यमलार्जुन

मा०ना० आचार्य

प्राचीन मराठी काव्यांतील श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन मूळ संस्कृत ग्रंथातील आधारांसह वाचीत असताना 'यमलार्जुन' या शब्दाविषयी आलेला एक मजेदार अनुभव येथे थोडक्यात देत आहे.

या बाललीलांपैकी एक प्रसंग असा - एकदा यशोदेने खोड्या काढणार्या कृष्णाला उखळाला बांधून ठेवले (उलूखलबंधन). ते उखळ ओढीत ओढीत तो अंगणात गेला. तेथे दोन अर्जुन नावाचे वृक्ष उभे होते. त्यांमधून उखळ ओढीत नेताना ते अडकले, तरी कृष्णाने ते तसेच जोरात ओढले. त्यामुळे ते दोन अर्जुन वृक्ष उन्मळून पडले. (यमलार्जुनोत्पाटन). कृष्णाला उखळाशी बांधले होते ते एका दाव्याने. त्यावरूनच त्याला 'दामोदर' (दाव्याने बांधले आहे उदर ज्याचे) म्हणतात. हा प्रसंग तसा बहुतेकांच्या माहितीचाच आहे.

या प्रसंगाच्या वर्णनासाठी पाहिलेले मूळ संस्कृत ग्रंथ असे -
हरिवंश (सुमारे इ०स० पूर्व पहिले शतक)
(चित्रशाळा प्रत - विष्णुपर्व अ० ७, किंवा भांडारकर प्रत - अ० ५१)
विष्णुपुराण - (सुमारे इ०स० पहिले ते तिसरे शतक)
(पंचम अंश - अ० ६) गीताप्रेस प्रत
श्रीमद्भागवत - (र०स० ६ व्या शतकानंतर) यंदे प्रत.
(स्कंध १० अ० ९ ते ११)
भासाचे 'बालचरित' हे नाटक (विवाद्य काळ इ०स० चौथे शतक)
(यातील तिसर्याा अंकाच्या आरंभीचा प्रवेशक)
- जे मराठी ग्रंथ पाहिले ते असे -
श्रीचक्रधरनिरूपित श्रीकृष्ण चरित्र व नामदेवांचे अभंग (तेरावे शतक)
तुकारामांचे अभंग (सतरावे शतक)
श्रीधर कवीचा हरिविजय (अठरावे शतक)
(दशम स्कंधावर आधारित अन्य ग्रंथांमध्ये चर्चास्पद भाग नाही.)

मूळ संस्कृत ग्रंथातील महत्त्वाच्या घटना वर नोंदल्याच आहेत. हरिवंश व विष्णुपुराण यांमध्ये या त्रोटक स्वरूपात येतात. भागवतामध्ये त्या घटनांना आणखी एका उपकथेची जोड आहे ती अशी -
त्या उन्मळून पडलेल्या दोन अर्जुनवृक्षांमधून दोन तेजस्वी पुरुष बाहेर पडले, ते दोघे म्हणजे पूर्वी नारदांनी शाप दिलेले नलकूबर व मणिग्रीव या नावांचे कुबेरपुत्र होते. यांना नारदांनी शाप देण्याचे कारण असे - एकदा हे कुबेरपुत्र मद्यप्राशनाने धुंद होऊन स्त्रियांसह वस्त्रहीन अवस्थेत जलक्रीडा करत होते. तेवढ्यात तेथे नारद आले. त्यांना पाहून त्या स्त्रिया लाजल्या व त्यांनी वस्त्रे परिधान केली. ते कुबेरपुत्र मात्र तसेच हसतखिदळत राहिले. आपली अशा प्रकारे केलेली अमर्यादा सहन न झाल्यामुळे नारदांनी त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला. परंतु त्याच अवस्थेत ते दीर्घकाळ राहू नयेत म्हणून, 'श्रीकृष्ण तुमचा उद्धार करील', असा उ:शापही दिला. तद्नुसार कृष्णाने आता वृक्षयोनीतून त्यांची मुक्तता केली.

भासाच्या 'बालचरित्रातील' या प्रसंगाच्या एका गोपालकृत वर्णनाचा अनुवाद असा – 'त्या कृष्णाने ओढीत नेलेले उखळ यमल व अर्जुन या दोन (वृक्षरूपी) राक्षसांवर फेकले..... नंतर त्या नंदपुत्राने ते उखळ त्यांच्यामधून ओढले व त्या वृक्षांचे चूर्ण केले. तेव्हा त्या वृक्षांनी राक्षसरूप घेतले व ते मरण पावले.'
- संस्कृत पुराणांमध्ये 'यमलार्जुनौ' असा शब्द आहे. 'यमल' म्हणजे 'जुळे'.
भासाच्या नाटकात हे जुळे वृक्ष 'यमल' व 'अर्जुन' नावांचे दोन राक्षस झाले आहेत. ('यमलार्जुनयो: नाम दानवयो: निक्षिप्तम्।') या परिवर्तनाची चिकित्सा पुढे यथास्थळ करू.

