मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना

दिवाकर मोहनी

मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते म्हणजे त्यांचा परीघ वाढत जातो. त्याचप्रमाणे त्या विषयांची खोलीदेखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावेत आणि तीमध्ये केलेले लेखन नि:संदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. अलीकडे लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला. पण सुलभीकरणाची गरज नाही अशा निष्कर्षाला मी आलो आहे.

भाषण आणि वाचन ह्या दोन्ही क्रियांनी आपणाला काही कळते. भाषण कानांना ऐकू येते किंवा ते ऐकायचे असते. आणि लेखन डोळ्यांनी वाचायचे असते. दोन वेगवेगळ्या इंद्रियांचा उपयोग आपण करीत असतो.

आंधळे लोक कानांनी ऐकून आणि बोटांनी स्पर्श करून पुष्कळ गोष्टी शिकतात. डोळ्यांच्या वापराशिवाय त्यांना विषयाचे आकलन होऊ शकते. जन्मापासून बहिरे असलेले, कर्णेंद्रियाचा वापर अजिबात न करणारे लोक वाचायला शिकू शकतात आणि त्या वाचनातून ज्ञान मिळवू शकतात. याचा अर्थ असा की आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी कोणतेही एक इंद्रिय पुरेसे असते. आपण जसे ऐकतो तसेच लिहिले गेले पाहिजे असे काही नाही. कोणतीही परकी भाषा शिकायची झाली तर ती दोन प्रकारे शिकता येते. ऐकून किंवा वाचून. व्याकरणाची पुस्तके, शब्दकोश ह्यांच्या साह्याने तिचे उच्चार कसे होतात हे न समजता कोणतीही भाषा शिकणे सहज शक्य आहे, असे माझ्या लक्षात आले. असे जर आहे तर उच्चाराप्रमाणे लिहिण्याची गरज नाही.
एक काळ असा होता की आपल्या देशात सुशिक्षितांची परस्पर-संपर्काची भाषा संस्कृत होती. बंगालमधले संस्कृत पंडित, केरळमधले आणि पंजाबमधले पंडित संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा उच्चार आपापल्या पद्धतीने, त्यांच्या मुखाला असलेल्या सवयीप्रमाणे करीत. पण ते उच्चार लेखनात आणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. संस्कृत भाषेचे लेखन कधीच उच्चारानुसार झालेले नाही. कारण प्रदेश जितका मोठा तितके उच्चारभेद असणारच.
लेखन उच्चार दाखविणारे कमी, तर अर्थ सांगणारे जास्त हवे हे केवळ संस्कृत भाषेतच नाही तर एका अत्यंत परक्या म्हणजे इंग्रजीसारख्या भाषेमध्येही आहे. एकाच उच्चाराच्या शब्दांचे स्पेलिंग निरनिराळे करून ते हे कार्य साधतात : SON, SUN; WRITE, RIGHT; BLUE, BLEW; NEW, KNEW वगैरे.

भाषण आतापर्यंत समोरासमोर होत असे म्हणजे एकाच प्रदेशात आणि काळात बोलणारा आणि ऐकणारा असे. त्यामुळे ऐकणार्‍याला आपले शंकानिरसन तेथल्या तेथे करून घेता येत असे. लेखन मात्र दूरदूरच्या प्रदेशात जाते. इतकेच नव्हे तर लिहिणारा आणि वाचणारा यांच्या काळात काही शतकांचेही अंतर असू शकते. असे लेखन समजून घेताना त्या लेखनाचा उच्चार त्या काळी आणि त्या प्रदेशात कसा होत असे यांच्याशी वाचकाला कसलेही कर्तव्य नसे. आपण वाचताना आपल्याला आलेल्या शंका लेखकाला विचारू शकूच असे नाही, कारण आपण ज्या वेळी ग्रंथ वाचत असू त्या वेळी त्याचा लेखक हयात असेलच असे नाही.

