पुस्तक परीक्षणः आधुनिक समीक्षा सिद्धान्त

[परीक्षित पुस्तक : 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' - मिलिंद मालशे, अशोक जोशी. मौज प्रकाशन, मुंबई. २००७. पृष्ठे ३५२. किंमत रु० २७५/-]

अर्वाचीन मराठी साहित्य समीक्षेमध्ये पाश्चात्य तत्त्वमीमांसा, वादसंकल्पना आणि अनेक संज्ञांचा सढळपणे वापर होत आला आहे. मात्र सन्माननीय अपवाद वगळता, हा वापर नेमकेपणाने, मुळाबरहुकूम, काटेकोरपणे न होता सैलपणे आणि खूपसा बेजबाबदारपणे होत आला आहे आणि त्याला मूलार्थाची प्रतिष्ठाही लाभत आली आहे. असे विपरीत आणि चुकीचे अर्थ प्रस्थापित होऊ नयेत असे वाटत असेल तर अशा लेखनाचे मुळातूनच ज्यांनी व्यवस्थित वाचन केले आहे आणि ज्यांना ते कळले आहे, अशा अभ्यासकांनी मराठीतून त्या त्या विषयावरचे लेखन करायला हवे. इंग्रजी भाषा आणि साहित्यासह पाश्चात्य तत्त्वविचारांचा सखोल अभ्यास आणि ज्ञान असणार्‍या मिलिंद मालशे आणि अशोक जोशी यांनी लिहिलेल्या आणि मुंबई विद्यापीठ व मौज प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेल्या 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त', या ग्रंथाचे मोल आणि महत्त्व म्हणूनच लक्षणीय स्वरूपाचे आहे.

प्लेटो/अरिस्टॉटलपासून ते रूसोपर्यंतच्या (१९ व्या शतकापर्यंत) पाश्चात्य साहित्यविचारावर अभिजातवाद आणि स्वच्छंदतावाद यांचा प्रभाव होता. त्या अनुषंगाने साहित्याचा हेतू, आस्वाद आणि निर्मिति-प्रक्रिया, 'अनुकृती सिद्धान्त', 'पुनर्निर्मिती सिद्धान्त' , 'कल्पनाशक्ती', 'काव्यभाषा' अशा सिद्धान्तांचा, संकल्पनांचा समीक्षेत सढळपणे विचार होत होता. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या समीक्षेवर 'आधुनिकता'वादाचा प्रभाव राहिला. रूपवाद, प्रतीकवाद, आविष्कारवाद, प्रतिमावाद, वास्तववाद, अतिवास्तववाद, अस्तित्ववाद, फ्रॉईड आणि मार्क्सचे विचार आणि त्यातून निर्माण झालेले मनोविश्लेषण आणि बिंब-प्रतिबिंबवाद, प्रयोगशीलता, कलेची स्वायत्तता, मौलिकता, 'कलेकरिता कला' व्यक्तिवाद, इ० सिद्धान्त, संकल्पना, आणि परिभाषा या प्रभावातून निर्माण झाली. मात्र सर्वसाधारणपणे १९६० नंतर 'उत्तर-आधुनिकता' आणि 'उत्तर-संरचना'वादांचा प्रभाव निर्माण झाला आणि या प्रभावाखाली आजवरच्या अनेक संकल्पनांना आणि गृहीतकांना जबरदस्त धक्के देण्यात आले. या काळातील तत्त्वविचारांच्या केंद्रस्थानी भाषावैज्ञानिक संकल्पनांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले; साहित्य ही स्वायत्त बाब नसून संस्कृतीचा एक आविष्कार आहे, या भूमिकेचा पुरस्कार होऊ लागला आणि साहित्यसमीक्षेचे स्वरूप आंतरविद्याशाखीय बनले. चिन्हात्मकता, विकेंद्रितता, सांस्कृतिक भौतिकवाद, लिंगभेद विचार, अर्थनिर्णयन, संभाषिते, संहितात्मकता, पाया विरोध, विचारतत्त्व विरोध (अँटी-लोगो), सारभूतता-विरोध (अँटी-इसेन्शिऍलिझम), महाकथन-विरोध (अँटी-ग्रॅंडनॅरेटीव्हज्), भेद, बहुतत्त्ववाद, स्त्रीवाद, वाचकवाद नवइतिहासवाद इ० नव्या संकल्पना, संज्ञा आणि त्यांच्या परिभाषा अस्तित्वात आल्या. हे सर्व मराठी समीक्षेला नवे, अपरिचित असल्याने गोंधळात टाकणारे होते आणि अजूनही आहे. मात्र या सार्यामचा वापर आता होऊही लागला आहे. हा वापर नेमकेपणाने होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणारा आहे.

