गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन

सातवाहन राजा हाल याने महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातल्या कवींनी रचलेल्या हजारो गाथा गोळा केल्या. प्रसंगी त्यासाठी भरपूर धनही वेचले. कुंतल देशावर राज्य करणार्याह, स्वत: कवी असलेल्या या राजाने त्यातल्या निवडक गाथांचा संग्रह केला. ‘गाथा सप्तशती' म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या मूळ सातशे गाथांमध्ये नंतर थोडी भर पडली, आणि १००४ गाथा ‘शेफालिका' या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात अनुवादासह वाचायला मिळतात. सुमारे इ०स० २०० ते ४५० या काळात, कदाचित त्याच्याही आधीपासून बोलल्या जाणार्याव महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या या अनमोल संग्रहातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक जीवनाचा परिचय तर होतोच. शिवाय महाराष्ट्री प्राकृत हा मराठी भाषेचा पूर्वावतार असल्यामुळे त्या काळी मराठी माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यात असलेल्या बोली मराठी भाषेचा अंधुकसा का होईना अंदाज आपल्याला येतो... आजही आपल्या बोलण्यात असलेले काही शब्द त्या काळी आपले पूर्वजही जसेच्या तसे वापरत होते या जाणिवेने सुखावायला होते ... काही शब्द जसेच्या तसे आणि काही शब्द किंचित वेगळ्या रूपात आलेले पाहून, वाचून आपल्याला त्या काळच्या आपल्या वाणीची थोडीफार का होईना झलक अनुभवता येते. ‘गाथा सप्तशती' वाचताना माझ्या नजरेला आलेल्या काही मराठी - महाराष्ट्री शब्दांची मी नोंद केली आहे. [शब्दांपुढे कंसात शतक क्रमांक व गाथा क्रमांक दिला आहे.]

तेव्हा, शेकडो वर्षापूर्वीही आपण मामीला मामी च म्हटलं, (१.९३), आत्याला कधी अत्ता (४.६९), तर कधी पिउच्छा - पितृस्वंसा - वडलांची बहीण म्हटलं (२.९५), दीर होता दिअर (५.७०), आईला माए (१.४३), तर मावशीला माउआ म्हटलं (४.२३), सवत ही सवत्ती (सपत्नी ) आहे (५.२८), सावली साउलीच आहे (२.६९) (६.५), सुई ही सुइचर् आहे (७.२०), जुनं सुद्धा जुण्ण म्हणून आहे (३.२९), चिख्खल चिक्खलच आहे (१.६७), दिठी दिठ्ठी म्हणून दिसते, (२.३४) आणि अश्रू आहेत अंसू (२.५३), मज्झ - माझे (२.३१), तुज्झ - तुझे (१.७८), १.८९) आढळते. त्याचप्रमाणे मज्झ तुज्झ - माझे तुझे (७.१) ही आढळते. अत्थे म्हटलं जाई आत्ता या अर्थाने (४.३७), अच्छेर म्हणजे आश्चर्य (२.१२), हे की सइ ही सती (२.२८), ही असते सखी प्रमाणे, आणि काकी, (२.२) म्हणजे काकू नसून चक्की कावळी असते! तम्बे (६.३८) म्हणजे हे तांबू गाई. रुन्द म्हणजे रुंदच (७.४९), ओलं आहे ओल्लं (५.४०), कलिअं - कळले, ओळखले (७.१५), गूळ आहे गुलो (५-५४)... आजचा अय्या हा सुंदर उद्गार अव्वाे म्हणून भेटतो! (२.७८).

