स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द

स्वयंपाकघराच्या रचना, तेथील वस्तू, त्यांचा वापर - सारेच बदलत आहे. आठवलं एका अगदी छोट्या टोपलीवरून. माझ्याहून सहासात वर्षांनी मोठी असलेली माझी आतेबहीण माझ्याकडे ती टोपली पाहून उद्गारली, 'अगो बाई मीना, तुझ्याकडे किती छान कुरकुला आहे.'' किती वर्षांनी कानावर पडला तो शब्द, मग आठवली दुरडी - तांदूळ धुण्यासाठी. परडी सुद्धा, पण ती फुले वेचून देवघरात ठेवण्यासाठी! सर्वात मोठा तो हारा. पण ते नित्याचे नव्हेत. हाराभर, फुले, हाराभर आंबे असे कार्यप्रस्था-लाच लागत. अशावेळी मंडईतील हारेवाली भाजी घेऊन आपल्या सोबत घरी येई.

नंतर आठवतात झाकण्या - गोठाच्या. वेळण्या बिनगोठाच्या. भांड्यांवर चपखल बसणार्याय. भातातलं पाणी वेळून टाकणं त्यामुळे सोपं जात असे. छोट्या मंडळींना पाणी पिण्यासाठी गडू, चंबू, बुडकुली किंवा झारी. मोठ्यांना फुलपात्र आणि गडवा, लोटी किंवा तांब्या. पूजेसाठी पंचपात्र. पातळ पदार्थ एकदाच भरपूर वाढता यावा- खेळत बसायला लागू नये म्हणून 'ओगराळं'. प्रवासात फिरकीचे तांबे; पेढेघाटी डबे, चटणी, मिठासाठी दगड्या. तुपासाठी तांबुली किंवा सतेलं. भात-वरणाच्या तपेल्या, आमटी भाजीच्या बोगण्या. निरुंद तोंडाचा गुंड आणि उभा गंज. निखार्‍यावर साखरपाकाच्या वड्या बनवण्यासाठी 'लंगडी', चुलीला जोडलेला 'वैल'. लोणच्याच्या बरणीला बांधायचा 'दादरा'. मोठ्या वाट्या - म्हणजे वाडगे. तर छोटे घमेले म्हणजे तसराळे. भाकरीचे पीठ मळायला काथवट. वरचे झाकण टोपीदार असणारं मोदकपात्र. छोटी ती मडकी. त्याहून मोठं गाडगं. मडक्याहून लहान बोळकं. त्याहूनही लहान 'खुलं.' गाडग्यात पीठ साठवणे किंवा तांदळाच्या वड्याचे पीठ भिजवणे. तर मडक्यात दहीभात ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवला व सकाळी पाणी काढून टाकून खाल्ला तर भाताचा उंडा/उंडी - उन्हाळ्यात थंडावा देणारी! भाज्यांमध्ये डाळ-दाणे म्हणजे व्यंजन. विरघळणारे म्हणजे 'हसणारे' अनारसे. 'चंदेरी' घाटाच्या वाट्या. धान्य मोजायच्या अधोल्या, पायल्या, पासरी. आणि सर्वात छोटा हाताचा 'पसा'. हंडा ठेवायची घडवंची, तर घागरी खाली चुंबळ. तुम्हांला आठवतात अजून काही?

३९/३५, विजय अपार्टमेंट्स, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४. दूरभाष : २५४२ ४४८०