एकूण दहा प्रकरणांतून आस्वाद-समीक्षा-सिद्धान्त, आधुनिकता-उत्तर- आधुनिकता, रूपवाद आणि स्वायत्तता, संरचनावाद आणि चिन्हात्मकता, उत्तर - संरचनावाद आणि विकेंद्रिता, मार्क्सवाद आणि सामाजिकता, मनोविश्लेषण वाद आणि अबोधता, स्त्रीवाद आणि लिंगभेद, वाचकवाद आणि अर्थनिर्णयन, नव-इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद आणि संस्कृतिसमीक्षा इ०ची सविस्तर मांडणी, चिकित्सा आणि विवेचन करण्यात आले आहे. विषय-मांडणीचे स्वरूप निव्वळ संकलनात्मक नसून अन्वयार्थक स्वरूपाचे आहे. ग्रंथाच्या शेवटी मराठी/इंग्रजी गं्रथांची/लेखांची संदर्भसूची आणि विषयसूची देण्यात आली आहे. विवेचनात आलेल्या वादांची, संकल्पनांची, तत्त्वांची, संज्ञांची आणि परिभाषांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी देण्यात आली आहे. जिथे जिथे मूळ भूमिकेशी मतभेद वा शंका वाटतात, तिथे तिथे तशी नोंद स्पष्टपणे करण्यात आली आहे. एकूण सर्वच विवेचन लेखकद्वयाच्या सखोल अभ्यासाचे, नेमक्या आकलनाचे आणि शास्त्रशुद्ध मांडणीचे दर्शन घडविणारे आहे. समकालीन मराठी समीक्षा त्याच त्याच भूमिकांच्या आणि वादांच्या आवर्तात सापडलेली दिसते. त्यामुळे अनेक समीक्षक अनेक विषयांवर लिहीत असले तरी त्यातून फारसे काही नवीन, मूलभूत स्वरूपाचे आणि म्हणून पुनर्विचार करायला लावणारे हाती लागत नाही; मतमतांचा उथळ खळखळाटच ऐकायला मिळतो. प्रस्तुत ग्रंथामधे आधुनिकोत्तर काळातील ज्या विविध भूमिकांचा ऊहापोह करण्यात आला आहे, त्यांतील वेगवेगळ्या संकल्पनांचे उपयोजन मराठी समीक्षेमधून केले तर या कोंडीतून बाहेर पडून अर्थांच्या नवनवीन खुणा अधारेखित करता येतील; साहित्य संस्कृतीकडे बघण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल. प्रस्तुत ग्रंथातील विषय बहुसंख्य अभ्यासकांना तसे अपरिचित, गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र स्वरूपाचे असले तरी त्यांचे विवेचन आकलनसुलभ व्हावे अशा पद्धतीने करण्यात आले आहे, हा या ग्रंथाचा खास विशेष होय.

