'छंदोरचने'च्या भाषांतराची निकड

डॉ० माधवराव पटवर्धन यांचा 'छंदोरचना' हा ग्रंथ १९३७ साली प्रकाशित झाला. छंद हे पद्याचे आवश्यक अंग आहे. या छंदाचे नियमन करणार्याथ छंद:शास्त्राचा प्राचीन आणि संपन्न वारसा आपल्याला लाभलेला असला तरी 'पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना' हा सिद्धांत डॉ० पटवर्धन यांनी मांडला आणि समग्र पद्यरचनेला लावून दाखविला. त्यामुळे छंद:शास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाला एक नवी दिशा आणि एक नवे परिमाण मिळाले. छंद:शास्त्राच्या विकासाला ही बाब उपकारक ठरली. त्यांनी अभ्यासिलेल्या त्रिविध प्रकारच्या छंदोरचनांपैकी अक्षरछंद वगळता उर्वरित (१) अक्षरगणवृत्ते व (२) मात्रावृत्ते व जाति या मुळात संस्कृतातील छंदोरचना असल्यामुळे त्यांचा प्रसार भारतवर्षात झालेला आहे. भारतभरातील प्रादेशिक भाषांमध्ये या वृत्तांचा- जातिरचनांचा आढळ होत असल्याचे दिसून येते. तेव्हा डॉ० पटवर्धनांचा लयविषयक सिद्धांत या भाषांतील पद्यरचनांना देखील लागू आहेच. जसे मूळ संस्कृत 'शादूर्लविक्रीडित' वृत्त मराठीत जसेच्या तसे आल्याने त्यातील गण-याति-मात्रा मराठी भाषेतही संस्कृतप्रमाणेच लागू असल्याचे आपल्या नित्य परिचयाचे आहेच. तेव्हा अशा मूलभूत स्वरूपाचे लयतत्त्व पद्यरचनांना लावून दाखविणारा 'छंदोरचने'सारखा ग्रंथ प्रकाशित होऊनही त्यातील विचारांची पाहिजे तशी दखल इतर भाषांतील छंद:शास्त्रकारांनी घेतलेली दिसत नाही. असे समजण्याचे एक कारण म्हणजे कोलकाता येथील आशुतोष महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ० अमूल्यधन मुखर्जी यांनी लिहिलेला 'संस्कृतमधील छन्दांचा एका नवीन दृष्टिकोणातून अभ्यास’ या शीर्षकाचा लेख. प्रस्तुत लेखाचा अनुवाद डॉ० पु०द० नवाथे यांनी केला असून तो 'प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन’ या नावाने प्रकाशित केलेल्या वेदशास्त्रोत्तेजक सभा शताब्दी स्मारक ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.

आपल्या या लेखात त्यांनी मांडलेले छंदोविषयक विचार, डॉ० पटवर्धन यांच्या एतद्विषयक विचारांशी मिळतेजुळते आहेत हे त्यांच्या पुढील विवेचनावरून लक्षात येईल. डॉ० अमूल्यधन मुखर्जींच्या प्रतिपादनातील मुद्दे असे आहेत :-
(१) भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात अगदी प्राचीन काळापासून छन्द अथवा वृत्त
या विषयाला पंडितांच्या अभ्यासात महत्त्वाचे स्थान असले तरी खेदाची बाब अशी की संस्कृत काव्यातून योजिलेल्या छन्दांचे शास्त्रीय अथवा पद्धतशीर रीतीने विवेचन करण्याच्या दिशेने फारच थोडी प्रगती झाली.
(२) छंदाच्या नमुन्यांचे असंख्य प्रकारसंकलित करणारे ग्रंथ तयार झाले असले
तरी छंद:शास्त्रकारांनी छंदाच्या लयविषयक अंगाविषयी काहीच विचार केला नाही.
(३) एखाद्या पद्यातील अक्षरांची संख्या तसेच त्यातील लघुगुरूंचा विशिष्ट क्रम,
यासारख्या केवळ बाह्य अथवा वरवरच्या बाबींकडेच त्यांनी लक्ष पुरविले.
(४) परिणामी छंदाच्या लयतत्त्वमूलक वैशिष्ट्यांवर आधारलेले योग्य असे वर्गीकरण होऊ शकले नाही.
(५) अत्यंत भिन्न अशा लयतत्त्वविषयक वैशिष्ट्यांनी युक्त अशी वृत्ते एका गटात
घुसडली गेली आणि याच्या उलट एकाच गटात मोडणार्या वृत्तप्रकारांमध्ये असणारे साम्य क्वचितच ओळखले गेले.
(६) तेव्हा ऐतिहासिक दृष्टीचा मागमूसही नव्हता, तसेच विकसनाची प्रक्रिया अथवा
तत्संबद्ध इतर घटक यांची जाणीवही अभावानेच होती.
(७) वृत्ताच्या बांधणीच्या मागे यति आणि लयबद्धता यांचा काही परस्परसंबंध आहे,
या गोष्टीचा छडा लावण्याच्या दृष्टीने जुने शास्त्रकार अयशस्वी ठरले.
(८) परिणामी पद्यरचनेत उघड उघड दिसणार्या लयबद्धतेच्या वैशिष्ट्यांचे आकलन
त्यांना झाले नाही.

