धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास

लोकसाहित्यात पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन प्रगट होत असते. समाजात रूढ असणार्या समजुती, भ्रम, मंत्र-तंत्र, लोकरूढी, उत्सव यांचे दर्शन घडत असते. कधी लोकगीतांत, लोककथांत यक्ष, गंधर्व, किन्नर अशा अतिमानवी व्यक्तींचे उल्लेख आढळतात, तर कधी राक्षस, भूत, हडळ, जादूटोणा, प्राणिकथा अशा लोकतत्त्वीय घटकांचा मुक्त आविष्कार आढळतो. समाजात रूढ असणारे विधी, आचार-विचार, शुभ-अशुभाच्या कल्पना, शकून-अपशकुनाच्या कल्पनाही विखुरलेल्या असतात. ज्या समाजात, ज्या काळात ते लोकसाहित्य निर्माण झालेले असते, त्या समाजाचे दर्शन लोकसाहित्यातून घडते. त्या विशिष्ट समाजात रूढ असणार्या प्रथा, समजुती, रूढी-परंपरा त्यातून प्रगट होतात.

प्रस्तुत लेखात धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास करण्याचा प्रयत्ना केला आहे.

धनगर समाज पूर्वी भटक्या अवस्थेत होता. आता तो बर्यायच अंशी स्थिरावला आहे. या धनगर समाजाबद्दल डॉ० सरोजिनी बाबर यांनी उत्पत्तीकथा नमूद केली आहे. एकदा मेंढ्यांचे व शेळ्यांचे कळप वारुळातून निघाले. हे कळप शेताची नासाडी करू लागले. तेव्हा लोकांनी महादेवाची प्रार्थना केली. महादेवाने मेंढरांच्या राखणीसाठी धनगर लोक निर्माण केले.

धनगर लोक बिरोबाचे उपासक आहेत. माळावर, गावाबाहेर बिरोबाचे मंदिर असते. बिरोबाचीही जन्मकथा सांगितली जाते. ही कथा अशी : एका कुणब्याला शेत नांगरताना एक मुलगी मिळाली. कुणब्याने ती मुलगी राजाला दिली. तिचे नाव गंगासुरावंती. गंगासुरावंती वयात आल्यावर राजा तिच्यासाठी वर शोधू लागला; पण गंगासुरावंतीला कौमार्यच हवे होते. पुरुष सहवासाचा तिला तिटकारा होता. म्हणून ती लग्नाला नकार देत राहिली. पण एकदा गायीचा पान्हा पिणारे वासरू तिने पाहिले, त्यामुळे तिच्या मनात वत्सलभाव जागृत झाला. तिला मातृत्व हवेसे वाटू लागले; पण तिला पुरुषाच्या सहवासाशिवाय आई व्हायचे होते. त्यासाठी तिने तप आरंभले. ‘बिनमेघाचे धान्य दे. बिनफुलाचे फळ दे आणि बिनभोगाचा पुत्र दे.' अशी प्रार्थना केली. तिला शंकरपार्वती प्रसन्न झाले. त्यांनी तिला बिनमेघाचे धान्य दिले. त्या धान्याच्या भाकरीत शंकराने प्रवेश केला. ती भाकरी तिने खाल्ली व ती गर्भवती राहिली. यथावकाश गंगासुरावंतीला पुत्र झाला, तोच बिरोबा! धनगरांचे दैवत!

बहुतेक सर्व देवतांचा जन्म असा सामान्यांहून वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे आढळते. हे लोकतत्त्व आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर रामजन्म झाला. सीता ही भूमिकन्या आहे. द्रौपदीही ‘याज्ञसेनी' आहे. ती यज्ञातून निर्माण झाली. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींच्या अवताराची कथाही अशीच अद्भुत आहे. देव-दैवतांच्या जन्माचे हे लोकतत्त्व अन्य धर्मांतही आढळते.
कोजागिरी पौर्णिमेला बिरोबाची यात्रा भरते. भल्यामोठ्या ढोलाच्या तालावर रात्रभर गीते म्हटली जातात. देवाचे सुंबरान मांडतात. सुंबरान महणजे स्मरण.

‘सुंबरान मांडिलं गा सुंबरान मांडिलं ।
आदि नमन गणाला । पतिव्रता पार्वतीला ।
कैलाशीच्या महादेवाला । काशीलिंग बिरोबाला ।।’
अशा गीताने यात्रा सुरू होते.

कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या नमनाने करायची प्रथा लोकमानसात रुजलेली आहे. मग तो कार्यक्रम विवाह, वास्तुशांत यासारखा धार्मिक असेल किंवा संतांनी - पंडितांनी लिहिलेला एखादा ग्रंथ असेल. कोणत्याही पूजेत सुपारीचा गणपती पुजला जातो. ‘ॐ नमोजी आद्या' म्हणत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. धनगरांचे सुंबरानही याला अपवाद नाही.
महादेव कैलास पर्वतावर राहतो ही सुद्धा लोकमानसाची श्रद्धा आहे. ‘रामायण', ‘महाभारत' या ग्रंथांत, पुराणात कैलास पर्वताचा उल्लेख आहे. दासबोधातही कैलासाचा उल्लेख आढळतो.
ब्रह्मशृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मर्गजाचा ।
शिवशृंग तो स्फटिकाचा । कैलास नाम त्याचे ।।
(द० ४, स० १०, ओ० १२)

म्हणजे ब्रह्मदेवाचा सत्यलोक सोन्याचा आहे. विष्णूचा वैकुंठलोक पाचूचा आहे व शंकराचा कैलास स्फटिकाचा आहे. वर उल्लेख केलेल्या धनगरी गीतातही हेच लोकतत्त्व आढळते.

त्याचप्रमाणे बिरोबा हा शंकराचा अवतार आहे अशी धनगर समाजाची श्रद्धा आहे. गंगासुरावंतीला दिलेल्या भाकरीत शंकराने प्रवेश केला होता. म्हणून काशीलिंग बिरोबा असा उल्लेख वरील गीतात आढळतो.
देव बहुतांशवेळी डोंगरावर राहतो. त्याच्या दर्शनाची वाट चढाची, काट्याकुट्याची अवघड असते. भक्ताला त्याचे दर्शन सहजासहजी होत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनाला डोंगर चढावा लागतो. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो भक्त आळंदी ते पंढरपूर ही वाट पायी तुडवतात. शंकराची अनेक मंदिरे उंच डोंगरावरच आहेत.
हाच अनुभव धनगर स्त्रीलाही येतो. ही स्त्री म्हणते :
‘देव बीराजीला जाती, माझ्या पायाला आलं फोडं ।
देव बीराजीचं मला बाई लई याडं ।'
‘देव बीराजीला जाती, खडं टोचलं माझ्या पाया ।
देव बीराजी, माझी येऊ दे तुला दया ।'
‘आता नवस बोलली जीवापरीस अवघड
देवा माझ्या बीरयाजी, राहाणं तुजं काटवाण ।'

बीरदेव माळावर, काट्याकुट्यात राहतो, काटवणात राहतो. त्याच्या दर्शनाला जाताना खडे टोचतात. पायाला फोड येतात. तरीही तिला दर्शनाला जायचंच आहे; कारण बीराजीरायाचं वेड तिला लागले आहे.
‘नवस बोलणे' हाही एक लोकाचार आहे. आपल्या मनातील इच्छित पूर्ण व्हावे यासाठी नवस बोलला जातो. कधी देवाला कौल लावला जातो. विचारलेल्या प्रश्नाला मिळणारे दैवी उत्तर ‘कौल' या नावाने ओळखले जाते. कौल लावण्याची प्रथा जागतिक आहे. इजिप्शियन, ग्रीक, रोमन लोकही कौलावर विश्वास ठेवत असत. महाराष्ट्रातही सर्वत्र कौल लावण्याची प्रथा आहे. धनगर स्त्रीही बिरोबाला कौल लावते. हे लोकतत्त्व आहे.
‘बीरयाच्या देवळात मी ग कवाची उभी र्हा्ऊ ।
देव माझा बीरयाजी, आधी कवल माझा लाऊ ।'
धनगरी ओव्यांमध्ये कौलाचा उल्लेख आढळतो, तसाच ‘कंदुरी'चा उल्लेखही आढळतो.
‘अगं नवस बोलली पीरसाहिबा कंदुरी ।
असं पोटीचं माझ्या बाळ, खेळू दे मंदिरी ।'
‘कंदुरी' ही एक लोकप्रथा आहे. देवाला, विशेषत: पीराला नवस बोलला जातो. रोगमुक्तीसाठी किंवा संतती व्हावी म्हणून पीराला नवस बोलण्याचा प्रघात आहे. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर ‘कंदुरी' केली जाते. उत्सवाच्या दिवशी पीरासमोर बकरं मारून त्याच्या मांसाचे जेवण केले जाते. ही प्रथा महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी सुरू आहे.

