आपली भाषा

भाषेतून पुकारण्याच्या आधी ती फक्त एक चिमणी होती
तिला चिमणीसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
भाषेनंच दिलं त्या झाडाला एक नाव
किंबहुना आपल्या भाषेच्या पलिकडं झाड फक्त झाड होतं
त्याला झाडसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
अशाच प्रकारे त्या असंख्य नद्या, झरे, पहाड...
कुणालाही माहिती नव्हतं
की आपली भाषा त्यांना कुठल्या नावानं ओळखते

त्यांना आपल्या भाषेशी काही देणं-घेणं नव्हतं
भाषा आपली सोय होती
आपण प्रत्येक गोष्टीला भाषेत रूपांतरित करण्यासाठी उतावीळ होतो
प्रत्येक गोष्टीला घाई-घाईनं भाषेत बसवण्याचा हट्ट
आपल्याला त्या गोष्टींपासून थोडं दूर घेऊन जात होता
कित्येकदा आपल्याला ज्या गोष्टींची नावं माहिती असायची
त्यांचे आकार आपल्याला ठाऊक नसायचे
आपण विचार करायचो की भाषा प्रत्येक गोष्टीला जाणून घ्यायचा दरवाजा आहे
याच तर्काच्या वाटेवरून काही भाषा सत्ताधीश झाल्या
दुबळ्यांची भाषा दुबळी मानून तिचा पराजय व्हायचा
भाषांचे आपापले अहंकार होते

झाडं, दगडं, पक्षी, नद्या, झरे, हवा आणि जनावरांजवळ
त्यांची स्वत:ची अशी भाषा होती की नाही कुणास ठाऊक
पण आपण सातत्यानं त्यांच्यामधून एक भाषा वाचवण्याचा प्रयत्‍न करायचो
अशाप्रकारे आपले अनुमान त्यांची भाषा घडवत होते
आपण विचार करायचो की आपले अनुमान म्हणजेच सृष्टीची भाषा होय
आपण विचार करायचो की या भाषेनं
आपण वाचून काढू अवघं ब्रह्मांड!

(‘दो पंक्तियों के बीच' या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या संग्रहातून)