संयुक्त क्रियापदांचा पेच

चिन्मय धारूरकर

‘भाषा आणि जीवन’च्या वर्ष २८, अंक १ हिवाळा २०१० या अंकात रेणुका ओझरकर यांचा ‘‘मराठीतील ‘विवाद्य’ संयुक्त क्रियापदे’’ या शीर्षकाचा लेख आला आहे. या लेखात त्यांनी उमाकांत कामतांच्या एका लेखाचा उत्तम समाचार घेतला आहे आणि मुद्देसूदपणे कामतांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे.

संयुक्त क्रियापदांची विवाद्यता ही भाषागत नसून सैद्धान्तिक अव्यवस्थेतून निपजते हे रेणुका ओझरकरांचे म्हणणे त्यांच्या संशोधनातील सैद्धान्तिक चौकटीबद्दलची जाण दाखवणारेच आहे.

अर्जुनवाडकरांनी (१९८७:१७८-१८४) केलेल्या संयुक्त क्रियापदांच्या ऊहापोहाचा संदर्भ लेखात नसावा हे मात्र खटकते. लेखाच्या अखेरीस (पृ० ३७, परिच्छेद दुसरा) एका ठिकाणी ‘उडी मारणे’ व ‘गाडी चालवणे’ याबद्दल जे लिहिले आहे त्या संबंधातील अडचणीबद्दल पुढे ऊहापोह केला आहे आणि संयुक्त क्रियापदांची व्याकरणातील व्यवस्था यावर चर्चा केली आहे.

‘उडी मारणे’ यात ‘उडी’ आणि ‘मारणे’ यात घनिष्ठ संबंध आहे म्हणजे काय? आणि गाडी चालवणे यात नाही म्हणजे काय? याचे एक स्पष्टीकरण असू शकते की, उडी आणि मारणे यांच्या विभिन्न / वेगवेगळ्या स्वत:च्या अर्थापासून जो बोध होतो तो त्यांच्या संयोगाने होत नाही तर तिसराच अर्थ व्यक्त होतो. हा तिसरा अर्थ निर्माण करण्याची जी शक्ती उडी मारणे, गप्पा मारणे, मांडी घालणे इ० क्रियापदांत असते त्या असण्याला आपण घनिष्ठ संबंध म्हणत आहोत. गाडी चालवणे यातील गाडीचा अर्थ आणि चालवणे याचा अर्थ बघता मिळून काही अगदी वेगळाच अर्थ निघत नाही तर ‘‘गाडी चालवणे’’ हाच निघतो. अर्थाच्या पातळीवरील हे तथ्य नजरेसमोर ठेवून आपण घनिष्ठ संबंध असे म्हणणार असलो तर यातून काही व्यवस्था हाती लागत नाही, कारण मुळात वेगळा अर्थ निघतो म्हणून ही संयुक्त क्रियापदं असं म्हणण्यात काही फार तथ्य नाही, कारण भाषेत वेगळा अर्थ संदर्भाने कथित संयुक्त नसणार्‍या क्रियापदाचाही निघू शकतो.
अर्जुनवाडकरांनी केलेली चर्चा पाहा : अर्जुनवाडकर (१९८७:१८०)

