धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती आणि त्यांचे सामाजिक संदर्भ

खानदेशातील धुळे जिल्ह्याचा ग्रामीण परिसर म्हणजे अहिराणी बोलीचा केंद्रप्रदेश आहे. या भागात विभागानुसार ज्याप्रमाणे अहिराणी बोलीचे 'क्षेत्रीय भेद' आढळतात; त्याप्रमाणे विविध जाती-जमातींनुसार 'स्तरीय भेद'ही आढळतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'महार' ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. समाजात दलित किंवा पूर्वास्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या या जातीच्या लोकपरंपरा, लोकवाङ्मय, लोकबोली आपले वेगळेपण जपून आहेत. हे वेगळेपण त्यांच्या लोकबोलीतील लोकोक्तींमधूनही व्यक्त होताना आढळते. महार समाजात प्रचलित असलेल्या लोकोक्तींमध्ये म्हणजेच वाक्प्रचार व म्हणींमध्ये त्यांच्या लोकजीवनाचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आढळतात. लोकोक्तींमधील शब्दांना लोकरूढी, लोकप्रथा, लोकसंकेत यांमुळे वैचित्र्यपूर्ण आशय प्राप्त झालेला दिसतो.

म्हणी आणि वाक्प्रचार हा लोकवाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार आहे. मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि समाजभाषावैज्ञानिक दृष्टीने त्यांचा अभ्यास क्वचितच केला गेला आहे. दैनंदिन जीवनात लोक म्हणींचा वापर अतिशय कुशलतेने करताना आढळतात. सामाजिक संज्ञापन प्रक्रियेतील तो महत्त्वाचा घटक आहे. मानवी स्वभावाचे विविध पैलू मोठ्या कौशल्याने व बुद्धिचातुर्याने म्हणींतून प्रकट होताना आढळतात.

लोकजीवनात प्रचलित असलेल्या म्हणी व वाक्प्रयोगांना लोकजीवनाचे अनेक संदर्भ लाभलेले असल्याचे जाणवते. लोकजीवनात रूढ असलेल्या म्हणी व वाक्प्रचारांना एक परंपरा असते. लोकजीवनातील अनेकविध सार्वत्रिक अनुभव म्हणी किंवा वाक्प्रचारांतून आविष्कृत होतात. त्यामुळे निरनिराळ्या लोकसमूहात एकाच अर्थाच्या म्हणी प्रचलित असलेल्या आढळतात. उदा० 'यत्र यत्र धूम: तत्र तत्र वह्नि:’ 'व्हेअर देअर इज स्मोक देअर इज फायर’, 'विस्तव असल्याशिवाय धूर निघणार नाही’, 'नरम असाबिगर पानी मराव नही’ (=भुसभुशीत जमिनीशिवाय पाणी मुरत नाही) या संस्कृत, इंग्रजी, मराठी व अहिराणी भाषांमधील म्हणींचा लक्ष्यार्थ एकच आहे, असे दिसेल.