नवस बोलणे, कौल लावणे, कंदुरी या सर्व धर्म-कल्पनांचा पगडा केवळ आदिम पातळीवरच होता असे नाही. तर आजच्या विज्ञानयुगातही या धर्मकल्पनांचा पगडा शिक्षित-अशिक्षित सर्वांवर आढळून येतो. धनगर स्त्रीचीही मानसिकता तशीच आहे यात नवल नाही.

यात्वात्मकता ही भारतीयांची धर्मश्रद्धा आहे. भूत, पिशाच्चच, झाड इत्यादी अतिमानवी शक्ती अस्तित्वात आहेत असा बहुतांश लोकांचा समज आहे. या अतिमानवी व्यक्तींना संतुष्ट करणे किंवा त्यांच्यापासून संरक्षण करणे यासाठी मंत्र-तंत्राचा वापर मानव अनेक शतके करत आहे. ताईत भुताखेतांपासून संरक्षण करतो, रोगांचे वा इतर संकटांचे निवारण करतो अशी लोकश्रद्धा आहे. लहान मुलांना दृष्ट लागू नये, देवीच्या साथीपासून त्यांचे रक्षण व्हावे हा हेतूही ताईत बांधण्यामागे असतो. कधी शीतळादेवीची प्रतिमा ताईतामध्ये असते, कधी वाघाचे केस, नखे, कधी महंमद पैगंबरांची कुराणातील वचने लिहिलेला कागद ताईतामध्ये ठेवला जातो.

धनगर स्त्री ताईत बांधण्याच्या प्रथेवर श्रद्धा ठेवते. आपल्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून स्वत: पीरसाहेब त्याला ताईत भरून देतो असे तिला वाटते. ती म्हणते,
‘माझा लाडका राघू सर्व्या देवाला म्हाईत,
पीरसाहेब बीराजी देतो भरून ताईत ।'
भंडारा उधळणे ही सुद्धा एक सामाजिक प्रथा आहे. धनगर समाज कोजागिरी पौर्णिमेला, यात्रे-जत्रेच्या दिवशी भंडारा उधळतो. त्याचे चित्रणही धनगरी ओवीत दिसते.
‘दसर्यारच्या महिन्यात हळदीबाईला भाव आला ।
हळदीबाईला भाव आला, देव बीराजी नवरा झाला ।'
‘दसर्याभच्या महिन्यामंदी गजी नाचून आलं घाया ।
तान्ह्या बाळा किती सांगू, लाव भंडारा पड पाया ।'

धनगर समाजाचे ‘गजी' हे लोकनृत्य आहे. कोजागिरी पौर्णिमेला तरुण धनगर गजी नाचतात. नाचून नाचून दमतात. दमलेल्या गजींचा तिला अभिमान वाटतो.
भारतीय मानसिकता साधू-सिद्धांच्या प्रभावाखाली नांदत आली आहे. लोकमानसावर आजही सिद्धांचा प्रभाव आहे. बीरोबाच्या मंदिराशेजारी दावणमलिकाची समाधी आहे. ही समाधी पीराची आहे, तो मुस्लीम आहे याचा विचार धनगर वा हिंदू करत नाहीत. हिंदूंच्या सर्व जाती या पीराची पूजा करतात. समाधीवर बुक्काय वाहतात, फुले वाहतात. त्याला केशरी गंधही लावतात आणि पीरावर हिरवा गलबही घालतात. लोकमानस धर्मांधता जाणत नाही. सिद्धपुरुषांचा प्रभाव, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, लोकमानसावर बिंबलेला आहे. संतान व्हावे म्हणून या पीराला नवस बोलतात. हा पीर धनगर समाजाच्या लोकश्रद्धेचा विषय बनला आहे.
धनगर समाजाच्या मानसात असे सिद्ध पुरुष, गजीनृत्य, भंडारा उधळणे, नवस बोलणे, ताईत बांधणे, कंदुरी, बीरदेवाची अद्भुत जन्मकथा अशा लोकतत्त्वीय धारणांना अढळ स्थान आहे. या एकविसाव्या शतकातही त्यांना आदिम जीवनाची ओढ आहे, परंपरेचा प्रभाव त्यांच्या मनावर आहे.
या सर्व लोकतत्त्वीय धारणा म्हणूनच त्यांच्या गीतांमध्ये दिसतात.

४, बुधवार पेठ, फलटण ४१५ ५२३, जि० सातारा.
दूरभाष : ०२१६६-२२२१२०. भ्रमणभाष : ९४२१२०८५९५