भाषेतील म्हणींचे संचित

भाषेतील विविध अवस्थांतरांचे दर्शन प्रामुख्याने भाषेतील म्हणी, वाक्प्रचार आदी भाषिक रूपांतून घडते. एखाद्या समाजाचे जीवन, त्या समाजातील प्रचलित समजुती, त्या समाजाची संस्कृती या सार्‍यांचे संदर्भ भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांसारख्या भाषेच्या अवशेषांतून मिळतात. वास्तविक भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांतून मिळणारे ज्ञान हे अनुमानाचे ज्ञान असते. पहिल्या पिढीच्या अनुभवाला आलेले प्रत्यक्ष ज्ञान दुसर्‍या पिढीकडे जाताना अनुमानाच्या पातळीवर येते आणि म्हणूनच भाषेतील म्हणी म्हणजे भाषेचे संचित अथवा भाषेतील लेणी असे मानले जाते. अर्थात वर्तमानकालीन समाजात भाषेतील या म्हणींकडे जरी फारसे लक्ष दिले जात नसले तरी समाजाच्या एकूण इतिहासात असलेले म्हणींचे महत्त्व नाकारता येत नाही. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे 'अनुभवाचे बोल ते न ठरती फोल' ही गोष्ट आजच्या समाजाला तितकीशी पटणारी नाही. प्रत्येक पिढीतच नव्हे; तर एकाच पिढीत सुद्धा समस्येचे स्वरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळे आजोबाचे शहाणपणाचे बोल नातवाच्या समस्या सोडविण्यास तर अपुरे ठरतातच; पण बर्या.चवेळा पुढच्याला ठेच लागून पाठच्याने शहाणे होण्यासारखीही परिस्थिती असतेच असे नाही. म्हणी म्हणजे अनुभवाचे सार सांगणार्या चटकदार, अर्थगर्भ अशा उक्ती होत. आपल्या बोलण्यात प्रसंगानुरूप चटकदार अशा तयार उक्तींचा वापर करणे ही एकेकाळी बोलीची लकब तर होतीच; पण त्याचबरोबर ते भाषेचे भारदस्तपणही मानले जाई. चटकदार अशा छोट्याशा उक्तीमधून एखादे जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी अथवा जीवनाचे सार सांगून त्यातून बोलणारा समोरच्या माणसासमोर नकळतपणे अनुभवाचे दालन उघडे करीत असे. कारणे कोणतीही आणि कितीही असली तरी एकेकाळी भाषेचे चैतन्य असलेल्या म्हणी आज मात्र भाषिक अवशेषरूपात राहिल्या आहेत. बदलती सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे भाषेत व्यक्त झालेले हे अनुमानाचे ज्ञान नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

समाजाच्या संस्कृतीतील प्राकृतिकतेचे दर्शन तसे पाहता म्हणींतूनच घडते. समाज ही संकल्पनाच मुळी भाषेशी जोडली गेली आहे. कारण एक भाषा बोलतो तो एक समाज असे स्थूलपणे मानले जाते. अर्थात एक मातृभाषा असलेला वा एक प्रादेशिक भाषा बोलणारा समाज तसा एकसंध असला तरी एकसुरी नसतो. कोंकणी समाजाचा विचार करताना वरील विधानाची यथार्थता पटते. 