लोकजीवन आणि म्हणी यांचा संबंध अतिशय घनिष्ठ आहे. म्हणींच्या वापरामुळे लोकांची भाषावृद्धी होते. म्हणींच्या द्वारे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना त्या समाजाचा अभ्यास करणे सोपे जाते. कारण म्हणींतून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ समर्थपणे आविष्कृत होतात. संबंधित समाजाचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन जतन करण्याचे काम 'लोकोक्ती' करतात. म्हणी भाषेतील लुप्त होऊ पाहणारे शब्द वाचवतात. एकंदरीत लोकजीवनातील विविध रंग लोकोक्तींतून अभिव्यक्त होतात.
धुळे जिल्ह्यातील महार समाजाच्या अहिराणी बोलीत ज्या लोकोक्तींचा वापर होतो त्यांना सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असल्याचे आढळते. उदा० धुळे जिल्ह्यातील ग्रामीण महार समाजात विवाहविषयक काही प्रथा आहेत. त्या प्रथांविषयी माहिती असल्याशिवाय त्या म्हणींचा अर्थ आपल्याला कळणार नाही. जसे - 'बाईंना फुले बाईले नि शाबासी मन्हा याहीले’ या म्हणीतील प्रत्येक शब्दाचा अभिधात्मक अर्थ आणि लाक्षणिक अर्थ वेगळा आहे आणि त्यातून पुन्हा संपूर्ण म्हणीची लक्षणा वेगळीच आहे. या म्हणींत 'बाई' या शब्दाचा अर्थ नववधू, 'फुले' या शब्दाचा अर्थ लग्नकार्याचा खर्च पेलण्यासाठी वधूपित्याला मिळालेली वरपित्याकडची आर्थिक मदत, 'याही' या शब्दाचा अर्थ व्याही होय. मुलीच्या किंवा नियोजित वधूच्या नावाने मिळालेल्या आर्थिक मदतीतून लग्नाचा खर्च भागविणे; व लोकांच्या धन्यतेस पात्र ठरणे. नवरीच्या नावाने नवरदेवाच्या बापाकडून नवरीच्या बापाला पैशांची मदत केली जाते. त्यातून लग्नसमारंभ पार पडतो व नवरीचा बाप त्याचे काही योगदान नसताना शाबासकीस पात्र ठरतो, असा या म्हणीचा सामाजिक संदर्भ आहे. हा संदर्भ महार जातीच्या विवाहप्रथेतून आलेला आहे. पूर्वीच्या काळी महार समाजात गरीब वधूपित्याला वरपिता जी मदत करायचा त्या मदतीला 'हातबाही' असा शब्द प्रचलित आहे. या 'हातबाही'रूपाने मिळालेल्या मदतीत लग्नसमारंभ पार पाडला जात असे. आज या म्हणीचा अर्थ 'त्याग एकाचा व शाबासकी दुसर्या ला' असा लक्षणेने घेतला जातो.

