मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०

सुशान्त शंकर देवळेकर

‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

उद्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भाषासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.
भाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्याबद्दल एक समज असा आहे की इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.

त्यातला सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवणार्‍या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.

भाषेची समृद्धी दुसर्‍या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तर्‍हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वत:च्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीची संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे, कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसर्‍या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. ‘इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली’ असा संबंध नसून ‘इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले’ असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.

इतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही? सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनासंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बर्‍याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.

वरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा.

मी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही, तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे? तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.

पण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे? नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधोरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.
संज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे / करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण जो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वांरवार येणारी जाहिरातही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला ‘खण’ म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत ‘खण’ हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.
भाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड / दुर्बोध होते असा एक मुद्दा आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्बोध वाटणार नाही.

भाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सर्रास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवारला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवर्‍याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला / आतेभावाला / मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुत: करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.

परकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. ‘क्लिक्’करता मला ‘टिकटिकव’ हा धातू सुचला. त्यामुळे मी ‘अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा’ असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.

भाषेत खर्‍या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात; हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपण त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही; पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ० त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणार्‍यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का? मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहत नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे. तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.