आता मराठी ग्रंथकारांची भेट घेऊ. श्रीचक्रधरनिरूपित 'श्रीकृष्णचरित्र' या महानुभाव, गद्य ग्रंथामध्ये या प्रसंगवर्णनातील महत्त्वाचा भाग असा -
'एक दी महादाइसीं विनविलें' : बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ति यमलार्जुन कैसे उन्मूलीले: सर्वज्ञें भणतले : ... धनदाचे पुत्र दोघे यक्ष आपुलिआं स्त्रियांसहितु विवस्त्र होऊनि सरोवरीं जळकेली खेळुत होते : तंवं तेथ नारदु स्नालागीं गेला : सरोवराचीं तीरीं अंजनवृक्षातळीं बैसला : ... (इत्यादी, बाकी तपशील भागवती कथेप्रमाणे) परंतु आणखी एक प्रश्नोत्तर असे- 'महदाइसीं पुसिलें : बाबा : अर्जुनवृक्षु तो कवणु : सर्वज्ञें भणतलें : अर्जुन भणजे अंजनाचा वृक्ष :' (प्रसंग ९)
म्हणजे येथे नारद अंजनवृक्षाखाली बसला आहे. यक्षांना शाप आहे (मुळाप्रमाणेच) अर्जुनवृक्ष होण्याचा. परंतु अर्जुनवृक्ष म्हणजे अंजनवृक्ष अशी येथील नवीन भर आहे. याचीही चिकित्सा यथास्थळ येईलच.
दुसरे नामदेव. त्यांच्या अभंगांमध्ये दोन तीन ठिकाणी या घटनेचा उल्लेख आलेला आहे (त्यांतील फक्त प्रस्तुत असलेलाच भाग पाहू.)
१. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले । म्हणूनि शापिले नारदानें॥१॥
...... विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उ:शाप वदत कृपाळुवा ॥३॥
...... मोडितसे तेव्हा वृक्ष लक्ष्मीचा पती। दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥
(शासकीय गाथा क्र० ७०)
२. ..... कंसचाणूर मर्दिले । विमलार्जुन उन्मळिले ॥१७॥
(शा०गा०क्र० ४४३)
येथे यमलार्जुनांचे 'विमलार्जुन' झाले आहेत. (असाच उल्लेख अ०क्र० १५ मध्येही आहे.)
तिसरे तुकाराम. त्यांच्या अभंगांमध्येही दोन ठिकाणी या घटनेचा उल्लेख येतो. त्यांतील संबद्ध भाग असा-
१. (यशोदेने गोपींसह श्रीकृष्णाला दाव्याने उखळाला बांधले. नंतर एकमेकींकडे पाहत हसत हसत त्या निघून गेल्या...)
'फांकल्या सकळ उपडूनियां उखळा
मोडी वृक्ष विमलार्जुन दोन्ही॥' (३८८.५) शा०गा०
२. 'बाळपणीं रिठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन॥' (४५१९.७)
शा०गा०
येथे विमलार्जुनाऐवजी 'विमळार्जुन' असा अक्षराचा फरक येतो. बाकी जी नवीन भर आहे, तिचा विचार नंतर करू.