आधुनिक समीक्षा सिद्धांतांमधे रूपवाद आणि मार्क्सवाद यांची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. साहित्याचा विचार केवळ तथ्यलक्षी आणि वर्णनात्मक करून त्याच्या हेतूवर लक्ष केंद्रित करणार्याआ पारंपरिक विचारातून समीक्षेला बाहेर काढून तिच्या केंद्रस्थानी सौंदर्यविचार आणण्याचे कार्य रूपवादी भूमिकेने केले. त्यासाठी तिने 'कलेची स्वायत्तता' आणि 'वस्तुनिष्ठता', कलेचे रूप आणि अनन्यसाधारणत्व या तत्त्वांचा पुरस्कार केला. रूपवादावरील प्रकरणात यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तात्त्विकविचार, साहित्यविचार, सैद्धांतिक भूमिका आणि उपयोजित समीक्षाविचार यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे, पुढच्या टप्प्यावर रूपवादी भूमिकेचे खंडन 'संरचनावादा'ने केले आणि समीक्षाविचारात नव्या भूमिकांची भर घातली. रूपवादाच्या विरुद्ध टोकावर उभ्या असलेल्या मार्क्सवादाने कलेतील सामाजिकतेचा पुरस्कार केला. प्रस्तुत ग्रंथात मार्क्सवादी साहित्यविचारांची पारंपरिक मांडणी कशी आहे, याची चिकित्सा आली आहेच; पण पुढे या भूमिकेला 'उत्तर-आधुनिकतावादाने' दिलेल्या आव्हानानंतर मार्क्सवादाची पुनर्मांडणी नवमार्क्सवाद्यांनी कशी केली आहे तेही दाखवून देण्यात आले आहे. फ्रॅंकफर्ट प्रणाली, गोल्डमान, फ्रेड्रिक जेमसन, टेरी ईगल्टन, अल्थ्यूजर, नाटककार ब्रेश्ट, ग्राम्ची, इ० विचारवंतांनी मार्क्सवादाचा गाभा कायम ठेवून केलेल्या नव्या-मांडणीची आणि अन्वयार्थांची या ग्रंथातील चिकित्सा - लक्षणीय स्वरूपाची आहे. या विवेचनाच्या शेवटी मराठीतील मार्क्सवादी समीक्षेचा आढावा घेण्यात आला आहे, तो पाहता मराठी मार्क्सवादी समीक्षा मार्क्सवादाच्या पारंपरिक टप्प्यावरच थांबलेली दिसून येते. मार्क्सवाद आता संपला असून मार्क्सवादी समीक्षा आता अनावश्यक आहे, अशी इथल्या प्रतिष्ठित विचारवंतांची आणि समीक्षकांची भूमिका दिसते. मात्र, मार्क्सवादी समीक्षा अजूनही नव्या संदर्भात प्रस्तुत आहे हे पाश्चात्य नवमार्क्सवाद्यांनी दाखवलेल्या चिकित्सेच्या आधारे म्हणता येते. दुर्दैवाने असे प्रयत्ना मराठी समीक्षेत होताना दिसत नाहीत. रूपवादावरील प्रकरणाच्या शेवटीही मराठीतील रूपवादी समीक्षकांचा आणि त्यांच्या लेखनाचा उल्लेख आला आहे; पण तो त्रोटक स्वरूपाचा आहे, तो आणखी सविस्तर यायला हवा होता, म्हणजे मग मराठीतील नवसाहित्याच्या टप्प्यावर आणि नंतरही टेंभा मिरवलेली तथाकथित रूपवादी समीक्षा कशी उथळ आणि फुटकळ स्वरूपाची आहे हे लक्षात आले असते.

