शिकवताना कसे शिकवावे याचे नेमके उत्तर लेखिकेजवळ आहे. 'शब्दांचे दुसर्‍या शब्दांशी लागणारे नाते, शब्दाचे अर्थाशी लागणारे नाते, त्या अर्थाचे आपल्या जगण्याशी लागणारे नाते आणि त्याचवेळी संस्कृतीच्या आजवरच्या खळाळत्या प्रवाहाशी लागणारे नाते, या सार्र्‍यांची एकसंधरीत्या प्रचिती येईल असे शिकवावे.' (पृo १७) हा तो गुरुमंत्र आहे. प्रत्यक्षात हे शिक्षण कसे चालते हे शिक्षकांना पुरुषराज अळूरपांडे म्हणजे कोण हे न उमगणे, गवर्‍यांचे उत्तरासह दिलेले कोडे वाचूनही त्याचे उत्तर न समजणे, 'मी कोण होणार' या हुकमी निबंधाचे 'चिमणी' हे उत्तर देऊन सार्‍या वर्गाला निबंध फळ्यावर लिहून दिलेला असणे, असे चालते हे लेखिकाच आपल्याला सांगते.

लेखिकेचे कवी, कवयित्री, गद्यलेखक यांच्याविषयीचे लेख त्यांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. 'लंपनच्या आंतरिक विश्वात... संवेदनाविश्व... भावविश्व आणि विचारविश्व यांना जागा आहे' (पृo २१). हे तिचे निरीक्षण आहे. गाडगीळांच्या खुटमुट्यांच्या चाळीत 'जातीय दंगलीच्या घटनेचा प्रकाश जेव्हा या चाळकरी कारकुनांच्या जगण्यावर पडतो, तेव्हा त्यांच्या रक्तातील अंधार्‍या पेशीसुद्धा दिसू लागतात' असे लेखिकेला वाटते (पृo १४५). 'एकंदर मराठी कविता काळाच्या स्पंदनांशी इमान राखत परंपरेचे सत्त्व पारखून घेत आहे.' हा तिचा निष्कर्ष आहे (पृo १६२). स्त्रीवादी साहित्यात स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचे बनले; पण 'कशापासून स्वातंत्र्य आणि कशासाठी स्वातंत्र्य याविषयीची भक्कम वैचारिक बैठक सर्वच लेखकांकडे आढळत नाही' असे तिचे निरीक्षण आहे. विंदा करंदीकर हे 'विशेषणात न मावणारे कवी' आहेत तर कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने उत्कटतेच्या अंगभूत भरारीचा अनुभव दिला अशी लेखिकेची साक्ष आहे. एकंदरीत हे लेख वाचताना लेखिकेचे मन भावनाशील, उत्कट रसिकाचे आहे हे जाणवते.

परंतु समीक्षापर लेखनाला एवढे पुरेसे नसते. अशा लिखाणातून काही मौलिक असे मुद्दे मांडता येणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संदर्भांची, वाक्यरचनेची, शब्दयोजनेची अचूकताही अपेक्षित असते. उदाहरणार्थ, पहिल्याच लेखातील 'रे त्या पक्ष्यावर दगड मी' आणि इतर सर्व कवितांच्या कवींची नावे लेखात नाहीत. 'ती जाईची कोमल लतिका' (पृ० ११) च्या २,३,४ या ओळी मात्रांप्रमाणे अचूक लिहिलेल्या नाहीत. 'शाळा' ही कादंबरी संवेदनशीलता आणि मनोविश्र्लेषण या दृष्टीने समीक्षकांनी गौरविलेली कृती आहे. तिच्या समीक्षणात 'मुले घराबाहेर राहतात... त्यांची पावले घराकडे वळावीत अशी घरे घडवणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे' (पृo २७) अशी भूमिका घेणे, 'हा र्‍हासशील काळ आहे.' (पृo २८), 'मुलांना सर्व शिक्षकांविषयी आदरयुक्त प्रेम वाटत नाही' अशी तक्रार करणे (पृo २८) काहीसे बाळबोधपणाचे वाटते. इरावती कर्वे यांच्या 'परिपूर्ती' या लेखात 'स्त्रीसुलभ नात्याचे त्यांना वाटणारे अप्रूप' (पृo ७४) नाही तर इतक्या संपन्न, प्रगल्भ, स्वयंप्रज्ञ आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रत्येक टप्प्यावर पुरुषांशी असलेल्या नात्याच्या संदर्भातच होते हे इरावतीबाईंनी मांडले आहे. सर्वच समीक्षकांनी एक सुबोध अर्थ घेतल्यावर अखेर आनंद कर्वे यांनी तो खुलासा केला होता.