आता श्रीधरस्वामी काय म्हणतात ते पाहू.
त्यांच्या 'हरिविजया'मध्ये नवव्या अध्यायात या प्रसंगाचे वर्णन येते. त्यातील संबद्ध भाग असा-
चंडवृक्ष नंदांगणीं यमलार्जुन नामें दोन्ही।
ते नारदें पूर्वी शापोनी ।
वृक्षजन्मा घातले ।
हे पूर्वी कुबेरपुत्र। नांवें यांची नलकूबर ।
परम उन्मत्त अविचार ।
सारासार कळेना ॥ ... (९. ८४-८५)
- येथे कुबेरपुत्रांची नावे नल व कूबर अशी झाली आहेत. मणिग्रीवाचा पत्ताच नाही.
आता काही अनुवादकांची व कोशकर्त्यांची भेट घेऊ. डॉ० मु०श्री० कानडे व श्री० रा०शं० नगरकर यांच्या 'श्रीनामदेव गाथा - शब्दार्थ संदर्भ कोश' (इ०स० २००२) या कोशात नामदेवांच्या शा०गा०मधील उपरोक्त अभंगांचा संदर्भ देऊन, 'विमलार्जुन' या शब्दाचा 'अर्जुन नावाचा वृक्ष' असा अर्थ दिला आहे. (एक मुद्रणदोष - ७० ऐवजी ७१ असा क्रमांक पडला आहे. क्र०१५८चा उल्लेख राहून गेला आहे. याच संपादकद्वयांनी नंतर (इ०स० २००५ मध्ये) 'नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा' प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये उपरोक्त शा०गा० क्र० ७० हा अभंग क्र० ६२ वर आहे. त्यातील पूर्वोक्त ओळींचा त्यांनी केलेला अर्थ असा आहे-
'कुबेराचे दोन पुत्र (नल आणि कुबेर) मदोन्मत्त झाले होते. म्हणून नारदाने त्यांना शाप दिला (की तुम्ही वृक्ष व्हाल.) (१) नारदाने उ:शाप देऊन म्हटले, 'तुम्ही दोघे जण गोकुळात अर्जुनवृक्ष व्हाल....' (३) ... कृष्णाने ते दोन्ही वृक्ष मोडून टाकले. त्याबरोबर त्यांतून दोन दिव्य पुरुष (नल व कुबेर) निघाले (५)
आता येथे 'नलकूबर' या एका नावाची (श्रीधराच्या हरिविजयातील उल्लेखाप्रमाणेच) फाळणी होऊन दोन पुत्र जन्मले आहेत. आणखी एक मौज म्हणजे कुबेराचा पुत्र पुन्हा कुबेरच! (असो.)

आता तुकाराम कानडे-नगरकरांच्या 'श्री तुकाराम गाथा-शब्दार्थ संदर्भकोशात' (इ०स० १९९९) उपरोक्त दोन्ही अभंगांचा संदर्भ देऊन 'विमळार्जुन' या शब्दाचा 'पांढर्याल रंगाचा अर्जुनवृक्ष' असा अर्थ केला आहे. विष्णुबुवा जोगांच्या गाथ्यात (येथे उपरोक्त शा०गा० क्र० ३८८ हा अभंग ३८०९ या क्रमांकावर आहे) 'नल व कुबर' असे दोन वृक्ष झाल्याचा उल्लेख आहे. तर त्यांच्याच गाथ्यात (उपरोक्त शा०गा० क्र० ४५१९ हा अभंग येथे ३८४६ या क्रमांकावर आहे.) 'नारदाने शाप दिल्यामुळे 'विमळ व अर्जुन' या नावांचे दोन वृक्ष...' असा उल्लेख आहे.
म्हणजे एकदा 'नल व कुबर' (कूबर नव्हे) अशी दोन, तर नंतर 'विमळ व अर्जुन' अशी दोन वृक्षनामे झालेली आहेत.
- खंदारकरांच्या गाथ्यात - (येथे अनुक्रमे क्र० ३७७७ व ३८११) 'विमळ व अर्जुन' ही एके ठिकाणी वृक्षनामे आहेत, तर दुसर्याग ठिकाणी 'विमलार्जुन' असा उल्लेख करून ते 'कुबेरपुत्र की वृक्ष' हे संदिग्ध ठेवले आहेत. दाते-कर्वे यांच्या 'महाराष्ट्र शब्दकोशात' तुकारामांच्या 'उन्मळी त्या भावें विमळार्जुन' या ओळीचा संदर्भ देऊन 'विमलार्जुन' = एक दैत्य, असा अर्थ दिलेला आहे.
- असे हे अनुवाद व अर्थ पाहिले की, नारदांनी शापलेले ते कुबेरपुत्र खरोखरच किती मद्यधुंद होते, याची खात्री पटते.
- पण 'घोटाळस्य उपरि गोंधळ: संवृत्त:' अशा या प्रकारांची आपण थोडी चिकित्सा करू. कदाचित त्यातून काहींचा उलगडाही होईल.
- मूळचे 'यमलार्जुन' विमल (ळा) र्जुन झाले आहेत, यात काहीच आश्चर्य नाही. मात्र 'विमलार्जुनाशी' ध्वनिसाम्य असलेला हरिवंशातील एक उल्लेख पाहू, तो असा आहे-
उन्मळून पडलेले ते दोन अर्जुनवृक्ष पाहून, गोपजनांना फार आश्चर्य वाटले. ते म्हणाले, 'अहो बत न शोभेतां विमूलौ अर्जुनौ उभौ।' (श्लोक क्र० ३०) तेव्हा 'विमूल अर्जुन' व 'विमलार्जुन' यांतील ध्वनिसाम्य लक्षणीय आहे. अर्थात त्यावरून निष्कर्ष काढण्याची घाई नको.