मग एखाद्या शब्दाची शंका फेडायची कशी? अशा वेळी शब्दकोशाचा आश्रय घ्यावा लागतो. क्वचित एखाद्या व्युत्पन्न पंडिताच्या लेखनात तो लेखनाच्या ओघात त्याच्या गरजेप्रमाणे घडवलेले नवीन शब्द वापरतो. त्यांचा अंतर्भाव शब्दकोशांत असेलच असे नाही. अशा ठिकाणी शब्दकोश उपयोगी पडत नाही. पण तो शब्द व्याकरणशुद्ध असेल आणि वाचकालाही तेवढे व्याकरण येत असेल, तर त्याला अशा नव्या शब्दापासूनसुद्धा अर्थबोध होतो. त्या नव्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे त्याला माहीत नसले तरी चालते.

लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी करणार्‍यांना तशी गरज का वाटत असावी असा विचार करीत असता मला एक गोष्ट जाणवली. त्यांना आपली भाषा संस्कृतपासून निघालेली आहे आणि जे संस्कृत चांगल्या प्रकारे शिकले आहेत त्यांनी ती सामान्य जनांवर लादली असे वाटत असावे. भाषा पूर्वी जास्त कठीण होती आणि कालमानाप्रमाणे ती सोपी होत चालली आहे आणि ती आणखी सोपी केली पाहिजे असा त्यांचा समज आहे असेसुद्धा मला जाणवले.

येथे मी एक विवाद्य विधान करतो, ते असे की मराठी किंवा तिच्यासारख्या अन्य भारतीय भाषा संस्कृतपासून निघालेल्या नाहीत. संस्कृत त्यांची जननी नाही. आपल्या आजच्या भाषा संस्कृत-प्रभावित आहेत; संस्कृतोद्भव नाहीत असे माझे मत आहे. पण तो वेगळा विषय असल्याकारणाने त्याचा येथे विस्तार करीत नाही.

आपल्या भाषेच्या लेखननियमांचे सुलभीकरण करावे अशी मागणी करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशी मागणी केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आकलनशक्ती किंवा बुद्धिमत्ता कमी आहे असा समज पसरतो. वास्तव तसे नसल्यामुळे सुलभीकरणाची मागणी त्यांनी टाकून द्यावी, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.

ज्याला शुद्धलेखनाचे जुने नियम म्हणतात त्या नियमांनुसार लिहिलेले वाचायला मला आवडते. याचे कारण असे की त्यातील प्रत्येक वाक्य मला एखाद्या गोफासारखे विणलेले दिसते. कोणत्याही नामाचे लिंग, वचन आणि विभक्ती सतत डोळ्यांसमोर असते. क्रियापदाच्या समोर असलेल्या रूपावरून काळ, कर्त्याचे लिंग, वचन आणि पुरुष ही सारी पुष्कळशा वेळी बरोबर समजतात. नाव (होडी) आणि नाव (नाम) ह्यांतला फरक डोळ्यांना दिसावा म्हणून नाम या अर्थाने जेव्हा तो शब्द लिहिला जातो तेव्हा त्यातल्या ‘ना’ वर अर्थभेददर्शक अनुच्चारित अनुस्वार पूर्वी देत असत तो आता काढून टाकला आहे आणि आपणांस संदर्भावर अवलंबून राहण्यास सांगितले आहे. येथे प्रश्न असा आहे की अर्थभेददर्शक अनुस्वार फक्त नाव किंवा तत्सम शब्दांवरच आहे काय? ‘मला खाऊ दे’ हे वाक्य पूर्वी दोन पद्धतीने लिहिले जात होते. ‘मला खाऊ दे’ आणि ‘मला खाऊं दे’ पहिल्या ‘खाऊ’ चा अर्थ ‘मला खाण्याचा पदार्थ दे’ असा आहे. आणि दुसर्‍या अनुच्चारित अनुस्वारयुक्त ‘खाऊं’चा ‘अर्थ मला खाण्याची क्रिया करू दे’ असा होतो. खाऊ हे एका ठिकाणी नाम आहे तर दुसर्‍या ठिकाणी साहाय्यक क्रियापद आहे. येथे जो बिंदुचिन्हाचा वापर झाला आहे त्यामुळे त्या शब्दाच्या नव्हे, वाक्याच्या ठिकाणी निश्चितार्थ आला आहे. तेवढ्या एका टिंबाने पुष्कळ मोठा संदर्भ मनात निर्माण करण्याचे कार्य केले आहे. हेच वाक्य आपण सुटे वाचले आणि त्यातला अनुच्चारित अनुस्वार नको म्हणून तो दिला नाही तर खाऊ हे नाम की क्रियापद हे कळायला मार्ग नाही. हे वाक्य ज्या वेळेला उच्चारले जाते आणि ते कानांनी ऐकले जाते त्या वेळी संदर्भ तेथे उपस्थित असतो. हे वाक्य डोळ्यांनी वाचत असताना तेथे आविर्भाव नसतात. उच्चारात हेल नसतात आणि त्या वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे समजून घेण्याची सोय नसते. जुन्या पद्धतीच्या लेखननियमांत ती सोय होती.