आता डॉ० माधवराव पटवर्धन यांनी आपल्या 'छंदोरचनेत' (पृ० ५६३) व्यक्त केलेले एतद्विषयक विचार बघू.
छंद:शास्त्राचा गेल्या १५०० हून अधिक वर्षांचा इतिहास पाहिला की एक प्रकारचे असमाधानच वाटते. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरचना होय. या मूलभूत सिद्धांताच्या जवळजवळ छंद:शास्त्रकार पुन्हा रुळलेल्या मार्गाने जातात. येऊन छंद:शास्त्राची पुनर्घटना करण्याचा कोणी प्रयत्नज करीत नाही. कोणी थोडी वृत्ते देतो, कोणी पुष्कळ वृत्ते देतो. लक्षण सांगण्याची कोणी त्रिकावलंबी (=त्र्यक्षरी गण-पद्धती) पद्धत घेतो तर कोणी विशिष्ट परिभाषा निर्माण करून त्या भाषेने सांगतो, यापलीकडे त्यांच्या कृतीत भेद नाही. कोणी दुसर्यांृनी रचिलेली उदाहरणे देतात. कोणी ती स्वत: रचून घालतात. पण वाङ्मयाचे मंथन करून छंद:प्रकार कसे परिणत होत आले याचे विवेचन कोणी करीत नाही. आधार देण्याची बुद्धी तर कोणालाच होत नाही. ज्या सामग्रीवरून एखादा सिद्धांत ठरवायचा वा दुसर्या.चा सिद्धांत पारखायचा तीच पुढे नसल्याने त्या सिद्धांताची चर्चा होऊ शकत नाही.''
या दोन्ही छंद:शास्त्रकारांच्या वरील विवेचनावरून त्यांच्यात (१) प्राचीन छंद:शास्त्रकारांनी छंदाचे शास्त्रीय वा पद्धतशीर विवेचन न करता केवळ बाह्य व वरवरच्या बाबींकडेच लक्ष पुरविले व (२) लयबद्धता हेच छंदाचे मूलतत्त्व आहे आणि या लयतत्त्वमूलक वैशिष्ट्यावर पद्याचे वर्गीकरण व्हावयास हवे - या दोन मुख्य मुद्यांबाबत असलेली एकवाक्यता लक्षात येते. मात्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डॉ० पटवर्धनांनी आपल्या 'छंदोरचने'त छंद:शास्त्रात आजवर चालत आलेल्या कुंठितावस्थेवर जसे नेमके बोट ठेवले तसेच त्याची भरभक्केम अशा सैद्धांतिक बैठकीवर उभारणी करून त्याच्या प्रगतीच्या चाकाला दिशा आणि गतीही दिली. या त्यांच्या १९३७ साली केलेल्या कार्याची नोंद मात्र १९७८ साली प्रकाशित झालेल्या डॉ० मुखर्जी यांच्या प्रस्तुतच्या लेखातून घेतली गेलेली दिसत नाही. वास्तविक पूर्वसूरींचे ऋण मान्य करणार्या० व छंदोविषयक विवेचनात मोलाची भर घालणार्याद छंद:शास्त्रकारांना त्यांनी त्यांचे श्रेय दिलेले आहे असे या त्यांच्या लेखातून जाणवते. तेव्हा डॉ० माधवराव पटवर्धनांचा या संदर्भात उल्लेख नसल्याचे कारण सकृतदर्शनी तरी असे असावे की भाषांतराअभावी मराठी भाषेतील हा मोलाचा छंद:शास्त्रीय ग्रंथ बंगाली भाषकांना अपरिचित राहिला असावा. अन्यथा आपला समानधर्मा भेटल्याची खूण त्यांना पटली असती आणि छंद:शास्त्रीय अभ्यासाला मिळालेली गती बघून वाटलेला आनंदही त्यांनी आपल्या या लेखातून व्यक्त केला असता.

पूर्वी शास्त्रकारांची भाषा संस्कृत होती आणि तत्कालीन विद्वानांना, पंडितांना ती अवगत असल्याने त्यातील ज्ञानाचा प्रसार अखिल भारतीय पातळीवर होणे शक्य होत असे. आज प्रादेशिक भाषेत तयार झालेले हे मोलाचे विचारधन भाषिक अडथळ्यामुळे कदाचित योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचत नसावे. तेव्हा अशा मौलिक ग्रंथांच्या भाषांतराची निकड या निमित्ताने जाणवते हे खरे!

डॉ० मुखर्जी यांनी छंदोविषयक काही मुद्द्यांबाबत डॉ० पटवर्धन यांच्यापेक्षा वेगळा विचारही मांडला आहे. त्यावरही साधक-बाधक चर्चा होणे आवश्यक आहे. या मतभिन्नता नोंदविणार्याा मुद्द्यांबाबत मात्र स्वतंत्रच लेख लिहावा लागणार आहे.
[डॉ० अमूल्यधन मुखर्जी यांचे हे छंदोविषयक विचारधन बंगाली भाषेतून मराठीत आणल्याबद्दल डॉ० पु०द० नवाथे यांचे आभार.]

११/इ-२१, सरकारी वसाहत, हाजी अली, मुंबई ४०० ०३४.
दूरभाष : ९८७०३११५३४