'कोंकणी समाज' ही संकल्पना स्थूलपणे कोंकणात राहणारा आणि संज्ञापनासाठी कोंकणी भाषेचा वापर करणारा समाज याच्यासाठी वापरली जाते. संज्ञापनासाठी कोंकणीचा उपयोग करणारा सर्व जातीजमातींचा, संपूर्ण कोंकणप्रदेशात विखुरलेला छोटा-मोठा प्रादेशिक समाजगट म्हणजे कोंकणी समाजगट होय. कोंकणी बोलणारा समाजगट मग तो प्रांतीयदृष्ट्या महाराष्ट्रीय (मालवणी) असो, गोमंतकीय असो वा मंगळुरी असो; शिवाय तो प्रत्यक्ष व्यवसाय वा शिक्षणाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही वावरणारा असो त्याचे सहजोद्गार, त्याची मानसिकता, त्याची एकूण व्यक्तिगत अभिव्यक्ती ही पारंपरिक म्हणजे कोंकणीच असते. प्रमाणभाषा, व्यावसायिक भाषा म्हणून जरी व्यावहारिकदृष्ट्या त्याला कोणतीही भाषा स्वीकारावी लागली तरी त्याची आत्म्याची भाषा ही पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसाच घेऊन येताना दिसते. म्हणूनच समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी भाषेतील म्हणी उपयुक्त ठरतात. कोंकणी समाजाच्या अंतरंगाचे दर्शन घडविणार्याह कोंकणी म्हणींमधून कोंकणातील चालीरिती, नातेसंबंध, सण-उत्सव, प्रादेशिक संदर्भ अशा एक ना अनेक विस्तारित जीवनानुभवांचे दर्शन घडते. म्हणी म्हणजे भाषेतील गोठवलेले ज्ञान होय. अशा या गोठवलेल्या भाषिक रूपातून कोंकणी माणसाची प्राकृतिक जडण-घडण, कोंकणातील निसर्ग, पशु-पक्षी या सार्यांाचे प्राकृतिकतेशी नाते जोडणारे या म्हणींमधील संज्ञापन जितके नैसर्गिक आहे तितकेच ते रांगडेही आहे. श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे जाणारे हे अनुभव- प्रकटीकरण असल्याने त्यांमध्ये कोंकणी समाजमनाचे अत्यंत उघडे-वाघडे दर्शन घडते आणि त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीनुसार बदलत जाणारे रंगही दिसतात. मौखिक परंपरेने जपून ठेवलेल्या आणि आता केवळ लोकपरंपरेचे संकलन करावे म्हणून संकलित करून ठेवलेल्या म्हणींमध्ये स्थलकालानुसार झालेले बदल हा भाषिक परिवर्तनाचा एक प्रकार म्हणता येईल.

कोंकणप्रदेशात मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेल्या काही म्हणी मालवणी, कोंकणी (गोमंतकी) आणि काही प्रमाणात मराठी या तीनही भाषांमध्ये सारख्याच आढळतात. काही म्हणींमध्ये प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार शब्दभेद झालेला दिसतो, तर काही म्हणी पूर्णतया परिवर्तित रूपांत पुढे येताना दिसतात. एकूणच लघुता, व्यावहारिकता आणि लोकमान्यता हे तीन गुण घेऊन आलेले कोंकणीमधील हे भाषिक धन म्हणजे कोंकणी म्हणी होत. म्हणींचे रूप आटोपशीर असावे लागते आणि हे आटोपशीर रूप लवचीक असल्यामुळेच स्थलकालपरिस्थितीनुरूप अनुभव जिवंतपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात असते. पूर्वजांच्या संचित ज्ञानाचा कोश असलेल्या कोंकणी भाषेतील म्हणींमधून कोंकणी माणसाच्या मार्मिकपणाचे रोखठोक स्पष्टपणाचे तसेच त्याच्यातील रांगडेपणाचेही दर्शन घडते.
