चार अल्पपरिचित शब्द

अरविंद कोल्हटकर

ब्रिटिश आणि अन्य युरोपीय देशांशी घनिष्ट संबंध निर्माण झाल्यापासून भारतीय आणि युरोपीय भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण चालू झाली आहे आणि तिची अनेक उदाहरणे आपण प्रत्यही पाहत असतो. अशाच देवाणघेवाणीतील त्यामानाने अल्पपरिचित अशा चार शब्दांच्या कथा पुढे मांडल्या आहेत.

गोंडवन अर्थात गोंड लोक राहतात तो प्रदेश हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ‘गोंडवनातील प्रियंवदा’ ह्या आपल्या कादंबरीच्या शीर्षकात ज्ञानकोशकार केतकरांनी ह्या शब्दाचा वापर केला आहे. ह्याच शब्दापासून उत्पन्न झालेला ‘गोंडवनलँड’ हा थोडासा पुनरुक्तिदोष असलेला शब्द आज भूगर्भशास्त्रात एक महत्त्वाचा पारिभाषिक शब्द बनलेला आहे. शब्दाचा हा प्रवास कसा घडला ह्या प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर थोडा शोध घेतल्यावर सापडते.

पृथ्वीवरील निरनिराळे भूभाग स्थिर नसून पृथ्वीच्या अंतर्भागातील घडामोडींमुळे ते एकमेकांपासून सतत दूर सरकत असतात अथवा एकमेकांवर आदळत असतात, हा सिद्धांत प्लेट टेक्टॉनिक्स ह्या नावाने भूगर्भशास्त्रात आज सर्वमान्य झालेला आहे. १५ ते २० कोटी वर्षांपूर्वी आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरबस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका हे सर्व भूभाग सलग जोडलेले आणि दक्षिण गोलार्धात होते आणि तेथून विलग होऊन ते एकमेकांपासून दूर झाले आणि आज दिसतात तेथे येऊन पोहोचले. एकेकाळी अस्तित्वात असलेल्या त्या महाखंडाला भूगर्भशास्त्रात गोंडवनलँड अशी संज्ञा देण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ब्रिटिश राजवटीचा प्रभाव गोंड आणि अन्य जमाती राहत असलेल्या मध्यभारतातील अरण्यांपर्यंत जाऊन पोहोचला आणि गोंडांचा प्रदेश अशा अर्थाने गोंडवन हा शब्द ब्रिटिश सत्ताधारी वर्गाच्या सरकारी भाषेत समाविष्ट झाला. त्या भागात आढळणार्‍या आणि थराथरांनी बनलेल्या भूगर्भातील प्रस्तरांच्या रचनेचे वर्णन करण्यासाठी गोंडवन हा पारिभाषिक शब्द ब्रिटिश अभ्यासकांनी नवीनच उदयाला येऊ घातलेल्या भूगर्भशास्त्रात समाविष्ट केला. एडुआर्ड सुएस नावाच्या विएन्नास्थित जर्मन शास्त्रज्ञाने ‘पृथ्वीचा चेहरामोहरा’ अशा शीर्षकाचे एक महत्त्वाचे पुस्तक १८८५ साली लिहिले. त्या पुस्तकामध्ये भूगर्भशास्त्राला तोवर माहीत असलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला गेला होता. आणि तेथेच गोंडवनलँड हा शब्द पहिल्यांदा जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला. कालांतराने प्लेट टेक्टॉनिक्स ही संकल्पना निर्माण झाली आणि तेथे उपरिनिर्दिष्ट महाखंडाला हीच संज्ञा प्राप्त झाली.

