हद्दपार शब्द

भाषेमध्ये शब्द नाण्यासारखे असतात. ते बोलीभाषेत, व्यवहारात, वाङ्मय-व्यवहारात सतत 'चालते' हवेत. नाण्याला फक्त अर्थ असतो. परंतु शब्द अर्थपूर्ण असतो. तो जीवनाशी साक्षात जोडलेला असतो. तो ज्यावेळी जीवनापासून तुटतो तेव्हा तो भाषेतून हद्दपार होण्याची प्रक्रिया नकळत सुरू होते. पूर्वी ग्रामीण जीवनात विवाहातून नाती निर्माण होत, ती जवळपासच्या गावातूनच. त्यामुळे नवीन येणारी सून या ग्रामव्यवहाराशी निगडित असे. शब्द तिला ठाऊक असत. आता शहरातील मुलगी सून म्हणून गावात गेली की ती या शब्दांविषयी अनभिज्ञ असते. एक घरचाच अनुभव सांगते. माझ्या भावाची नातसून आली. घरातीलच शेती. त्यामुळे वाडीत जाणे, काम करवून घेणे सारे ओघाने आलेच. नुकतीच गुहागरला गेले तेव्हा ती आणि मी वाडीत गेलो. तिथे वाडी बेणणार्‍या बायकांना तिने सांगितले, 'वाडीतील सारं गदळ एकत्र करून जाळून टाका' मी सहज विचारले- "यात काय काय आहे माहीत आहे तुला?'' "त्यात काय असणार? ते सारं गदळ.'' मी त्या ढिगाशी उभी राहिले आणि तिला सांगू लागले - ही झावळी, याची उभी दोन कांडी केली की दोन 'तळकटं' होतात. तळकट स्वतंत्र विणून परत ती एकत्र बांधली की 'झाप' होतो. ही माडाची पोय, नारळ लागतात त्याच्या मागील जो भाग असतो त्याला लगटून आहेत या 'पिचोंदर्‍या'. पातळ जाळीदार अशा.

झावळीच्या पुढचा बुडखा कापला की तो होतो 'खाका'. झावळीच्या पात्या स्वतंत्र करून बांधायचा तो 'बिंडा'. पाती तासून काढली की मधे लवलवीत लांब तीन साडेतीन फूट पातळ पिवळसर भाग हाती राहातो तो 'हीर'. हिराची केरसुणी बांधायची. या केरसुणीची ही कितीतरी रूपे. केरसुणी सुंभाने 'पिंढर्‍या वर' (लाकडाचे पिढे) ठोकून काथ्याने-सुंभाने बांधायची. प्रथम ती असते 'लक्ष्मी'. ती देवघरात फिरते. मग होते 'वाढवण.' तिचा वावर माजघर, कोठी, स्वयंपाकघर असा. 'वाढवण' वापरून जरा कमी होते, ती 'केरसुणी.' ती ओटी, पडवी, अंगणात फिरू लागते. ती आणखी बुटकी होते, की होतो 'खराटा' तो थेट गोठ्यात पोहचतो शेण लोटायला. बाथरूम धुवायला, सारवायला. आता 'लक्ष्मी', 'वाढवण', 'केरसुणी', 'खराटा' ही एकाच वस्तूची बदलती रूपे.

'रामा गडी' नारळाच्या झाडावर 'पायंडा' अडकवून चढतो. तो सुंभाचा असतो. पण 'पायंडी' म्हणजे समुद्राकडे जाणारी छोटी वाट. नारळ पाडणारा 'पाडेकरी'. तो नारळाच्या 'पेंडीं' उतरवतो. 'पेंडसाने' निसतो (सोलतो) नारळ 'श्रीफल' फक्त देवघरात. नारळ देवापुढे 'वाढवतात' आणि स्वयंपाकासाठी 'फोडतात'. फोडलेल्या नारळाच्या दोन वाट्या. त्याला 'बक्काल'ही म्हणतात. नारळाची वाटी खरवडली की 'करवंटी' होते. ती घासून गुळगुळीत केली की रांगोळी ठेवायला 'भेली' होते. करवंटी फुटली की 'नरोटी' होते. 'वाटी', 'बक्कयल', 'करंवटी', 'भेली', 'नरोटी' - एकाच वस्तूची ही रूपे. गाईला गोर्‍हा होतो, पाडस होते. म्हशीला रेडा किंवा रेडी होते. पण नवजात रेड्याला श्रीवर्धन भागात 'खोगा' म्हणतात.