फक्त नाम आणि क्रियापद यांतला फरक दाखविण्यासाठीच टिंबाचा उपयोग होत होता काय? नाही. तो नामाची विभक्ती दाखविण्यासाठीही होत होता. ‘मी गावाला गेलो आणि मी पुस्तक वाचले’ ह्या दोन वाक्यांतील पहिल्या ‘मी’ ची विभक्ती प्रथमा आहे आणि दुसर्‍या ‘मीं’ची विभक्ती तृतीया आहे. ‘डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो’ या चरणाचा कर्ता ‘मी’ की ‘तो’ हे तेथे हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकल्यामुळे समजण्याचा मार्ग खुंटला आहे. बघतो, परिसतो, चालतो, चाखतो वगैरे क्रियापदे प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी कर्ता असताना त्यांचा उच्चार समान असला तरी प्रथमपुरुषी क्रियापदाच्या अंत्याक्षरावर टिंब असते. त्या एका टिंबामुळे वाक्याच्या कर्त्याचा पुरुष माहीत होतो. ‘घोडे पळाले’ येथे एक घोडे की पुष्कळ घोडे पळाले, हे सांगण्यासाठीसुद्धा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग होत होता. ‘घोडें पळालें’ येथे कर्ता नपुंसकलिंगी आहे आणि एकवचनी आहे, हे त्या अनुस्वाराच्या योगाने स्पष्ट होते. दिवाळी-दिवाळीं, वांचाल-वाचाल, जिवाणूं-जीवाणू असे प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी निश्चितार्थ येण्यासाठी जुने शुद्धलेखन जास्त उपयुक्त आहे, अशा निष्कर्षाला मी आलो आहे. पूर्वीच्या हस्तलेखनात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे दिनचर्या आणि दीन चर्या अशांसारखे शब्द जोडून लिहिले जात होते. ह्या दोन शब्दांतील अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी उच्चाराचे र्‍हस्व-दीर्घत्व सांभाळण्याची गरज आहे. भाषेमध्ये सतत नवनवीन शब्द येतात. त्यांपैकी काहींचे उच्चार पूर्वीच्या एखाद्या शब्दासारखे असू शकतात. अशा दोन शब्दांमधील अर्थभेद स्पष्ट व्हावा यासाठी त्यातील स्वरांचे र्‍हस्व-दीर्घत्व बदलून वा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग करून अर्थभेद दाखविण्याचे कार्य होऊ शकते. पुढे तीन शब्द मी लिहीत आहे. कोणत्याही शब्दाचे अर्थनिश्चयन करण्यासाठी बिंदुचिन्हाचा उपयोग कसा होतो ते दाखविण्यासाठी आहेत. अंगकाठी, जरीकाठी आणि इंद्रायणीकाठी. पूर्वीच्या नियमानुसार ते अंगकाठी, जरीकांठी आणि इंद्रायणीकांठीं असे लिहिले जात असत. काठ हा शब्द किनारा या अर्थाने वापरला गेल्यास ‘कां’वर टिंब देण्याचा प्रघात होता. आणि नदीकांठींमध्ये काठ या शब्दाची सप्तमी विभक्ती आहे हे त्या टिंबाने स्पष्ट होत होते.