मालवण किंवा सिंधुदुर्ग प्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या गोमंतकाला जवळ जाणारा असला तरी राजकीय दृष्ट्या गेली कित्येक दशके तो महाराष्ट्राशी जोडलेला आहे त्यामुळेच मराठी आणि गोमंतकी कोंकणीतील अनेक सामाजिक तसेच सांस्कृतिक संदर्भ मालवणी बोलीत सहज सापडतात. बोलताना म्हणींचा सहज वापर करणे ही मालवणी बोलीची खास लकब होय. मालवणीत वापरल्या जाणार्याआ या म्हणींचा तौलनिक अभ्यास केल्यास त्यांत गोमंतकी कोंकणी, तसेच मराठीतील अनेक संदर्भ सापडतात. काही ठिकाणी केवळ भाषिक परिवर्तन दिसत असले तरी काही ठिकाणी प्रदेशानुसार झालेले अर्थपरिवर्तनही दिसते. उदा० मालवणी कोंकणीत 'आग खांव काय वाघ खांव' ही म्हण आलेला प्रचंड राग व्यक्त करते, तर मराठीत हाच अर्थ 'दही खाऊं की मही खाऊं' या म्हणीतून व्यक्त होतो आहे. 'आगासला ता मागासला पाठसून इल्ला गुरवार जाला' या म्हणीतून नंतर आलेल्याने अगोदर आलेल्यापेक्षा प्रगती करणे असा अर्थ व्यक्त होत असून 'कानामागून आली आणि तिखट झाली' ही मराठीतील म्हण जवळजवळ याच अर्थाची छटा घेऊन येते. काही जाणकारांनी कानामागून हा पानामागून या शब्दाचा झालेला शब्दविपर्यास असून मिर्ची पानानंतर येते आणि पानापेक्षा तिखटपणा दाखवते असा अर्थ असल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे 'आवशीची भयण मावशी, जीवाक जीवशी, बापाशीची भयण आका, डोळ्यांमुखार नाका', या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच 'आका दोळ्यामुखार नाका, मावशी ती मावशी खावपांक भरपूर दिवशी' अशी म्हण गोमंतकीय असून 'आना भयनी आका तूं म्हाका नाका, अम्मा भयिनी मावशी म्हाका पावशी' अशी म्हण मंगळुरी कोंकणीत वापरली जाते. मराठीतील 'माय मरो; पण मावशी उरो' या म्हणीतील थोडासा संदर्भ घेऊन येणार्या या सर्व म्हणींमधून आईच्या बेंबीशी संबंध असलेल्या मावशी या नात्यातील जैविक संबंध व्यक्त झालेला दिसतो. 'आये आतकारीण, बाये पातकारीण, गिरजा धाकटेकारीण तुया तसला तर मियां असला' या मालवणी कोंकणीतील म्हणींच्या अर्थाला समांतर जाणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणून 'म्हगेले धस्स, तुगेले फस्स' या म्हणीकडे पाहता येते. मालवणी कोंकणीत 'आमचो बाबगो काय करी, आसलाला नाय करी' अशी म्हण नालायक माणसाने काम न करता कामाचे बारा वाजवणे या अर्थाने वापरली जाते. याच अर्थासाठी गोमंतकी कोंकणीत 'कुड्डी उदकांक गेली आनी बुडकुलो फोडून घरां आयली' अशी वापरली जाते. 'गावात म्हाळ आणि कुत्र्याक बोवाळ' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीमधील म्हण म्हणजे 'कोणाच्या व्हराडां कोण मुरड' ही होय. कधी कधी केवळ भाषांतरातूनही म्हणीचे वेगळेपण राखलेले दिसते. उदा० 'चेडक्या बांयत पडला आणि बोंद्राचो चिखल गेलो,' या मालवणी