संयुक्त मानल्या गेलेल्या क्रियापदांना आपण जर गोठलेल्या रचना (फ्रोजन एक्स्प्रेशन्ज!) किंवा रूढीभूत रचना म्हणणार असलो तर अर्थविचार आणि व्याकरण यांना एकत्र आणत आहोत. तसे करताना बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. मुळात संस्कृत आणि इंग्रजीच्या प्रभावात विकसित झालेली आपली मराठीची ‘अमराठी व्याकरणं’ इथे फसली आहेत. व्याकरण म्हणजे रूपांच्या निर्मितीचे नियमन करणारे शास्त्र अशी ढोबळ धारणा दिसून येते. ती काही अंशी पाणिनीय प्रभावातून आहे. पाणिनी बर्‍याचदा रूपलक्ष्यी भूमिका घेतो आणि महत्त्वाच्या घटकांना पदगती देण्यात धन्यता मानतो. पाणिनीला अर्थलक्ष्यी विचार (म्हणजेच सिद्ध पदांचे वा त्यांतील घटकीभूत अवयवांचे आर्थिक विश्लेषण) नको होता असं मुळीच नाही तर पद (पद म्हणजे १. तिङन्त म्हणजेच तिङ् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत अशी धातुरूपे किंवा २. सुबन्त म्हणजे सूप् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती लागलेले आहेत अशी नामरूपे व म्हणून भाषेत व्यवहारयोग्य असा शब्द) या संकल्पनेने रूपनिर्मिती, पदसिद्धीला होणारे फायदे (जसे की अव्ययांना सुबन्तत्व दिले की त्यांनाही पदसंज्ञा मिळते व पाणिनीय व्यवस्थेत त्यांसाठी वेगळी शब्दजाती लागत नाही इ०) पाहता, एक औपचारिक बांधिलकी म्हणून रूपलक्ष्यित्व प्राबल्याने दिसते. पाणिनीचा आणि संस्कृताचा उल्लेख झालाच आहे तर कथित ‘संयुक्त क्रियापदां’संबंधी पाणिनी काय म्हणतो या साहजिक प्रश्नाचा ऊहापोह करू. पाणिनीच्या व्याकरणातील रूपनिर्मितीच्या आणि पदसिद्धीच्या व्यापारात ‘संयुक्त क्रियापद’ अशी संकल्पना नाही. तिची मुळात पाणिनीय व्यवस्थेत गरजही नाही. ओझरकरांनी दिलेली ‘नमस्करोति’ आणि ‘प्रकटीकरोति’ ही संयुक्त क्रियापदे नाहीत असे म्हणता येणार नाही; परंतु, पाणिनीसाठी ती संयुक्त क्रियापदे नक्कीच नाहीत. ‘नम:’ व ‘प्रकटी’ दोहोंनाही रीतसर पदसंज्ञा प्राप्त होते आणि एक अव्ययपद म्हणून त्यांचे स्थान निश्चित होते. संस्कृत भाषा ही अर्थात पाणिनीच्या मालकीची नाही. पाणिनीने केवळ एक व्याकरणिक प्रारूप उभे केले आहे. ओझरकरांना किंवा आधुनिक भाषाविज्ञानाच्या चष्म्यातून बघणार्‍या कोणालाही जर संस्कृतातील अशा क्रियापदांची संगती ‘कॉम्प्लेक्स प्रेडिकेट’ म्हणजेच ‘संयुक्त क्रियापदे’ म्हणून लावायची असेल तर तो मार्ग खुला आहेच. भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स आणि कम्पाउंड व्हर्ब्झ अशा दोन संज्ञा रूढ आहेत आणि त्या आलटून पालटून वापरल्या जातात. केवळ धातुरूपांचा संयोग असेल तर तिथे कम्पाउंड व्हर्ब (उदा० करत बसणे, उकरून काढणे इ०) ही संज्ञा वापरावी व नाम+धातुरूप (उदा० गप्पा मारणे, उडी मारणे इ०) अशा संयोगांसाठी कॉम्प्लेक्स प्रेडिकेट म्हणावे असा कल आहे, तसेच कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स हा मोठा संच मानून कम्पाउंड व्हर्ब्झ हा पोटप्रकार मानावा असाही प्रवाह आहे. या लेखात मात्र नाम +धातुरूप अशा रचनांचीच चर्चा आहे.
पाणिनीय प्रभावातून बाहेर पडून तसेच इंग्रजी व्याकरणाच्या अंधानुकरणातूनही बाहेर पडून आता जायचे कुठे असा प्रश्न आहे. एक उत्तर हे की आधुनिक भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्सची व्यवस्था वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये लावण्यात येते ती मराठीला लागू करून बघणे.