पण अशा ध्वनिसाम्यामुळेच 'अणोरणीयान्' (अणो: अणीयान्) या औपनिषदिक (श्वेताश्वेतरोपनिषद् ३:२०, गीता ८.९) वर्णनाचे तुकारामांच्या अभंगात 'अणुरणीया थोकडा' असे रूपांतर झालेले सहज आठवते. (तुकाराम - शा०गा० क्र० ९९३)
भागवतामध्ये कुबेरपुत्रांची नावे 'नलकूबर आणि मणिग्रीव' अशी स्पष्टपणे दिलेली आहेत (१०.१०.९४). पण त्याजबरोबर एके ठिकाणी 'नलकूबर' हे एकच नाव लक्षणेने दोन्ही पुत्रांना उद्देशूनही योजले आहे (१०.१०.४२). (मात्र या श्लोकात 'नलकूबर' हे संबोधन एकवचनी व अन्यपदे द्विवचनी असल्यामुळे अन्वय लावण्याचे काम फार दुर्घट झाले आहे.)
- कुबेर (पितृनाम) व नलकूबर (पुत्रनाम) यांतील ध्वनिसाम्य असणार्याय घटकांमुळे मराठीतले अन्य घोटाळे संभवलेले दिसतात.
- आता थोडी वृक्षनामांची चर्चा करू. कारण चक्रधरनिरूपित श्रीकृष्णचरित्रात, 'अर्जुन म्हणजे अंजनवृक्ष' असे म्हटले आहे; तर कानडे-नगरकरांनी विमलार्जुन म्हणजे 'पांढर्या् रंगाचा अर्जुनवृक्ष' असा अर्थ दिला आहे.
वनस्पतिशास्त्रामध्ये 'अर्जुन' व 'अंजन' या दोन्ही वृक्षांची स्वतंत्र माहिती मिळते. अर्जुन म्हणजे 'अर्जुनसादडा' या नावाने ओळखला जाणारा एक उंच वृक्ष. सुमारे २४ मीटरपर्यंत उंच वाढणार्याक या वृक्षाची साल जाड, गुळगुळीत, हिरवट पांढरी वा क्वचित लालसर असते. ती औषधी आहे. लाकूड इमारतीसाठी उपयोगी असते. अंजन (अंजनी) याची उंची ३५ मीटरपर्यंत वाढते. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे रेल्वेच्या रुळांखालील स्लीपर्ससाठी ते वापरतात. अन्यही उपयोग आहेतच. असे हे दोन वृक्ष वनस्पतिशास्त्रदृष्ट्याही वेगवेगळ्या वृक्षकुळातील आहेत. अर्जुनवृक्ष 'काँब्रेटेसी' या वृक्षकुलातील असून 'अंजनवृक्ष' 'लेग्युमिनोजी' या कुलातील आहे. (मराठी विश्वकोश खंड १, संबद्ध नोंदी)

आता येथे अर्जुनवृक्षाच्या सालीचे जे दोन वेगवेगळे रंग सांगितले आहेत त्यावरून 'पांढर्या रंगाचा अर्जुन' वृक्ष असा विमळार्जुनाचा अर्थ केला असावा काय? या अर्थाला उद्बोधक असा एक कोशगत अर्थ देतो. दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात अर्जुन (वृक्ष) म्हणजे, 'अर्जुनसादडा-साताडा; पांढरा ऐन' याचा पांढरा डिंक औषधी आहे. हे झाड कोकणात होते.... अशी माहिती येते. 'अर्जुन' हे विशेषण 'पांढरा' अशा अर्थीही येते. तेव्हा या माहितीच्या संशयाचा फायदा कोशकर्त्यांना द्यायला हरकत नाही.
पण तरीही एक रुखरुख राहतेच. कानडे-नगरकरांनी नामदेवाच्या सार्थ गाथ्यात 'विमलार्जुन' या शब्दाचा 'यमलार्जुन' हा पाठभेद नोंदला आहेच. मग या दोहोंमधील ध्वनिसाम्य सोडून हे जंगलात कशाला गेले?