'रायरंग' ही महार जातीतील एक पोटजात होती. आज ही जात महारांमध्ये विलीन झाली आहे. जुन्या काळात रायरंग हे लोककलावंत महारवाड्यात येऊन रामायण-महाभारतातील कथाभागावर रात्रभर सोंगे वठवून महार स्त्री-पुरुषांचे मनोरंजन करायचे. राजाचे सोंग वठवून रायरंग रात्रभर राजेशाही थाटाने बोलायचा, वागायचा. सकाळी मात्र त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहात नसे. अशा विसंगत अनुभवातून 'रायरंग रातभर राजा नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा’ ही म्हण निर्माण झाली आहे. महार जातीत प्रचलित असलेल्या म्हणी महारेतर जातीतील लोकांना कळत नाहीत; कारण या म्हणींचे आकलन होण्यासाठी संबंधित समाजाचे सामाजिक सांस्कृतिक जीवन परिचित असणे गरजेचे आहे. काही गोष्टी तात्कालिक असतात, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. प्रत्येकाचा विशिष्ट काळ असतो. नंतर त्याला समाजात कोणीही विचारत नाही, असा या म्हणीचा अर्थ आहे.
काही म्हणींतून कुटुंबातील विशिष्ट नातेसंबंधातील ताण-तणावांचे दर्शन घडते. सासू-सून, नणंद-भावजय हे नातेसंबंध संघर्षमय आढळतात. त्याला महार समाजही अपवाद नाही. उदा० 'भाडाना घरथीन झोपडी बरी नि रांडमूंड ननीनथीन सयेत बरी’ या म्हणीतून नणंद-भावजयीच्या संघर्षपूर्ण नात्यावर प्रकाश पडतो. ननीन म्हणजेच नणंद मुळातच वाईट त्यात पुन्हा 'रांडमूंड' म्हणजे विधवा असेल तर तिचा मुक्काबम कायमस्वरूपी माहेरी. अशा परिस्थितीत भावजयीच्या उखाळ्या-पाखाळ्या काढून भाऊ-भावजयीचे भांडण लावण्यात तिला धन्यता वाटते. कारण जे सुख तिला मिळाले नाही, ते इतरांनाही मिळू नये, ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सवत परवडली परंतु नणंद घरात नको, या निर्णयापर्यंत संबंधित घराची सून आलेली असते. अशा कौटुंबिक वास्तवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे. काही वेळेस दोन्ही गोष्टी घातकच असतात, तेव्हा कमी घातक कोण, याचा निर्णय घ्यावा लागतो, 'दगडापेक्षा वीट मऊ' या न्यायाने विधवा नणंदेपेक्षा सवत परवडली.
महार समाजात पूर्वीच्या काळी एकापेक्षा जास्त बायका करण्याची प्रथा होती. गावकामासाठी अनेक स्त्रियांची गरज पडण्यातून हा रिवाज निर्माण झाला असावा. किंवा महार जातीतील पुरुषांच्या लैंगिक आसक्तीतून ही प्रथा निर्माण झाली असावी. त्यातून 'दुसार व्हयनी रानी, पयली वाहे पानी’, 'दुसरी उनी घरमा, पयली गयी गोरमा’ अशा म्हणींची निर्मिती झालेली आहे. 'दुसरी’ म्हणजे 'दुसरी बायको’, 'पयली’ म्हणजे 'पहिली बायको’, दुसरी बायको येण्याने पहिल्या बायकोचे हाल होतात; म्हणून ती लवकर मरते म्हणजे 'गोरमा’ जाते 'गोर’ म्हणजे प्रेताला पुरण्याचा खड्डा. महार जातीत मृताला पुरण्याची प्रथा आहे. त्यातून हा शब्द प्रस्तुत म्हणीत आला आहे. दुसरी बायको नवीन असल्यामुळे स्वाभाविकच तिचे नवर्यालकडून हट्ट किंवा लाड पुरविले जायचे व पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष केले जायचे. अशा अनुभवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे. एकाच्या येण्याने दुसर्या्चे महत्त्व कमी होणे, किंवा त्याचे नुकसान होणे असा या म्हणीचा लक्ष्यार्थ आहे.

महार समाजात गंधर्व पद्धतीने स्त्रियांचे पुनर्विवाह होतात, त्याला 'गंदोरं’ किंवा 'मोथीर’ असे म्हणतात. या विवाह प्रकारामध्ये वयस्क माणसाबरोबर विवाहबद्ध व्हावे लागत असे. त्यातून 'धल्ला नवरा कया, कुयले आसरा झाया’ ही म्हण निर्माण झालेली आहे. 'धल्ला नवरा’ म्हणजे म्हातारा नवरा. तो कामजीवनाच्या बाबतीत कमकुवत असला तरी वंश चालविण्यासाठी म्हणजे 'कूय’ 'कूळ’ चालविण्यासाठी आधार असतो. संबंधित स्त्रीला कामजीवनापेक्षा मूल-बाळ होणे जास्त महत्त्वाचे वाटत असे. अशा भावनेतून तरुण स्त्रिया म्हातार्यास नवर्यावबरोबर 'गंदोरं’ पद्धतीने लग्न लावत असत. अशा अनुभवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे.’एखादी गोष्ट अजिबात नसण्यापेक्षा काहीतरी असणे बरे’ असा या म्हणीचा लक्ष्यार्थ आहे.