आपण काही एक भूमिका घेणार असू तरच हे सुरू करणे योग्य. मुळात संयुक्त क्रियापदे का मानू नयेत याची भरपूर समाधानकारक चर्चा अर्जुनवाडकर करतात. तिची पुनरुक्ती नको. संयुक्त क्रियापदे मानू नयेत यापक्षी भाषावैज्ञानिक विश्लेषणात्मक पुरावा व कारणमीमांसा अर्जुनवाडकर पुरवतात. हे जरा टोकाचे किंवा फारच रूपलक्ष्यी आहे. पण अर्जुनवाडकरांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. त्यामुळे एक भाषाविशेष आपण दुर्लक्षून टाकत आहोत असे वाटू शकते, पण त्याला इलाज नाही. कारण जर अर्थाचा असा विचार आपण व्याकरणात करत बसलो तर आलंकारिकांचे कामही आपण करून ठेवू, मग त्यांनी करायचे काय! असो. गमतीचा भाग बाजूला, पण आपणच उलटी भूमिका भक्कम करता येते का बघू आणि तसे करताना काय अडचणी येतात ते बघू.

संयुक्त क्रियापदे असतात असे मानू. ती लाक्षणिक अर्थाने कळून येतात यावर आपण जरा विचार करू. लाक्षणिक अर्थाने कळून येणे म्हणजे काय हा मूळ प्रश्न आहे तो आपण अर्जुनवाडकरांना विचारू शकतो. त्यावर ते आपले मम्मटाचे पुस्तकच आपल्या समोर ठेवतील. अर्थात ते योग्यच आहे. लक्षणार्थाने कळून येत नाहीत या दिशेने चर्चा पुढे जाऊ शकत नाही.
आधुनिक मनोलक्ष्यी भाषाविज्ञानाच्या अभ्यासपद्धती वापरल्यावर असे दिसून आल्यास नवल नाही की एखादा लाक्षणिक अर्थ मराठीत कळून येण्यास जेवढा (मिलीसेकंदाचा) वेळ लागतो तेवढाच वेळ या ‘लक्षणाभिव्यंजक’ संयुक्त क्रियापदांचा अर्थबोध होण्यास लागत नसून त्यापेक्षा बराच कमी लागतो. यालाच मुळी भाषाविज्ञानात गोठलेली रूढ (फ्रोझन), अभ्यासाने, सवयीने बांधलेली (फर्ॉम्युलैक) अशी विशेषणे वापरली जातात. शिवाय, मराठी भाषक ‘गप्पा मारणे’ याचा वापर करताना ‘चला जरा लक्षणा वापरू या’ किंवा ‘काय नवलाईनं प्रयोग करतो आपण’ असा दरवेळेस विचारही करत नाहीत, हे प्रयोग सवयीने सहज मुखावाटे बाहेर पडतात. म्हणजेच इथे लक्षणा गोठलेली आहे. इथे लक्षणा आहे याचे भानही वापरकर्त्यांना राहिलेले नसते.
असे असले म्हणून, उलटपक्षी कोणी असेही म्हणेल की ‘उडी मारणे, गप्पा मारणे’ यांत लक्षणा गोठलेली आहे आणि त्यांचा समग्रपणे एकत्रितच अर्थबोध होतो, त्यांतील नामांचा (उडी, गप्पा), क्रियापदांचा यांचा भिन्नत्वाने बोध होत नाही, तर त्यांना संयुक्त मानायचेच कशासाठी. म्हणजे संयुक्त क्रियापदे (नाम+क्रियापद प्रकारातले कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स) ही संज्ञाच टाळता येतील. पण असे म्हणणे सयुक्तिक नाही. कारण समग्रपणे जरी बोध होत असला तरी ती, ती नामे आणि क्रियापदे अस्तित्वात असतातच. आणि त्यांचा संयोग इथे होत आहे, म्हणून त्यांना संयुक्त म्हणण्यात वावगे काहीच नाही! पण हा युक्तिवादही फार तग धरू शकत नाही, कारण मूळ प्रश्न हा की गोठलेल्या लक्षणा आपले व्याकरण स्पष्टीकरणाच्या पातळीवर हाताळू शकते का? याचे सरळ उत्तर नाही, असे आहे. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गोठलेल्या लक्षणातील पदांच्या संयोगातून निर्माण होणार्‍या अर्थाविषयी काही निश्चयपूर्वक भाकीत करता येत नाही. याची जबाबदारी शेवटी कोशावर टाकावी लागते आणि वाक्प्रचार या कोटीतच त्यांची यादी द्यावी लागते.

