पुढादीगणातील शब्द

पुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.
मराठी नामिकांची१ म्हणजेच सलिंगसवचन शब्दांची घराचा, बागेभोवती अशी रूपे पाहिली (सलिंग शब्दांनाच वचनाचा विकार होतो) तर त्यांची रचना [(सलिंग शब्द + (विकरण) + उत्तरयोगी (प्रत्यय/शब्दयोगी)] अशी आढळते. ह्यांपैकी काही प्रत्यय आणि शब्दयोगी हे सलिंग नसणार्यान पुढ्सारख्या शब्दांनाही लागलेले आढळतात. उदा० पुढपर्यंत, पुढवर, पुढे, पुढून इ० उदाहरणांत पर्यंत, वर, ए, ऊन हे प्रत्यय / उत्तरयोगी पुढ्सारख्या शब्दांना लागलेले आहेत. घरापासून, शाळेपाशी ह्यांतील पासून, पाशी असे काही शब्दयोगी हे मुळात ह्याच गटातल्या शब्दांपासून बनलेले दिसतात. उदा० पास् = > पासून, पाशी, पासचा इ०

पुढादीगणातील शब्दांची वैशिष्ट्ये

ह्या शब्दांचा एक गट करून ह्या शब्दांना 'पुढादीगणातले शब्द' असे नाव देता येईल. ह्या गणातील शब्दांची काही वैशिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. हे शब्द अलिंग असतात. आपल्याला असे विधान करता येणे शक्य आहे कारण एरवी एखाद्या शब्दाचे लिंग कळण्यासाठी तो शब्द आणि क्रियापदाशी आणि अन्य पदांशी त्याच्या रूपाची जुळणी ह्यावरून आपल्याला लिंगाची जाणीव होते. उदा० काळा घोडा, पांढरी गाय, घोडा पळाला, गाय चरते. अशा रूपाला प्रथमेचे रूप किंवा सरळ रूप असे म्हणतात. पण ह्या पुढादीगणातल्या शब्दांची रूपे अशी थेट प्रथमेतील नसतात. त्यांची प्रथमेतली रूपे अन्य घटक (शब्दसिध्दीचा सलिंग प्रत्यय उदा० आ > पुढ् + आ = पुढा) मध्ये येऊन तयार होतात.
२. हे शब्द स्थान वा दिशा ह्यांचे वाचक असतात. पुढे इ० शब्दांची पुढ् + ए अशी फोड होते. ह्यातील ए हा प्रत्यय अधिकरणार्थी आहे आणि त्याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी असा होतो. हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो प्रत्ययाआधीचा पुढ् हा शब्द ते विशिष्ट स्थान वा दिशा कोणती आहे ते सांगतो.
३. ह्यांना वेगवेगळे प्रत्यय लागून नामिके आणि अव्यये तयार होतात. उदा० खाली, खालचा, वरले, मागची.
४. ह्यांपैकी काही रूपे नामिक शब्दांच्या पुढे (सामान्य रूपांपुढे) येतात. त्यांना अशा वेळी शब्दयोगी ह्या गटात घालता येते. उदा० दारासमोरून, वाडयापुढे इ०