संरचनावादाने भाषेला एकूणच तात्त्विक मीमांसांच्या केंद्रस्थानी आणले आणि भाषेचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. फेर्दिनां द सोस्यूरचे भाषाविषयक विवेचन या दृष्टीने पथदर्शक ठरले. भाषाविज्ञानाला अनन्य-साधारण महत्त्व प्राप्त झाले. चिन्हमीमांसा महत्त्वाची ठरू लागली. लेवी स्ट्रॉसने मानववंशशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक संकेत पद्धतींचा अभ्यास करताना, रोलां बार्थने संस्कृतीमधील चिन्हात्मकता तपासताना, लाकाने मनोविश्लेषणात, विशेषत: नेणीवेची रचना तपासताना, फुकोने इतिहास आणि पुरातत्त्वांचा शोध घेताना संरचनावादाचा आधार घेतला. पुढे उत्तर-संरचनावादाच्या टप्प्यावर संरचनावादातील काही तत्त्वे नाकारण्यात आली (उदा० संकेतव्यवस्थेचे सार्वकालिक/सार्वदेशिक स्वरूप, चिन्हीकरणातील अर्थाची स्थिरता, द्विपदी भूमिका, संरचनांतील साम्ये इ०) आणि त्यातून झॅक देरीदाचा 'विरचनावाद' पुढे आला. विरचनावादाने अर्थनिर्णयनातील अनिश्चितता आणि अस्थैर्य दाखवून दिले, ज्ञानकेंद्रित्व, ध्वनिकेंद्रित्व, द्विपदी आकलन नाकारले. उत्तर-संरचनावादी अभ्यासक आणि ल्योतार्द, फुको इ० अन्य विचारवंतांच्या वैचारिक मांडणीतून उत्तर-आधुनिकतावादाची भूमिका साकार झाली. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोपासून चालत आलेल्या बुद्धीच्या (रीझन) केंद्रवर्ती परंपरेला रूसो, हायडेगर फ्रॉईड आणि मोठ्या प्रमाणात नित्शेने आव्हान दिले होतेच. त्याचा प्रभाव व संस्कार घेऊन उत्तर-आधुनिकतावादाच्या रूपाने हे 'अँटी-रीझन' आव्हान व्यापक प्रमाणात प्रकट झाले. प्रस्तुत ग्रंथातील यासंबंधीचे विवेचन अत्यंत महत्त्वाचे आणि गाभ्याचे आहे. उत्तर-आधुनिकतावादाच्या पर्यावरणातून उत्तर-वसाहतवाद, स्त्रीवाद, नवइतिहासवाद, वाचकवाद आणि संस्कृतिवाद अशा नव्या संकल्पना पुढे आल्या; त्यांचेही सविस्तर विवेचन प्रस्तुत ग्रंथात नेमकेपणाने करण्यात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने युरोपच्या इतिहासातील 'नवजीवनाच्या' (रनेसां) कालखंडापासून ते मार्क्सवादापर्यंतच्या मानवकल्याणाच्या 'प्रगती', 'बुद्धिवाद', 'आशावाद', 'वैज्ञानिक सत्य', 'मानवतावाद', 'विज्ञानाची वस्तुनिष्ठता व तटस्थता', 'महाकथने', 'इतिहासाची सलगता', 'सौंदर्यशास्त्र', 'नैतिकता' अशा अनेक संकल्पना नाकारल्या, आणि काळाच्या ओघातले त्यांचे वैयर्थ्य दाखवण्याचा प्रयत्नव केला, यासंबंधीचे विवेचनही या ग्रंथात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने 'आधुनिकता'वाद नाकारला, त्याचे खंडन हाबरमासने केले आहे आणि 'आधुनिकता' हा महाप्रकल्प अद्यापही अपुरा असून तो अजूनही नव्या काळात महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. जेमसने उत्तर-आधुनिकतावाद हा तिसर्या टप्प्यावरील भांडवलशाहीचा सांस्कृतिक आवरणातून प्रकट होणारा आविष्कार असून 'बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या' सोयीचे तत्त्वज्ञान आहे असे म्हटले आहे. हे दोन्ही संदर्भ या ग्रंथात आले आहेत, मात्र टेरी ईगल्टनने जेमसनच्या प्रसिद्ध लेखाला प्रतिसाद म्हणून १९८५ साली 'न्यू लेफ्ट रिव्ह्यू'मधून प्रकाशित केलेल्या 'कॅपिटॅलिझम, मॉडर्नर्निझम अँड पोस्टमॉडर्नर्निझम' या लेखाचा संदर्भ या ग्रंथात आलेला नाही, तो आवश्यक वाटतो; कारण त्यामधून ईगल्टनने जेमसनपेक्षाही वेगळ्या परिप्रेक्ष्यात आणि ठामपणे विरोध नोंदवला आहे. उत्तर-आधुनिकतावादाची स्थापत्यशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि चित्रपट इ० महत्त्वाच्या क्षेत्रांसंबंधी जी वेगळी भूमिका आहे, आणि तिचे त्या त्या क्षेत्रातले जे आधार आणि संदर्भ आहेत, त्यांचे विवेचन या ग्रंथात नाही. तसेच, 'विचारसरणीचा अंत' (दि एण्ड ऑफ आयडियॉलॉजि), 'मानवाचा अंत' (दि एण्ड ऑफ मॅन), 'इतिहासाचा अंत' (दि एण्ड ऑफ हिस्ट्री), 'वास्तवाचा अंत' (दि एण्ड ऑफ द रियल) अशा ज्या कांही नव्या संकल्पना उत्तर-आधुनिकतावादाने पुढे आणल्या आहेत, त्यांचेही विवेचन या ग्रंथात आलेले नाही. मुख्य म्हणजे, उत्तर-आधुनिकतावादाच्या सर्जनशील निर्मितीसंबंधी (कॉन्सेप्ट ऑफ क्रिएशनसंबंधी) प्रस्थापित विचारापेक्षा संपूर्णपणे वेगळा असा विचार आहे, तो या ग्रंथात आलेला नाही. डलझ (Deleuze) आणि गोत्री (Guattari) यांनी 'अ थाउजंड प्लॅट्व्ज'मधून ह्या विचारांचे विवेचन केले आहे. प्लेटोपासून चालत आलेल्या ज्ञानवृक्षाला त्यांनी वृक्षसमान नमुना (आर्बरेसंट मॉडेल) असे म्हटले असून हा वृक्ष, त्याच्या फांद्या आणि मुळांसह आपल्या डोक्यातून आपण प्रथम काढून टाकायला हवा, म्हणजे निर्मितीची नवी संकल्पना रुजवता येईल असे त्यांना ठामपणे वाटते. 'झाडा'च्या ऐवजी हा पर्याय ते रिझोमे (रिझोमे : गवतासारखी कुठलीही वनस्पती)च्या रूपात विशद करतात. झाडाचे वेगवेगळे भाग दाखवता येतात, रिझोमे- सारख्या वनस्पतीची आतली मुळे आणि वरचा विस्तार सुटा सुटा न वाढता एकमेकांत मिसळून क्षितिज समांतर रूपात विस्तीर्णपणे पसरत असतात. त्यांचे सहअस्तित्व गुण्यागोविंदाचे असते. निर्मिती ही अशाच प्रकारे होत असते, असे त्यांना सांगायचे आहे. 'आंतर-संहिता संबंध' किंवा 'लेखकाचा अंत'सारख्या संकल्पनांचा उत्तर-आधुनिकतावादामधे जो विचार आहे, तो या निर्मिति-प्रक्रियेच्या संकल्पनेशी निगडित आहे. निर्मितीप्रमाणेच 'वाचनाचे राजकारण' असते असे ही वादसंकल्पना मानते, त्याचाही विचार प्रस्तुत ग्रंथात करण्यात आलेला नाही. त्या त्या काळामधे साहित्य कशाला म्हणायचे? साहित्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ कसे ठरवायचे? यासंबंधीचे जे मापदंड (कॅनन्स) कार्यरत असतात, ते निर्माण कोण करते? त्यामागे कशा प्रकारचे 'राजकारण' असते? कुणाच्या सोयीसाठी ते निर्माण करण्यात येते? त्यासाठी कशी 'व्यूहरचना' वैचारिक/सांस्कृतिक क्षेत्रामधे निर्माण केली जाते? अशा काही महत्त्वाच्या प्रश्र्नांकडे ही नवी समीक्षा आपले लक्ष वेधते. या अनुषंगाने 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' ही संकल्पना कशी पद्धतशीरपणे राबवली जाते हे लक्षात घ्यावे लागते. प्रस्तुत ग्रंथात या संबंधीचे विवेचन आलेले नाही; ते आवश्यक होते असे वाटते.