दुसरा शब्द म्हणजे इंग्रजीत, विशेषत: अमेरिकन इंग्रजीत, आढळणारा ‘बॉस्टन ब्रॅह्मिन’हा शब्दप्रचार. इंग्लंडातून स्थलांतर करून अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्‍यावर प्रॉटेस्टंटांनी प्रथम वसाहती निर्माण केल्या. बॉस्टन शहराचा पाया ह्या मंडळींनीच घातला. सुरुवातीच्या काळामध्ये संस्कृती, कला, शिक्षण, लेखन, राजकारण अशा सर्व क्षेत्रांत ह्या कुटुंबांचा वरचष्मा होता. त्यामुळे समाजाच्या वरच्या थरातील ह्या काही डझन कुटुंबांना बॉस्टन ब्रॅह्मिन ही संज्ञा मिळाली. ह्या संज्ञेचे जनकत्व ऑलिवर वेंडेल होम्स सीनियर (१८०९-१८९४) ह्यांच्याकडे जाते. ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि ‘अटलांटिक मंथली’ ह्या नव्यानेच स्थापन झालेल्या मासिकात ते लिखाणही करीत. हे भारदस्त मासिक अजूनही चालू आहे. त्याच्या जानेवारी १८६०च्या अंकामध्ये छापून आलेल्या ‘एका प्रोफेसरची गोष्ट’ अशा शीर्षकाच्या कथेत होम्सनी ह्या शब्दप्रचाराचा पहिला वापर केला.(जाताजाता दोन उल्लेख करावेसे वाटतात. उल्लेख करावेसे वाटतात. वैद्यकशास्त्रात नव्यानेच उत्पन्न होत असलेल्या भूल देण्याच्या प्रक्रियेला अ‍ॅनस्थीसिआ हे नाव ह्यांनीच दिले. ह्यांचेच पुत्र पुढे प्रसिद्धीस आलेले अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे प्रख्यात न्यायाधीश ऑलिवर वेंडेल होम्स ज्युनियर (१८४१-१९३५). १९०२ ते १९३२ अशा प्रदीर्घ काळात ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. ‘क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर’ ‘ड्यू प्रोसेस ऑफ लॉ’ अशा सर्वपरिचित संज्ञा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. ह्यानंतरचा शब्द आहे ‘ब्राह्मन बुल’ किंवा नुसता ‘ब्राह्मन’. हा बैल युरोपीय बैलापासून थोडा निराळा आहे. मुळात हिंदुस्थानातील गीर आणि कांकरेज (गुजरात), नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बैलांची ही जात अमेरिका खंडात निर्यात झाली आणि लवकरच उष्ण हवामानाला तोंड देण्याच्या तिच्या गुणामुळे तिचा प्रसार उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये वेगाने झाला. हिंदुस्थानाशी असलेल्या ह्या संबंधामुळे बैलांच्या ह्या जातीला ‘ब्राह्मण’ असे नाव पडले आणि ते अजूनही वापरात आहे७. ह्या जातीच्या प्राण्यांचे प्रजनन आज व्यापारी पद्धतीने मांसासाठी केले जाते.

चौथा शब्द ‘डूलाली टॅप’ अर्थात देवळाली ताप.हिंदुस्थानात सेवा केलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या बोलीभाषेतील मूळचा हा शब्द आता सर्वसामान्य भाषेचा भाग बनला आहे. ब्रिटिश सैन्य अथवा हवाई दलात काम केलेल्या माझ्या काही मित्रांच्या सांगण्यानुसार साठ सालापर्यंत सर्व जुन्या सैनिकांना हा शब्द चांगला परिचयाचा होता. त्याची कहाणी अशी. देवळालीमध्ये ब्रिटिश सैनिकांचा जो तळ होता तेथेच युद्धामुळे मनावर परिणाम झालेल्या ब्रिटिश सैनिकांना उपचारार्थ पाठवीत असत आणि त्यांच्यापैकी अधिक वाईट स्थिती असलेल्यांना इंग्लंडला रवाना करीत असत. भ्रमिष्ट वर्तणूक करणार्‍याला देवळाली ताप अथवा ‘डूलाली टॅप’ झाला आहे असे म्हणण्याची पद्धत त्यामुळे पडली.

बंबैय्या हिंदीमध्ये ‘बिंदास’ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने ‘डूलाली’चाही वापर इंग्रजीमध्ये आज होता दिसतो. इंटरनेटवर अशा कित्येक जागा पाहावयास मिळतात. पुण्याजवळ कोंढवा भागात सुरू झालेले एक बुटीक हॉटेल त्यांनीच तयार केलेली एक ‘बुटीक बियर’ डूलाली ह्या नावाने विकतात असे मला इंटरनेटवरच दिसले.

आंग्ल-भारतीय शब्दांचा विख्यात शब्दकोश हॉबसन जॉबसन येथे मात्र प्रस्तुत शब्द दिसत नाही.

टिपा :
१) http: / / www.thestudy.net.au / projects / gondwana-nराe.html
२) Das Antlitz der Erde.
३) Boston Brahmin.
४) ‘The Professor’s Story.’ Atlantic Monthly January १८६०.
http: / / digital.library.cornell.edu / a / atla / index.html ह्या संकेतस्थळावर ही गोष्ट मुळातून वाचावयास उपलब्ध आहे. तेथे पृ० ९३ पाहा.
५) http: / / en.wikipedia.org / wiki / Oliver Wendell_Holmes_Sr,
http: / / en.wikipedia.org / wiki / Oliver Wendell_Holmes_Jr.
६) प्राणिशास्त्रीय नाव ‘Bos primigenius indicus’
७) http: / / en.wikipedia.org / wiki / Brahman_(cattle),
http: / / www.cattle.com / articles / title / Brahman+Cattle.aspx.
८) Deolali / Doolaly Tap.
९) http: / / dsal.uchicago.edu / dictionaries / hobsonjobson / index.html.