वर्ण आणि अक्षर

दिवाकर मोहनी

संदर्भ : 'शासनसंमत मराठी वर्णमाला', 'भाषा आणि जीवन' : वर्ष २८ अंक १ व २

प्रा० अर्जुनवाडकर ह्यांचा मुद्दा विचारणीय आहे. आपण उच्चार करताना बुङ्ढा, विट्ठल, सक्खा असाच करीत असतो. पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे; आपण नेहमी जसा उच्चार करतो तसे लिहीत नाही आणि आपण पूर्वीपासून जसे लिहीत आलो तसेच पुढेही लिहीत राहिल्याने आपले वाचन सुकर होत असते.

दुसरा मुद्दा असा की, आपल्या बोलीभाषा आणि संस्कृत ह्यांचे उच्चारच वेगवेगळे आहेत. आपल्या बोलीमध्ये म्हणजे देशज शब्दांमध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व करण्याचा प्रघात आहे. गप्पा, अप्पा, अण्णा, घट्ट, हट्ट, कच्चा, पक्का, हल्ला, किल्ला, पत्ता, गुत्ता, बत्ता असे उच्चार आम्हांला सहजपणे करता येतात. स्वास्थ्य, नि:स्पृहत्व, धृष्टद्युम्न असे शब्द आम्हांला प्रयत्नाने उच्चारावे लागतात.

एकाच व्यंजनाचे द्वित्व करावयाचे हे आमच्या मनात अगदी पक्के ठसले असल्यामुळे आम्ही महाप्राण व्यंजनांचेसुद्धा लेखनात द्वित्व करतो. तसा उच्चार करणे प्राय: अशक्य असले तरी! वाचनसौकर्यासाठी हा लेखनदोष स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते.

प्रा० अशोक केळकर ह्यांनी सुचविलेल्या रु, रू लाही तेवढ्याचसाठी माझा आक्षेप आहे. ज्या अक्षरांची आपल्या डोळयांना सवय झाली आहे ती मोडू नये ही एक गोष्ट आणि जुनी पुस्तकेही लोकांच्या वाचनात येत राहणार असल्यामुळे ह्या दोन प्रकारच्या अक्षरांचा डोळयांना त्रास होईल ही दुसरी. म्हणून लेखनात फरक करण्याऐवजी अक्षरांतील ऱ्हस्वत्वाच्या खुणा डावीकडे वळतात आणि दीर्घत्वाच्या उजवीकडे (रु, रू) हे वाचकाला एकदा नीट समाजवून देणे इष्ट असे माझे मत आहे. (बघा : मि मी, मु मू)

डॉ० केळकर ह्यांच्या पत्रात अर्धचन्द्र हा शब्द एकदा आला आहे; अर्धचन्द्र ह्या शब्दाला निराळा संदर्भ आहे. त्यांना तेथे 'चन्द्र' अपेक्षित आहे हे उघड आहे. कारण चन्द्र ह्या शब्दाने पौर्णिमेचा पूर्ण चन्द्र सूचित होत नाही. चन्द्राची चतुर्थीची किंवा पंचमीची कलाच सूचित होते. ( ॅ)

केवल-व्यंजनांच्या मालेला वर्णमाला म्हणणे आणि सस्वर-व्यंजनांच्या मालेला अक्षर-माला म्हणणेही चुकीचे आहे. आपल्या नागरी लिपीत ज्याचा उच्चार होऊ शकत नाही असे काहीही लिहिता येत नाही. केवल व्यंजनांचा उच्चार कोणालाही करता येत नाही. उत्, ऋक्, धिक्, वत्, विद् ह्या शब्दांतील व्यंजने मागच्या स्वराच्या आधाराने उच्चारली गेली आहेत. त्यांच्यापुढे स्वर आल्याबरोबर ती व्यंजने पुढच्या स्वराला जाऊन चिकटतात. उन्नयन, ऋक्साम, विद्वान्, सदसद्विवेक अशी त्यांची शेकडो उदाहरणे आहेत. एवढ्याचसाठी वर्णमाला क् ख् ग् घ् ङ् अशी कधीही लिहू नये. ती क ख ग घ ङ अशीच लिहावी. वाटल्यास उच्चारसौकर्यासाठी ती तशी लिहिली आहे असे सांगावे.

वर्ण हा अर्थशून्य असतो तर अक्षर हे अर्थपूर्ण असते. त्याचप्रमाणे 'वर्ण' हा समूहाचा एक घटक असतो. ख, भू ही वाक्यात वापरली तर 'अक्षरे' - क ख ग घ, भ भा भि भी भु भू हे वर्ण - हे जाणून जुन्या संज्ञा बदलू नयेत. मंत्र, वृत्ते ही सारी अक्षरसंख्येने ओळखली जातात, वर्णसंख्येने नाही!

गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440 010
भ्रमणभाष : 098819 00608