नामांपासून अव्यये डोळ्यांना वेगळी ओळखता यावीत ह्यासाठी अव्यये र्‍हस्वान्त ठेवली जात असत. किंवा र्‍हस्व करणे शक्य नसल्यास त्यांवर अनुच्चारित अनुस्वार दिला जात असे. ‘आणी’ हे क्रियापद आणि ‘आणि’ हे अव्यय डोळ्यांना वेगळे दिसावे ह्यासाठी तसे लिहिले जात होते. ‘यथाशक्ती’ सारखी अव्यये आजही र्‍हस्वान्त लिहिली जावीत, असा नियम आहे. पण अव्यये म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे आणि सगळेच शब्दांच्या अंती येणारे इकार उकार दीर्घान्त लिहावे एवढाच नियम माहीत असल्यामुळे ते दीर्घान्त लिहिले जाऊ लागले आहेत. मुळे हे नाम आणि मुळें अव्यय; साठी हे नाम व साठीं हे अव्यय. ‘तो जाता झाला’, ‘जातां जातां गाडीत त्याने पुस्तक वाचले.’ ह्या वाक्यांतील पहिला जाता आणि पुढचे जातां जातां ह्यांमधला अर्थभेद डोळ्यांना दाखविण्याची सोय आम्ही गमावली आहे आणि प्रत्येक ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवण्याची गरज निर्माण केली आहे.

वाचताना संदर्भावर कमीतकमी अवलंबावे लागावे ह्यासाठी शब्दांच्या लेखनामध्ये फरक करण्याची पद्धत बहुतेक सगळ्याच भाषांमध्ये आहे. उर्दूमध्ये तीन भाषांचे मिश्रण आहे. अरबी, फारसी आणि हिंदी. तिचे लेखन पुष्कळसे फारसीप्रमाणे करण्याची पद्धत आहे. परंतु तीमध्ये अरबी शब्द अरबीसारखेच लिहिले जातात. एकच किंवा जवळचे उच्चार दाखविणारी तीन-तीन व्यंजने आहेत. परंतु कधीही एका व्यंजनाची जागा ते दुसर्‍या व्यंजनाला घेऊ देत नाहीत. इंग्लिशमध्येही अर्थभेद दाखविण्यासाठी शब्दाच्या लिखित रूपाने निश्चित अर्थ दाखवावा, अशी सोय असल्याचे पूर्वी सांगितले आहे.

मुद्रणपूर्व काळात पद्य बाळबोधीत (देवनागरीत) आणि गद्य मोडीत लिहिले जात होते. पद्य अल्पाक्षर आणि छंदोबद्ध असल्याकारणाने त्यामध्ये अर्थबोधासाठी त्याचा अन्वय करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये छंदाच्या गरजेसाठी र्‍हस्व-दीर्घाचे बंधन पाळणेही गरजेचे असते. अन्वय करणे सोपे जावे ह्यासाठी लिंग-वचन-विभक्तीच्या, त्याचप्रमाणे काळाच्या आणि अर्थाच्या खुणा सगळ्या शब्दांना अंगावर वागवाव्या लागतात. इतकेच नव्हे तर काही शब्दांचे व प्रत्ययांचे अध्याहरण करावे लागते. पद्यलेखनाच्या वरील गरजांसाठी घडलेले लेखनाचे नियम आपण नंतर गद्यातही वापरू लागलो. हे गद्य मुख्यत: मुद्रणासाठी लिहिले गेले. (आपसातला पत्रव्यवहार मोडीमध्ये चालू होता. मोडीमध्ये एकच वेलांटी आणि एकच उकार आहे. आणि उच्चारित अनुस्वाराचादेखील वापर होत नाही.)