पुढादीगणातील सिद्ध आणि साधित शब्द

पुढगणातील शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन वर्ग करता येतात.
१. सिद्ध शब्द : ह्या शब्दांची आणखी अवयवांत फोड होत नाही. ह्या गणात पुढील शब्द आढळतात.
अ) पुढ्, माग्, कड् : पुढे, मागे, कडे
आ) खाल्, पाठ् : खाली, पाठी
इ) वर्, बाहेर्, समोर्, लांब्, जवळ, आत्, आड् :
२. साधित शब्द : ह्या शब्दांची, अवयव वेगळे करीत, अजून फोड करता येते.
अ) जतकहची रूपे : एरवी सर्वनामांची आणि सार्वनामिक विशेषणे म्हणवणार्याआ शब्दरूपांपैकी काही रूपेही ह्या गटात घालता येतात. ह्या शब्दरूपांतही एक आकृतिबंध आढळतो. ह्या शब्दरूपांच्या आरंभी ज्, त्, क्, ह् हे विशिष्ट दिशावाचक / निर्देशी अवयव आढळतात. म्हणून ह्या रूपांना जतकहची२ रूपे म्हटले आहे.
क) ज् : पूर्वनिर्देशी वा उद्देशवाचक : उदा० जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
ख) त् : उत्तरनिर्देशी वा दूरत्वनिर्देशी : तिथून पाणी आणावे लागेल.
ग) क् : प्रश्ननिर्देशी : ही बस कुठपर्यंत जाणार आहे?
घ) ह : समस्थानकालनिर्देशी : इथला माल जगभर विकला जातो.
जिथ्, जेथ्, तिथ्, तेथ्, इथ्, येथ्, (एथ्), कुठ्, कोठ् ह्या शब्दरूपांना पुढ् इ० प्रमाणेच प्रत्यय लागून रूपे बनतात.
ज् + एथ् = जेथ् : जेथे, जेथून, जेथील
त् + एथ् = तेथ् : तेथे, तेथून, तेथील
क् + ओठ् = कोठ् : कोठे, कोठून, कोठील
ह२ + एथ् = येथ् : येथे, येथून, येथील
आ) कड्ची रूपे : कड् ह्या पुढगणातील शब्दाच्या आधी काही घटक येऊन ही रूपे तयार होतात. उदा० इकड्, तिकड्, सगळीकड् इ० ह्यांना मग अधिकरणाचे इ० प्रत्यय / उत्तरयोगी लागून इकडे, तिकडे, सगळीकडून अशी रूपे तयार होतात. ह्यात कडच्या आधी काहीएक घटक आलेलाच असतो. निव्वळ कडे, कडून असा प्रयोग आढळत नाही. जतकह हे वर उल्लेखलेले अवयवही कड्च्या आधी येतात आणि ज + इ + कड् > जिकड्, तिकड्, इकड्, कुणीकड् अशी रूपे घडतात.
काही सलिंग विशेषणांच्या (शेवटी स्वर असल्यास) शेवटच्या स्वराला ईचा आदेश होऊन आणि ती व्यंजनान्त असल्यास त्यांना ई लागून त्यापुढे कड् येऊन काही रूपे बनतात. ही रूपे क्रियेचे स्थान दाखवतात. उदा०
सगळा > सगळी + कड् = सगळीकड् तिसरा > तिसरी + कड् = तिसरीकड्
वेगळा > वेगळी + कड् = वेगळीकड् सारा > सारी + कड् = सारीकड्
डावा > डावी + कड् = डावीकड् (ऐल्) > अली + कड् = अलीकड्
उजवा > उजवी + कड् = उजवीकड् (पैल्) > पली + कड् = पलीकड्
भलता > भलती + कड् = भलतीकड् एक > एकी + कड् = एकीकड्
दुसरा > दुसरी + कड् = दुसरीकड्
इ) पास्ची रूपे : पास् ह्या शब्दाला ई लागताना शेवटच्या सकाराचा शकार होतो आणि पाशी असे रूप तयार होते. तसेच ह्या शब्दाला ऊन लागून पासून असा शब्द तयार होतो. हे शब्द पहिल्या गटातल्या शब्दाच्या पुढे येतात. आणि पुढपासून, जिथपासून अशी रूपे तयार होतात.

