मराठी कोशवाङ्मयातील मौलिक भर

कलिका मेहता

(परीक्षित पुस्तक : भूगोल कोश, लेखक : एल०के० कुलकर्णी. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती २००९, पृष्ठे २३ + ३४८ किंमत ` ४००)

ज्ञानभाषा म्हणवून घेण्यासाठी केवळ इंग्रजी हीच योग्य भाषा आहे अशी ओरड करणार्‍यांना एल०के० कुलकर्णी यांचा भूगोलकोश हे सणसणीत उत्तर आहे. वर्षभरात निघालेल्या दोन आवृत्त्या ही भूगोलकोशाच्या यशाची वाचकांनी दिलेली पावतीच आहे.

लेखक स्वत: पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असून त्यांनी जवळजवळ २५ वर्षे भूगोलाचे अध्यापन केले आहे. त्यामुळेच शालेय स्तरापासूनच उपेक्षित राहिलेल्या या विषयाच्या अध्ययन-अध्यापनातील नेमक्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. त्यांच्या लेखी भूगोल हा सामाजिक शास्त्रांमधील केवळ ४० गुणांइतकेच महत्त्व असणारा विषय नसून जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून टाकणारी संकल्पना आहे.

भूशास्त्र, हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इ० विज्ञानशाखांमधील माहिती व संकल्पनांना भूगोलात अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्याबद्दलची जास्तीत जास्त अचूक व परिपूर्ण शास्त्रीय माहिती एकत्रितपणे देणारा असा एकही संदर्भग्रंथ मराठीत तर नाहीच पण इंग्रजीतही नाही. वरील विषयांच्या संदर्भग्रंथातूनच त्याविषयी माहिती मिळवावी लागते.

या समस्येवर उत्तर शोधण्याच्या तळमळीतून आणि आपल्या व्यवसायाबद्दलच्या व विषयाबद्दलच्या निष्ठेतून अध्यापक, विद्यार्थी आणि आजूबाजूच्या घडामोडींकडे कुतूहलपूर्ण नजरेने पाहणारा सामान्य माणूस अशा विस्तृत वाचकवर्गाच्या गरजा एकाच वेळी पुरवणार्‍या दर्जेदार कोशाची निर्मिती झाली. मराठी भाषेच्या कोशदालनात अत्यंत मौलिक अशी भर पडली व भूगोल हा एक विषय न राहता विज्ञान बनले. या कोशनिर्मितीचे वेगळेपण म्हणजे हे वेळखाऊ, खर्चिक काम लेखकाने ११ वर्षांच्या दीर्घ कालावधीत एकट्याने, एकाहाती पूर्ण केले आहे.
या कोशात ३५० भौगोलिक नोंदींचे (त्यांचा उल्लेख लेखकाने ‘संबोध’ असा केला आहे.) स्पष्टीकरण व माहिती दिली आहे. हे संबोध खगोलशास्त्र, भूशास्त्र, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, पाषाणशास्त्र, सागरशास्त्र, भूकंपशास्त्र, जग व भारतातील विविध स्थळे, पर्वत, नद्या, सरोवरे इ०विषयी आहेत. मनोगत, भूमिका, ऋणनिर्देश व कोशवापरासाठीच्या उपयुक्त सूचनानंतर येणार्‍या अनुक्रमणिकेत सर्व संबोधांची यादी वर्णानुक्रमे दिली आहे. संबोधांची ही यादी पाहिली तरीही कोशातील विषयांचा आवाका लक्षात येतो. यात पाऊस, वारे, ढग अशा रोजच्या विषयांपासून भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अस्मानी आणि ओझोनचा थर, जल व मृदा संधारण, भूतापवृद्धी, प्रदूषण अशा मानवनिर्मित संकटांचा ऊहापोह केला आहे. पण त्यात फक्त भौगोलिक बाबी नसून अमेरिका खंडाच्या अंतर्भागाचा शोध घेणारा अमेरिगो व्हेस्पुसी, नकाशातज्ज्ञ गेरहार्ट मर्केटर, मार्को पोलो, शेर्पा तेनसिंग अशा संशोधकांच्या विक्रमवीरांच्या नोंदी आहेत. एखाद्या विशिष्ट नदीची माहिती देताना सोबतच्या चौकटीत तिचा उगम, लांबी, खोर्‍याचं क्षेत्रफळ, मुख, तिच्या उपनद्या इतकेच नव्हे तर तिच्या काठावरची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व शहरे ही माहितीही दिली आहे. अगदी गंगा नदीच्या शुद्धीकरण योजनेबद्दलही एक स्वतंत्र नोंद केली आहे. ग्रहांच्या माहितीबरोबर त्यांची सूर्यापासूनची सरासरी, कमाल व किमान अशी तीनही अंतरे दिली आहेत.