हे सारे घडले ते मुद्रणाच्या गरजेमुळे पण त्याच वेळी मराठीचा इंग्रजीशी संपर्क वाढत चालला होता. आणि आपल्या भाषेमध्ये तोवर कधीच न आलेल्या विषयांचा अंतर्भाव होऊ लागला होता. ह्या नवीन विषयांसाठी नवे पारिभाषिक शब्द घडविण्याची गरज होती आणि ते घडविण्यासाठी संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागणे अपरिहार्य होते. हे पारिभाषिक शब्द पूर्णपणे नवीन असल्याकारणाने ते कोशगत झाले नव्हते. म्हणून त्या शब्दांचे आकलन होण्यासाठी संस्कृतच्या व्याकरणाच्या ज्ञानाची गरज होती. ते शब्द आपल्या भाषेत पुढे रुळल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सातत्य हा गुण आला आणि त्या सातत्यामुळेसुद्धा त्यांच्यात निश्चितार्थता आली. भाषेला या शब्दांमुळे प्रौढत्व आणि सौष्ठव प्राप्त झाले. हे सारे शब्द संस्कृत भाषेच्या नियमांप्रमाणे घडविल्यामुळे ते कोणाच्याही उच्चाराप्रमाणे लिहिले गेले नाहीत. तर मुळाप्रमाणे (तत्सम) लिहिले गेले. ह्या नव्या, संस्कृतातून घेतलेल्या, शब्दांची संख्या जशी मराठीत वाढू लागली तशी मोडीलिपी त्यांच्या वापरासाठी अपुरी पडू लागली.

एखादा नवीन विषय भाषेमध्ये आणायचा हे मोठे अवघड काम आहे. त्या विषयाचे आकलन होण्यासाठी वाचकांच्या ठिकाणी कोणतेही संदर्भ असत नाहीत. कारण तो विषय त्यांच्यासाठी पूर्णतया नवीन असतो. तेवढ्याचसाठी प्रत्येक शब्दाने संदर्भावर अवलंबून न राहता नेमका अर्थ व्यक्त करावा अशी गरज असते. हे काम उच्चारानुसारी लेखनामुळे होऊ शकत नाही. कारण त्या शब्दांच्या योगे उच्चार व्यक्त करावयाचा नसतो तर वाचकाच्या मनामध्ये अर्थाचे संक्रमण करावयाचे असते. त्यासाठी ते व्याकरणशुद्ध असावे लागतात. एकदा हे शब्द भाषेत रूढ झाल्यानंतर ते वाचकांच्या डोळ्यांना परिचित झाले. इतकेच नव्हे तर त्या शब्दांपासून एकच अर्थ व्यक्त व्हावा ह्यासाठी त्यांच्या लेखनात सातत्य राखावे लागले. त्या शब्दांना कोशगत करावे लागले. त्यांच्या लेखनात सातत्य राखल्यामुळे एक आनुषंगिक गुण त्यांना प्राप्त झाला. ते ओझरते पाहूनदेखील त्यांचा अर्थ (नित्य परिचयामुळे) वाचकाला समजू लागला.
मराठीच्या बोलीभाषा ह्या घरांत, शेतात किंवा रणांगणावर वापरण्यासाठी घडलेल्या आहेत. रणांच्या गरजेसाठी घडवलेल्या भाषेत देश्य शब्दांच्या बरोबर काही परकीय म्हणजे फारसी, अरबी आणि पोर्तुगीज शब्दही आले. पण ज्या वेळी मराठी ही तीन क्षेत्रे सोडून विज्ञानाच्या वा तत्त्वज्ञानाच्या सभामंडपात शिरली त्या वेळी तिला संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागला. आणि तत्सम शब्दांचा तिच्यात भरणा झाला. आमची मराठी बोली पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत पूर्णपणे परावलंबी आहे. ह्या परावलंबनामुळे बोलीभाषांची स्वतंत्रपणे होऊ शकणारी वाढ खुंटून गेली. न्यायालयात वापरण्यासाठी संविधानासारखे ग्रंथ रचण्यासाठी वा विश्वकोशातील नोंदी लिहिण्यासाठी जी भाषा वापरावी लागते, ती पूर्णपणे संस्कृतनिष्ठ असल्याकारणाने आमच्या बोलीपासून फार दुरावलेली आहे. परंतु नाइलाजास्तव तीच वापरणे भाग आहे.

