संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर
नीलिमा गुंडी
अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.
या कार्यक्रमांची सुरुवात बहुधा शारदास्तवनाने होते. सुरुवातीला जर 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' या संस्कृत श्लोकाचे गायन असेल, तर त्यातील 'या शुभ्रवस्त्रावृता'चे अनेकदा 'या शुभ्रवस्त्रामृता' असे उच्चारण होते. आणि 'जय शारदे वागीश्वरी' हे शांता शेळके यांचे गीत असेल, तर त्याचे उच्चारण बऱ्याचदा 'जय शारदे वागेश्वरी' असे कानी पडते. अशा वेळी श्रोत्यांची सहनशीलता हीच त्यांच्या रसिकतेची कवचकुंडले ठरतात.
जाहीर कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोकप्रिय होत आहे. मात्र अनौपचारिक कशाला म्हणायचे, हा प्रश्नच आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषाविवेक न गमावलेली सहजता अपेक्षित असते. तशा सहज प्रसन्न भाषेचा वावर हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. भाषेचा नेटका, नेमका वापर करण्यातून सांस्कृतिक श्रीमंती व्यक्त होत असते. मात्र जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्षात घडते ते असे : प्रत्येक वक्ता आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावरील सर्वांची लांबचलांब विशेषणे वापरून नामावली घेण्याची औपचारिक परंपरा अजिबात सोडत नाही. प्रत्येक निमंत्रितामागे श्री०/श्रीमती/प्रा०/डॉ० अशा उपाधी हव्यातच, अशी सर्वसाधारण समजूत दिसते. त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा काहींना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल होत असते. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' हे किताब उपाधीसारखे वापरायचे नसतात, या संकेताचेही सहज उल्लंघन होत असते.
अनौपचारिक शैलीत पाहुण्यांचा परिचय करून देणारा वक्ता पाहुण्यांशी आपले फोनवरून कधी नि कोणते संभाषण झाले, पाहुण्यांशी आपली पहिली गाठभेट कशी झाली, त्या वेळी त्यांनी आपले आदरातिथ्य कसे केले, अशी साग्रसंगीत ओळख जाहीरपणे करून देतो. मनात येणारा प्रत्येक विचार कसलाही आडपडदा न बाळगता श्रोत्यांना तत्काळ सांगून टाकणे म्हणजे अनौपचारिक बोलणे, अशी काहींची समजूत असते. यामध्ये काही वेळा पाहुण्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्व सांगायचेच राहून जाते! याउलट औपचारिकपणे ओळख करून देणाऱ्याचा मार्ग दुसऱ्या टोकाचा असतो. तो म्हणजे पाहुण्यांनी दिलेला 'बायोडेटा' यांत्रिकपणे वाचून दाखवण्याचा! त्यामुळे पाहुण्यांचा जन्म कोठे झाला, त्यांना प्राथमिक शाळेत कोणती बक्षिसे मिळाली... इथपासून आजपर्यंतचे त्यांचे सारेच कर्तृत्व जाहीर केले जाते. अशा वेळी शहाणा पाहुणा संकोचून जातो. या परिचयप्रसंगी पाहुण्यांचे नावच न आठवणे, ते चुकीचे उच्चारले जाणे इत्यादी विविध प्रसंगनिष्ठ विनोद कधी कधी घडत असतातच. व्यासपीठावर उभे राहून बोलताना पूर्वतयारीशिवाय बोलल्यावर ते भाषण आपोआप उत्स्फूर्त आणि सहज ठरते, अशी (गैर)समजूत त्यामागे असते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यातील काही सूत्रसंचालकांनी भाषेचा मुक्तपणे केलेला वापर ही होय. सूत्रसंचालक हे जणू शब्दजीवी पात्र असते. या 'सुसूत्र' पात्राचा व्यासपीठावरील संचार गेली काही वर्षे अनिर्बंधपणे सुरू आहे. पूर्वी संगीताच्या कार्यक्रमांना निवेदक असत. गायकांना कार्यक्रमात मध्येमध्ये विश्रांती मिळावी आणि गीतकार, संगीतकार, इत्यादींची माहिती श्रोत्यांना व्हावी म्हणून निवेदकाने भाष्य करणे योग्य असते. पण आता कोठल्याही कार्यक्रमांना-चर्चासत्रांनाही-सूत्रसंचालक असतोच. एकेकाळी निवेदक व्यासपीठावरील जागा न अडवता कार्यक्रमाची सूत्रे सांभाळण्याचे काम अदबीने करीत असे. आता मात्र सूत्रसंचालक ही सर्वांत मोठी असामी असते. सूत्रसंचालकाचा भूतलावरचा वावर आता त्रिखंड हिंडणाऱ्या नारदाशीच तुलना करण्याजोगा ठरावा! (हल्ली लग्नसमारंभातही सूत्रसंचालक संचार करू लागला आहे!)
सतत बोलत राहणे (तेही लाडिकपणे!) आणि ऊठसूट श्रोत्यांकडून टाळ्यांची मागणी करणे, हे आपले काम असल्याची सूत्रसंचालकाची प्रामाणिक समजूत असते. अशा वेळी वाटते, एखाद्या उत्तम कलाविष्कारानंतर सभागृह क्षणभर अवाक् होते, हीदेखील कार्यक्रमाविषयी अनुकूल प्रतिक्रिया देण्याची प्रगल्भ रीत असू शकते, यावर आता आपला विश्वासच उरला नाही का? सूत्रसंचालकामुळे काव्यवाचनाच्या कार्यक्रमात काही वेळा एकाच वेळी दुहेरी मैफल चालू राहते. एक मैफल असते प्रत्यक्ष उपस्थित असणार्या कवींच्या कवितांची आणि दुसरी असते प्रत्येक कवीनंतर सूत्रसंचालक वाचून दाखवत असलेल्या कवितांची! पूर्वी रविकिरण मंडळाच्या काळी जेव्हा काव्यगायनाच्या जाहीर कार्यक्रमांना मागणी होती, तेव्हा आवाज नसलेल्या गायक कवींची श्रोत्यांनी व्यासपीठावरून सदेह उचलबांगडी केल्याच्या वार्ता वाचायला मिळत. त्यामानाने सूत्रसंचालकांच्या लीलांविषयी आजचा रसिकवर्ग फारच सोशिक व उदार दिसतो आहे!
कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचा उपचार असतो. आपण कार्यक्रमपत्रिकेत 'आभारप्रदर्शन' असे म्हणून मुळातच 'प्रदर्शना'ला वाव ठेवलेला असतो. त्यामुळे निरर्थक शब्दांचे बुडबुडे कानी पडतातच! हल्ली बोली भाषेतील एकारान्त शब्दाऐवजी अनुस्वारान्त शब्द वापरण्याची लकब आभारप्रदर्शनातही दिसू लागली आहे. त्यामुळे कधी कधी 'यांचे आभार' याऐवजी 'यांचं आभार' असा शब्दप्रयोग कानी पडतो. [आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान असले तर त्यामध्ये 'दुरिताचे तिमिर जावो' (पापकृत्याचा, पापाचा अंधार दूर होवो) याऐवजी हटकून 'दुरितांचे तिमिर जावो' असे ऐकू येते!] अशा वेळी वाटते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलावे (खरे तर कसे बोलू नये!) हे शिकविणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याची नितांत गरज आहे. शब्दांचे अवमूल्यन ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. त्या बाबीकडे वेळीच गंभीरपणे पाहायला हवे. नाहीतर 'औचित्याची ऐशीतैशी' अशी परिस्थिती सार्वजनिक भाषावापराबाबत सार्वत्रिकच होईल.