लागणारे प्रत्यय

पुढगणातील वर सांगितलेल्या शब्दरूपांपासून काही अधिकरण हा कारक संबंध असलेली रूपे बनतात तर काही विशेषणे वा कर्तृपदेही तयार होतात.
ए/ई : हे दोन्ही अधिकरणार्थी प्रत्यय आहेत. ह्या प्रत्ययांचा अर्थ ही क्रिया अमुक स्थानी घडली असे दाखवतो. 'मी घरी आलो' ह्यात येण्याची क्रिया 'घर' ह्या स्थानावर झाली असा अर्थ व्यक्त होतो.
खाल्, पाठ् ह्या शब्दांना ई हा प्रत्यय वरील अर्थानेच लागतो आणि खाली्, पाठ् अशी शब्दरूपे घडतात.
वर, समोर, बाहेर्, आत् ह्या शब्दांत ई ह्या प्रत्ययाचा लोप होतो (आत् ह्या शब्दाचा अपवाद वगळता वरी, समोरी, बाहेरी अशी रूपे जुन्या ग्रंथांत आढळतात.)
ऊन : हा प्रत्यय अपादानार्थी आहे. तो पुढगणातल्या शब्दांना थेट लागतो. उदा० पुढून, मागून, वरून, खालून, आतून, बाहेरून, आडून, इकडून, तिकडून, जिकडून, कुठून, कोठून, डावीकडून, उजवीकडून, सगळीकडून, वेगळीकडून, भलतीकडून, एकीकडून, दुसरीकडून, तिसरीकडून, सारीकडून, पलीकडून, अलीकडून.
पास् ह्या शब्दाला ऊन लागून 'पासून' असे रूप बनते. ते केवळ उत्तरयोगी म्हणूनच वापरतात आणि ते काही पुढगणांतल्या शब्दांनाही लागते. पुढपासून, मागपासून, वरपासून, खालपासून, इथपासून, तिथपासून, जिथपासून, कुठपासून, आतपासून, बाहेरपासून, घरापासून इ०
नाम, धातू इ० शब्दांची निर्मिती
पुढादीगणातील शब्दांपासून काही धातू तसेच काही सलिंग शब्दही तयार होताना दिसतात. पण ही प्रक्रिया घडताना ती आधी उल्लेखिलेल्या रूपांइतकी सार्वत्रिक नाही असे दिसते.
सलिंग प्रत्ययाचा लोप होऊन तयार होणारे सलिंग शब्द
माग (पू) : ह्या शब्दाचा अर्थ मागे राहून हुडकून काढण्याची क्रिया असा होतो.
पाठ (स्त्री) : शरीराच्या मागचा अवयव

साधित धातू

१. पुढार् (पुढ् + आर्) : पुढे होण्याची क्रिया. ह्यापासून पुढारतो इ० धातुरूपे तसेच पुढारलेला, पुढारणे, पुढारी, पुढारपण इ० धातुसाधित नामिके घडतात. तसेच पुढे असण्याची क्रिया म्हणजे पुढाकार (पु), पुढली बाजू म्हणजे पुढा (पु) हे शब्दही घडलेले आढळतात.
२. मागास् (माग् + आस्) : मागे पडणे, मागासले, मागासलेला, मागासणे इ०
३. खालाव् (खाल् + आव्) : खाली येणे (लक्षणेने : गुणवत्ता घसरणे). खालावते, खालावलेले.

संदर्भसूची

अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास. १९८७. मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; सुलेखा प्रकाशन, पुणे.
दामले, मोरो केशव. १९७०. शास्त्रीय मराठी व्याकरण; (संपा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर), देशमुख आणि कंपनी; पुणे
धोंगडे, रमेश वामन. १९८३. अर्वाचीन मराठी : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे

ई-पत्ता : sushant.devlekar@gmail.com
भ्रमणभाष : 097698 35310
------------
टिपा :
१) 'नामिक' ही संज्ञा कृ०श्री० अर्जुनवाडकर ह्यांनी वापरली आहे. लिंग आणि वचनाचा विकार होणार्या), तसेच धातू आणि अव्यये ह्यांपासून वेगळया अशा शब्दांसाठी त्यांनी ही संज्ञा वापरली आहे.
२) जतकहची इतर रूपे : जो, जेव्हा, जिथला, जिथे, जेथे, जितका, जेवढा, जितपत, जोवर, जसा, जितवा, तो, तेव्हा, तिथला, तिथे, तेथे, तितका, तेवढा, तितपत, तोवर, तसा, हा, एव्हा, इथला, इथे, येथे, इतका, एवढा, इतपत, असा, कोण, केव्हा, कुठला, कुठे, कोठे, कितका, केवढा, कितपत, कसा, कितवा.
३) इथे आकाराव्यतिरिक्तचा स्वर पुढे आल्यास हकाराचा लोप होतो. तसेच ए ह्या स्वराआधी य् हा वर्ण येऊन ये असे अक्षर येते. लेखनात ही यकारयुक्त रूपेच वापरतात. उदा० येथे, येथला, येथचा इ०