अंदाजे गेल्या साठ वर्षांपासून मराठी भाषेच्या शिक्षणाकडे आपले दुर्लक्ष आहे. मला येथे मुद्दा मांडावासा वाटतो तो असा की आम्ही जसे बोलतो तसे लिहितो किंवा तसे लिहावयास पाहिजे ह्या आपल्या समजामुळे ‘‘मातृभाषा काय शिकवायची?’’ असे आम्हांस वाटू लागले. भाषेच्या शिक्षणाच्या नावाने आम्ही थोडे साहित्य शिकविले; परंतु भाषेचे व्याकरण व शब्दांची घडण ह्या दोन गोष्टी शिकविण्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केले. कोणतीही भाषा फक्त साहित्य व त्यातही ललित साहित्य लिहिण्यासाठी वापरली जात नाही. तर तिच्यात जीवनावश्यक सगळेच विषय लिहिले-बोलले जातात. भाषा जर चांगली नसेल तर त्या विषयांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. वाढ खुंटते. गेल्या अनेक वर्षांत, साहित्याचा प्रांत सोडल्यास आपल्या भाषेतून नवीन विचार मांडले गेले नाहीत ते यामुळेच.

भाषण कानांसाठी आहे व लेखन डोळ्यांसाठी हे आपण पूर्वी पाहिलेले आहे. येथे सांगायचे ते असे की, वाचन श्रवणापेक्षा कठीण आहे, त्रासदायक आहे. तोंडाने आवाज करणे व तो कानांनी ऐकणे हे बहुतेक सगळे चार पायांचे प्राणीसुद्धा करतात. ही त्यांची क्षमता माणसांत आली आहे इतकेच नव्हे तर अन्य प्राण्यांपेक्षा पुष्कळ निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढणे त्याला शक्य झाले आहे. दृश्य संकेत हे अगदी अलीकडे म्हणजे पाचसहा हजार वर्षांपासून माणूस वापरू लागला आहे. हातांनी निरनिराळी चिन्हे काढून त्यांच्या योगाने अर्थबोध करून देणे हे मानवाच्या इतिहासात अगदी नवीन आहे. परंतु त्याचा वापर झपाट्याने वाढणार आहे. कानांनी ऐकताना अर्थबोध करून घेण्यासाठी पूर्ण वाक्य ऐकावे लागते. आणि डोळ्यांनी वाचताना अक्षरन्अक्षर वाचण्याची गरज नसते हे आपणांस ठाऊक आहे. कानांना सिक्वेन्शियल अ‍ॅक्सेस (क्रमेण) असतो आणि डोळ्यांना रँडम अ‍ॅक्सेस (यादृच्छिक) असतो. तेवढ्यामुळेच वाचन लवकर होते. मुद्रण सुरू झाल्यापासून माणसाला वाचनाची गती वाढविणे भाग पडले आहे, आणि शक्यही झाले आहे. सगळ्यांचीच वाचनाची गती दिवसेंदिवस वाढवावी लागणार आणि ते साध्य व्हावे म्हणून मुद्रणात एकसारखेपणा ठेवणे आवश्यक झाले आहे. मुद्रणात एकसारखेपणा असल्याशिवाय वाचनाची गती वाढू शकत नाही. एकसारखेपणा ठेवण्याच्या गरजेमुळेच शुद्धलेखनाचे नियम करावे लागतात आणि जुन्या-नव्या पुस्तकांमध्ये लेखनविषयक सातत्य राखावे लागते.
लेखननियम सुलभ करण्याचा हेतू, ते सर्वांच्या आटोक्यात यावेत हा असतो. पण सगळ्या लोकांची क्षमता सारखी नसते. जे सगळ्यांना सहजपणे अमलात आणता येतील असे नियम अमलात आणणे इष्ट आहे असा समज आहे. पण तो चुकीचा आहे. कारण सध्या सुलभ केलेले नियमही फारच थोड्यांना वापरता येतात व सोपे करण्याच्या भानगडीत त्यांत विसंगती आल्यामुळे ते कठीणही झाले आहेत.

