‘ण’ की ‘प’?

मेघना सामंत

आमच्या मालवणी प्रकारच्या माशांच्या आमटीची कृती एका मित्राला सांगत असताना एक गंमत लक्षात आली. मी सांगत होते, "वाटपात अमुक अमुक घालायचं... मग वाटप उकळायचं..."तर तो अडवून म्हणाला, "वाटप काय वाटप? वाटण म्हणायचंय ना तुला?" एक क्षण मला गोंधळायला झालं. कारण आई-आजी सगळयांच्या तोंडी वाटप, वाटपाची तयारी, वाटपाची आमटी हेच शब्द ऐकलेले, मग वाटप हा शब्द चुकीचा कसा? तितक्यात हा मित्र म्हणतो कसा, "वाटप म्हणजे बक्षीस वाटप किंवा वह्यावाटप, धान्यवाटप, खातेवाटप वगैरे आणि तुला म्हणायचंय ते वाटण."आमच्यात वाटपच म्हणतात असं मी ठासून सांगितलं खरं, पण मग थोडं विचारचक्र सुरू झालं. आमच्या भागात दळणाला सर्रास दळण म्हणतात. ‘आमच्या येथे सर्व प्रकारच्या धान्याचे दळप व कांडप करून मिळेल’ अशी पाटी मी कोल्हापुरात कुठेतरी बघितलेली आठवली. त्यावरून कांडपीण हा शब्द आठवला. कांडपिणींवरून रांधपिणी आठवल्या. म्हणजे रांधप हा शब्द असणारच. तसाच वाढप (आणि वाढपी) हे शब्द तर चांगलेच प्रचारात असलेले. उसाचा ‘गाळप’ हंगामही वाचलेला आहे. अशाच प्रकारचा आणखी एक शब्द म्हणजे वाजप. हा फक्त सिंधुदुर्ग भागात ऐकायला मिळेल. याला प्रमाण-भाषेत बहुधा प्रतिशब्द नसावा. लग्नात वगैरे - ‘बहु गल्बला न करणे’ अशी सूचना देऊनही वाजंत्री जो गल्बला करतच राहतात तो म्हणजे वाजप.

यावरून एक गोष्ट लक्षात आली की काही ठरावीक क्रियापदांची ‘ण’ ऐवजी ‘प’ लावून केलेली नामंच आमच्या बोलीत रुजली असावीत. क्रियापद (वाटणे) एकच असून, ‘वाटप’ म्हटलं की वितरण आणि ‘वाटण’ म्हटलं की ओल्या चटणीसारखी, अनेक पदार्थांची एकत्र वाटून केलेली गोळी असं पुण्यामुंबईकडच्या भाषेने ठरवलं असलं तरी आम्ही बुवा वाटप हा शब्द वापरणारच.

ता० क० नुकताच आणखी एक ‘प’कारान्त शब्द सापडला - पाडप. हाही कोकणातलाच. माडांवरून नारळ उतरवायच्या कामाला पाडप म्हणतात.

सी-202, सॅटलाईट पार्क, गुंफा रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई 400 060
ई-पत्ता : askwhy.meghana@gmail.com