वाडीत सुपार्‍या गोळा करायला 'रोवळा' असतो; पण स्वयंपाकघरात तांदूळ धुवायला तिचे रूप संकोचते, बेताचे होते आणि ती 'रोवळी' होते. वाडीत नारळ भरून आणायला 'हारा' असतो. निसलेले नारळ घरात येतात ते 'पाटी'तून. हीच पाटी जरा साजिरं आणि बाळरूप घेऊन स्वयंपाकघरात अवतरते. ती होते 'दुरडी'. पोहे कांडायची 'साळ' धुवायला ती लागतेच.

आता गावात गोठे नाहीत. तिथेही पिशवीतून दूध येते. पोहे दुकानात मिळतात. त्यामुळे 'उखळ', 'कांडप', 'मुसळ', 'सारणी', 'दोमुखं' (दोन ठिकाणी मुख असलेले मातीचे मडके. त्यात पोह्याची साळ भाजली जायची) साळ भाजायचे 'घाटणे' हे सारे शब्द राहाणे मुश्कीलच नाही का?

'निवणी' आणि 'अडणी' हे दोन शब्द. शंखाखाली देवघरात 'अडणी' असते ती कदाचित माहीत असेल. कोकणात बालपणी आमच्याकडे दूधदुभत्यासाठी विविध आकाराची मातीची मडकी होती. ती जमिनीवर स्थिर रहाण्यासाठी त्याच्याखाली आई 'निवणी' ठेवायची. 'निवणी' म्हणजे काश्यापासून केलेली गोल आकाराची वस्तू. मडक्याच्या आकारानुसार ही निवणी असायची. ताकाच्या डेर्‍यायखाली लहान मुलाच्या मनगटाएवढी जाड गोल निवणी असायची. आता ताकमेढी (घुसळखांब) गेला, निवणी गेली, दुधाणीही गेली; कारण त्यांची गरजच संपली.

आज स्वयंपाकघरातील असे कितीतरी शब्द नवीन मंडळींना ठाऊक नाहीत. ते कदाचित कोशात रहातील. त्यांची जरा या ठिकाणी नोंद करते. पूर्वी भात चुलीवर शिजायचा. तांब्याचं एक मोठं सतेलं सतत चुलीवर असायचं. ते बाहेरून मशेरीने पूर्ण काळं व्हायचं. त्याला म्हणायचं 'मेशरं' किंवा 'मशेरकं'. स्वयंपाकाला पाणी सारखं त्यातून घ्यायचं. भात करायला आकारानुसार तांब्याची तपेली, सतेली असायची. शेरभर भात मावेल ते 'शेरकं', तसंच 'दशेरकं' असायचं. तांदूळ मोजायला लाकडांचे 'निठवं' असायचं. भाताला तांदूळ काढायचे त्याला 'ओयरा' म्हणायचे आणि शिजत लावताना तो तपेल्यात 'वैरायचा'. फोडणी करायच्या मोठ्या लोखंडी पळीला म्हणायचे 'थावर'. भरपूर ताक ठेवायला असायचा 'गुंड'. तो कथलाचा असायचा. ताक वाढायला 'कथली' तर तूप वाढायला 'तांबली.' चूल पेटायची 'शेणी' किंवा 'गोवरी'ने. तिला 'थापट्या' पण म्हणत. ओगराळे, तसराळे, टोप, वेळणी (ताटली) रोवळी (बुरडाचीच असायची) वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा असे) बोगणी, भगुलं अशी नाना भांडी आठवताहेत.

कोकणात शंभर वर्षापूर्वीचं माझं घर आहे. ही सारी भांडी मी एका पेटार्‍याअत जपून ठेवली आहेत. माझ्या नातीला गंमत म्हणून दाखवते. आता संसार स्टीलचे आणि प्लॅस्टिकने चकाचक सजले. पितळ्याचे भांडे आता घरात दिसणेच कठीण. काही भांड्यांनी स्टीलचे आकार स्वीकारले. त्यामुळे पिंप, हंडा, परात, कळशी हे शब्द रहातील. पण 'बोगणी,' 'वरणभात,' 'कथली', 'गुंड' हे शब्द आता स्वयंपाकघरातून हद्दपार झाले. अजून दोन पिढ्यांत ते भाषेतून हद्दपार होतील आणि कदाचित कोशात रहातील. हे अटळ आहे. तरीसुद्धा जड वस्तूशीही माणसाचे मन जोडलेले असते. म्हणून त्यांची ही नोंद.

या सार्‍या शब्दांशी आमच्या पिढीचं भावपूर्ण नातं होतं. आता या शब्दांचं प्रेम नवीन पिढीला कसे राहणार? बदलते जीवन नवीन शब्द घेऊन येणे अपरिहार्य आणि अटळच आहे. या शब्दांनी आता राहायचे कोशात आणि कधी हाकारले तर साहित्यात!

लीला दीक्षित
'धृवा', ४९/२, सहजानंद, कोथरूड, पुणे ४११ ०३८ भ्रमणभाष : ९४२२५ २६०४१