या काळातल्या आपल्या भाषेत होणं आहे - होसि - अससी (१.६५), वसणं आहे - वसइ - वसती (१.३५), हिंडणं फिरणं आहे - हिण्डन्ती (१.३८), जाणं आहे - वच्चल - तेथ न वचा असा महानुभावकालीनही वापर (२.६०) आढळतो. रमणं आहे - रमिउण रमून (१.९८), रुसणं आहे - रुसेउ (१.९५), प्राप्त करणं, मिळवणं या अर्थी पावणं आहे - पाउम (२.३९), उल्लावो हे बोलणं, संभाषण करणं या अर्थी आहे (५.१४) तर कर्कश - कक्खड बोलणं - बोल्लम ही आहे (१.८१) दीससी - दिसतोस असा सरळ उपयोग आहे (४.८९), दाखवणं आहे - दावेई - दाखवत (३.१५) दावणं असा शब्द आजही कितीतरी लोक वापरतात. फुंकर घालणं आहे - फुक्कथन्तो (१.७६), बुज्जिउ - जाणूनबुजून (७.२) मळणं या अर्थी मर्दन करणं या अर्थी आलंय मलेसि (४.४४) आजही आपण पीठ मळतोच; काढणं आहे - कढ्ढेइ (४.३५), कढ्ढण - कर्षण (३.२४), ओघळणं ओसरणं आहे - ओसरइ (१.७४), झिजणं आहे झिज्जए (२.४१), मोडून पडणं आहे - भज्जिहिसी - मोडून पडशील, (२.२), मोडणं आहे - मोडिअ - नासधूस (५.४९), अमोडिऊण - मोडून, पिरगाळून, भाजणं आहे - भज्जिआ (५.५७), खंतावणं आहे - तम्मइ (४.८३), तमणं, तमत बसणं असा शब्दप्रयोग आजही खेड्यातून आढळतो. मा तम्म (८.४५), खंतावू नकोस. कोळपून जाणं आहे - कुलुत्रिऊण कोळपून, (४.२७), नष्ट होणं आहे - णासइ (२.७२), चुकणं दोन प्रकारे आढळलं : चुक्कुसि - चुकलीस, मुकलीस (४.६५), चुक्कीसंकेआ - जिचा संकेत चुकला आहे (३.१८), ओलं होणं आहे - ओलिज्जन्त (६.२१), त्याचप्रमाणे टुणटुणणंही आहे. टुणटुणन्तो म्हणजे उड्या मारतो, भटकतो (९.७८), शिवशिवणंही आहे! - चुलचुलन्ते (४.८१).

काही शब्द वेगळेच आहेत, थोडे गोंधळात टाकणारे हे शब्द पाहा :
चिउर - केस (२.७३), वराई - बिचारी हा शब्द अनेक ठिकाणी आला आहे. कण्इज्जुआ वराई - बिचारी सरळ सोट अशी (३.५२), ग्द्येप्पइ - आपलेसे होणे (२.८६), किच्छेन - कष्टाने (७.९४), अवउहणस्स - आलिंगनरूपी (३.४४), दुद्दोली - निरगाठ (२.४९), कसवट्ट - कसोटी (६.२६), उच्चटइ - उचलणे वेचणे (२.५९), काएहि खज्जन्ति - कावळेच खातात (२.४८), धम्मिल्लो - वेणी (५.४४).

काही शब्द साधे वाटतील असे देखील आहेत :
नाऽअ - नाटक (१.६८), महग्घम - महाग (१.६८), आईप्पणेण - पिठाच्या पाण्याने - आलेपन (१.६६), झत्ति - झटकन (१.६८), सोणार - सोनार (१.९१), मालारी - माळीण (५.९६), हट्ट - बाजार (७.८७), ओआसो - आवास (९.४७), वई - कुंपण (५.६३), गभहर - गाभारा (७.६५), माहप्पो - मोठेपण (२.६६), खन्ध - खांदा (१.७७), भिउडि - भुवई (९.१४), भुमआ भङ्ग - भुकुटिभंग (९.१३), थणाणं - स्तन - खेड्यात आजही थान शब्द वापरतात (१.१००), भरिअ भरून आलेले (डोळे) (२.८०), पहणुअई - पान्हावती (४.४९), अच्छीसु - डोळ्यात (२.३२), पक्कललो - प्रवीर, निधड्या छातीचा (२.१८), पउत्थो - प्रोशित प्रवासी (२.२९), पामर (२.६४), अप्पाणो - आपल्याला स्वत:ला (२.३३), मा छिवसु - शिवू नकोस (१.९२), पअपरिपाटी - पावलांनी घातलेल्या येरझार्या- (२.४९), छल्लि - साल (२.१५), खुत्त - रुतलेले (२.७६), लग्गन्ति - लागतात (४.२८), धुव्वन्त - धुतलेले (५.६३), णच्चेरी - नाचरी (४.२०), सिढिले - ढिले (३.२४), सहज्झिआ - शेजारीण (८.४१) पाहुणिआ - पाहुणी (९.५६), पङ्गुरणं - पांघरूण (७.७५), कञ्जिएण - कांजीने (२.८६), चंदनपंकाे - चंदनाची उटी (२.८८), सद्धालुई - श्रद्धाळू, आवड निर्माण झालेल्या (४.१५), कल्लि - उद्या. खेड्यात आजही कल हा शब्द उद्या म्हणून वापरला जातो (५.२), अइआअरेण - अतिआदराने, असोशीने (५.१९), किणे चिठ्ठसि (तिष्ठसि) - का उभी आहेस?, थोअं थोअं - थोडे थोडे किंवा हळूहळू (५.५०), विशेष म्हणजे, होइ होउ - होईल ते होऊं दे! (५.२९).