काही ठिकाणी वाक्यरचना, शब्दयोजना किंवा शब्दांचा क्रम यांमधील सदोषता रसहानी करताना दिसते. लेखिकेची आई खणखणीत स्वरात 'रानात, सांग कानात आपुले नाते' म्हणते; आणि अभावित विनोद घडतो (पृo १०). सर्वांना रसस्नासत होता यावे म्हणून वापरलेले 'शिक्षणाच्या दहीहंडी'चे रूपक (पृo १५) शिक्षकांच्या संख्येच्या प्रमाणात व्यस्त ठरते. 'फुलपाखरू'मधल्या 'मी धरु जाता येई न हाता ' या ओळीत तरलतेला जोडून व्यवहारविमुखता आहे (पृo ४८) हे जरा अतीच वाटते. 'मेंदी'तील इंदिरा संत यांची 'पिळदार अभिव्यक्ती' (पृo ५०) विलक्षण होती म्हणजे काय याचा बोध होत नाही. शान्ता शेळके यांना अत्रे यांच्या सहवासात सहजसोप्या लेखनाचे कानमंत्र (किती?) मिळाले (पृo ६४). (कानमंत्र साधारणपणे एक असतो!) शान्ताबाई आणि बापट यांनी 'काव्यसंग्रह लिहिले!' (पृo ६५, ६९) ते कसे? काही प्रचंड वृक्षांमध्ये (वड, पिंपळ) चाफा (पांढरा, तांबडा) आणि गुलमोहर यांचा समावेश (पृo १०८) कसा होतो? 'प्रेम आणि मरण'मधले झाड एकतर्फी प्रेमाचे की 'मूल्यनिष्ठ जगण्याचे' प्रतीक होते? (पृo १०८). चारित्र्याशी निगडित अशी कोणती मूल्ये ते मानत होते? गौहाटी या शब्दाचा 'सुपारीचा बाजार' हा नवा अर्थ इरावतीबाईंनी शोधलेला नसून (पृo ७४) तो असमिया भाषेत मुळातच आहे. लेखांमधील विवेचनात असे कच्चे दुवे दिसत असल्यामुळे लेखनावर सफाईचा हात फिरला नसल्याचे जाणवते.

