कोळीण घरवाते खडाइली

श्रीचक्रधरांचे वास्तव्य खडकुली (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) येथे होते. येथे गोदावरी आणि शिवना या दोन नद्यांचा संगम आहे. या दोन नद्यांच्या मधला जो खडकाळ भूप्रदेश आहे त्याला खडकुली म्हणतात. नाथसागर धरणामुळे ते आता बेट झाले आहे. येथेच श्रीचक्रधरप्रभूंनी पंथाचे प्रथम आचार्य श्रीनागदेवाचार्य यांना दीक्षा दिली. म्हणून हे स्थान पंथात अतिशय पवित्र - महास्थान - मानले जाते.

श्रीनागदेवाचार्य हे श्रीचक्रधरांना अनुसरू नयेत यासाठी त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरू रामदेव दादोस वडनेरकर यांनी प्रयत्न केला. ते श्रीचक्रधरप्रभूंना म्हणाले,
“'जी: जी: हा नागदेवो गोसावीं आपणयापासिं
राहों नेदावा जी: ........ जी: जी: हा नीका नव्हे:
हा अमेगा धांडाळांचा असे : हा गोसावियांचे काही
आइकैल : आणि पैर्हा जाऊनि भडभडैल:”
यावर श्रीचक्रधरप्रभू म्हणाले,
“तैसें एथ काइ गा असे: मां पैर्हाा जाऊनि भडभडैल:”
यावर निरूत्तर झालेले दादोस वेगळा मुद्दा काढीत म्हणाले.
“'एर गोसावीयांचे यासि काइ चलो हेले असे:”
यावर श्रीचक्रधरप्रभू म्हणाले,
“न चलों कां गा: ......... मां पैर्‍हा जाऊनि एणें
कोळिणी घरवातें खडाइली तरि काइ:”
(लीळाचरित्र, उत्तरार्ध, लीळा क्र० १)
येथे 'घरवात खडाईणे' असा शब्द आला आहे. त्याचा अर्थ शेवटी शब्दकोशात खडाइणे = प्रपंच चालविणे, नांदणे असा दिला आहे. तो अगदीच अनुमानाने दिला आहे. तो अचूक नव्हेच. शं०गो० तुळपुळे यांनी खडावणे = घेऊन जाणे, अपहरण करणे असा अर्थ दिला आहे. (लीळाचरित्र, हा उत्तरार्ध भाग १, शब्दकोश, पृ० १८९) हा अगदीच दूरचा वाटतो.
विदर्भ संशोधन मंडळ वार्षिकाचा १९८६चा अंक चाळत असता कुसुम पटोरिया या विदुषींचा 'मृच्छकटिकातील देशी शब्द' हा लेख वाचण्यात आला. त्यांनी 'खडआई' या शब्दाविषयी विवेचन केले आहे. ते असे :
“खडआइं (पृ० ४१२) कंगनासाठी हा शब्द आहे.
माझ्या माहितीप्रमाणे व्रज आदी भाषेत
हाताच्या आभूषणासाठी संभवत: कंगनासाठीच
'खडुआ' शब्दाचा प्रयोग होतो.”
खडआइ, खडुआ हा कंगन, काकण वा बांगडी या अर्थी शब्द आहे. संस्कृतमधील कटक आणि मराठीतील कडे या शब्दांची येथे आठवण होते. कटक हा शब्द रघुनाथ पंडिताच्या 'नळदमयंती स्वयंवर' या काव्यातील
वधूनी माझी हे कनकरूपकाया
कटकमुकुटादिक भूषणें कराया
या श्लोकात भेटतो.

तेव्हा कटक, कडे, खडुआ, खडआइं हे कंगन, बांगडी या अर्थाचे शब्द आहेत हे निष्पन्न होते आणि खडाइणे म्हणजे काकणे घालणे, बांगड्या भरणे असा अर्थ प्राप्त होतो. हा अर्थ हिंदी प्रदेशात सर्रास रूढ आहे. माझे एक मित्र डॉ० चंद्रशेखर गुप्त (भूतपूर्व प्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग, नागपूर) हे आपल्या पत्नीसाठी बांगड्या घेत होते. पत्नीची बहीणही सोबत होती. गुप्तजींनी तिच्यासाठीही बांगड्या घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांची पत्नी आपल्या बहिणीला म्हणाली, 'देख! तेरे जीजाजी तुझे चुडियाँ पहिना रहे है।' तिने फणकार्या ने बांगड्या घेण्यास नकार दिला. कुठलाही धार्मिक विधी न करता लग्न करणे या अर्थी बांगड्या भरणे हा विधी होतो. 'कडी पहनाना' म्हणजे लग्न करणे हा भाग 'सगीना' आणि 'पाकिजा' या चित्रपटांतही आला आहे. तेव्हा नागदेवाचार्यांनी 'कोळिणी घरवाते खडाइणे' म्हणजे तिला बांगड्या भरून पत्नी बनवणे असा अर्थ प्राप्त होतो.

ब्रह्मानंद देशपांडे

संदर्भ
१. लीळाचरित्र, सं० वि०भि० कोलते, आवृत्ती तिसरी, विश्वशांती प्रकाशन, औरंगाबाद. १९९७
२. लीळाचरित्र, उत्तरार्ध भाग १ ला, सं० शं०गो० तुळपुळे, सुविचार प्रकाशन, नागपूर. १९६७