वरील प्रकारच्या विवाहसंबंधातून नवीन समस्या निर्माण होत असे. त्यातून 'धल्ला नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे’ ही म्हण निर्माण झाली आहे. प्रस्तुत म्हण विजोड संसाराचे चित्र अधोरेखित करते. 'धल्ला नवरा’ म्हणजे लैंगिकदृष्ट्या कमकुवत नवरा व 'जुवान बायको’ म्हणजे 'तरुण पत्नीक’ किंवा तारुण्याने मुसमुसलेली बायको. 'रातभर खिजे’ म्हणजे लैंगिक अतृप्तीतून रात्रभर अस्वस्थता अनुभवणे किंवा तळमळत राहणे. विरोधी गुणधर्माच्या व्यक्ती एकत्र येण्याने समस्या निर्माण होतात, किंवा दु:खच निर्माण होते असा या म्हणीचा लक्ष्यार्थ सांगता येईल.

अशा प्रकारे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असलेल्या म्हणी महार जातीच्या अहिराणी बोलीत विपुल प्रमाणात आढळतात. अजून काही म्हणींचा उल्लेख करता येईल - (१) 'घरमा फुटेल बोयका नि मांगस दोन-दोन बायका’, [=घरात गाडगे फुटके, बायका मात्र हव्यात दोन-दोन] (२) 'तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले’, [=तुम्हांआम्हांला सांगायला भगतीण, प्रत्यक्षात असते वेगळीच] (३) 'नाईकभाऊले वाडा भ्याये नि घरनी बाई बाहेर पये’, [=नाईकाला - वस्तीच्या प्रमुखाला - सगळा गाव घाबरतो, पण त्याच्या बायकोचे संबंध भलत्याशीच] (४) 'भन्दं र्हाायनं देववर भगत गया शीववर’, [=प्रेतात्म्यांना शांत करण्यासाठी तयार केलेले तळलेले पदार्थ घरातील देवाच्या ठाण्याजवळ विसरून गावसीमेवर प्रेतात्म्यांना शांत करण्यासाठी जाणे] (५) 'महारनं आख्खं गाव नि त्याने नही कोठे ठाव’, [=गावकामगार म्हणून महार आख्ख्या गावाचा, पण राहण्यासाठी मात्र त्याला गावात घर नाही. त्याचं ठिकाण गावाबाहेरच] (६) 'खरानं व्हयनं खोटं नि छिनालनी गाव लुटं’, [=चांगल्या शीलाच्या बाईला हास्यास्पद ठरवून छिनाल बाई सार्या' गावाला आपल्या कह्यात ठेवते.] (७) 'गावमा ऊना पोया नि महारले आनन झाया’, [=गावात पोळा असला की गावकामगार महाराला आनंद होतो. (कारण त्याला पोळा सणाला धान्य, कापड असं बलुतं मिळतं.)] (८) 'नदारीमा सिरीमंती ऊनी ते बोबड्या बोले नि, धयडपने दिन ग्यात ते पोट काढी चाले’, [=एखाद्या दरिद्री माणसाला अचानक श्रीमंती आली तर ती त्याला पचत नाही. म्हातारपणी दिवस गेलेली बाई सार्या) गावाला आपलं पोट दाखवत फिरते.] अशा शेकडो म्हणी आढळतात. या म्हणी केवळ दलित-महार समाजाच्या अहिराणी बोलीतच आढळतात. त्यांच्या समाजभाषावैज्ञानिक अभ्यासातून एक नवी बाजू पुढे येईल.
म्हणींप्रमाणेच महार जातीच्या वाक्प्रचारांना सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक संदर्भ आढळतात. जसे – 'शीव दाबनी पडी’, 'खोयमा टाकेल से’, 'आकडी धरेल से’ इत्यादी अनेक वाक्प्रचारांना लोकविधी, लोकप्रथांचे संदर्भ आढळतात. महार जातीत पूर्वीपासूनच विधवांचे पुनर्विवाह करण्याची प्रथा रूढ आहे. मात्र असे पुनर्विवाह आजही हळद लावून होत नाहीत. 'गंदोरं’ पद्धतीने हा विवाह अर्ध्या रात्री केला जातो. या पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या पतिपत्नीनला कोणत्याही धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होता येत नाही. अशा पद्धतीने विवाहित झालेल्या जोडप्यावर दुष्ट शक्तींची अवकृपा असते म्हणून ज्या रात्री हा विवाह केला जातो त्याच रात्री भगत त्या जोडप्याला गावाच्या सीमेवर म्हणजेच 'शीव’वर घेऊन जातो व मंत्र-तंत्र विधी करून दुष्ट शक्तींना शांत करतो त्याला 'शीव दाबणे’ असे म्हणतात. 'शीव' दाबल्यामुळे दुष्ट शक्ती गावाची सीमा ओलांडू शकत नाहीत असा समज आहे. 'शीव' दाबल्यानंतर त्याच रात्री त्यांचा संबंध आला पाहिजे असा संकेत आहे. अशा रूढीतून प्रस्तुत वाक्प्रयोग निर्माण झाला आहे. अशुभ निवारण करणे, अडथळा दूर करणे अशी या वाक्प्रयोगाची लक्षणा आहे.