काही ठिकाणी वाक्यांच्या रचनेत ढिलेपणा आढळतो. विशेषत: क्रियाविशेषणाची जागा भरकटल्यामुळे वाक्यरचनेचा तोल जातो. उदाहरणार्थ- "जेव्हा आपण हेतुपूर्वक अध्यापनाचा व्यवसाय स्वीकारतो'' (पृo १५), "ग्रंथालयाचा उपयोग अनेक प्रकारे शिक्षणाशी जोडून घ्यायला हवा'' (पृo १५), "या पालक घडवण्याच्या प्रक्रियेला...''(पृo २९), "करंदीकरांच्या अभंगांमध्ये इहवादी वृत्तीचा पीळ जोरकसपणे आहे'' (पृo १५६) अशी त्याची काही उदाहरणे दाखवून देता येतील. काही वाक्ये केवळ वाचली तरी त्यांची सदोष रचना ध्यानात येते. उदाहरणार्थ- "वर्गाला सुरुवातीला एक प्रश्न विचारते.'' (पृo १६), "मुलांचे निसर्गाशी निसर्गत:च एक नाते...'' (पृo ३१), "निसर्गाचे निरागस सौंदर्य'' (पृo ४८), "करंदीकरांनी परंपरेची बलस्थाने नेहमी हेरून'' (पृo ५५), "इ०स० १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'मध्ये... इ०स० १९३२ ते १९४९ दरम्यानच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत.'' (पृo ६०), "सामाजिक जाणिवेचे नाते... लागलेले आहे.'' (पृo ६१), "रचनेवरील कसब (प्रभुत्व?)'' (पृo ६५), "सानेगुरुजींच्या हरिजनांसाठी मंदिरप्रवेशाच्या प्रवेशदौर्‍यात'' (पृo ६९), "बापटांचे काव्यलेखन आणि काव्यदर्शन'' (पृo ६९), "शिक्षकांचे प्रशिक्षण केले जावे'' (पृo ७८), "त्यांच्या नावावर दोनच छोटेखानी मराठी साहित्यविषयक पुस्तके'' (पृo ८१), "विज्ञानाकडून झालेला अपेक्षाभंग झाला.'' (पृo ८७) "कल्पवृक्ष कन्येसाठीसारख्या काही (म्हणजे किती? ती त्या प्रकारची एकच रचना आहे!) कविता'' (पृo १३२), "द्वेष उफाळून येतो तर नवल नव्हते.'' (पृo १३८), 'झुक झुक झुक झुक आगीन गाडी' ही मामाच्या गावाला नेणारी कविता असताना वि०म० कुलकर्णी यांच्या 'गाडी आली गाडी आली'त तिचा उल्लेख (पृo १००) असावा असे लेखनावरून वाटते. प्रत्यक्षात तो "कोठेही जा, नेऊ तेथे दूरदूरदूर'' असा आहे. इत्यादी लेख पुस्तकात समाविष्ट करण्यापूर्वी त्यांवर संपादकीय संस्करण केले असते तर असे दोष राहिले नसते, असे पुन्हा म्हणावेसे वाटते.

लेखिकेच्या शैलीचा एक विशेष या ठिकाणी सांगावासा वाटतो. लेखिका साधा वर्तमानकाळ किंवा भूतकाळ न वापरता अनाठायी कृदन्तयुक्त रचना वापरते. म्हणजे संस्कार करून जाते (पृo ४३), मोठा प्रभाव पाडून गेली (पृo ४९), जगण्याचे तत्त्वज्ञान सुचवून जातात (पृo ५६), कविता आठवून जातात (पृo ५६), अर्थपूर्ण अनुभव देऊन जातात (पृo ५७), कल्पनाचित्र रेखाटून गेली (पृo ६२), निर्देश होत गेला (पृo ६२), लेखन... दाद मिळवून गेले (पृo ६७), वसंत... आकर्षित करून गेला आहे. (पृo ११३), ईश्वरकल्पना ठसा उमटवून गेली आहे (पृo १५०), बलात्कारातून... बालक... प्रश्नचिन्हे समोर ठेवत जाते (पृo १६४). अशा प्रकारची वाक्यरचना जाताजाता एखादी दुय्यम गोष्ट घडते, त्या वेळी वापरली जाते. साहित्यात काय किंवा समीक्षेत काय असे 'जाताजाता' घडून जाण्यासारखे काही नसते.
एकूण प्राध्यापकी ढंगाचा असलेला हा लेखसंग्रह आपल्या पिढीने साहित्याचे कोणते संचित मिळविले ते सांगतो; मागील पिढीकडून मिळालेल्या ठेव्यात आपल्या वाचनातून महत्त्वाच्या लेखक-कवींचे साहित्य अभ्यासून आपल्याला काय मिळाले यावर प्रकाश टाकतो; आणि हे सर्व आजच्या तरुण पिढीच्या हाती ठेवू पाहातो. त्यात काही सामान्य विषयांसंबंधी असलेल्या कवितांचे/गद्याचे लेख वगळून आणखी काही महत्त्वाच्या लेखकांविषयी लेखिकेने लिहिले असते, तर या पुस्तकाची गुणवत्ता निश्चितच वाढली असती.

सुमन बेलवलकर
F-४४, सुंदरनगरी, ३०८, सोमवार पेठ, पुणे ४१६ ०११. दूरभाष : २६११ १११३