हा कोश परिणामकारक तर आहेच परंतु त्यातील चित्रांमुळे तो रंजकही झाला आहे. गंगोत्री, कैलास पर्वत, सर्वांत उंच शिखर के-टू, एव्हरेस्ट, गिरसप्पा धबधबा या भारतातल्या प्रसिद्ध स्थळांबरोबरच चीनची भिंत, ग्रँड कॅनियन अशा सर्वसामान्यांचे आकर्षण ठरलेल्या ठिकाणांचीही चित्रे यात आहेत. माहिती सर्वप्रकारे कळावी म्हणून ज्वालामुखी, धुमकेतू तारकाविश्व, ग्रहांचे मोठे उपग्रह इ० चित्रेही आहेत. काही संकल्पना उदा० गटपर्वत, खारे-मतलई वारे, गारांची निर्मितिप्रक्रिया आकृत्यांमधून स्पष्ट केल्या आहेत. कोशाचा विषयच भूगोल असल्यामुळे नकाशे हा अविभाज्य भाग तर आहेच.

लेखकाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर असल्याकारणाने सुबोध, साध्या-सोप्या, सुटसुटीत पण नेमका अर्थ व्यक्त करणार्‍या भाषेचा निकष परिभाषा बनवतानाही लावला आहे. फक्त परिभाषाच नव्हे तर माहिती देतानाही केवळ बुद्धिमत्तेचे व व्यासंगाचे प्रदर्शन न करता कोशाचा उपयोग करणार्‍याची आकलनक्षमता लक्षात घेतली आहे. त्यामुळे कोशाची वाचनीयता वाढली आहे. हे या कोशाचे बलस्थान आहे. संबोधानंतर शब्दार्थ व टिपा हा विभाग असून त्यामध्ये कोशातील विवेचनात आलेले असे अनेक शब्द आहेत की ज्यांचा अर्थ वाचकाला समजणे आवश्यक आहे. उदा० अल्पाईन वनस्पती, बर्फ, पिग्मी, सुंद्री, सूचिपर्णी इ० ह्या शब्दांच्या बरोबरीने एडमंड हिलरी, शीतल महाजन अशा धाडसी वीरांचीही माहिती दिली आहे.
या माहितीनंतर एकूण ८ परिशिष्टे असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाण एकके व व्यावहारिक एकके, मोजमापे, रूपांतरणे, उपग्रहांची खगोलशास्त्रीय माहिती, धूमकेतू व उल्कावर्षाव, तेजस्वी तारे, जगातील समुद्र, जगातील देश, त्यांच्या राजधान्या, जागतिक आश्चर्ये इ० अत्यंत उपयुक्त व म्हटले तर वाचकाच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणारी पण सहसा कुठेही उपलब्ध नसणारी अशी माहिती देण्यात आली आहे. सहाव्या व सातव्या परिशिष्टात प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत असायलाच हवी अशी भारताची माहिती एकत्रितपणे दिली आहे. त्यात नद्यांच्या खोर्‍यांतील प्रकल्पांबरोबरच राज्ये, संघराज्ये त्यांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधान्या, जिल्हे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचाही समावेश आहे. शेवटच्या परिशिष्टात भूगोल व खगोलशास्त्राच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घटनांचा कालपट वाचकांसमोर उलगडला आहे.

त्यानंतर इंग्रजी शब्दांना मराठीत रूढ असलेले द्वीपकल्प, भूशिर यांसारखे वा नव्याने घडवलेले तारकाविश्वासारखे (गॅलक्सी) पारिभाषिक शब्द दिले आहेत. सर्वांत शेवटी इंग्रजी व मराठी संदर्भग्रंथांची यादी आहे.

एकूणच या प्रचंड माहितीसंकलनाला लेखकाने जरी भूगोलकोश म्हटले असले तरी त्याचे स्वरूप ज्ञानकोशाच्या धर्तीचे आहे. ज्ञानकोशाचा आकार महत्त्वाचा नसून त्यामध्ये समाविष्ट ज्ञानाची व्याप्ती पाहिली जाते. ज्ञानकोशाच्या व्याख्येनुसार ज्ञानकोश हा जगाचे यथार्थ, आहे तसे दर्शन घडवणारा जणू आरसाच असतो. चित्रे, नकाशे, आकृत्या, तक्ते, संख्याशास्त्रीय कोष्टके यांची मदत घेऊन त्या त्या बाबीबद्दलची उपलब्ध असलेली सर्व गाभाभूत माहिती सुव्यवस्थितपणे मांडून वाचकांसमोर ठेवणे व त्यायोगे मानवजातीच्या विकासाच्या दिशेने पाऊले उचलणे; हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते.

हा कोश विद्यार्थ्यांना व जिज्ञासूंना भूगोलाच्या अभ्यासाची गोडी लावेल. भूगोलाच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊलच आहे असे समजायला हरकत नाही. विद्यार्थी, भूगोल अभ्यासक यांच्या बरोबरीन सवर्ससामान्य रसिक वाचकाने संग्रही ठेवावा असा हा भूगोल कोश आहे.