येथे प्रश्न हा पडतो की, गणित हा विषयही सर्वांच्या आटोक्यातला नाही. पण म्हणून गणितातील नियम (सूत्रे) बदलायची का? की शिकविण्याच्या पद्धती बदलायच्या? बीजगणित आणि शून्यलब्धी हे विषय पुष्कळांना जड जातात म्हणून ते कायमचे काढून टाकायचे का?
आज आपल्या भाषेतल्या लेखननियमांच्या बदलत्या स्वरूपामुळे परभाषी लोक मराठी भाषा शिकायला धजत नाहीत. त्याचप्रमाणे जुन्या शुद्धलेखनाचे नियम गेली साठ वर्षे शाळांमधून न शिकविल्यामुळे प्राचीन मराठी वाङ्मयाचा आस्वाद आज कोणालाच घेता येत नाही. व आमची साहित्याची उज्ज्वल परंपराच नष्टप्राय झाल्यामुळे एक मोठी सांस्कृतिक पोकळी निर्माण झालेली मला जाणवते, ती आपल्याला का जाणवत नाही? ही कोण आणि कशी भरून काढणार? चिपळूणकरांच्या पूर्वीचे सर्व गद्य व केशवसुतांच्या पूर्वीचे सर्व पद्य यथामूल म्हणजे जुन्या लेखननियमांप्रमाणेच लिहावे हा नवा नियम करून तर अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ ह्यासारख्या म्हणी कशा लिहायच्या असा प्रश्न पडतो. त्या म्हणी चिपळूणकरपूर्वकालीन की उत्तरकालीन, हे कसे ठरवायचे? सोनारें ही सोनार या शब्दाची तृतीया विभक्ती आहे. आणि व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तृतीया विभक्तीच्या सर्व प्रत्ययांवर अनुच्चारित अनुस्वार देणे आवश्यक आहे. व्याकरण हे शास्त्र पॉझिटिव्ह सायन्स आहे, ते नॉर्मटिव्ह सायन्स नाही. आपली भाषा पूर्वी कशी लिहिली गेली एवढेच व्याकरणशास्त्र सांगते. पुढे ती कशी लिहावी हे सांगण्याचा अधिकार व्याकरणाला नाही. लिहिलेल्या भाषेचे व्याकरण आणि बोलीभाषेचे व्याकरण ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. बोली प्रत्येक दहा कोसांवर बदलते. इतकेच नव्हे तर ती महाराष्ट्रात प्रत्येक जातीप्रमाणेही बदलते. त्यामुळे बोलीचे एकच एक व्याकरण अशक्यप्राय आहे. व्याकरणामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती इत्यादींचे विकार नामांना कसे होत आले आहेत त्यांचे वर्णन असते. बोलींत ठिकठिकाणी ते विकार बदलतात. त्यामुळे मराठीच्या बोलीभाषांचे एक व्याकरण होऊ शकत नाही. बोलीभाषेतले शब्द प्रमाणभाषेत घेण्यात कसलीच आडकाठी नाही. फक्त ते घेताना त्या त्या शब्दाचे लिंग ठरवून त्याची अनेकवचनी रूपे कशी होतील आणि सामान्य रूप कसे होईल ह्याचा निर्णय करणे व ती कोशगत करणे आवश्यक असते. कोणत्याही भाषेमध्ये शब्दांची भर सतत पडावयासच पाहिजे आणि बोलीभाषेतून मोठ्या संख्येने ते घेतले जावेत.