कोंकणीतील म्हणीचे गोमंतकी कोंकणीत 'सोबले बायंत पडले आनी कापड नितळ जाले' असे भाषांतरित रूप दिसते. 'बाळो माजो बाळो कोलत्यांनी खेळुं, घर जळल्यार जळूं पुण बाळो माजो खेळूं' या मालवणी कोंकणीतील म्हणीचे रूप गोमंतकी कोंकणीत 'निळू म्हजों निळू खलतें खेळूं, निळू म्हजो खेळूं' या म्हणीत कोलती म्हणजेच जळते लाकूड या मालवणी म्हणीतील शब्दाचा विपर्यास होऊन खलते असा झाला असला तरी कोंकणीत आज प्रचलित असलेला अर्थ खलते म्हणने खलबत्त्यातील खल हा होय. खल ही अत्यंत जड लोखंडी वस्तू असून ती मुलाला खेळण्यासाठी देणे हा लाडाचा एक खास प्रकारच आहे. मराठीत हाच अर्थ घेऊन येणारी म्हण म्हणजे 'लाडे लाडे केले वेडे' ही होय. 'घोवाच्या भयान घेतला रान, थंय भेटेलो मुसलमान, तेणां कापला नाक कान' या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच गोमंतकी कोकणीत 'मडक्यातल्यान कायलेन पडलो, कायलेतल्यान उज्यान पडलो, जळून गोबर जालो' असा अनुभव येतो. मराठीतील 'आगीतून सुटला फोफाट्यात पडला' या अनुभवाशी जवळ जाणारा असा हा अनुभव आहे. 'रिकामको सुतार बायलेचे कुले ताशी' या मालवणी म्हणीत पायलेचे या शब्दाचे परिवर्तित रूप दिसते. पायली हे धान्य मोजण्याचे लाकडी माप ज्याचा तळ फार जाड असतो, त्यामुळे ही म्हण प्रचलित झाली असावी; परंतु कालांतराने पायलेचे या शब्दाचे विकृत असे रूप प्रचलित झाले असावे. गोमंतकी कोंकणीत हीच म्हण 'बेकार मेस्त गांड तासता' अशी वापरली जाते; तर मराठीत 'रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी' अशा रूपात ती येताना दिसते. 'वेताळाक नाय होती बायल आणि भावका देवीक नाय होतो घोव' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणजे 'आरेल्या न्हवर्याकक भुरेली व्हंकल' ही होय. 'नगार्या ची घाय थंय तुणतुण्याचा काय?' या मालवणी म्हणीतील अनुभव 'हागर्याकफुडे वागरे खंचे?' या गोमंतकी कोंकणीतील म्हणीत सापडतो. 'उधार तेल खंवटा' या मालवणी कोंकणीतील म्हणीचा अर्थ 'सवाय खाण पॉंट फुगयता' या म्हणीतून व्यक्त होतो.

एकूणच कोंकणीतील म्हणींचा खजिना अमर्याद असाच आहे. 'माराक आयला काय दिवाड म्हारवाडातच जाता', 'राजाचा न्हेसाण ता मडवळाचा पायपोसाण', 'माझा माका थोडा व्यायान धाडला घोडा', 'उपाजली कुळीया, दिली म्हादळीया दो हाती टाळिया वाजविली', 'जायाचा गो मोती, मुराडशीत किती, लाथ मारतीत आणि धेवन जातीत', 'म्हस घेवच्या आदि दाव्याचो गजाली कित्याक?', 'अधिक ऊ तेका खाज नाय, अधिक ऋण तेका लाज नाय’, अशा किती तरी म्हणींचा अभ्यास समाजजीवनाच्या अभ्यासास उपयुक्त ठरू शकतो. 'तोंणान मोग पोटांत फोग’ (=मूँह में राम बगलमें छूरी), 'उदकान आसा मासो मोल करता पिसो’ (=बाजारात तुरी, भट भटणीला मारी), 'वानात तकली घालतकीर मुसळाचो कसलो भय', 'जळोव आसा म्हण मरणांक उबो रांव?' अशा किती तरी म्हणी या थोड्या प्रमाणात मनोवैज्ञानिक अभ्यासाला दिशा देऊ शकतील. थोड्या प्रमाणात का होईना, पण आजही कोंकणातील जनसमुदाय या अशा भाषिक संचिताचा वापर करताना दिसतो आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या रेट्यात अडकलेल्या या भाषिक खजिन्याचे रक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.

पी०ई०एस०एस०आर०एस०नाईक महाविद्यालय
फर्मागुडी - फोंडा (गोवा.)
दूरभाष : ०८३२-२३१२६३५/२३३५१७१