सामाजिक द्रोह

लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक द्रोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्वभाषेच्या सक्षमीकरणाचे आव्हान न स्वीकारता स्वत:चे आर्थिक सक्षमीकरण करून घेण्यासाठी आधी अभिजन व बुद्धिजीवी वर्गाने आणि आता बहुजन समाजानेही इंग्रजी या परकीय सक्षम भाषेचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे.

डॉ० प्रकाश परब, ‘भाषा, समाज आणि शासन' ,
‘महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८