अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर
म०के० ढवळीकर
(परीक्षित पुस्तक : भारतीय लेखविद्या, दिनेशचंद्र सरकार. मराठी भाषांतर : डॉ० शोभना गोखले. काँटिनेंटल प्रकाशन, पुणे. पृ० ४७८ + चित्रे. किंमत दिलेली नाही.)
प्रा० (कै०) दिनेशचंद्र सरकार हे जगविख्यात भारतीय पुरालिपी तज्ज्ञ होते. ते निष्णात संस्कृत पंडितही होते. काही काळ ते कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रमुख लिपितज्ज्ञ म्हणून काम केले. ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ हे त्या खात्याचे मुखपत्र, त्याचे ते संपादक होते. त्याच्या प्रत्येक अंकात बहुसंख्य लेख डॉ० सरकारांचे असत. त्यामुळे काही विद्वान त्याला ‘एपिग्राफिया सरकारीका’ म्हणत असत.) डॉ० सरकार यांनी आपल्या हयातीत शेकडो कोरीव लेख प्रसिद्ध केले; त्यातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख लिहिले आणि अनेक ग्रंथही प्रसिद्ध केले. केंद्रसरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना कोलकाता विद्यापीठाने पुन्हा प्राध्यापक नेमले. प्राचीन लेखांच्या अभ्यासकांत ते अग्रगण्य होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासासाठी नेमले आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ‘इंडियन एपिग्राफी’ त्याचे मराठी भाषांतर डॉ० शोभना गोखले यांनी केले आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या मराठी भाषिक अभ्यासकांसाठी हे भाषांतर अत्यंत मोलाचे ठरेल यात शंका नाही.
डॉ० सरकार हे स्वत: शिक्षक असल्यामुळे ग्रंथाची रचना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीची केली आहे. एकूण आठ प्रकरणांपैकी पहिल्यात भारतीय पुराभिलेखांचे स्वरूप, इतिहासाची जुळणी करण्याकरता त्यांचा होणारा उपयोग, याची चर्चा केली आहे. या प्रकरणाच्या परिशिष्टात हिंदु-मुस्लिम पुराभिलेखांचीही माहिती आहे. दुसर्या प्रकरणात लेखांच्या आर्य आणि द्राविडी भाषांचे वर्णन आहे. प्रथम प्राकृत, नंतर संस्कृत आणि पुढे सहाव्या शतकापासून प्रादेशिक भाषांत लेख लिहिण्यास सुरुवात झाली. लेखनासाठी भूर्जपत्रापासून ताम्रपटापर्यंत लेखनसाहित्य कसे वापरले जात असे हे तिसर्या प्रकरणात विशद केले आहे. चौथ्या प्रकरणात लेखनाची चर्चा आहे. यापुढील प्रकरण (पाचवे) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात ताम्रशासनांसंबंधी माहिती आहे. ताम्रशासनाचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांतील मजकूर-विशेषत: सुरुवातीचा आणि शेवटचा - त्यावरील राजमुद्रा यांचे तपशीलवार वर्णन आहे.
या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय हे की, त्यात परदेशातील भारतीय अभिलेखांचीही माहिती दिली आहे. प्राचीन काळी धर्मप्रसारासाठी आणि व्यापारासाठी भारतीय मोठ्या संख्येने भारताबाहेर अनेक ठिकाणी गेले. आग्नेय आशियात तर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. तेथील लोकांना त्यांनी धर्म, भाषा, लिपी, कला दिल्या. त्यांना संस्कृती दिली. त्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत. भारतीयांनी तेथे राज्य स्थापन केले. शेकडो संस्कृत लेख आजही तेथे उपलब्ध आहेत. त्यांची माहिती सहाव्या प्रकरणात आहे.
प्राचीन लेखांची कालनिश्चिती हे अत्यंत जिकिरीचे काम असते. त्यात निरनिराळ्या कालगणनांचा उल्लेख असतो. आजही आपण शक आणि संवत यांची गल्लत करतो. अनेक राजांनी शककर्ता बनून आपल्या राज्यरोहणापासून आपल्या नावाने शक सुरू केले. त्या सर्वांची माहिती सातव्या प्रकरणात मिळते. शेवटच्या (आठव्या) प्रकरणात पारिभाषिक शब्दप्रयोग दिले आहेत. ग्रंथाच्या शेवटी महत्त्वाच्या कोरीव लेखांची व राजमुद्रांची चित्रे आहेत. त्यामुळे ग्रंथ परिपूर्ण झाला आहे.
भारतात प्राचीन कोरीव लेख हजारोंनी उपलब्ध आहेत आणि दरवर्षी नव्याने शेकडो सापडतात. त्या सर्वांचे परिशीलन करून त्यावर ग्रंथ लिहिणे हे केवळ प्रा० सरकारच करू शकले. या विषयावरचे इतरांचे काही थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत; परंतु प्रस्तुत ग्रंथाच्या तुलनेत ते तोकडे वाटतात. तेव्हा हा उत्कृष्ट आणि अत्यंत उपयोगी ग्रंथ लिहिल्याबद्दल या विषयाचे अभ्यासक प्रा० सरकारांचे ऋणी आहेत.
डॉ० सरकार यांच्यासारख्या प्रकाण्डपण्डिताच्या ग्रंथातील उणिवा काढणे धाडसाचे ठरेल. परंतु काही शंका निर्माण होतात. उदाहरणार्थ, सातवाहन आणि क्षहरात यांचे लेख - जे महाराष्ट्रातील लेण्यांत आढळतात- ‘‘मूळ ताम्रपटांवर असलेल्या राज्यशासनाच्या प्रतिकृती आहेत.’’ हे विधान पटण्यासारखे नाही (पृ० १०४). एकतर यांपैकी काही लेख खूप मोठे आहेत, ते लिहिण्यासाठी अगणित पत्रे लागले असते; आणि तसे असते तर एखादा तरी पत्रा आजवर सापडला असता. तेव्हा ते प्रथम कापडावर लिहून नंतर कोरक्याला दिले असावेत.
या पाचशे पानांच्या ग्रंथाच्या भाषांतराचे कामही सोपे नव्हते. डॉ० शोभना गोखले हा विषय अनेक वर्षे स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यांनी भाषांतर सुबोध केले आहे. परंतु एकदोन सूचना कराव्याशा वाटतात. ‘डेटिंग’ला ‘दिनांक’ ऐवजी ‘कालोल्लेख’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. ‘फलक’ (पृ० १३२) म्हणजे तांब्याचा पत्रा नसून लाकडी फळी असावी. तसेच काही ठिकाणी ‘नीट सांगितले नाही’ अशा शब्दप्रयोगाऐवजी ‘स्पष्ट दिलेले नाही’ असे भाषांतर अधिक योग्य वाटते. परंतु एकूण भाषांतर उत्कृष्ट व वाचनीय झाले आहे, यात शंका नाही.