धुळे परिसरातील महार जातीत खंडोबा किंवा खंडेराव महाराज या लोकदैवताला धर्मांतरानंतरही महत्त्वाचे स्थान आहे. संकटनिवारक लोकदैवत म्हणून या दैवताकडे पाहिले जाते. खंडोबाच्या नावाने 'गोंदय’ (गोंधळ) देण्याची प्रथा प्रचलित आहे. हा गोंधळाचा कार्यक्रम विशिष्ट प्रसंगी ठेवण्याची प्रथा आहे. जसे कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न करायचे असेल तर लग्न लावण्यापूर्वी 'गोंदय’ देण्याची प्रथा महार जातीत आहे. परंतु संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकाच वेळी गोंधळाचा खर्च व लग्नकार्याचा खर्च पेलण्याइतकी नसेल, तेव्हा नियोजित वराची आई किंवा वडील खंडोबाच्या नावाने 'आकडी' धरतात. 'आकडी धरणे' म्हणजे खंडोबाचा गोंधळ जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत बोकडाचे किंवा मेंढ्याचे मांस न खाण्याची प्रतिज्ञा करणे किंवा निश्चय करणे. 'त्यानी आकडी धरेल से' असा वाक्प्रयोग ह्या प्रथेतून आलेला आहे. ही पार्श्वभूमी कळल्याशिवाय प्रस्तुत वाक्प्रयोगाचा अर्थ कळत नाही. 'आकडी धरणे'चा लाक्षणिक अर्थ प्रतिज्ञा करणे, निश्चय करणे असा आहे.

धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर्वी कुणबी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या मुलाला मृत्यूपासून वाचविण्यासाठी महार स्त्रीच्या 'खोय' म्हणजे ओटीत टाकण्याची प्रथा होती. आजही ही प्रथा काही गावांमध्ये प्रचलित असल्याचे आढळते. कुणबी समाजातील काही जोडप्यांचे अपत्य जन्मल्यानंतर मृत्यू पावत असे. अशा मृत्यूचा अर्थ दुष्ट शक्तींची नजर आहे असा लावला जात असे. या संकटावर उपाय म्हणजे त्या अपत्याला महार स्त्रीच्या ओटीत विधिपूर्वक टाकणे. एकदा हे मूल महार स्त्रीच्या ओटीत टाकले म्हणजे दुष्ट शक्ती त्याचे काहीही करू शकणार नाही अशी समजूत होती. अशा ओटीत टाकलेल्या मुलाचे नाव 'महारू' असे ठेवले जात असे. 'त्याले महारीणना खोयमा टाकं तवय तो जगना’ अशी वाक्ये आजही ऐकायला मिळतात. त्यातून 'खोयमा टाकेल से’ किंवा 'खोयमा टाकणे’ हा वाक्प्रयोग निर्माण झाला आहे. याचे लाक्षणिक अर्थ दुष्ट शक्तींपासून वाचविणे, अवकृपा टाळणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे असे घेतले जातात.