हे असं बरंच काही या गाथांमधून आढळतंच; पण खूपच विलोभनीय आहे या गाथांमधून, तेव्हाच्या मराठीतून प्रकट होणारं तेव्हाच्या मराठी निसर्गाचं चित्र! (४.९१) मधे ज्योत्स्नाजल प्रकटतं, पंसुआण (पंशुक) म्हणजे नरपोपट विहरतात (५.६२) मधे, कन्दोट्ट फुलतंय (६.२२) मधे. नील कमल, तर (६.४) मधे कमळांची शोभा घमघमून सारं जग जिंकते आहे. महम्महई - घमघमते, ६.१ मधे एक्कळक्कं परिरक्षण एकमेकांचे रक्षण करणारे कुरङ्गमिहुन म्हणजे हरणांचं जोडपं भेटतं. (१.७५) मधे दरिअसीह म्हणजे बेफाम झालेला सिंह आहे. मुङकुस म्हणजे मुंगूस दिसते ७.७४ मधे. कइत्थ - कवठ ६.४१ मधे तउसी - काकडीची वेल ५.३४ मधे. मालू - बेलफळ ५.७९ मधे तर गुटिका धनु - कदंब घुटिका - कदंबाचे गेंद फेकण्याच्या धनुचा उल्लेख आढळतो १.७७ मधे. विज्जुज्जोआे - विजेचा झोत झळकतोय ३.१५ मधे तर लंकालता या पिवळसर लाल पळसांच्या नाजूक फांद्या झुलतायत ३.११ मधे आणि ४.४६ मधे तर अद्धप्पइया, अर्धवट, किंचित उडणारी परी दिसते. णइकच्छ - नदीकाठ ४.१६त दिसतो. पाऊसआल - पाऊस काळ ३.९५ मधे आलेला दिसतो. गावातल्या तळ्यात कोणी तरी आभाळ उताणे (उत्ताण) टाकून दिले असल्याची भन्नाट कल्पना २.१० मधे आली आहे! दैनंदिन व्यवहारातला घरगुती ओलावा ६.३७ मधे आढळतो; तर परिमलिआ गोवेण तेण हत्थं पिजाण ओल्लेइ । स च्चिअ धेणू एहिं पेच्छसु कुड दोहिणी जाआ।। = (पूर्वीच्या) गवळ्याने (गाय) अशा रीतीने हाताळली की ती हातदेखील ओलावी ना - (- मग दूध देणं तर दूरच!) पण बघा, आता तीच गाय घागरभर दूध देणारी झाली आहे. तर ९.४६ मधे निसर्ग सौंदर्याची खास बहार आढळून येते :
हंसाणं सरेहिं सिरी सारिज्जइ अह सराणं हंसेहिम् । अण्णोणं चिअ एए अप्पाणं णवर गरुअन्ति । = हंसांचे सौंदर्य सरोवरांनी आणि सरोवरांची शोभा हंसांनी वृद्धिंगत होते. हे दोन्ही एकमेकांचा व स्वत:चाच गौरव करतात!
इथेच थांबून राहावं वाटतंय, नाही का?

शरदिनी मोहिते
ए-१/४, शरयू सरिता नगरी, फेज-२, सिंहगड मार्ग, पुणे ४११ ०३८.
दूरभाष : (०२०) २४२५ १३५३