सोस्यूरच्या चिन्हाच्या यादृच्छिकतेचा विशेष वाक्प्रचारांच्या संदर्भातही लागू ठरतो. गोठलेल्या लक्षणांची वासलात कोशात वाक्प्रचार या खाक्यात करणे म्हणजे एक प्रकारे त्यांची कोणतीही तार्किक मीमांसा न देता त्यांची यादृच्छिकता मान्य करण्यासारखेच आहे. दुसर्‍या एका दिशेने या गोष्टीचा विचार करता येईल. ती दिशा म्हणजे स्टिव्हन पिंकर यांनी दाखवलेली किंवा एस्पेरांतोच्या विकासातून स्पष्ट झालेली. त्यानुसार असे वाक्प्रचारात्मक प्रयोग निर्माण होणे हे भाषेचे भाषापणच आहे. मग त्या चिन्हभाषा असोत व एस्पेरान्तो सारख्या रचलेल्या भाषा असोत, त्यांना सुरुवातीला कितीही तर्काधिष्ठित अथवा दामटून नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी (प्राय: चिन्हाच्या यादृच्छिकतेच्या तत्त्वामुळे) भाषेचा कल अधिकाधिक वाक्प्रचारात्मक होण्याकडेच असतो.

इथे एक तात्त्विक विसंगती जाणवू शकते. ती अशी की आपण गोठलेल्या लक्षणा म्हणण्यासाठी ज्ञानात्मक भाषाविज्ञानाची कास धरत आहोत. आणि संयुक्त क्रियापदे आहेत / असतात असे म्हणताना पारंपरिक व्याकरणात मानल्या जाणार्‍या पदजातींना ग्राह्य धरत आहोत. त्याचे कारण असे की ज्ञानात्मक व्याकरणे कशी लिहावीत [पाहा लँगॅकर (२००८), राडन आणि दिर्वें (२००७)] मानवी बुद्धिगत भाषिक प्रक्रियांचा व्याकरणगत अनुबंध कसा असावा याची थोडीफार स्पष्टता भाषाविज्ञानात असली तरी संयुक्त क्रियापदांची संगती लावण्यासाठी अखेरीस ‘लेक्सिकन’ वरच सगळी जबाबदारी टाकली जाते. तसेच, ज्ञानात्मक पातळीवर समग्रपणे बोध होणे वेगळे आणि मनोबाह्य (ज्ञानात्मक नसलेल्या) व्याकरणामध्ये नाम, क्रियापद या भिन्न पदजाती मानणे वेगळे. मूळ तिढा असा की या लक्षणेने कळून येणार्‍या त्यांची व्यवस्था आपण कोणत्याही प्रकारच्या व्याकरणात लावणार का आणि कशी? सत्तरच्या दशकात चॉम्स्कीच्या ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ या निबंधानंतर लेक्सिकलिझमची लाट आली आणि अशा प्रकारे व्यवस्था न लागणार्‍या घटकांची व्यवस्था (त्यांचे वाक्यातील वर्तन, त्यांच्यासोबत येऊ शकणारे शक्यतम कारकार्थ इ० तपशील) सरसकट लेक्सिकन (शब्दकोश)मध्ये असते असे सांगितले जाऊ लागले. हे प्रकार वाक्यविचाराने अर्थविचारातून आपले अंग काढून घेण्यातलेच होते.

संदर्भ :
अर्जुनवाडकर, कृ० श्री० १९८७. ‘मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद’. सुलेखा प्रकाशन, पुणे.
ओझरकर, रेणुका. २०१०. ‘मराठीतील विवाद्य संयुक्त क्रियापदे’. भाषा आणि जीवन : हिवाळा, अंक १, पृ० ३३-३८
चॉम्स्की, नोम. १९७०. ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ (संपा० आर याकोब्झ आणि पी रोझनबाउम) ‘रिडिंग्झ इन इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर’ वॉल्टहॅम, मॅसॅचुसेट्स. गिन आणि कं०. पृ० १८४-२२१
राडन, ग्युंटर आणि दिर्वें, रेने. २००७. ‘कॉग्निटिव्ह इंग्लिश ग्रामर’, जॉन बेंंजामिन्झ पब्लिशिंग कंपनी, ऍमस्टर्डॅम.
लँगॅकर. २००८. ‘कॉग्निटिव्हर ग्रामर : अ बेसिक इंट्रडक्शन’ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यु यॉर्क.