पारंपरिक विचारसरणीमध्ये साहित्य आणि समीक्षा ही मूलत:च भिन्न क्षेत्रे मानण्यात आली आहेत. या अतिनव समीक्षासिद्धांतांमध्ये त्यांच्यामधे भेद न मानता त्यांना समान दर्जाचे मानले आहे आणि त्यामुळे दोन्हीसाठीही 'संहिता' हा शब्दप्रयोग केला आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या कर्त्यांना ही भूमिका मान्य नाही, मात्र ती 'समजून घेण्याचा' प्रयत्नय त्यांनी केला आहे.

या ग्रंथाच्या सुरवातीला 'आस्वाद, समीक्षा आणि सिद्धान्त' हे प्रकरण देण्यात आले आहे. सर्वसाधारणत: कला-आस्वादामधे 'भावना’ आणि 'विचार' यांना प्रतिद्वंद्वी मानून आस्वादाचा संबंध भावनेशी जोडण्यात येतो. आस्वाद प्रक्रिया अंत:स्फूर्त असते असेही मानण्यात येते. या ग्रंथामधे आस्वादप्रक्रियेतही विचार, संकल्पना, निकष आणि सिद्धांत कसे कार्यरत असतात हे सविस्तरपणे दाखवून दिले आहे. मूल्यमापन हे 'यादृच्छिक' असू नये आणि त्यासाठी निश्चित निकषांची गरज अपरिहार्य आहे असे मानण्याकडे लेखकद्वयाचा कल आहे आणि उत्तर-आधुनिकतावादी समीक्षा-सिद्धान्त मात्र 'यादृच्छिकता' मानणारे आहेत. त्यामुळे ग्रंथाच्या सुरवातीच्या प्रकरणाप्रमाणेच, या नव्या सिद्धांतांची चिकित्सा केल्यानंतर, ग्रंथाच्या शेवटी एका स्वतंत्र प्रकरणातून, एकूणच या समीक्षा-सिद्धांतांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांसंबंधी लेखकद्वयांची भूमिका स्पष्टपणे आणि सविस्तरपणे यायला हवी होती, असे वाटते.

५८/५९, पार्श्वनाथनगर, सांगली-मिरज रस्ता, मु०पो० वानलेसवाडी, मिरज ४१६ ४१४.
दूरभाष : ०२३३ – २२१ २७२० / ९४२२० ४१३१२