प्रमाणभाषेचे नियम फक्त छापील मजकुराला लागतात. छापील म्हणजे सार्वजनिक मजकुराला लागतात. खाजगी मजकूर त्यांपासून मुक्त असतो. कोणताही मजकूर छापण्यापूर्वी तो जाणकारांनी पाहून छापण्यास द्यावयाचा असतो. पूर्वीचे प्रकाशक आणि मुद्रकसुद्धा हे काम नियमितपणे करीत होते.

प्रमाणभाषा ही सगळ्यांनाच परकीय भाषेसारखी शिकवायला पाहिजे कारण ती बोलीभाषेपासून अगदी वेगळी असते. ती उच्चारबोधक असण्यापेक्षा जास्त प्रमाणात अर्थबोधक असते. ती इतिहासाकडे वळलेली असते आणि ती कानांसाठी नसून डोळ्यांसाठी असते.
येथे मराठी भाषेची इंग्रजीशी केलेली तुलना अप्रस्तुत होणार नाही. इंग्रजी आता ज्ञानभाषा म्हणून जगात प्रतिष्ठा पावली आहे. तिचा शब्दसंग्रह विशाल आहे. हा शब्दसंग्रह त्या भाषेने इतर भाषांमधून उचल केल्यामुळेच वाढला आहे. तांत्रिक, वैज्ञानिक त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचे विषय जेव्हा इंग्रजीला नवीन होते तेव्हा तिने ग्रीक आणि लॅटिन भाषेतून शब्द घेऊन आपली निकड भागवली. त्यानंतर जसजसा इतर भाषांशी तिचा संपर्क वाढला तसतसे त्या भाषांतले शब्द तिने आत्मसात केले. ते तसे करताना त्या शब्दांचे स्पेलिंग कसे करावयाचे हे ठरविले म्हणजे त्यांना तत्सम शब्दांसारखे वागवून कोशामध्ये स्थान दिले. ते एकदा कोशगत झाल्यानंतर त्यांच्या स्पेलिंगमध्ये कधीही बदल घडू दिला नाही.

इंग्लंडमधल्या लोकांची मातृभाषा ‘प्रमाणभूत इंग्लिश’ आहे असे आपण समजतो. परंतु ते बरोबर नाही. तेथे पुष्कळ बोली आहेत आणि त्यांचा वापर त्या-त्या प्रदेशात अनौपचारिकपणे होत असतो. इंग्लंडमधील लोकांची मातृभाषा जरी इंग्लिश असली आणि त्यांना आयुष्यभरात दुसरी भाषा शिकण्याची गरज नसली तरी तेथल्या सर्व नागरिकांना प्रमाणइंग्लिश बिनचूक लिहिता येते असे नाही. औपचारिक प्रसंगी वापरावयाची भाषा सर्वांनाच वेगळी शिकावी लागते. आणि काही जणच तीमध्ये प्रवीण होतात. ते तिचे लेखनविषयक नियम काटेकोरपणे पाळतात. एकदा स्वीकारलेल्या प्रमाणभाषेत त्यांनी वेळोवेळी बदल केला आहे असे आढळत नाही. आमच्या देशात अर्थातच इंग्लंडमधील बोलीभाषा शिकवल्या जात नाहीत. प्रमाण इंग्रजी भाषाच शिकवली जाते. आणि त्या आमच्यासाठी नवख्या असलेल्या भाषेचे नियम आम्ही सगळेच निमूटपणे पाळतो.

आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर तिला शास्त्रशुद्ध बैठकीवरच बसवावे लागेल. आणि तिचे शिक्षण औपचारिकपणे सर्वांना घ्यावे लागेल. इंग्रजी भाषा जशी आपण तिच्या व्याकरणाविषयी कुरकुर न करता स्वीकारतो, तिच्यामधील शब्दांचे स्पेलिंग पाठ करतो, तसेच आपल्याही औपचारिक मराठी भाषेचे म्हणजेच प्रमाणभाषेचे नियम आपण स्वीकारले पाहिजेत. त्याचप्रमाणे जुन्या-नव्या नियमांमध्ये सातत्य राखले पाहिजे.