- अर्जुन व अंजन हे वेगवेगळे वृक्ष. स्वाभाविकच 'अर्जुन भणजे अंजनवृक्ष' ही चक्रोधरोक्त माहिती शास्त्रीय दृष्ट्या प्रामादिक ठरते. कदाचित अंजनवृक्षाचे सापेक्ष वैपुल्य लक्षात घेता हा उल्लेख आलाही असेल. म्हणून तर चक्रधरांनी नारदाला बसविले आहे ते अंजनवृक्षाखालीच.
(या संदर्भात गोविंदाग्रजांच्या श्रीमहाराष्ट्र गीतामधील 'अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा' ही गौरवपंक्ती आठवावी.)
आणखी एक मुद्दा जसा की, झाडांबद्दलची शास्त्रीय माहिती वेगळी व लोकसमजूत वेगळी- असाही प्रकार संभवतो.
या लोकसमजुतीमुळे 'यमलार्जुन' हाही एक राक्षस झाला नाही का? त्याच उल्लेखांचा आता परामर्श घेऊ.
भासाच्या बालचरितातील गोपकृत वर्णनात याचे चांगले प्रतिबिंब उमटले आहे. या वृक्षोन्मूलन प्रसंगापूर्वी कृष्णावर अनेक संकटे येऊन गेली होती. (उदा० पूतना, तृणावर्त, गाडा उलटणे.) त्यांतून तो दैवयोगानेच सुटला अशी गोकुळातील सामान्य गोपजनांची श्रद्धा होती. त्यांच्या दृष्टीने ही संकटे म्हणजे राक्षसच होते. म्हणून तर भासाच्या नाटकातील गोप यमलार्जुनांना राक्षस म्हणतो.
याच भूमिकेतून तुकारामांच्या पूर्वोक्त (अ०क्र० ४५१९) या अभंगाकडे वळू या. तेथे 'रिठा रगडिला, कागबग भारले व त्याच 'भावें' विमलार्जुन उन्मळीले' - असा उल्लेख येतो. तुकारामांच्या दृष्टीनेही जसा रिठासुर, कागासुर, बकासुर तसाच हा विमलार्जुनही एक असुरच आहे.

हा रिठासुर कोण? हा नामदेवांच्या अभंगातही भेटतो. (शा०गा० क्र० १७७) भागवती कथेत अरिष्टासुर आहे व तो वृषभरूपाने आलेला आहे. (भागवत १० क्र० ३६). नामदेवांच्या उपरोक्त अभंगातही असेच वर्णन आहे. चक्रधरोक्त श्रीकृष्णचरित्रात रिठासुर (प्रसंग ५) व अरिष्टासुर (प्रसंग १९) हे दोघेही स्वतंत्रपणे आले आहेत. बकासुर भागवती कथेत आहे. (स्कंध १०, अ० ११), कागासुर हा मात्र लोकसमजुतीतला. हा चक्रधरोक्त श्रीकृष्णचरित्रातही भेटतो (प्रसंग ११).
रिठासुर हाही लोककथांतीलच आहे. 'रिठा' हा शब्द सं० अरिष्ट या शब्दावरून आला. खेडेगावात अजूनही या रिठ्याच्या फळांचा उपयोग साबणाऐवजी कपडे धुण्यासाठी करतात. (मनुस्मृतीमध्ये कोणती वस्त्रे कोणत्या फळांनी स्वच्छ करावीत हे सांगताना 'कुतपानां अरिष्टकै:।' असा उल्लेख आला आहे. (मनु० ५.१२०) 'कुतप' म्हणजे लोकरीचे वस्त्र.) या रिठ्याच्या फळांमध्ये कठीण व काळ्या बिया असतात. लहान मुलाला दृष्ट लागू नये म्हणून या बियांची माळ त्याच्या गळ्यात घालतात. कृष्णाच्या गळ्यात अशीच एक माळ घातलेली होती. तीमधील एका बीमध्ये एक असुर दडून बसला होता. कृष्णाने त्या रिठ्यामधील बी) दाढेखाली रगडली व त्या असुराला ठार मारले. (पाहा - श्रीचक्रधरोक्त श्रीकृष्ण चरित्र-सं० रा०चिं० ढेरे, प्रस्तावना पृ० २६)
अशा या लोकसमजुतींवर आधारित कथा. भागवतात त्यांना आधार नाही, हे सरळच आहे. परंतु ज्याप्रमाणे शास्त्रीय सत्य वेगळे व लोकसत्य वेगळे, त्याचप्रमाणे भक्तीचे परिणत सात्त्विकक रूप वेगळे व लोकसंस्कृतीमधील श्रध्देय रूप वेगळे.
प्राचीन मराठी काव्यातील शब्दांचा विचार करताना, अशी अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात; एवढाच या उचापतीचा निष्कर्ष.