अशा प्रकारचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असलेले वाक्प्रयोग महार जातीच्या अहिराणी बोलीत विपुल प्रमाणात आढळतात. जसे - (१) 'देरवट वायेल से’, [=दिराबरोबर भावजयीचे लग्न करणे (घरातील वस्तू घरच्यालाच देणे)] (२) 'महार वर देनं पडीन’, [=महार दांपत्याला जेवू घालणे] (३) 'बाबत्या झेलन्या पडथीन', [=अहेर करणे, साडीचोळी घेऊन देणे] (४) 'सोडवन करनी पडी’, [=(महार स्त्रीच्या ओटीत टाकलेल्या मुलाला लग्नाची हळद लावण्यापूर्वी महार स्त्रीच्या ओटीतून त्याची) विधिपूर्वक सोडवणूक करावी लागते.] (५) 'हातबाही देनी पडी’, [=हाताची बाही (फूल ना फुलाची पाकळी) देणे] (६) 'डेरगं भरनं पडीन’, [=घडा भरणे (मृतात्म्याच्या शांतीसाठी नातेवाईकांनी पक्वान्ने वगैरेनी मातीचा घडा भरण्याचा विधी करणे)] (७) 'न्हानी पूंजनी पडी’, [=सटवीला शांत करणे. बाळंतिणीच्या आंघोळीची जागा पुजणे] (८) 'रिंगन भरनं पडी’, [=कडक मंत्रतंत्रादि उपचार करणे] (९) 'लंगर तोडना पडी’, [=(खंडोबाची) साखळी तोडणे] (१०) 'आठखोय मोडी ल्या’, [=नाट मोडणे, पतिपत्नी'चे मीलन घडविणे] (११) 'पोट खाले येयेल से', [=पहिल्या पतीचे अपत्य सोबत येणे] (१२) 'सल्ल्या काढना पडी', [=सरडा बाहेर काढणे (मनातली शंका दूर करणे - भ्रम दूर करणे] (१३) 'कडी चढी जावो’, [=घराला कुलूप लागणे, सत्यानाश होणे] (१४) 'काटं लागी जावो’, [=घराभोवती काट्यांचे कुंपन लागणे, सत्यानाश होणे] (१५) 'भादीमायनी शप्पत’, [=भादी देवीची शपथ खाणे. (कधीही खोटं न बोलण्याची प्रतिज्ञा करणे)] इत्यादी वाक्प्रयोगांच्या अभिधार्थांना सामाजिक संदर्भ आहेत. हे सामाजिक संदर्भ महार जातीच्या लोकजीवनातून प्राप्त झालेले आहेत. धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या अहिराणी बोलीत-लोकोक्तींचे समृद्ध भांडार आढळते. प्रस्तुत लोकोक्ती महार जातीचे सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक जीवन अगदी सोप्या भाषेत व्यक्त करताना आढळतात. लोकवाङ्मयातील किंवा लोकबोलीतील हा 'मौलिक ठेवा' नीट जतन करून पुढील पिढीच्या हवाली करणे त्या-त्या समाजाचे कर्तव्य ठरते.
संदर्भ :
(१) 'लोकसाहित्याची रूपरेखा' - दुर्गा भागवत
(२) 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' - संपा० य०रा० दाते, चिं०ग० कर्वे
(३) 'लोकवाङ्मय रूप-स्वरूप' - डॉ० शरद व्यवहारे
मुलाखती :
(१) श्री० शंकर भिवा भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(२) श्री० किसन नथ्थू मोरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(३) श्रीमती लक्ष्मीबाई अर्जुन भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(४) श्रीमती येसाबाई हिरचंद भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
अजिंठा-२८, रघुवीरनगर, खोडाईमाता रोड, नंदुरबार ४२५ ४१२, भ्रमणभाष : ९८२२२९४२५५